Author Archives: Kokanai Digital

Sawantwadi: नव्याने मिळालेले थांबे टिकवण्याचे आव्हान

   Follow us on        

सावंतवाडी:

कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर तीन महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन व्यावसायिक थांबे मंजूर करण्यात आले आहेत. रेल्वे बोर्डाच्या मान्यतेनंतर प्रसिद्ध झालेल्या या निर्णयानुसार १२१३३/१२१३४ मुंबई सीएसएमटी – मंगळुरु जंक्शन एक्सप्रेस, १२४३२/१२४३१ हजरत निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/१२२०२ लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या आता सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. सावंतवाडी परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीची दखल घेत हे थांबे देण्यात आल्याने सर्वसामान्य नागरिक आणि कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​रात्रीच्या वेळा आणि सार्वजनिक वाहतुकीचा अभाव ठरणार डोकेदुखी:

आनंदाची बाब ही असली तरी, मंजूर झालेल्या वेळापत्रकाचा बारकाईने अभ्यास केल्यास रात्रीच्या वेळेत थांबणाऱ्या गाड्या प्रवाशांसाठी मोठ्या गैरसोयीच्या ठरणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सावंतवाडी स्थानक तळकोकणातील महत्वाचे स्थानक आहे. येथून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या (footfall) पण खूप मोठी आहे. अजून गाड्यांना थांबा मिळाल्यास त्यामधे अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. असे असले तरी या स्थानकाचे ठिकाण रात्रीच्या प्रवासासाठी काहीसे गैरसोयीचे आहे. सावंतवाडी शहर ते रेल्वे स्थानक या दरम्यान सुमारे ८ किलोमीटरचे अंतर आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दररोज सायंकाळी ७ वाजेनंतर ते सकाळी ६ वाजेपर्यंत या मार्गावर कोणतीही एसटी बस किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसते. यामध्ये विशेषतः १२२०१ एलटीटी – तिरुवनंतपुरम गरीब रथ एक्सप्रेस (मध्यरात्री ०२:०२ वा.), १२२०२ तिरुवनंतपुरम – एलटीटी गरीब रथ एक्सप्रेस (पहाटे ०३:२८ वा.) आणि १२१३४ मंगळुरु – सीएसएमटी एक्सप्रेस (रात्री ११:३० वा.) या गाड्या ऐन मध्यरात्री व पहाटे सावंतवाडीत येतात. सार्वजनिक बस नसल्यामुळे या वेळेत उतरणाऱ्या किंवा ट्रेन पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

रात्रीच्या वेळेत सावंतवाडी स्थानक परिसर आणि शहराकडे जाणाऱ्या निर्जन मार्गावर पुरेशी सुरक्षा व्यवस्था (RPF आणि स्थानिक पोलीस बंदोबस्त) असणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ऐन मध्यरात्री उतरणाऱ्या महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न यांमुळे ऐरणीवर आला आहे. याशिवाय, रात्रीच्या वेळी कोणत्याही सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध नसल्याचा गैरफायदा घेऊन काही रिक्षा व्यावसायिक प्रवाशांकडून मनमानी आणि अवाजवी भाडे वसूल करण्याची दाट शक्यता आहे. या कारणाने प्रवासी या गाड्यांतून प्रवास करणे टाळण्याची शक्यता आहे.

​थांबे टिकवून ठेवण्यासाठी तातडीने ‘या’ उपाययोजना करणे आवश्यक:

रेल्वे प्रशासनाने हे थांबे ५ महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर दिले असून, या कालावधीत मिळणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवरून (Patronage) व उत्पन्नावरून हे थांबे कायम ठेवायचे की रद्द करायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या नसल्यास हे थांबे रद्द होण्याची दाट शक्यता आहे. हे थांबे कायम टिकवण्यासाठी आणि प्रवाशांची सोय होण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. एसटी महामंडळाने रात्रीच्या गाड्यांच्या वेळापत्रकानुसार सावंतवाडी शहरातून स्थानकासाठी विशेष कनेक्टिंग बस फेऱ्या सुरू कराव्यात.

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) आणि रिक्षा संघटनांनी रात्रीच्या प्रवासासाठी अधिकृत दरपत्रक जाहीर करून ते स्थानक परिसरात लावावे. तसेच, स्थानक परिसर व मुख्य रस्त्यावर कडक आरपीएफ कर्मचाऱ्यांच्या पहारा आणि पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी), स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि प्रवाशांनी समन्वयाने काम केले तरच हे थांबे कायमस्वरूपी टिकून राहतील.

