वाडवडिलांच्या ‘तडजोडी’ ठरत आहेत आताच्या पिढीची ‘डोकेदुखी’!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कोकणात वाडवडिलांच्या काळातील तोंडी केलेल्या तडजोडी मोठी डोकेदुखी ठरत असल्याचे चित्र समोर येत आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात जमिनींचे व्यवहार कोणतीही लेखी कागदपत्रे न करता केवळ विश्वासावर केले जात होते. काही ठिकाणी जमिनी कायमस्वरूपी, तर काही ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात दिल्या जात होत्या. तसेच अदलाबदलीचे व्यवहारही मोठ्या प्रमाणात झाले होते.

मात्र, या व्यवहारांची कोणतीही अधिकृत नोंद नसल्याने संबंधित व्यक्तींच्या मृत्यूनंतर मोठा गोंधळ निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी जमीन एका व्यक्तीच्या नावावर असली तरी प्रत्यक्ष वहिवाट दुसऱ्याच्याकडे असल्याचे दिसून येते. त्यामुळे वादाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.

या पार्श्वभूमीवर गावोगावी भांडणे वाढत असून काही ठिकाणी मारामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांपर्यंत परिस्थिती पोहोचत आहे. जमीन मिळवण्यापेक्षा अहंकाराचे प्रश्न अधिक पुढे येत असल्याचेही निरीक्षण आहे. परिणामी समाजात गटबाजी वाढत असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

या वादांचा गैरफायदा समाजातील विघातक प्रवृत्तींकडून घेतला जात असल्याचीही चर्चा आहे. प्रशासनाकडून या प्रश्नांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. न्यायालयात अशा प्रकरणांची संख्या मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे.

शेतात जाण्यासाठीच्या वाटांवरूनही वाद निर्माण होत असून, ग्रामीण भागातील दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत आहे. दोनच दिवसापूर्वी सावंतवाडी येतील ओवळीयेतील महिलेचा अशाच एका वादातून निर्दयी खून करण्यात आला. एकूणच, “कोकणाचा बिहार होत चालला आहे” अशी तीव्र प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे.

या समस्येवर ठोस उपाययोजना करून जुन्या व्यवहारांचे कायदेशीर पुनरावलोकन करण्याची गरज व्यक्त होत आहे

 

Facebook Comments Box
   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search