Category Archives: शेती

सातबाऱ्यावर नाव नसलेले शेतकरीही शासकीय रेकॉर्डवर येणार

 

   Follow us on        

राज्यातील ज्या शेतकऱ्यांच्या नावांची नोंद सातबारा उताऱ्यावर किंवा इतर शासकीय कागदपत्रांवर उपलब्ध नाही, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे ज्या शेतकऱ्यांकडे तांत्रिक कारणांमुळे स्वतःच्या जमिनीचे अधिकृत पुरावे नाहीत, त्यांना आता शासकीय रेकॉर्डवर आणण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात पुढाकार घेत ही घोषणा केली आहे.


या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांच्या ‘अॅग्रिस्टॅक’ नोंदणीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे या शेतकऱ्यांना भविष्यात कर्जमाफीसह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळणे सुलभ होणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या कार्यवाहीसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले आहेत.


मंत्रालयात महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या विषयावर एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीला मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार निलेश राणे आणि आमदार दीपक केसरकर प्रामुख्याने उपस्थित होते. बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्याबाबत एकमत झाले.


देवस्थान, कबुलायतदार किंवा इनाम जमिनी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही शासनाने विशेष उपाययोजना आखली आहे. अशा शेतकऱ्यांनाही सर्व शासकीय सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी एक विशेष अर्ज किंवा फॉर्म तयार करण्यात येणार आहे. सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले की, पात्र शेतकऱ्यांची यादी तयार असून, ज्यांची ‘अॅग्रिस्टॅक’ नोंदणी होण्यास तांत्रिक अडथळे येत आहेत, त्यांच्याकडून पर्यायी कागदपत्रे घेऊन मार्ग काढला जाईल.


कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले की, राज्यातीव सर्व खऱ्या शेतकऱ्यांचा अचूक डेटा गोळा करून त्यांना अधिकृत रेकॉर्डवर आणणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर विशेष प्रयत्न केले जाणार आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी विदेशात जाण्याची संधी

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग नगरी येथील कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ ची राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र व प्रगतशील शेतकऱ्यांनी २० ऑगस्टपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

​या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया तसेच सेंद्रिय शेतीविषयक कार्य प्रत्यक्ष पाहण्याची आणि ज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये युरोप येथे फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दूधोत्पादन तर चीन येथे विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पो यांचा अभ्यास दौरा प्रस्तावित आहे.

​निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे शासकीय अनुदान दिले जाईल. उरलेला ५० टक्के खर्च शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीने (NEFT/RTGS/Cheque) संबंधित ट्रॅव्हल कंपनीकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.

​या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय २५ वर्षे पूर्ण असावे, तो मुख्य व्यवसाय शेती करणारा असावा आणि त्याच्याकडे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदार सरकारी किंवा निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कॉन्ट्रॅक्टर नसावा आणि कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस याचा लाभ दिला जाईल.

​जिल्हास्तरावर पात्र अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने वीडिओग्राफूसह सोडत काढून केली जाणार असून, यात किमान एक महिला शेतकरी आणि कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी यांचा समावेश अनिवार्य आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत.

कोकणात केली थायलंडच्या ‘जास्मिन राइस’ची यशस्वी लागवड

   Follow us on    

 

 

रायगड: पावसाचा लहरीपणा, अतिवृष्टी आणि नैसर्गिक अडचणींवर यशस्वी मात करत पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील प्रयोगशील ‘कृषी भूषण’ शेतकरी मिनेश गाडगीळ यांनी जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या थायलंडच्या ‘जस्मिन राइस’ची यंदा यशस्वी लागवड केली आहे. पूर्णपणे स्व-संशोधित सेंद्रिय द्रव्यांच्या जिरावर घेतलेला हा प्रयोग रायगडच्या कृषी क्षेत्रात विशेष चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.

​गेल्या वर्षी गाडगीळ यांनी थायलंडमधून जस्मिन राइसचे बियाणे मागवले होते. पहिल्या वर्षी विविध नैसर्गिक अडचणींचा सामना करत सुमारे दोन किलो भाताचे उत्पन्न मिळाले. यंदा याच धान्यापासून पुनरुत्पादन करण्याचे नियोजन त्यांनी केले. मात्र, यंदा मुळातच मान्सून लांबल्याने पेरणी वेळेत करता आली नाही. त्यानंतर सुरू झालेल्या धोधाम पावसामुळे रायगड जिल्ह्यात हाहाकार माजवला. नद्या, नाले आणि शेते तुडूंब भरल्याने अनेकांची पेरलेली धान्ये उगवली नाहीत, तर कमी प्रमाणात उगवली रोपे कुजून गेली.

