देशात ८.३ करोड जनतेची प्रथम भाषा मराठी असूनही तिला स्थान नाही
मराठी भाषेपेक्षा कमी बोलल्या जाणाऱ्या गुजराथी आणि ओडिया भाषेला स्थान
दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकालपत्रे यापुढे इंग्रजी वगळता भारतातील इतर चार भाषेत उपलब्ध होतील असे आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जाहीर केले आहे. यासंबंधी त्यांनी मंगळवारी तशाआशयाची माहिती प्रसिद्ध केली होती. या चार भाषेत हिंदी, गुजराथी, उडिया आणि बांगला या भाषेचा समावेश आहे. देशात सर्वच नागरिकांना इंग्रजी भाषा वाचता येत नसल्याने न्यायालयाची निकालपत्रे तळागाळातील नागरिकांना समजावीत यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय खूप कौतुकास्पद असला तरी मराठी भाषेवर अन्याय करणारा आहे. जणगणनेनुसार देशात मराठी भाषेचा हिंदी आणि बंगाली ह्या भाषेनंतर तिसरा क्रमांक लागतो. ८.३ करोड जनतेची प्रथम भाषा मराठी आहे. टक्केवारीत बोलायचे झाल्यास हे प्रमाण देशातील एकूण लोकसंख्येच्या ६.८६% एवढे आहे. त्यामुळे निकालपत्रासाठी मराठी भाषेला स्थान द्यायला हवे होते. ते न देता सातव्या आणि नवव्या क्रमांकावर असलेल्या अनुक्रमे गुजराथी(५.५४ करोड भाषिक) आणि उडिया (३.७५ करोड भाषिक) या भाषेंना स्थान देण्यात आलेले आहे. केंद्र असो वा सर्वोच्च न्यायालय या आधी पण अनेकदा असे मराठी भाषेला डावलण्याचे प्रकार घडले आहेत.
रायगड : रोजच्या जीवनातील आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी ‘क्यूआर कोड’ चा वापर आता सर्वच ठिकाणी होताना दिसत आहे. रोख रक्कम सोबत बाळगण्याची गरज नाही आणि सुट्ट्या पैशाचे टेन्शन ह्या ‘क्यूआर कोड’ मुळे नाहीसे होताना दिसत आहे. याच ‘क्यूआर कोड’ सुविधेंचा लाभ घेऊन आपल्या नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे याकरिता रायगड तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने एक हायटेक फंडा वापरला आहे. अशी सुविधा देणारी चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचात ठरली आहे.
ग्रामपंचायतीने प्रत्येक घरावर ‘क्यूआर कोड’ चे स्टिकर्स लावले आहेत. प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्याचे ‘क्यूआर कोड’ बनविण्यात आलेले आहेत. हे ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून नागरिकांना आपला कर भरणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाही. तसेच हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून नागरिकांना आपल्या इतर समस्या सोडवता येतील. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी ‘क्यूआर कोड’ द्वारे इतर मनोरंजक माहिती दिली जात आहे. भविष्यात हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून इतर सुविधेंचा लाभ पण नागरिकांना घरबसल्या देण्याचा आपला प्रयत्न आहे असे ग्रामपंचायती द्वारे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचातीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे.
नवी दिल्ली :केंद्रीय गृह मंत्रालयाने पोलीस पदकांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील ७४ जणांना पदक जाहीर झाले. त्यामध्ये उत्कृष्ट सेवेकरिता ४ पोलीस अधिकाऱ्यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ आणि ३१ जणांना ‘पोलीस शौर्य पदक’पोलीस शौर्य पदक’ यांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील चार पोलीस अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाने गौरवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, महाराष्ट्राचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अनुप कुमार सिंह, मुंबईतील पोलीस उपनिरीक्षक (वरिष्ठ गुप्तचर अधिकारी, राज्य गुप्तचर विभाग, मुंबई) संभाजी देशमुख आणि ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांचा समावेश आहे. राज्यातील ३१ अधिकारी व शिपायांना राष्ट्रपती शौर्य पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती पोलीस पदक विजेत्यांची नावे.
पोलीस शौर्य पदक विजेत्यांची नावे.
