Author Archives: Kokanai Digital

​१ ऑगस्टपासून खोल समुद्रात मासेमारी सुरू!

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मच्छिमारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून, १ ऑगस्ट २०२६ पासून विशेष आर्थिक क्षेत्रात (Exclusive Economic Zone – EEZ) म्हणजेच किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापुढील खोल समुद्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात (किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापर्यंत) १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे.

​पावसाळा हा अधिकांश सागरी माशांच्या प्रजननाचा काळ असल्याने मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि पुनरुत्पादन व्हावे, यासाठी दरवर्षी या कालावधीत मासेमारीवर बंदी घातली जाते. यंदा महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक जलक्षेत्रातील बंदीचा कालावधी १५ ऑगस्टपर्यंत, म्हणजेच एकूण ७६ दिवसांपर्यंत वाढवला आहे. त्यामुळे किनाऱ्यापासून १२ सागरी माइलापर्यंतच्या समुद्रात या कालावधीत मासेमारी करण्यास परवानगी नाही. त, केंद्र शासनाने पश्चिम किनारपट्टीवरील विशेष आर्थिक क्षेत्रात (EEZ) ३१ जुलैपर्यंत म्हणजेच ६१ दिवसांची बंदी लागू केली होती, त्यामुळे १ ऑगस्टपासून EEZ क्षेत्रात मासेमारी पुन्हा सुरू होणार आहे.

​मत्स्यव्यवसाय विभागाने मच्छिमारांना खोल समुद्रात मासेमारी करताना या मर्यादांचे काटेकोर पालन करण्याचे आणि सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध महाराष्ट्र सागरी मत्स्यव्यवसाय नियमन अधिनियम अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही विभागाने दिला आहे.

तब्बल सहा वर्षानी राजधानी एक्सप्रेस सावंतवाडीत थांबली; जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी रोड (लोकनेते मधू दंडवते टर्मिनस) रेल्वे स्थानकावर राजधानी एक्सप्रेसला पुन्हा एकदा थांबा मिळाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. बुधवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही गाडी स्थानकात दाखल होताच, कोकण रेल्वे प्रवासी संघटना आणि स्थानिक रेल्वेप्रेमींनी तिचे अत्यंत उत्साहात स्वागत केले. यावेळी रेल्वेची विधिवत पूजा करण्यात आली, तसेच गाडीच्या दोन्ही चालकांचा श्रीफळ, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थित प्रवाशांना पेढे वाटून हा आनंदोत्सव मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला.

​या कार्यक्रमादरम्यान कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी कोरोना काळातील अडचणींना उजाळा दिला. कोरोना काळात राजधानी आणि गरीब रथ एक्सप्रेसचा थांबा बंद करण्यात आला होता, मात्र संघटनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आता राजधानी एक्सप्रेससह गरीब रथ आणि मंगळूरू एक्सप्रेसचा थांबा पुन्हा मिळवण्यात यश आल्याची माहिती त्यांनी दिली. या यशामागे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या मोलाच्या मेहनतीचे त्यांनी विशेष कौतुक केले. तसेच सावंतवाडी स्थानकाला ‘लोकनेते मधू दंडवते टर्मिनस’ हे नाव प्राप्त झाले असून, या नामासाजेसा प्रवाशांचा विकास व सुविधा भविष्यात येथे उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

​या स्वागताच्या सोहळ्याला संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजीनदार भूषण बांदिवडेकर यांच्यासह सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, तसेच मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी, रेल्वे प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने रेल्वेप्रेमी उपस्थित होते.

पनवेल: एर्नाकुलम-पुणे एक्सप्रेसमध्ये तांत्रिक बिघाड; प्रवाशांना सुरक्षितपणे हलवले

   Follow us on        

बुधवारी पनवेल रेल्वे स्थानकावर एर्नाकुलम-पुणे सुपरफास्ट एक्सप्रेसच्या (ट्रेन क्रमांक २२१४९) बी-१ या डब्यात तांत्रिक बिघाड झाल्याची घटना घडली. ट्रेन पनवेल स्थानकावर पोहोचल्यानंतर डब्यातील कंट्रोल आर्म तुटल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले, ज्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने तातडीने पावले उचलली.

