Malvan: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील समुद्र तटबंदीवरील राजकोट किल्ला आजपासून पुढील काही दिवस शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. किल्ल्यावरील पदपथाची आवश्यक दुरुस्ती आणि इतर अनुषंगिक कामे पूर्ण होईपर्यंत राजकोट किल्ला शिवप्रेमी आणि पर्यटकांसाठी काही दिवस बंद राहणार असल्याची माहिती येथील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चबुतराच्या सभोवताली पदपथाच्या आवश्यक दुरुस्ती पूर्ण होईपर्यंतआजपासून राजकोट किल्ला बंद राहणार आहे.
मालवणमधील राजकोट किल्ला आजपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यावर माजी आमदार वैभव नाईक यांनी नाराजी व्यक्त करत टीका केली. ‘मागच्या वेळेला जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला तसा पुन्हा पुतळ्याच्या आजूबाजूचा भाग कोसळेल या भीतीमुळेच किल्ला बंद ठेवण्यात आला आहे का?’, असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.
तसंच, ‘शंभर कोटी रूपये खर्च करून शंभर वर्षे टीकेल असे पुतळ्याचे काम केल्याचे सरकार सांगत असताना अशा प्रकारे बंदी आणली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अजूनही लक्ष घालून जे अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे.’ अशी मागणी देखील माजी आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.
राजकोट किल्ला बंद करण्यात आल्यामुळे कोकणामध्ये फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. किल्ल्याच्या बाहेर येऊन पर्यटकांना परत जावे लागत आहे. दुरूस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर हा किल्ला पुन्हा पर्यटकांसाठी खुला केला जाईल असे सांगितले जात आहे.
Category Archives: सिंधुदुर्ग
देवगड: देवगड तालुक्यातील नारिंग्रे कोटकामते मार्गावर नारिंग्रे स्मशानभूमीनजीक अचानक समोरून आलेल्या एसटीला बाजू देताना रिक्षेची एसटीला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकासह रिक्षेतील चार प्रवाशांचा मृत्यू झाला. तर एक प्रवासी गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये रिक्षाचालक संकेत सदानंद घाडी (२९, आचरा देऊळवाडी), संतोष रामजी गावकर (३३, आचरा गाऊडवाडी), सुनिल उर्फ सोनू सूर्यकांत कोळंबकर (४८, आचरा पिरावाडी), रोहन मोहन नाईक (२९, आचरा गाऊडवाडी) यांचा समावेश आहे. तर रघुनाथ रामदास बिनसाळे (५०, आचरा भंडारवाडी) हे गंभीर जखमी झाले. हे सर्वजण आचरा येथील रिक्षा व्यावसायिक असून ते वर्षा पर्यटनासाठी देवगड तालुक्यात आले होते.
हा अपघात शुक्रवारी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. घटनेची माहिती मिळताच मिठबाव सरपंच तथा रामेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाई नरे, शैलेश लोके, काका नरे यांच्यासह मिठबाव, नारिंग्रे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले. देवगड पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे, पोलीस हवालदार आशिष कदम, प्रवीण सावंत, नीलेश पाटील, स्वप्नील ठोंबरे, योगेश महाले, नितीन डोईफोडे, गणपती गावडे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अपघातातील मृतदेह विच्छेदनासाठी मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. या अपघाताची माहिती आचरा गावात पसरताच मोठ्या संख्येने आचरावासीय मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जमा झाले. मृत व्यक्तींचे नातेवाईकही मिठबाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी केलेला आक्रोश उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस, शिंदे शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे यांच्यासह आचरा येथील रिक्षा व्यावसायिक, स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shakteepith Expressway: राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गासंबधी काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत. आजरा ते बांदा हे अंतर जलद गतीने पार करण्यासाठी या महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली २ बोगदे मोठे बोगदे बांधण्यात येणार आहेत. या दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही, तर हा कदाचित देशातील सर्वात लांब बोगदा ठरणार आहे.
आंबोली घाटातून आजरा ते बांदा प्रवास करण्यासाठी सुमारे १.५ तास लागतात. डीपीआरनुसार, आजरा ते बांदा या पॅकेजच्या संपूर्ण ३९ किलोमीटर लांबीचा प्रवास करण्यासाठी लागणारा प्रवास वेळ फक्त २० मिनिटे असणार आहे. तर या टप्प्यात वेगमर्यादा १२० किमी प्रतितास असणार आहे.
