कुडाळ तालुक्यातील सावंतवाडी वनविभागाच्या वतीने २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत ‘वन्यजीव सप्ताह’ आणि ‘सेवासंकल्प अभियान’ अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आले आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश वन्यजीवांचे संरक्षण करणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे हा आहे.
याच मोहिमेदरम्यान मौजे झारप-मुंडेवाडी परिसरामध्ये प्रवीण रेडकर यांच्या घराच्या लगत असलेल्या विहिरीमध्ये एक खवले मांजर अचानक पडल्याचे निदर्शनास आले. या दुर्मीळ प्राण्याला विहिरीत अडकलेले पाहून स्थानिक रहिवासी अनिकेत तेंडुलकर यांनी अजिबात वेळ न दवडता नेरूर तर्फ हवेलीचे वनपाल यांना तातडीने या घटनेची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळाच्या दिशेने रवाना झाले. मात्र, वन कर्मचाऱ्यांचे पथक पोहोचण्यापूर्वीच स्थानिक ग्रामस्थ प्रवीण रेडकर व त्यांच्या सहकारी बांधवांनी विलक्षण प्रसंगावधान राखले आणि काठीच्या मदतीने विहिरीतील खवले मांंजराला सुरक्षितपणे बाहेर काढले.
ग्रामस्थांनी सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या खवले मांंजराला वन कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन केले. वनअधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या या तत्परतेचे व सतर्कतेचे मनापासून कौतुक करत आभार मानले; तसेच कुडाळ येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राण्याची वैद्यकीय तपासणी करून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात येईल असे स्पष्ट केले.
सदर बचाव मोहीम उपवनसंरक्षक मिलिंद शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड आणि वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या संपूर्ण मोहिमेत वनपाल सूर्यकांत सावंत, वनरक्षक प्रसाद पाटील, अमित खरवत, वनसेवक यशवंत कदम आणि जलद कृती बचाव पथकाचे सदस्य यांच्यासह प्रवीण रेडकर, उदय मुंडे, विनय मुंडे, सुरेश रेडकर, महेश मुंडे, रमेश मयेकर, भीमराव मुंडे, धनेश पालकर, रमेश पालकर, संतोष शिंदे आणि महादेव बुटे हे ग्रामस्थ उपस्थित होते.