तलाठी भरती: ‘गट-क’ परीक्षेसाठी ३०८८ पदांचा समावेश; अर्ज भरण्यास मुदतवाढ

   Follow us on        

नवी मुंबई:

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) ‘महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – २०२६’ बाबत अत्यंत महत्त्वाचे शुद्धीपत्रक जारी केले आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी असून, या भरतीमध्ये नवीन पदांचा समावेश करण्यात आला आहे तसेच अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

​महत्त्वाचे बदल आणि ठळक मुद्दे:

​एकूण पदसंख्या: यापूर्वी २६१९ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून प्राप्त झालेल्या नवीन मागणीपत्रानुसार आता एकूण ३०८८ पदांचा समावेश या परीक्षेत करण्यात आला आहे.

​अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ: उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी आता ३१ जुलै, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

​परीक्षेची तारीख: सदर पूर्व परीक्षा २५ ऑक्टोबर, २०२६ रोजी प्रचलित पद्धतीने (Offline – OMR आधारित) घेतली जाणार आहे.

​समाविष्ट करण्यात आलेली प्रमुख पदे:

​१. ग्राम महसूल अधिकारी (तलाठी), गट-क: १५३९ पदे

२. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (तांत्रिक), गट-क: २५४ पदे

३. लिपिक-टंकलेखक (विविध विभाग): एकूण ९२४ पदे (नियंत्रक शिधावाटप, अन्न व नागरी पुरवठा, आदिवासी विकास आणि महसूल व वन विभाग)

४. लिपिक-टंकलेखक (नोंदणी व मुद्रांक विभाग): ३३१ पदे

५. वरिष्ठ अभिलेखपाल / वरिष्ठ लिपिक व सहाय्यक अधीक्षक: २२ पदे

​विविध संवर्गातील वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता आणि इतर सविस्तर अटींसाठी उमेदवारांनी MPSC च्या अधिकृत संकेतस्थळाला (mpsc.gov.in) भेट देऊन अधिकृत प्रसिद्धीपत्रक तपासावे.

Konkan Railway: सावंतवाडी स्थानकावर नव्याने थांबे मिळालेल्या गाड्यांचे वेळापत्रक जाहीर

   Follow us on        

Konkan Railway Updates:

कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने सावंतवाडी स्थानकावर काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्त्वावर (Experimental Stoppage) व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

​या निर्णयामुळे स्थानिक नागरिक, चाकरमानी आणि पर्यटकांची मोठी सोय होणार आहे. सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा मिळालेल्या गाड्या, त्यांच्या वेळा आणि सुरू होण्याच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत:

​१. मुंबई सीएसएमटी – मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस (दररोज)

​गाडी क्र. १२१३३ (मुंबई सीएसएमटी ते मंगळुरू जंक्शन):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०७:०२ / ०७:०४

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२१३४ (मंगळुरू जंक्शन ते मुंबई सीएसएमटी ):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: रात्री २३:३० / २३:३२

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​२. हजरत निजामुद्दीन – तिरुवनंतपुरम सेंट्रल – ह. निजामुद्दीन ‘राजधानी’ एक्स्प्रेस (आवड्यातून ३ दिवस)

​गाडी क्र. १२४३२ (ह. निजामुद्दीन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: सकाळी ०६:१८ / ०६:२०

​सुरुवात: २६ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२४३१ (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते ह. निजामुद्दीन):

​स्थानक: सावंतवाडी रोड

​वेळ: सकाळी ०९:४४ / ०९:४६

​सुरुवात: २८ जुलै २०२६ पासून

​३. लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम नॉर्थ – एलटीटी ‘गरीब रथ’ एक्स्प्रेस (आवड्यातून २ दिवस)

​गाडी क्र. १२२०१ (लोकमान्य टिळक (ट) ते तिरुवनंतपुरम नॉर्थ):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०२:०२ / ०२:०४

​सुरुवात: २७ जुलै २०२६ पासून

​गाडी क्र. १२२०२ (तिरुवनंतपुरम नॉर्थ ते लोकमान्य टिळक (ट)):

​स्थानक: सावंतवाडी

​वेळ: पहाटे ०३:२८ / ०३:३०

​सुरुवात: ३० जुलै २०२६ पासून

प्रवाशांनी या बदलांची आणि सुधारित वेळेची नोंद घ्यावी, असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी (सुनील बी. नारकर) यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहिती आणि सविस्तर वेळापत्रकासाठी प्रवाशांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट द्यावी.

