Konkan Railway News:आंगणेवाडीच्या जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. मध्य रेल्वेने या जत्रेसाठी एक विशेष गाडी ट्रेन व डिमांड (TOD ) तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची सरीवस्तार माहिती खालीलप्रमाणे
गाडी क्रमांक 01043/01044 एलटीटी – करमाळी- एलटीटी विशेष (TOD)
ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक शुक्रवारी दिनांक ०१ मार्च रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी रविवार दिनांक ३ मार्च रोजी करमाळी या स्थानकावरून दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
दिवा दि.२२ फेब्रु | काल बुधवारी दिवा स्थानकावर झालेल्या एका अपघातात कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील सचिन बाळकृष्ण सावंत ( वय ४५ रा. भिरवंडे मुरडयेवाडी ) यांचे मुंबईकडे जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले.
या अपघाताची सविस्तर माहिती अशी की कणकवली येथे स्थायिक असलेले सचिन हे काही कामानिमित्त मुंबई येथे मंगळवारी कोकण कन्या एक्सप्रेसने जाण्यास निघाले. दिवा स्टेशन येथे पोहोचल्यावर कोकण कन्या एक्सप्रेसचा वेग कमी झाला.याचा अंदाज घेऊन सचिन यांनी दिवा स्टेशन येथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. रेल्वेतून उतरताना सचिन हे बाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळाली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने सचिन यांची उपचारांना साथ मिळत नव्हती. अशातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घडलेली घटना हा निव्वळ अपघात असला तरी घटनेमुळे कोकणच्या प्रवाशांची एक जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ती मागणी म्हणजे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा ही होय.
दिवा स्थानकांत सध्या आठ प्लॅटफॉर्म असून, या स्थानकात दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या, दिवा-रोहा मेमू, दिवा-वसई अशा गाड्या चालविण्यात येतात. दिवा स्थानकात जर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना थांबा दिला तर दिवा, डोंबिवली व कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टीटवाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातील चाकरमान्यांचा ठाणे, कुर्ला, दादर, सीएसएमटी टर्मिनसवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला जाईल. परतीच्या प्रवासातही ठाण्याला उतरल्यानंतर पुन्हा सामानासह लोकल पकडणे अडचणीचे ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.
तर हे अपघात टाळता येणे शक्य
वा येथे गाडी आल्यावर ठाण्याच्या दिशेने जाताना रूळ बदलताना गाडीचा वेग कमी होतो. त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे कित्येकदा अपघातही होतात. येथे थांबे दिल्याने असे अपघात टाळता येतील.
पहाटे सुटणार्या आणि उशिरा परतणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा
जनशताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्या मुंबईहुन पहाटे सुटतात आणि परतीच्या प्रवासात उशिराने ठाण्या- मुंबईत येतात. या गाडीला दिवा येथे थांबा दिल्यास या परिसरातील कोकणातील प्रवाशांची खूप मोठी सोय होईल. त्याचप्रमाणे कोकण-कन्या, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या नियमित आणि ईतर काही गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी होत आहे.
कोल्हापूर,दि. २१ फेब्रु. : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग पूर्ण करणे हे सरकारच्या दृष्टीने मोठे आव्हान असणार आहे. कारण या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरवात केल्याची बातमी समोर येत आहे.
नागपूर गोवा महामार्गाचे सर्वेक्षण कोल्हापूर जल्ह्यातील कागल तालुक्यात सुरु झाले आहे. या महामार्ग एकोंडी आणि बामणी या दोन गावातून जाणार असून या गावातील शेतकऱ्यांनी याविषयी एक बैठक घेऊन या महामार्गास विरोध करण्याचा पावित्रा घेतला आहे.
हा महामार्ग झाल्यास येथील अनेक शेतकरी भूमिहीन होतील, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या महामार्गास विरोध करावा असे या बैठकीत ठरले आहे. सरकारने या महामार्गाकरिता पर्यायी जागेचा विचार करावा अशी मागणी या सभेत करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी एकमताने ठरविण्यात आले आहे.
सावंतवाडी, दि. १८फेब्रु.: कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली येथे शिकार करण्यासाठी आलेल्या सहाजणांना काल आंबोली पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात उपोषण सुरू त्या स्थळापासून पोलिसांनी १४९ नोटीस दिलेली असतानाही केवळ १०० मीटर वर शिकारीच्या उद्देशाने हा गोळीबार झाला. या ठिकाणी सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हे स्वतः बंदोबस्तासाठी होते. गोळीबार नंतर आंबोली हिरण्यकेशी पर्यटन टोल नाक्यावर ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि एकूण ६ जणांना पकडून त्यांना पोलीस व वन विभागाच्या ताब्यात दिले. यात सावंतवाडीतील एक वकील आणि अन्य पाच जणांचा समावेश आहे. संबधितांच्या चारचाकी वाहनात बंदूक,काडतुसे,रक्त लागलेला सुरा सापडले असून ,सुरीला लागलेले ,रक्त व केसांचा पंचनामा पोलीस आणि वनविभाचे अधिकारी यांनी केला.या संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात आली. तपासाअंती त्यांनी साळींदर ची शिकार केल्याचे समोर आले.