देशातील विविध राज्यांतील एकूण 901 पोलिसांना पोलीस पदकं जाहीर करण्यात आली आहेत. 140 जणांना शौर्य पोलीस पदक (Police Medal for Gallantry), 93 जणांना राष्ट्रपती पोलीस पदक (President’s Police Medal for Distinguished Service ) आणि 668 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदक (Police Medal for Meritorious Service) जाहीर झाले आहे. 40 शौर्य पुरस्कारांपैकी सर्वाधिक पुरस्कार अतिरेकी प्रभावित भागात कार्य करणाऱ्या 80 कर्मचार्यांना दिले जाणार आहेत. तर, जम्मू आणि काश्मीर प्रदेशात कार्यरत 45 जवानांना सन्मानित केलं जाणार आहे.
सिंधुदुर्ग :जिल्ह्यात राजकिय पक्षात होणारे राडे हे काही येथील जनतेला नवीन नाही आहेत. राजकारणातील हे राडे मुख्यतः कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसतात, पण एका भडकलेला आमदार हातात दांडा घेऊन ह्या राड्यात सहभागी होण्यासाठी चालल्याचे दृश्य काल जिल्हय़ातील कणकवली तालुक्यात पाहायला मिळाले.
ह्याबाबत वृत्त असे की काल कणकवली तालुक्यातील कनेडी ह्या गावात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुपडलेतना राजकिय राग मनात ठेवून एका कारणाने बाचाबाची झाली होती. त्याचेपडलेत रूपांतर मारहाणीत होऊन त्याला गंभीर स्वरुप आले. ह्या परिसरातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांचात राडा सुरू झाला. त्यानंतर मात्र पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या सर्व प्रकाराने संतापलेले शिवसेना आमदार वैभव नाईक एका हातात दांडा घेऊन ते ह्या राड्यात सामील होणार होते तेवढय़ात त्यांना पोलीसांनी अडवून माघारी पाठवले.
कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र राज्यातील 37 स्थानकांचा कायापालट होणार.
रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे
मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.
या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.
देशातील बातम्या |आजच्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६वी जयंतीनिमित्त दक्षिण अंदमानातील पोर्ट ब्लेअर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला होता. यादरम्यान, अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे नामकरण करण्यात आले. या बेटांची नावे परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावर ठेवण्यात आली.
सदर कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “हे बेटे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरतील. अंदमानच्या या भूमीवर पहिल्यांदाच मुक्त तिरंगा फडकवला गेला. त्या अभूतपूर्व उत्कटतेचे आवाज आजही सेल्युलर जेलच्या कोठडीमधून अपार वेदनांसह ऐकू येतात. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेताजींना विसरण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकशाहीच्या स्तंभासमोरील ‘कर्तव्य पथ’येथील नेताजींचे स्मारक आपणांस आपल्या कर्तव्यांची आठवण करुन देतो. तसेच, वीर सावरकर आणि देशासाठी लढलेल्या अनेक वीरांनी अंदमानच्या भूमीत तुरुंगवास भोगला. आज २१ बेटांना नावे देण्यात आली, त्यातून अनेक संदेश मिळणार आहेत. हा संदेश ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा असून, आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याचा आहे.”
खालील बेटांना परमवीर चक्र विजेत्यांची नावे देण्यात आली आहेत.
मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे. चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता. कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.
सिंधुदुर्ग। प्रतिनिधी :सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात अचानकपणे पुन्हा पाणमांजरे दाखल झाली आहेत. शनिवारी रात्री ही पाणमांजरे निदर्शनास आली. चार ते पाच पाणमांजरे काही नागरीकांना दिसून आली आहेत. मोती तलावाच्या कठड्याच्या बांधकामांमुळे तलावाचे पाणी कमी करण्यात आले आहे. त्यामूळे माशांच्या शोधात ही मांजरे कमी पाण्यात फिरत असावीत असे प्राणी तज्ञांचे मत आहे.
