ओरोस:सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालय येथे काल जिल्हा नियोजन समितीची महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आराखडा ६०० कोटी रुपयांच्या पुढे नेल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले असून, या ऐतिहासिक टप्प्याबद्दल बैठकीत अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. या वाढीव निधीमुळे जिल्ह्याच्या प्रलंबित आणि प्रस्तावित विकासकामांना मोठी गती मिळणार आहे. यावेळी बोलताना, निधीची उपलब्धता वाढल्याने प्रशासकीय यंत्रणेने आता अधिक सक्रिय होऊन कामाला गती द्यावी आणि विकासकामांची अंमलबजावणी वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या बैठकीस आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे आणि कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर आणि अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांसह विविध शासकीय विभागांचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला असून, प्रशासनाला कामाचा वेग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


