दोडामार्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी परत येवून धुडगूस घालणे चालू केल्याने येथील नागरिकांमध्ये चिंतेचे अणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवस केर आणि मोर्ले या गावांतील बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करून त्यांनी आपला मोर्चा वायंगणतड या गावी वळवला आहे.
अचानक शेतात हत्तीं आल्याने वायंगणतड ग्रामस्थांनी शेतात घाव घेवून त्यांना हिसकावून लावण्याच्या प्रयत्न केला. मात्र हत्तींना त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. त्यानंतर खबर मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी हजर झाले. ग्रामस्थांनी आणि या कर्मचाऱ्यांनी कसेबसे त्यांना हिसकावून लावले. मात्र हत्तीं पुन्हा आल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेताची, बागायतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने हाता तोंडाशी आलेले शेती उत्पादन शेतकर्यांना गमावण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. उन्हाळी शेती, काजू, नारळ, सुपारी केळी या बागायतीचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.
सिंधुदुर्ग -ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल एक भाकीत केले आहे. .दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचं भाकीतच नाईक यांनी वर्तवलं आहे. हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे. असं देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला.तर पुढं म्हणाले की, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना म्हणाले, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.
मुंबई | 03-04-23| मुंबईतील पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांना एक खुशखबर आहे. रेल्वे प्रशासन या मार्गावर 11 नव्या 12 डब्यांच्या नॉन एसी गाड्या चालविणार आहे. त्या नवीन गाड्यांमुळे या मार्गावर चालविण्यात येणार्या गाड्यांची संख्या 1383 वरुन 1394 एवढी होणार आहे.
या गाड्या दिनांक 5 एप्रिल पासून चालविण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या नवीन गाड्या चालविताना काही वेगळे प्रयोग पण करण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर बोरिवली आणि वांद्रे ही स्थानकांवर गाड्यांना थांबे दिले जाणार नाही. बोरिवली च्या पुढे दहिसर, भायंदर, वसई आणि विरार असे मोजकीच स्थानके घेणार असल्याने विरार – वसई करांचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे.
Konkan Railway News | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला प्रत्येकी एका फेरीसाठी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव या गाडीला हापा येथून सुटताना 05 एप्रिल रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना 07 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाईल. याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेलीदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला पोरबंदर येथून सुटताना 06 एप्रिल रोजी तर कोचुवेली येथून सुटताना 09 रोजी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास या मार्गावरील सर्वच गाड्या आता विद्युत इंजिनसह धावत आहेत. विद्युत इंजिनामुळे इंधनावर होणार्या खर्चावर मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे या वाचणार्या पैशांतून या मार्गावरील विकासाची कामे करणे रेल्वेला शक्य होणार आहे. त्याशिवाय डिझेल इंजिनामूळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण टाळता येणार आहे.
पण या विद्युतीकरणामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या मार्गावरील अनेक गावे रेल्वेरूळा मुळे दोन भागात विभागली आहेत. घर रूळाच्या एका बाजूला तर शाळा आणि शेती एका बाजूला. त्यामुळे रूळ ओलांडल्या शिवाय गावकर्यांकडे पर्याय नाही आहे. कारण या मार्गावर पलीकडे जाण्यासाठी ब्रिज नाही आहेत. असले तरी ते खूप अंतरावर आहेत. याआधी गाड्या डिझेल इंजिनावर धावत होत्या त्यामुळे गाड्यांचा मोठा आवाज येत असे. या आवाजामुळे ग्रामस्थ किंवा वन्य प्राणी सावध होत असत. पण आता त्याप्रमाणात आवाज येत नाही त्यामुळे रूळांवर अपघात वाढत असल्याचे दिसत आहेत. वन्य आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांचा बळी जाण्याच्या बातम्या आजकाल मोठ्या प्रमाणावर ऐकण्यास मिळत आहेत.
वन्यप्राणी रूळांवर येवू नये यासाठी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कुंपण बांधणे गरजेचे आहे. व्यवहार्य दृष्टीने पाहता सर्वच ठिकाणी पादचारी पूल बांधणे शक्य नाही पण ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूळ ओलांडले जाते अशा ठिकाणी असे पूल किंवा भुयारी मार्ग बांधणे गरजेचे आहे.
गोवा वार्ता – काल दिनांक १ एप्रिल रोजी पणजी शहरात एक महिन्यासाठी लॉकडाउन लागणार असे गोवा राज्यातील गोमंतक या अग्रगण्य वृत्तप्रत्रात प्रसिद्ध झाल्याने एकच खळबळ उडाली होती. पणजीतील स्मार्ट सिटी प्रकल्प व कोरोनाच्या सावटावरील स्थितीला अगदी तंतोतंत जुळणाऱ्या या बातमी एका अग्रगण्य वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याने बातमीमध्ये वाचकांना विश्वासाहर्ता वाटली आणि चर्चा सुरु झाल्या. पण त्याच वृत्तप्रत्रात ती बातमी ‘एप्रिल फूल’ करण्याच्या उद्धेशाने असल्याचे आज जाहीर केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.
