Railway Updates: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना हाती घेतली आहे. रेल्वे मंत्रालयाने देशातील ७६ महत्त्वाच्या स्थानकांवर अद्ययावत सुविधांनी सज्ज असे विशेष ‘पॅसेंजर होल्डिंग एरिया’ (प्रवासी प्रतीक्षा क्षेत्र) उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना दिली.
या नवीन सुविधेमुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवरील गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे. या होल्डिंग एरियामध्ये प्रवाशांसाठी आसनव्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी (RO), स्वच्छतागृहे, तिकीट खिडक्या, ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स (ATVMs) आणि ट्रेनच्या माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक बोर्ड अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर अशा प्रकारचा एक ‘मॉडेल होल्डिंग एरिया’ आधीच सुरू करण्यात आला असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.
सुरक्षेच्या दृष्टीने या क्षेत्रांमध्ये एआय (AI) आधारित सीसीटीव्ही कॅमेरे, लगेज स्कॅनर, मेटल डिटेक्टर्स आणि अग्निशमन यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. रेल्वेने लागू केलेल्या नवीन नियमानुसार, ज्यांच्याकडे कन्फर्म तिकीट आहे अशाच प्रवाशांना थेट प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाईल. तर, ज्या प्रवाशांचे तिकीट वेटिंग लिस्टमध्ये आहे किंवा ज्यांच्याकडे तिकीट नाही, त्यांना त्यांचे स्टेटस कन्फर्म होईपर्यंत या बाहेरील होल्डिंग एरियामध्ये थांबावे लागेल.
याव्यतिरिक्त, रेल्वेने पायाभूत सुविधांमध्येही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थानकांवर ६ मीटर आणि १२ मीटर रुंदीचे नवीन ‘फूट-ओव्हर-ब्रिज’ (FOBs) बांधले जातील. प्रशासकीय स्तरावर अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी ‘स्टेशन डायरेक्टर’ या पदाचे अधिकार वाढवण्यात आले असून, त्यांना तातडीचे निर्णय घेण्यासाठी आर्थिक अधिकारही देण्यात आले आहेत. मोठ्या स्थानकांवर सर्व विभागांमध्ये ताळमेळ राखण्यासाठी ‘वॉर रूम्स’ देखील स्थापन केल्या जाणार आहेत.