​या काळात योग्य संधी साधत मिनेश गाडगीळ यांनी २२ जून रोजी पेरणी केली आणि सुरुवातीला बोरवेलच्या साहाय्याने पाणी दिले. अवघ्या चार ते पाच दिवसांत धान्य व्यवस्थित उगवून आले आणि त्यानंतर सुरू झालेल्या पावसाचा रोपांना मोठा फायदा झाला. सध्या भाताची नर्सरी अत्यंत उत्तम स्थितीत असून याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे.

​सुगंधी आणि आरोग्यदायी तांदूळ:

जस्मिन राइस हा जगातील सर्वाधिक सुगंधी तांदळांपैकी एक मानला जातो. हा तांदूळ पूर्णपणे झिरो ग्लुटन (Zero Gluten) असून त्यात फॅट्सचे प्रमाण अत्यंत अल्प असते. याशिवाय यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बोहायड्रेट्स, आयरन (लोह), मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-९ (फॉलिक एसिड) आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म मुबलक प्रमाणात आढळतात.

​योग्य नियोजन, चिकाटी आणि सेंद्रिय शेतीची जोड दिली तर प्रतिकूल हवामानातही परदेशी व उच्च दर्जाची पिके यशस्वीरीत्या घेता येतात, हे मिनेश गाडगीळ यांनी आपल्या या प्रयोगातून पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

या प्रयोगाबद्दल बोलताना मिनेश गाडगीळ म्हणाले, “कोणतेही रासायनिक खत न वापरता, केवळ मी स्वतः संशोधन केलेल्या सेंद्रिय द्रव्यांची फवारणी या पिकावर केली आहे. आता पुढे निसर्गाची अनुकूल साथ लाभल्यास यातून सुमारे १०० किलोपर्यंत शुद्ध बियाणे उपलब्ध होईल.”

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये! मान्सून दाखल पण…

   Follow us on    

 

 

मुंबई, दि. ८: मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र, त्यानंतर किमान १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा एकंदरीत जोर तसेच मान्सूनच्या प्रगतीचा वेग कमी होण्याची शक्यता हवामानाच्या सध्याच्या अंदाजातून दिसून येत आहे. त्यामुळे या कालावधीत राज्यात सर्वत्र समाधानकारक पावसाची शक्यता कमी आहे.

सध्याच्या हवामान अंदाजानुसार किमान १५ जूनपर्यंत विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दुपारनंतर ढग आणि विखुरलेल्या स्वरूपाचा मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस व्यापक क्षेत्रात पेरणीस पोषक ठरेल, अशी परिस्थिती अद्याप दिसत नाही.

दरम्यान, किमान १२ जूनपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये कमाल तापमान सध्याप्रमाणेच उच्च राहण्याची शक्यता आहे. विदर्भ व खानदेशात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक, तर मराठवाड्यात ३५ ते ४० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे.

कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना पुढीलप्रमाणे आवाहन करण्यात येत आहे :

आगामी वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये.

विजांच्या कडकडाटावेळी झाड, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ थांबणे टाळावे.

सावधान! ही चूक करू नका; नाहीतर तुमचा ‘फार्मर आयडी’ ५ वर्षांसाठी ब्लॉक; शासकीय योजना बंद

   Follow us on    

 

 

महाराष्ट्र: महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेअंतर्गत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २६ मार्च २०२६ रोजी घोषणा केली की, गाव नकाशावरील शेत किंवा पाणंद रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्या शेतकऱ्यांचा आधार लिंक्ड फार्मर आयडी पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येईल. यामुळे अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही.

सरकारने स्पष्ट केले आहे की, अतिक्रमण हटवण्यासाठी शेतकऱ्यांना सात दिवसांचा कालावधी देण्यात येईल. शेतकरी स्वेच्छेने जमीन दान करू शकतात, परंतु त्यांना ती जमीन नंतर परत मिळणार नाही. मात्र, नियमांचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी स्टॅम्प ड्यूटी माफ करण्याची तरतूद करण्यात आली आहे. भूसंपादन न करता स्वेच्छा दानावर भर देण्यात आला असून, नोंदणीकृत दानपत्र किंवा हक्कसोड पत्र आवश्यक ठरणार आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा हा निर्णय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतापर्यंत बारमाही, मजबूत आणि यंत्रसामग्रीने तयार केलेले पक्के रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी घेण्यात आला आहे.