कागदी शिधापत्रिका होणार इतिहासजमा! आता मिळणार ‘क्यू – आर’ असलेल्या ‘स्मार्ट शिधापत्रिका’

   Follow us on        

मुंबई (वृत्तसंस्था):

राज्यातील नागरिकांना अधिक सुलभ, सुरक्षित व आधुनिक स्वरूपातील शिधापत्रिका उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या नव्या उपक्रमाअंतर्गत आता पारंपारिक कागदी शिधापत्रिका बंद करून त्याऐवजी क्यूआर कोड (QR Code) आधारित अत्याधुनिक ‘स्मार्ट शिधापत्रिका’ वितरीत केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे वर्षानुवर्षे चालत आलेली कागदी शिधापत्रिकेची पद्धत आता लवकरच इतिहासजमा होणार आहे.

​अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला (जि. नाशिक) येथील एका विशेष कार्यक्रमात क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिकेच्या प्रतिकृतीचे अधिकृत अनावरण करण्यात आले. राज्यभरात ही योजना टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार असून, त्याची सुरुवात म्हणून सिंधुदुर्ग आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये या योजनेची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी केली जाणार आहे.

​या महत्त्वाकांक्षी मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे १.७० कोटी कुटुंबांना क्यूआर कोड आधारित स्मार्ट शिधापत्रिका देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या डिजिटल स्मार्ट कार्डमुळे सार्वजनिक शिधापत्रिका वितरण व्यवस्थेत अधिक सुलभता, पारदर्शकता आणि कार्यक्षमता येण्यास मदत होणार आहे. तसेच बनावट कार्ड रोखण्यास आणि नागरिकांना शासकीय अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील सेवांचा अधिक सोयीस्करपणे व विनासायास लाभ घेण्यास मदत होणार आहे.

​जुन्या आणि जीर्ण झालेल्या कागदी शिधापत्रिकांमुळे राज्यातील गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कामांमध्ये आणि धान्य घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन नागरिकांना डिजिटल स्वरूपातील स्मार्ट कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आला. या संकल्पनेनुसार राज्यात पुढील तीन वर्षांच्या कालावधीत ‘स्वर्गीय अजितदादा पवार लोककल्याण स्मार्ट शिधापत्रिका वितरण मोहीम’ संपूर्ण राज्यभरात मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येणार आहे.

​या प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना (AAY व PHH) तसेच एपीएल (APL) – शेतकरी योजना यांसारख्या विविध योजनांमधील सर्व पात्र लाभार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दिशेने राज्य शासनाचे हे एक अत्यंत महत्त्वाचे आणि क्रांतीकारी पाऊल मानले जात आहे.

Konkan Railway: घोलवड-उमरगाव पूलाखाली पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली, पाश्चिम रेल्वेची वाहतुक विस्कळीत; कोकण रेल्वेच्या गाड्यांवर परिणाम

   Follow us on        

विशेष वृत्त: घोलवड ते उमरगाव रोड दरम्यान असलेल्या पुलावरील (पूल क्र. २०३) पाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्याने पश्चिम रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेचा उपाय म्हणून काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या मार्गात बदल (Divert) करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील बी. नारकर यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

​या बदलांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहे:

​रद्द करण्यात आलेली गाडी:

​गाडी क्र. २०९१० (पोरबंदर – कोच्युवेली एक्सप्रेस): दिनांक २३/०७/२०२६ रोजी सुरू होणारी ही फेरी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

​मार्गात बदल करण्यात आलेल्या गाड्या (Diversion):

​१. गाडी क्र. १२२१८ (चंडीगड – तिरुवनंतपुरम सेंट्रल केरळ संपर्क क्रांती एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​२. गाडी क्र. २२९०८ (हापा – मडगाव जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – पाळधी – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​३. गाडी क्र. १२४८३ (तिरुवनंतपुरम सेंट्रल – अमृतसर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: रोहा – पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – सुरत.

​४. गाडी क्र. २२४७५ (हिसार – कोइम्बतूर जंक्शन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​५. गाडी क्र. १६३३८ (एरनाकुलम जंक्शन – ओखा एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.