सावंतवाडीतील तलावात पाणमांजरे असावीत कि नसावीत ह्यावर दोन विरुद्ध मतप्रवाह येथील नागरिकांमध्ये आहेत. पाणमांजर ही प्रजाती पाणी आणि जमिनीवर राहते, ती लाजाळू असून मासे, खेकडे यावर आपली गुजराण करते. त्यामुळे अनेकांनी तलावात सोडण्यात येणारे मत्स्यबीज, मासे खाऊन फस्त करतील अशी भीती व्यक्त केली होती. त्यावर प्राणिमित्रांनीही ही निसर्ग साखळी असल्याने ती तोडू नये असंही मत व्यक्त केलं. काही प्राणी मित्रांनी अतिशय चांगले मत नोंदवताना, “शहरातील पर्यटनाच्या दृष्टीने पोषक असेल त्यासाठी पाणमांजरांचे संवर्धन करावे, जेणेकरून नामशेष होत चाललेली ही प्रजाती सावंतवाडीतील तलावात दिसत असल्याने येणाऱ्या पर्यटकांसाठी तलावात स्थिरावलेली पाणमांजरे हा कुतूहलाचा विषय असेल, आणि त्यांना पाहण्या साठी, त्यांची छबी आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक येथे थांबतील” असेही सांगितले. तर एका प्राणिमित्राने भारतीय उपखंडातील नष्ट होत चाललेल्या पाणमांजरांचे अस्तित्व सावंतवाडी च्या सुप्रसिद्ध मोती तलावात असणे ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट असल्याचं म्हटलं आहे. पाणमांजरे ही पर्यावरण पूरक पर्यटनाची संधी असल्याचंही मत प्राणिमित्रांनी व्यक्त केलं आहे
नवी मुंबई | प्रतिनिधी : खारघर स्टेशन,सकाळचे ११ वाजले होते. स्टेशनवर ठाण्याला जाणारी लोकल आली आणि काही सेकंदात प्लॅटफाॅर्मवरून ती लोकल निघाली, तेवढ्यात लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. समोर एक ६५-७० वर्षांची प्रवासी लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्यामध्ये अडकून घासत जात होती. तिचा एक पाय लोकल आणि प्लॅटफाॅर्मच्या फटीत अडकला होता आणि एक पाय लोकलमध्ये होता. लोकल वेगाने पुढे जात होती.
प्लॅटफॉर्मवरील प्रवासी आजीला वाचावण्यासाठी धावले. त्यात सर्वात पुढे होता विलास बडे नावाचा एक तरुण. त्याने धावत जाऊन आजीला पकडले. सुदैवाने त्या आजीने हॅंडलचा हात सोडला आणि ते दोघे प्लॅटफाॅर्मवर कोसळले. जेमतेम पाच सेकंदात हे सगळं घडलं. घडलेल्या प्रसंगाने आज्जी प्रचंड भेदरली होती पण सुखरूप आहे.
विलास बडे IBN लोकमत मध्ये पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या ह्या धाडसामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. घडलेल्या प्रसंगाने आजी प्रचंड भेदरल्या होत्या पण सुखरूप आहे.
रत्नागिरी | प्रतिनिधी :कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या आणखी चार एक्सप्रेस गाड्या डिझेल इंजिन ऐवजी विद्युत इंजिन जोडून चालवण्यात येणार आहेत. या सर्व गाड्या दूरपल्ल्याच्या आहेत.या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार पुढील गाड्या विद्युत इंजिन जोडून चालविण्यात येणार आहेत.
16338 /16337 – एर्नाकुलम – ओखा – एर्नाकुलम एक्सप्रेस हि गाडी एर्नाकुलम ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान दिनांक 20/01/2023 पासून
16333/16334 – तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस- वेरावल – तिरुवनंतपुरम सेन्ट्रल एक्सप्रेस हि गाडी तिरुवनंतपुरम सेन्ट्रल ते अहमदाबाद स्थानकांदरम्यान दिनांक 23/01/2023 पासून
16336/16335 – नागरकोइल – गांधीधाम – नागरकोइल साप्ताहिक एक्सप्रेस हि गाडी 24/01/2023 पासून नागरकोइल ते अहमदाबाद स्थानकादरम्यान.
22655/22656 – एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस या गाडीला 25/01/2023 पासून संपूर्ण मार्गावर
कोंकण रेल्वेमार्गावरील आता जवळपास सर्वच रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने विद्युत इंजिनावर येत आहेत. कोकण रेल्वेवरील सर्व गाड्या विद्युत इंजिनावर धावू लागल्यानंतर डिझेलपोटी येणाऱ्या वार्षिक १५० कोटी रुपये खर्चाची बचत होईल, असे कोकण रेल्वेने म्हटले आहे.