यामुळे शेतमाल वाहतुकीतील अडथळे दूर होऊन कृषी उत्पादन वाढण्यास मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. ही योजना डिसेंबर २०२५ मध्ये मंत्रिमंडळाने मंजूर केली होती आणि त्यात १०० टक्के यांत्रिकीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी रस्त्यांचा विकास आवश्यक आहे आणि अतिक्रमण रोखण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी याबाबत जागरूक राहावे आणि स्थानिक महसूल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन सरकारने केले आहे. ही बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असून, ग्रामीण विकासाच्या दृष्टीने एक मोठा पाऊल मानले जात आहे.

 

 

‘सगुणा बाग’ ते राष्ट्रपती भवन: चंद्रशेखर भडसावळे यांच्या ​’शून्य-नांगरणी तंत्रज्ञांना’ ची मोठी दखल.

   Follow us on    

 

 

मुंबई/नवी दिल्ली:

भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष ‘ॲट होम’ (At Home) स्वागत समारंभासाठी महाराष्ट्रातील ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ आणि  सगुणा बाग’चे संस्थापक चंद्रशेखर हरी भडसावळे (कृषिरत्न) यांना विशेष निमंत्रण धाडण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या वतीने हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला असून, यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​चंद्रशेखर भडसावळे यांनी गेल्या अनेक दशकांपासून शेती क्षेत्रात अत्यंत नाविन्यपूर्ण आणि शाश्वत प्रयोग केले आहेत. त्यांच्या खालील कार्याची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे:

​सगुणा राईस तंत्रज्ञान (SRT): शून्य-नांगरणी (Zero-Till) तंत्रज्ञानाचा वापर करून भातशेती कशी फायदेशीर करता येते, याचे यशस्वी मॉडेल त्यांनी जगासमोर ठेवले.

​नैसर्गिक शेतीचा प्रसार: रसायनांचा वापर कमी करून जमिनीचा पोत सुधारण्यावर त्यांनी भर दिला.

​कृषी पर्यटन (Agri-Tourism): शेतकऱ्याला शेतीसोबतच पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नाचा नवा स्रोत मिळवून देण्यात ‘सगुणा बाग’ने दिशादर्शक काम केले आहे.

​जलसंवर्धन आणि ग्रामीण विकास: पाण्याचे नियोजन आणि ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे योगदान मोठे आहे.

​’ॲट होम’ समारंभ काय असतो?

​प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी राष्ट्रपती भवनाच्या हिरवळीवर ‘ॲट होम’ हा भव्य सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमात राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित असतात. यंदा देशभरातील विविध क्षेत्रांत (कला, क्रीडा, विज्ञान, समाजसेवा आणि कृषी) उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या निवडक २५० विशेष व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित यादीत भडसावळे यांच्या नावाचा समावेश असणे, ही महाराष्ट्रातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट मानली जात आहे.

​शून्य-नांगरणी तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि पैशांची मोठी बचत झाली आहे. भडसावळे यांनी केवळ शेती केली नाही, तर ती एक शास्त्र म्हणून विकसित केली. त्यांच्या या निमंत्रणामुळे पारंपरिक शेतीला आधुनिक आणि शाश्वत जोड देणाऱ्या प्रयोगांचा गौरव झाला असल्याची भावना व्यक्त होत आहे.

सगुणा बाग ही रायगड जिल्ह्यातील माथेरानच्या पायथ्याशी वसलेली आहे. हे ठिकाण केवळ एक शेती नसून, ते कृषी पर्यटन (Agri-Tourism) आणि शाश्वत शेतीचे (Sustainable Farming) एक मोठे केंद्र बनले आहे. तिथे त्यांनी विकसित केलेले ‘सगुणा राईस तंत्रज्ञान’ (SRT) पाहण्यासाठी देशभरातून शेतकरी आणि पर्यटक येत असतात.

 

आता हापूसच्या नावाने हापूसच विकला जाईल; आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी घेतला हा महत्वपूर्ण निर्णय

   Follow us on    

 

 

देवगड: हापूस आंबा, विशेषतः देवगड हापूस, याच्या अस्सलपणाची खात्री करण्यासाठी आणि ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आता युनिक आयडी (UID) कोड वापरला जाणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या युनिक आयडी कोडद्वारे ग्राहकांना खात्रीशीरपणे खरा देवगड हापूस आंबा मिळू शकेल.