​ही तांत्रिक अडचण लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित बी-१ डबा मुख्य ट्रेनपासून वेगळा करण्याचा निर्णय घेतला. या डब्यात प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांना कोणतीही जोखीम न पत्कता इतर डब्यांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरीत करण्यात आले. या सुयोग्य आणि तत्पर नियोजनामुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची घटना घडली नाही, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला.

​डबा वेगळा करणे आणि प्रवाशांची सुरक्षित सोय करण्याच्या या प्रक्रियेमुळे ट्रेनच्या वेळेत सुमारे तीन तासांचा विलंब झाला. सर्व आवश्यक तांत्रिक पडताळणी आणि सुरक्षेची खात्री केल्यानंतर ट्रेन आपल्या पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. या अनपेक्षित बिघाडामुळे प्रवाशांना झालेल्या मनस्तापाबद्दल व असुविधेबद्दल रेल्वे प्रशासनाने जाहीर दिलगीर व्यक्त केली आहे.

राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचे जीवन, राष्ट्रसेवा आणि समाजप्रबोधन

   Follow us on        

परभणी:

राष्ट्रधर्म, समाजप्रबोधन आणि मानवतेचे महान उपासक म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाणारे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे जीवन आणि कार्य हे खऱ्या अर्थाने “भूतो न भविष्यति” असेच प्रेरणादायी आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य केवळ अध्यात्मापुरते मर्यादित न राहता राष्ट्रप्रेम, समाजसेवा, सामाजिक समता, धर्मरक्षण आणि मानवकल्याण यांचा एक अनोखा संगम ठरले आहे. त्यांनी धर्म, राष्ट्र आणि मानवतेच्या सेवेसाठी आपले आयुष्य पूर्णपणे अर्पण केले होते.

​जन्म व ऐतिहासिक कर्मभूमी

​राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचा जन्म ८ नोव्हेंबर १९१२ रोजी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव येथे झाला. या पवित्र भूमीत जन्मलेल्या महाराजांमध्ये बालपणापासूनच अध्यात्म, राष्ट्रप्रेम, समाजसेवा आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची जाज्वल्य वृत्ती होती. धर्मरक्षण आणि राष्ट्रसेवेचा वसा पुढे चालवण्यासाठी त्यांनी स्वतः “हिंदू राष्ट्र सेना” उभारली. मुक्तेश्वर दरी हे त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याचे प्रमुख केंद्र राहिले. अन्यायाविरुद्ध त्यांनी नेहमीच निर्भीडपणे आवाज उठवला, ज्यामुळे त्यांना ब्रिटिश सरकार आणि निजामशाही या दोघांचाही रोष सहन करावा लागला. मात्र, सत्य, स्वाभिमान आणि राष्ट्रहिताचा मार्ग त्यांनी कधीही सोडला नाही.

​सामाजिक समता आणि राष्ट्रीय एकात्मता

​रत्नागिरी येथील ऐतिहासिक ‘पतितपावन मंदिर’ — ज्याची उभारणी प्रसिद्ध समाजसेवक भागोजी कीर यांनी केली होती — त्याच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज, डॉ. कुर्तकोटी, चौंडे महाराज आणि संत गाडगेबाबा यांसारखे महान संत एकत्र उपस्थित होते. ही ऐतिहासिक घटना सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता आणि मानवतेचा एक अत्यंत संदेश देणारी ठरली.

​राष्ट्रीय नेत्यांचे मार्गदर्शक

​राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज हे केवळ संत नव्हते, तर राष्ट्रनिर्मितीचे प्रभावी मार्गदर्शक होते. देशातील अनेक दिग्गज व मान्यवर नेते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी आवर्जून उपस्थित राहत असत. यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू, शंकरराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे, वि. स. पागे, रासू गवई, गुलजारीलाल नंदा, शिवराज पाटील आणि नानाजी देशमुख यांसारख्या राष्ट्रसेवकांचा व नेत्यांचा समावेश होता.

