Category Archives: पर्यटन
रत्नागिरी – केरळच्या धर्तीवर सिंधुरत्न योजनेतून जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे या बोटी महिला बचतगट चालवणार आहेत. या सेवेचा लाभ पर्यटकांना लवकरच मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाऊसबोटींगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. महिला बचतगटांना ही हाऊसबोट चालवण्यास दिली तर महिलांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे.
यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनाऱ्यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो.पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु-रत्न योजनेतून निधी मिळणार असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
दोन्ही खाडीत काय पाहता येईल?
वेलदूर ते चिपळूण (३० ते ४० किलोमीटर) –
कांदळवन दर्शन, मगरसफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, डॉल्फिन दर्शन.
जयगड ते तवसाळ-भातगाव पूल (२२ किलोमीटर)
कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन, मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे, फिश मसाज, कोकणकलांचे दर्शन, बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्र
मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.
नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.
सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.