​६. गाडी क्र. २२६५५ (एरनाकुलम जंक्शन – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस): (दि. २२/०७/२०२६)

​नवीन मार्ग: पनवेल – इगतपुरी – जळगाव – पाळधी – उधना – सुरत.

​७. गाडी क्र. १६३३३ (वेरावळ – तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस): (दि. २३/०७/२०२६)

​नवीन मार्ग: सुरत – जळगाव – इगतपुरी – पनवेल – रोहा.

​प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी रेल्वेच्या या नव्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी. झालेल्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

पेपर फुटी प्रकरण: शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मानवता विकास परिषदेची मागणी

   Follow us on        

२०२६ मध्ये उघडकीस आलेल्या ‘नीट’ (NEET) सह अन्य परीक्षांच्या पेपर फुटीच्या घोटाळ्यांमुळे देशभरातील लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा त्वरित राजीनामा द्यावा आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी जोरदार मागणी ‘मानवता विकास परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत विठ्ठल सावंत यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. “देशाचे भविष्य प्रश्नात आहे, सरकारने आता तरी जागे व्हावे,” असे आवाहन त्यांनी या पत्रातून केले आहे.

​विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या असत्या, तर आज दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावे लागले नसते, असे सावंत यांनी म्हटले आहे. देश हा संवादाने आणि न्यायाने चालतो; परंतु न्याय मागणार्‍या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून हा प्रश्न सुटणार नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. सर्व दोषींना कठोर शिक्षा व्हावी, ही विद्यार्थी, पालक आणि सर्व भारतीयांची एकमुखी मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​या अत्यंत संवेदनशील प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्वरित लक्ष घालून निर्णय घ्यावा, अशी विनंती मानवता विकास परिषदेने केली आहे. तसेच, सध्या सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या गंभीर विषयावर विशेष चर्चा घडवून आणावी आणि संपूर्ण प्रकरणाची सीबीआय (CBI) किंवा न्यायालयीन चौकशी करून कारवाई करावी, अशी कडक मागणी संस्थेने केली आहे. सरकारने तरुणांच्या भावनांचा आदर न केल्यास देशातील असंतोष अधिकच भडकेल, असा इशाराही श्रीकांत सावंत यांनी दिला आहे.

Konkan Railway: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांसाठी ४६.६८ कोटी रुपयांचा निधी; रेल्वेमंत्र्यांची माहिती

   Follow us on        

नवी दिल्ली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांवरील प्राथमिक सुविधांच्या विकासाबाबत आणि गाड्यांच्या थांब्याबाबत खासदार नारायण राणे यांनी विचारलेल्या प्रश्नाला रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लेखी उत्तर दिले आहे. या उत्तरात त्यांनी स्पष्ट केले आहे की, २०२१-२२ ते २०२६-२७ (३० जून २०२६ पर्यंत) या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख स्थानकांच्या प्रवासी सुविधांसाठी सुमारे ४६.६८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत किंवा त्यांची कामे सुरू आहेत.

​प्रमुख स्थानकांवरील विकासकामे

​रेल्वेने वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या मुख्य स्थानकांवर अनेक प्रवासी सुविधा उपलब्ध केल्या आहेत.

​वैभववाडी रोड: येथे १० मॉड्युलर शेल्टर, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, ४ वॉटर पेडस्टल, फूट ओव्हर ब्रिज (FOB) आणि स्वच्छतागृहांचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे.

​कणकवली: एसी लाउंज, प्लॅटफॉर्म १ आणि २ चा विस्तार, दिव्यांग-अनुकूल स्वच्छतागृहे, बायो-टॉयलेट आणि टीव्ही आधारित माहिती प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच लिफ्ट, एफओबी रूफ शेल्टर आणि डाऊनवर्ड एस्केलेटर बसवण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत.

​सिंधुदुर्ग: येथे ५ मॉड्युलर शेल्टर, दिव्यांग-अनुकूल स्वच्छतागृहे आणि टीव्ही आधारित माहिती प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत.

​कुडाळ: फूड कोर्ट, २६ मॉड्युलर शेल्टर, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि बायो-टॉयलेटची कामे पूर्ण झाली आहेत. याशिवाय लिफ्ट आणि एफओबी रूफ शेल्टरचे काम सुरू करण्यात आले आहे.