​१९८५ मधील ऐतिहासिक प्रदर्शन

​जानेवारी १९८५ मध्ये दिल्ली येथे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समितीचे कार्यवाह श्रीकांत (बाळा) सावंत यांच्या वतीने राष्ट्रसंतांच्या प्रेरणादायी जीवनावर आधारित एका भव्य चित्रमय जीवन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ऐतिहासिक कार्यक्रमास स्वतः राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांच्यासह तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, गृहमंत्री शंकरराव चव्हाण, संरक्षणमंत्री शिवराज पाटील आणि केंद्रीय मंत्री वसंत साठे आदी दिग्गज नेत्यांची विशेष उपस्थिती लाभली होती. हा कार्यक्रम राष्ट्रसंतांच्या अद्वितीय कार्याचा गौरव करणारा एक सुवर्णटप्पा ठरला.

​आजच्या काळाची गरज: राष्ट्रसंतांचे विचार

​आजच्या काळात राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवणे ही प्रत्येक भारतीयाची नैतिक जबाबदारी आहे. त्यांच्या जयंती आणि स्मृतिदिनानिमित्त विशेष व्याख्याने, विचारमंथन सत्रे, चित्रप्रदर्शने, समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आणि युवा प्रेरणा उपक्रम आयोजित करणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल. त्यांचे विचार, आदर्श आणि राष्ट्रसेवेची प्रेरणा आगामी अनेक पिढ्यांना सदैव योग्य मार्गदर्शन करत राहील.

१० आणि २० रुपयांच्या पॉलिमर नोटांना केंद्राची मंजुरी; जुन्या नोटांचे काय होणार?

   Follow us on        

​नवी दिल्ली: आरबीआयच्या (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) प्रस्तावाला केंद्र सरकारने नुकतीच अधिकृत मंजुरी दिली असून, त्यानुसार देशात लवकरच १० आणि २० रुपयांच्या पॉलिमर (प्लॅस्टिक) नोटांच्या फील्ड ट्रायल्स (प्रत्यक्ष चाचण्या) घेतल्या जाणार आहेत. या प्रयोगांतर्गत १० आणि २० रुपयांच्या प्रत्येकी एक अब्ज पॉलिमर नोटा चलनात आणून त्यांची कार्यक्षमता तपासली जाईल. या ट्रायल्स यशस्वी ठरल्यास भविष्यात या दोन्ही मूल्यांच्या नोटा नियमितपणे चलनात आणण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

​पारंपरिक कागदी चलनाच्या तुलनेत पॉलिमर किंवा प्लॅस्टिकपासून बनवलेल्या या नोटा अधिक मजबूत आणि टिकाऊ असणार आहेत, ज्यामुळे त्या लवकर खराब होणार नाहीत. मात्र, या प्राथमिक चाचण्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये पसरू शकणाऱ्या गैरसमजांवर सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. सध्यातरी कागदी नोटा पूर्णपणे बदलण्याची कोणतीही योजना नाही किंवा कोणत्याही कागदी नोटा चलनातून मागे घेतल्या जाणार नाहीत.

​हा संपूर्ण प्रकल्प सध्या अगदी प्राथमिक टप्प्यात असून, चाचणीच्या काळात पॉलिमर आणि सध्याच्या कागदी नोटा दोन्ही एकत्रच समांतर चलनात राहणार आहेत. या चाचण्यांच्या निष्कर्षावरूनच भविष्यातील चलन धोरणाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

मत्स्यसंपदा योजनेंतर्गत मच्छिमारांना सॅटेलाइट फोनचे वाटप

   Follow us on        

मुंबई: राज्यातील मच्छिमारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र शासनाने सॅटेलाइट फोन वाटпаच्या उपक्रमाला सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत बीएसएनएलचे सॅटेलाइट फोन राज्यातील मच्छिमारांना उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली.

​मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत नवीन सॅटेलाइट फोनबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. हे फोन समुद्राच्या कोणत्याही भागात कार्यरत राहत असल्यामुळे, समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छिमारांचा त्यांच्या कुटुंबांशी तसेच मत्स्य विभागाशी संपर्क कायम ठेवणे शक्य होणार आहे.