हा कोड आंब्याच्या पेटीवर आणि उत्पादनावर लावला जाईल, ज्यामुळे बनावट किंवा इतर प्रजातींच्या आंब्यांना हापूस म्हणून विकण्याच्या प्रकारांना आळा बसेल. हा उपक्रम या वर्षाच्या हंगामापासून प्रभावीपणे लागू होत असल्याची माहिती आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या खरेदीची पडताळणी करता येईल आणि हापूसच्या नावाने होणारी तोतयागिरी थांबेल.

हापूस आंब्यासाठी युनिक आयडी (UID) प्रक्रिया

ही देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने सुरू केलेली एक नाविन्यपूर्ण पद्धत आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांना अस्सल देवगड हापूस आंब्याची खात्री देणे आणि बनावट आंब्यांना बाजारातून हद्दपार करणे हा आहे.

नोंदणी आणि कोड निर्मिती:

देवगडमधील प्रमाणित आंबा उत्पादक आणि विक्रेते यांची नोंदणी संस्थेकडे केली जाते. नोंदणीकृत उत्पादकाला संस्थेकडून त्याच्या उत्पादन क्षमतेच्या संख्येनुसार स्टिकर देण्यात येतील. या स्टिकर वर त्या शेतकर्‍याची माहिती असलेला UID नंबर असणार आहे.

आंब्यावर कोड लावणे:

हा युनिक आयडी कोड आंब्याच्या पेटीवर किंवा काही प्रकरणांमध्ये थेट आंब्याच्या स्टिकरवर लावला जाईल.

कोडमध्ये उत्पादकाची माहिती, आंब्याचा हंगाम, आणि उत्पत्तीचा तपशील (उदा., देवगड) समाविष्ट असणार आहे.

ग्राहकाद्वारे पडताळणी:

ग्राहक हा कोड स्कॅन करून (QR कोड असल्यास मोबाइलद्वारे) किंवा संस्थेच्या संकेतस्थळावर/अॅपवर टाकून आंब्याची अस्सलता तपासू शकतील.

यामुळे आंबा खरोखर देवगडचा हापूस आहे की नाही, याची खात्री पटेल.

 

या उपक्रमाचा उद्देश:

  • बनावट हापूस आंब्यांची विक्री रोखणे.
  • ग्राहकांचा विश्वास वाढवणे आणि हापूसच्या ब्रँडचे संरक्षण करणे.
  • उत्पादकांना त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्य मिळवून देणे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भात पिकासाठी ताडपत्री खरेदी अनुदान योजना; अर्ज कसा कराल?

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग: सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत भात पिकासाठी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात साधारणत: ३५०० मि.मी. पाऊस पडतो. या पावसामुळे काढणीच्या वेळेस साधारणत: १५ ते २० टक्के नुकसान होते. भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २०२४-२५ अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेकरिता ७५ टक्के अनुदान तत्त्वावर मंजुरी दिली आहे. या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हेक्टर क्षेत्र भात पिकाखालील असावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद कृषी विभाग यांची जिल्हास्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर २ हजार प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदानाप्रमाणे प्लास्टिक ताडपत्रीसाठी जास्तीत जास्त १ हजार ५०० रुपये प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक ताडपत्री खरेदी करता येईल. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत आंबा पिकासाठी प्लास्टिक क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून तो तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहायक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. योजनेसाठी सातबारा, ८ अ उतारा , बँक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज येणार 2000 रुपये; लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे

   Follow us on    

 

 

PM Kisan Samman Nidhi Scheme: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 17 व्या हफ्त्याची शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आज म्हणजेच 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा 17 वा हफ्ता जमा होणार आहे. देशातील साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
सध्या देशातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची तजवीज करत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत. त्यामुळे या पैशांची शेतकऱ्यांना फार मदत होणार आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर आपली ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. फेस ऑथेंटिकेशनच्या (Face Authentication) मदतीने तुम्ही घरी बसूनच ई-केवायसी करू शकता. तसेच देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरदेखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी याआधीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची गरज नाही.
अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी 
1. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोबाइलवर PM Kisan अॅप डाऊनलोड करावे लागेल.
2. अॅप Install झाल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
3. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो अॅपमध्ये टाका
4. पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया पार पाडल्यावर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search