रेल्वेच्या नव्या ‘रेलवन’ ॲपचा फज्जा; तांत्रिक अडचणींमुळे प्रवासी हैराण

   Follow us on        

​नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू केलेले नवीन ‘रेलवन’ ॲप सध्या तांत्रिक बिघाडांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. १ मार्चपासून जुने लोकप्रिय ‘यूटीएस’ (UTS) ॲप टप्प्याटप्प्याने बंद करून ‘रेलवन’ ॲप अनिवार्य करण्यात आले, मात्र तेव्हापासून प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, जिथे यूटीएस ॲपचे पाच कोटींहून अधिक वापरकर्ते होते, तिथे तांत्रिक गोंधळामुळे रेलवन ॲप वापरणाऱ्यांची संख्या केवळ एक कोटीच्या आसपास राहिली आहे. म्हणजेच सुमारे चार कोटी प्रवाशांनी डिजिटल प्लॅटफॉर्मकडे पाठ फिरवली आहे.

​प्रवाशांच्या तक्रारीनुसार, या नवीन ॲपमध्ये लॉग-इन करताना वारंवार अडचणी येत आहेत. अनेकदा वॉलेटमधून पैसे वजा होतात, मात्र तिकीट जनरेट होत नाही. अशा वेळी स्थानकांवर मदत करण्यासाठी कोणतेही ‘प्रवासी दूत’ किंवा मदत कक्ष उपलब्ध नसल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दहिसर आणि मुलुंड येथील प्रवाशांनी आपली नाराजी व्यक्त करताना सांगितले की, सर्व चाचण्या पूर्ण न करताच हे ॲप अनिवार्य केल्यामुळे प्रवाशांना पुन्हा तिकीट खिडकीवरील लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.

​या ॲपमध्ये खरं तर उपनगरीय रेल्वेसह मेल-एक्सप्रेसचे तिकीट काढणे, पीएनआर तपासणे, डब्यांची रचना पाहणे आणि रेल्वे प्रवासात जेवण ऑर्डर करणे अशा विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच तक्रारीचा मागोवा घेण्याची (Tracking) सोयही यात आहे. मात्र, ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स’ (क्रिस) कडून विकसित करण्यात आलेल्या या ॲपमधील तांत्रिक त्रुटींमुळे या सर्व सुविधा प्रवाशांसाठी कुचकामी ठरत आहेत. यासंदर्भात रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत, परंतु अद्याप प्रशासनाकडून ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search