​समुдраत मासेमारीदरम्यान अपघात, वादळ किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास अनेकदा मच्छिमारांचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो. त्यामुळे वेळेवर मदत मिळण्यात अडचणी येतात. सॅटेलाइट फोनमुळे अशा परिस्थितीत तातडीने संपर्क साधणे शक्य होईल, परिणामी बचावकार्य अधिक जलद होऊन मच्छिमारांचे प्राण वाचवण्यास मोठी मदत मिळणार आहे.

​बीएसएनएलने विकसित केलेले हे सॅटेलाइट फोन मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून राज्यातील जास्तीत जास्त मच्छिमारांपर्यंत पोहोचवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या योजनेअंतर्गत पात्र मच्छिमारांना सॅटेलाइट फोन उपलब्ध करून दिले जाणार आहेत. राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांनी मत्स्य विभागाशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. प्रत्येक मच्छिमाराकडे सॅटेलाइट फोन उपलब्ध झाल्यास समुद्रातील आपत्कालीन परिस्थितीत त्यांची सुरक्षा वाढण्याबरोबरच वेळेवर मदत पोहोचवणे अधिक प्रभावी होईल आणि अनेकांचे प्राण वाचवण्यास मदत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनकडून विविध उपयुक्त आणि सुरक्षित मोबाईल अॅप्सची यादी जाहीर

   Follow us on        

मुंबई, २८ जुलै: सामान्य नागरिकांची शासकीय कामे अधिक सुलभ आणि सुरक्षित व्हावीत, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) विविध उपयुक्त मोबाईल अॅप्सची माहिती जाहीर केली आहे. डिजिटल इंडिया अभियानांतर्गत उचलण्यात आलेल्या या पाऊलामुळे नागरिकांची कागदपत्रांची बचत होऊन प्रशासकीय कामांमध्ये पारदर्शकता वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

​यादीतील प्रमुख अॅप्समध्ये UMANG, DigiLocker, Aaple Sarkar, PM Kisan, ABHA, mParivahan, BHIM UPI, FASTag आणि DigiYatra यांचा समावेश आहे. या डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने नागरिकांना आता दस्तऐवज सुरक्षितपणे साठवणे, विविध बिल भरणे, शेतीविषयक अनुदान मिळवणे, आरोग्य सेवांचा लाभ घेणे तसेच वाहन व प्रवासासंबंधित महत्त्वाची माहिती मिळवणे अत्यंत सोपे झाले आहे. हे सर्व अॅप्स Google Play Store आणि Apple App Store वर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

सावंतवाडी: ४५ प्रवासी असलेली कदंबा बस कलंडली; मोठी दुर्घटना टळली

   Follow us on        

सावंतवाडी : गोवा राज्याची कदंबा प्रवासी बस आजगावकडून दुचाकी वाहन चालकाला वाचवताना कलंडली, ज्यामध्ये ४५ प्रवासी बालबाल बचावले असून चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठी हानी टळली आहे. गोवा येथील पणजी येथून संध्याकाळी साडेचार वाजता सुटणारी पणजी शिरोडा मार्गे वेंगुर्ला ही वस्तीची गाडी शिरोडाच्या दिशेने येत असताना आजगाव वाघबीळाजवळ आली. या वेळी मळेवाडच्या दिशेने चार चाकी गाडी जात असताना त्या घातक वळणावर दुचाकी वाहन चालकाने ओव्हर टेक करण्याचा प्रयत्न केला, आणि त्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात ही बस खोलदूरीच्या काही फूट अंतरावर कलंडली.

​या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी प्रवास करत होते, ज्यांना आपत्कालीन दरवाज्यातून बाहेर काढण्यात आले. या बसचे चालक धनंजय आसोलकर व वाहक सर्वेश नाईक यांनी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले, तसेच या वेळी परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन प्रवाशांना वाचवण्यात मदत केली.