मात्र उपोषण स्थळापासून केवळ शंभर मीटर वर गोळीबार झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. काल इथे उपोषण असल्याने हा प्रकार उघडकीस आला. सावंतवाडी ते आंबोली या मार्गावर दाणोली या ठिकाणी पोलिसांचा तपासणी नाका आहे. या तपासणी नाक्यावर योग्य प्रकारे तपासणी होत नाही आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. अतिक्रमण आणि शिकार यामुळे येथील अनेक प्राण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चिपळूण, दि. १९ फेब्रु.:चिपळूण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्रेत्यांसंबंधीत जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ही गोष्ट लांछनास्पद आहे. मला अनेक प्रवाशांचे फोन आले तेव्हा मी खात्री केल्यानंतर वस्तुस्थिती खरी आहे हे समजले. प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या फेरीवाल्यांना कुणी दिला. या पूर्वी एक फेरीवाला पावाच्या लादीवर पाय ठेवून झोपला होता. तर दुसर्या फेरीवाला फलाटावरील बाकडयावर झोपला असून त्याच्याकडील भजी ट्रेसहीत पडलेली दिसत आहेत. व ती भजी प्रवाशांनी जाब विचारताच पुन्हा ट्रेमध्ये गोळा करून घेताना दिसत आहे. प्रवाशांनी व आरपीएफच्या जवानाने हटकताच ती कचर्याच्या डब्यात टाकली. हा प्रकार करणार्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की अन्य भेसळ अधिकारी तसेच पोलीस झोपा काढत आहेत का? फेरीवाल्यांची सहा महिन्याची मेडिकल टेस्ट करावी लागते, ती झालेली आहे की नाही. ज्या स्टॉलधारकांचे फेरीवाले आहेत त्यांच्या स्टॉलचा परवाना रद्द करण्यात यावा व प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाद्यपदार्थ विकणार्या परप्रांतीयांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.
मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.
बॅनरमधील मजकूर काय आहे ?
“प्रिय दिपकभाई,
म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.
मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.
तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.
आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??
भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”
नवी मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.
या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.
Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी दिनांक २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ ते ०९:३० वाजेपर्यंत सावर्डा ते रत्नागिरी विभागांदरम्यान पायाभूत कामे आणि देखभालीसाठी अडीच तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
रेल्वेकडून आलेल्या माहितीनुसार कोकण रेल्वेवरील ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 12617 Ernakulam – H. Nizamuddin Express
या गाडीचा दिनांक २२ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा प्रवास मडगाव ज. – रत्नागिरी विभागादरम्यान १ तास ४५ मिनिटांसाठी थांबविला जाणार आहे. .
नवी मुंबई: मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) अर्थात अटल सेतूवर प्रवास करत असताना तुम्ही पिकनिक च्या मूड मध्ये असाल आणि सेल्फी काढण्यासाठी गाडी थांबवत असाल तर सावधान! कारण या सेतूवर असे केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार आता पर्यंत सेल्फी घेण्यासाठी थांबल्याबद्दल नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांनी एकत्रितपणे एका महिन्यात 1,612 लोकांना दंड ठोठावला आहे.
21.8 किमी सागरी पुलावर थांबणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असताना, वाहन थांबल्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये या साठी हा दंड आकारण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलिसांनी 1,387 जणांना तर मुंबई पोलिसांनी 225 जणांना दंड ठोठावला आहे. नवी मुंबई पोलिसांनी 10.99 लाख रुपये एवढा दंड वसूल केला तर मुंबई पोलिसांनी ₹1.12 लाख एवढी रक्कम या दंडाद्वारे वसूल केली आहे.
अनेक वाहनधारक आपली वाहने कडेला थांबवून सेल्फी घेत वेळ घालवत असत. त्यामुळे वाहतूक कोंडी होऊन अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे. या साठी मुंबई पोलिस आणि नवी मुंबई पोलीसांनी ही मोहीम चालवली आहे. मात्र संपूर्ण 22 किमी लांबीच्या पुलावर गस्त घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
रत्नागिरी:देशातील पहिले ऐतिहासिक प्राणी संग्रहालय संग्रहालय गणपतीपुळे जवळील मालगुंड मालगुंड मध्ये सुरू होणार असल्याची घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मालगुंड येथे केली आहे. मालगुंड गावच्या सुकन्या तथा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माजी महिला व बालकल्याण सभापती साधनाताई साळवी यांच्या वाढदिवसाला पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली उपस्थिती दाखवली होती यावेळी ते बोलत होते.
या प्राणिसंग्रहालयाची जागा एक दोन दिवसांतच निश्चित होऊन लोकसभा व विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याचे काम सुरू होईल अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच हे प्राणिसंग्रहालय मालगुंड येथे झाल्यानंतर आमचा असा अंदाज आहे की गणपतीपुळे येथे दरवर्षी 22 लाख पर्यंत भेट देतात मात्र त्याहीपेक्षा 30 लाखापर्यंत मालगुंड मध्ये पर्यटक भेटी देऊन मालगुंडच्या विकासाचा कायापालट होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.