मुंबई: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम आणि या प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे महामंडळाची असलेली उदासीन भूमिका, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने आज, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. या पत्राद्वारे संघटनेने सावंतवाडी टर्मिनसचा प्रकल्प राज्य सरकारच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे हस्तांतरित करण्याची आणि उर्वरित कामांसाठी तातडीने अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची आग्रही मागणी केली आहे. दहा वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
या निवेदनात कोकण रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (CMD) ‘सावंतवाडी हे केवळ वे-साइड स्टेशन आहे, टर्मिनस नाही’ असे खळबळजनक विधान केल्याचा दावा संघटनेने केला असून, हे विधान कोकणच्या विकासाला खीळ घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. या बेजबाबदार विधानामुळे रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे स्थानिक जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
टर्मिनसचे काम रखडल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचे आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत असल्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटांचा तुटवडा निर्माण होतो आणि काळाबाजार वाढतो. जोपर्यंत सावंतवाडी येथे हक्काचे टर्मिनस पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन गाड्या सुरू करणे शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे मुंबई विभागाचे संपर्कप्रमुख श्री. विनोद नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.