नागपूर आणि गोवा यांना जोडणारा हा नवीन द्रुतगती मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) विकसित करीत आहे. या एक्स्प्रेसवेमुळे प्रवासाचा वेग वाढणार आहे. ज्यामुळे वेळेचीही बचत होणार आहे. नागपूर आणि गोवा यांना जोडणाऱ्या नवीन द्रुतगती मार्गामुळे प्रवासाचा वेळ, १८ ते २० तासांवरून केवळ ८ ते १० तासांवर येईल. त्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटनालाही चालना मिळेल. या मोठ्या प्रकल्पाची अंदाजीत किंमत ८६,००० कोटी रुपये आहे. हा द्रुतगती मार्ग १२ जिल्ह्यांना जोडून प्रादेशिक विकासासाठी उपयुक्त ठरेल. नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, वर्धा जिल्ह्यातील पवनार येथून सुरू होऊन महाराष्ट्र-गोवा सीमेजवळ पत्रादेवी येथे संपेल. हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांतून जाणार आहे.
𝐍𝐚𝐠𝐩𝐮𝐫-𝐆𝐨𝐚 𝐒𝐡𝐚𝐤𝐭𝐢𝐩𝐞𝐞𝐭𝐡 𝐄𝐱𝐩𝐫𝐞𝐬𝐬𝐰𝐚𝐲 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞 𝐟𝐫𝐨𝐦 𝐌𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚.
The package 4 of the Nagpur-Goa Shaktipeeth Expressway will have 2 tunnels under the western ghats near Amboli with a total length of 21.9 kilometres!
Not just… pic.twitter.com/0qyG75ZehS
— Infra News India (INI) (@TheINIofficial) June 17, 2025
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे आज पहाटे पाच च्या सुमारास भीषण अपघात झाला. गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह एक प्रवासी गंभीर तर अनेक जण जखमी झाले.
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवासी संजय जोशी, विद्याधर मांजरेकर दीपक जोशी व अन्य ग्रामस्थांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह अन्य जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढत त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील टेम्पो ट्रॅव्हलर चालक व अनेक प्रवासी गंभीर जखमी असून इतर प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. तर या अपघातात डंपरच्या मागील बाजूची दोन्ही चाके तुटून बाहेर गेली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
दोडामार्गः तालुक्यातील तळकट भटवाडी परिसरात शुक्रवारी (६ जून) दुपारच्या सुमारास १४ फूट लांबीचा भला मोठा किंग कोब्रा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भरवस्तीत आढळलेल्या या विषारी सापामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गावातील रहिवासी अभिजीत देसाई यांना हा किंग कोब्रा त्यांच्या घरासमोरच्या परिसरात दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गावातील नागरिकांना आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली. झोळंबे येथील अनुभवी सर्पमित्र विठ्ठल गवस यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं.
चिपळूण : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटे संरक्षक भिंत कोसळली असून या भागातील लोखंडी रेलिंगही निखळले आहे. घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांकडून खचलेल्या ठिकाणी दगड, पिंप उभे करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.
या घाटात गेल्या 2 वर्षात कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये संरक्षक भिंतीसह रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मात्र कितीही कोटी या घाटातील दुरुस्तीवर, सुरक्षेच्या उपाययोजनांवर खर्च केले तरीही पावसाळ्यात दरवर्षी हा घाट धोकादायक बनत आला आहे. दरड कोसळणे, केलेली बांधकामे ढासळणे हे नित्याचेच झाले आहे.
शनिवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीमुळे यावर्षीचा पावसाळा कसा जाणार, याचीच चिंता वाहनचालकांना लागून राहिली आहे. या घाटातून दररोज शेकडो वाहने जात-येत असतात. सध्या घाटात तीन ठिकाणी रस्ता खचण्याचे व संरक्षक भिंत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. सद्यस्थितीत खचलेल्या रस्ता ठिकाणी वाहने जाऊ नयेत म्हणून तेथे फक्त दगड आणि काही ठिकाणी पिंप उभी करून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.
पावसाळ्यात हा रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाट परिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी यंत्रसामुग्री पाठवली नसल्याने स्थानिकांनी उच्च आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
दोडामार्ग: कसई दोडामार्ग केळीच टेंब येथे दोन गाड्या समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. हा अपघात सकाळी १०:०० च्या सुमारास घडला. अपघातात दोन्ही गाडीतील प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमीना उपचारासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांना अधिक उपचारासाठी त्यांना गोवा बांबूळी हलविण्यात आल्याचे सांगण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळेदोडामार्ग ते तिलारी या राज्यमार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.