​सावंतवाडी: ८ मॉड्युलर शेल्टर, हाय लेव्हल प्लॅटफॉर्म, फूट ओव्हर ब्रिज, वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्टॉल पूर्ण झाले आहेत. तसेच प्लॅटफॉर्म क्र. ३ वर दुसऱ्या प्रवेशद्वारावरील बुकिंग ऑफिस, वेटिंग हॉल आणि लिफ्टची कामे सुरू आहेत.

​याव्यतिरिक्त, खरेपाटण रोड, अचिरणे, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे यांसारख्या इतर स्थानकांवरही प्रवासी सुविधांची कामे करण्यात आली आहेत.

​तिकीट बुकिंग सुविधा आणि डिजिटल पर्याय

​सिंधुदुर्ग (ओरोस) आणि वैभववाडी रोड या स्थानकांवर सध्या युटीएस-कम-पीआरएस (UTS-cum-PRS) तिकीट बुकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

​प्रवाशांच्या सोयीसाठी ‘रेलवन ॲप’ (RailOne App) ची सुविधा देण्यात आली आहे, ज्याद्वारे प्रवासी मोबाईलवरच राखीव आणि अनारक्षित तिकिटे बुक करू शकतात.

​एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबे

​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्यांना नवीन थांबे देण्यात आले आहेत:

​सिंधुदुर्ग स्थानक: एर्नाकुलम – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस (५ नोव्हेंबर २०२५ पासून) आणि एर्नाकुलम – अजमेर मरुसागर एक्सप्रेस (२ नोव्हेंबर २०२५ पासून) थांबत आहेत.

​कणकवली स्थानक: हिसार – कोईम्बतूर एक्सप्रेस (५ नोव्हेंबर २०२५ पासून) आणि गांधीधाम – नागरकोइल एक्सप्रेस (७ नोव्हेंबर २०२५ पासून) थांबत आहेत.

​सावंतवाडी रोड स्थानक: छत्रपती शिवाजी महाराज (T) – मंगळुरू जंक्शन एक्सप्रेस, तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस आणि लोकमान्य टिळक (T) – तिरुवनंतपुरम नॉर्थ गरीब रथ एक्सप्रेस या गाड्यांनाही थांबा मंजूर करण्यात आला आहे.

कणकवली:१० रुपयांच्या पर्यटन करावरून पर्यटक आणि स्थानिकांमध्ये राडा

   Follow us on        

कणकवली तालुक्यातील सावडाव धबधबा येथे पर्यटन कराच्या मुद्द्यावरून दाजीपूर आणि इचलकरंजी येथून आलेल्या पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये मोठा वाद झाला. ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. सावडाव ग्रामपंचायतीकडून धबधब्याकडे जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमागे दहा रुपये पर्यटन कर घेतला जातो. याच कराच्या वसुलीवरून १० ते १२ पर्यटकांनी तिथल्या कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि त्यांना बेदम मारहाण केली.

​मारहाणीचा हा प्रकार पाहून जेव्हा स्थानिक ग्रामस्थ तिथे जमा झाले, तेव्हा पर्यटकांनी त्यांच्यावरही दगडफेक केली. जसजसे अधिक ग्रामस्थ तिथे गोळा होऊ लागले, ते पाहून पर्यटकांनी आपल्या वाहनांसह मुंबई-गोवा महामार्गाच्या दिशेने पळ काढला. मात्र, या घटनेत गावकऱ्यांनी एका पर्यटकाला जागीच पकडले आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या पर्यटकाला ताब्यात घेतले असून, मारहाण करणाऱ्या सर्व पर्यटकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कणकवली पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. पर्यटनाच्या नावाखाली येऊन स्थानिकांवर दादागिरी करणाऱ्या अशा हुल्लडबाजांवर कडक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी सावडाव ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे.

एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरऐवजी ‘सुपर ब्लू इथेनॉल गॅस सिलिंडर’ येणार?

   Follow us on        

​नवी दिल्ली: १ ऑक्टोबर २०२६ पासून देशभरात एलपीजी (LPG) गॅस सिलिंडरऐवजी १०० टक्के इथेनॉलवर चालणारे ‘सुपर ब्लू इथेनॉल गॅस सिलिंडर’ येणार असल्याचा एक दावा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या दाव्यासोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नावही जोडले गेले होते. मात्र, हा दावा पूर्णपणे चुकीचा आणि भ्रामक असल्याचे महाराष्ट्र शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने (डीजीआयपीआर) स्पष्ट करत ही अफवा फेटाळून लावली आहे.