या प्रवाशांपैकी कोणालाही दुखापत झालेली नाही, परंतु काही फूट अंतरावर जर ही बस कलंडली असती तर किमान २०० फूट खोल दरीत ही बस कोसळून मोठा अपघात झाला असता. बस चालकाच्या प्रसंगवधानामुळे बस अलिकडेच कलंडली आणि दुचाकीस्वाराच्या चुकीमुळे ४५ प्रवाशांचे जीव धोक्यात जाणार होते, मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

Konkan Railway: गणपती विशेष गाड्यांच्या आरक्षणाच्या तारखा जाहीर..

   Follow us on        

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (CR) विशेष शुल्कावर  ‘टीओडी’ (TOD) विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून, या विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या विशेष गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११५३ / ०११५४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ या कालावधीत ही गाडी दररोज धावणार असून याचे तिकीट आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​पुणे – रत्नागिरी(RN):

​गाडी क्रमांक ०१४४५ / ०१४४६: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०१४४७ / ०१४४८: १२/०९/२०२६, १९/०९/२०२६ आणि २६/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (शनिवारी) धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – रत्नागिरी (RN):

​गाडी क्रमांक ०११६७ / ०११६८: १२/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १३/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार, रविवार व सोमवार या वारांमध्ये धावणार असून याचे आरक्षण ०१/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – मडगाव (MAO):

​गाडी क्रमांक ०११६५ / ०११६६: १५/०९/२०२५ व २२/०९/२०२५ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११८५ / ०११८६: १६/०९/२०२६ व २३/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (बुधवारी) धावणार असून याचे आरक्षण ०२/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११०३ / ०११०४: ११/०९/२०२६ ते २६/०९/२०२६ आणि १२/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२: ११/०९/२०२६ ते २७/०९/२०२६ दरम्यान ही गाडी दररोज धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

​लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – सावंतवाडी रोड (SWV):

​गाडी क्रमांक ०११२९ / ०११३०: १५/०९/२०२६ व २२/०९/२०२६ रोजी साप्ताहिक (मंगळवारी) धावणार असून याचे आरक्षण ०३/०८/२०२६ पासून सुरू होईल.

मुंबई – मंगळुरू एक्सप्रेसचे सावंतवाडी स्थानकावर जल्लोषात स्वागत

   Follow us on        

सावंतवाडी, दि. २७ जुलै:

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला मंजूर झालेल्या बहुप्रतिक्षित मंगळुरू एक्सप्रेसच्या थांब्यामुळे येथील प्रवाशांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आज सकाळी प्रथमच ही गाडी स्थानकात दाखल झाली. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच तालुक्यातील नागरिकांनी गाडीचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी रेल्वेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच लोको पायलट यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

​रेल्वेला मिळालेल्या या नव्या थांब्यामुळे सावंतवाडीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. १६ वर्षे या गाडीसाठी प्रयत्न सुरू होते. गेली ४ वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने सतत पाठपुरावा केल्यानंतर आज मोठं यश आम्हाला मिळालं आहे. सुपरफास्ट एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा मिळाला. यासाठी रेल्वे बोर्ड, कोकण रेल्वे, मंत्री व सर्व जनप्रतिनिधींचे आभार मानतो. तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार लोकनेते मधू दंडवते टर्मिनस असं नाव या स्थानकाला मिळालं आहे. त्यामुळे त्या नावासा शोभेल असं टर्मिनस जनप्रतिनिधींच्या प्रयत्नांतून निर्माण व्हावं, अशी अपेक्षा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी व्यक्त केली. यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व सावंतवाडीकर उपस्थित होते.

​यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव श्री. मिहीर मठकर, उपाध्यक्ष श्री. सागर तळवडकर, मुंबई विभागाचे श्री. गणेश चमणकर, श्री. मिहीर गावडे, श्री. नंदू तारी, श्री. देवेंद्र मातोंडकर, श्री. सुभाष शिरसाट, ॲड. तेजस परब, श्री. नरसु रेडकर, श्री. शेखर पाडगावकर, सौ. सान्वी तळवडकर, कु. राशी परब, कु. प्रेरणा पोकळे, श्री. बसवराज गुरव, श्री. अश्वैफ गवस, श्री. भावेश भिसे, तसेच सर्व रिक्षाचालक आदी उपस्थित होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search