​शासनाने खुलासा केला आहे की, सध्या सरकार वाहतूक क्षेत्रात इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी आणि जैवइंधन तंत्रज्ञानावर मोठ्या प्रमाणावर संशोधन करत आहे हे खरे आहे. परंतु, घरगुती स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरमध्ये असा कोणताही देशव्यापी बदल करण्याचा सरकारचा सध्या कोणताही विचार नाही. अशा प्रकारच्या बदलासाठी आवश्यक असणारे कोणतेही अधिकृत धोरण, नवीन सुरक्षा मानके, पायाभूत सुविधांची निर्मिती किंवा कोणतीही अधिकृत अधिसूचना शासनाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे एलपीजी सिलिंडर बंद होऊन इथेनॉल सिलिंडर येणार, ही केवळ एक अफवा आहे.

​या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी समाजमाध्यमांवर वेगाने पसरणाऱ्या अशा कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या माहितीवर किंवा अफवांवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये, असे आवाहन डीजीआयपीआरने केले आहे. तसेच, इंधन किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयाची माहिती मिळवण्यासाठी नागरिकांनी केवळ शासनाच्या अधिकृत वेबसाइट्स आणि अधिकृत स्रोतांवरूनच खात्री करावी, असा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गणेशोत्सव रेल्वे तिकीट आरक्षण: ऑनलाईन बुकिंग पहिली १० मिनिटे बंद; फायदा कोणाचा?

   Follow us on        

Konkan Railway: रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये  दलालांकडून होणाऱ्या ऑनलाईन घोटाळ्यांबाबत रेल्वे विभागाकडे सातत्याने अनेक तक्रारी दाखल होत होत्या. हे दलाल बेकायदेशीरपणे ऑनलाईन तिकिटे हडप करून प्रवाशांना ती चौपट दराने विकत असल्याचा दाट संशय होता. याच पार्श्वभूमीवर, तिकीट खिडकीवर (Ticket Window) रात्रभर रांगेत उभे राहणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना प्राधान्याने तिकीट मिळावे, या उद्देशाने आज ऑनलाईन बुकिंग सुरुवातीची पहिली १० मिनिटे जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे रात्रभर रांग लावणाऱ्या अनेक सामान्य प्रवाशांना आज तिकिटे मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ऑनलाईन तिकिटांची आस धरून बसलेल्या प्रवाशांच्या हाती निराशाच लागली.

​हा उपाय आहे की सामन्यांची डोकेदुखी?

दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने योजलेला हा उपाय कितपत योग्य आहे, यावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एजंट स्वतः रांगेत उभे न राहता, भाड्याने आपली माणसे रात्रभर तिकीट खिडकीच्या रांगेत उभी करून तिकिटे मिळवतात. रेल्वेच्या या नव्या प्रकारामुळे दलाल आता ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन रांगेत अधिक माणसे उभी करतील आणि काळाबाजार सुरूच ठेवतील, अशी रास्त भीती व्यक्त होत आहे.

​सर्वच उपनगरीय स्थानकांवर आरक्षित खिडक्या नाही आहेत. नोकरदार वर्ग, महिला आणि सर्वसामान्य लोकांसाठी तिकीट खिडकीवर रात्रभर रांग लावणे शक्य आणि सोयीचे नसते. त्यामुळे या वर्गाला ऑनलाईन तिकीट बुकिंगवरच अवलंबून राहावे लागते. ऑनलाईन तिकीट न मिळाल्यास त्यांना पुन्हा त्याच दलालांच्या दारात जावे लागेल. याचाच फायदा घेत दलाल चौपट दराने तिकिटांची विक्री करतील आणि रात्री रांग लावण्यासाठी भाड्याची माणसे आणखी वाढवतील. त्यामुळे दलालांना आळा घालण्यासाठी रेल्वेने असे उपाय अमलात आणणे हास्यास्पद आहे. अशा सामान्य प्रवाशांना त्रासदायक ठरणाऱ्या आणि वरवरच्या उपायांवर अवलंबून न राहता इतर प्रभावी, तांत्रिक आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. तसेच, सामान्य प्रवाशांचा होणारा हा आर्थिक आणि मानसिक छळ त्वरित थांबवावा, अशी आग्रही मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search