पणजी शहरातील रस्ते गेल्या तीन महिन्यांपासून खोदल्याने नागरिक आणि वाहनचालक त्रस्त झाले आहेत. याची सरकारने दखल घ्यावी व हे काम त्वरित पूर्ण करावे, या उद्देशाने ‘गोमन्तक’ने ही मनोरंजनात्मक बातमी प्रसिद्ध केली असे म्हंटले आहे.
काहीही असो, पण ही बातमी फक्त ‘एप्रिल फूल’ असल्याचे आज कळताच येथील नागरिकांचा जीव भांड्यात पडला आहे.
उत्तरा जोशी, देवगड |चांगलं शिक्षण घेतल की शहराकडे निघायचं हा आजवरचा कोकणातल्या मुलांचा इतिहास. कोकणातल्या माणसाला मुळातच शहराची जबरदस्त ओढ आणि त्यातूनच शिक्षण चांगलं असेल तर मग गावाकडे परत येणं नाहीच. पण या सगळ्याला छेद देणारा एक मुलगा याच कोकणात आहे.“ प्रसाद गावडे”.
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली या छोट्याशा गावातला हा मुलगा. याचं बालपण तळकोकणात गोवा-कर्नाटक-सिंधुदुर्ग च्या सीमेवरील मांगेली ह्या गावात गेले..!
तिन्ही बाजूने सह्याद्री च्या डोंगर रांगा ,मांगेलीच्याडोंगरात उगम पावून गोव्याच्या दिशेने वाहणारी थोरली न्हय अर्थातच आताची तिलारी नदी ,प्रचंड जैवविविधता ,प्राणी पक्षी आणि वनराईने नटलेला असा हा तिलारी खोऱ्याचा प्रदेश..प्रसादने मनुष्य आणि निसर्ग ह्यातील नातं जवळून अनुभवलं ते ह्याच दिवसात..संपूर्णपणे निसर्गधारीत जीवनशैली जगणारे अत्यंत आनंदी आणि समाधानी माणसं त्याने इथे पाहिलीत.
दहावी होईपर्यंत सावंतवाडी हेच मोठं शहर समजणाऱ्या प्रसादला बारावी नंतर त्याच्या चांगल्या गुणांमुळे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. चार वर्ष दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात त्याने अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केल. या चार वर्षात त्याने औरंगाबाद मधील दुष्काळ अगदी जवळून अनुभवला. लोकांचे पाण्यासाठी होणारी वणवण,भकास उजाड माळरान हे सगळं पाहून त्याला वेळोवेळी कोकणातल्या सुबत्तेची अधिकच जाणीव होत गेली.
प्रसाद म्हणतो की,“ह्या चार वर्षात सगळ्यात जास्त आठवलं ते माझं कोकणचं जीवन,इथला निसर्ग, इथला पाऊस,समुद्र,प्राणी,पक्षी,जैवविविधता ,हिरवेगार डोंगर,सडे,काजू आंबे फणस सगळंच..त्यामूळे डिग्री घेतल्यावर पहिल्यांदा मनात ठाम केलं की या पुढे काहीही झालं तरी कोकण सोडायच नाही..जे काही करणार इथे राहूनच..इथल्या लालमातीत सोनं आहे, जगात कुठेच सापडणार नाही असा स्वर्गीय निसर्ग असलेला प्रदेश सोडून भकास ,प्रदूषित,so called विकास करू पाहणाऱ्या शहरांकडे करिअर घडवायला जाणाऱ्यांमधला मी कधीच होणार नव्हतो..”
शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रसाद कोकणात परत आला.सर्वसाधारण कुटुंबातून आल्यामुळे उत्पन्न मिळवणे भागच होत. मांगेली पासून गोवा जवळ असल्यामुळे वर्षभर त्याने गोव्यातच GIDC मधील एका कंपनीत जॉब केला पण इथेही त्याची निसर्गाची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना . साधारण वर्षभर या कंपनीत नोकरी केल्यानंतर प्रसादला जाणीव झाली की आपल मन काही या नोकरीत राहणार नाही. गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. पाट्या टाकल्या सारख्या यांत्रिक नोकरीत त्यांचे मन काही रमेना. यातूनच त्याने घेतला एक धाडसी निर्णय नोकरी सोडण्याचा. एके दिवशी अचानक एक महिन्याचा पगार व्हायचा बाकी असताना नोकरीचा राजीनामा देऊन प्रसाद आपल्या गावी मांगेली ला परत आला.पुढे काय करायचं वगैरे काही ठरलं नव्हतं फक्त गावी जायचं आणि काहीतरी करायचं एवढंच डोक्यात घेऊन प्रसाद परतला होता. सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे प्रसादच्या घरच्यांनाही याच आता कसं होणार ही काळजी वाटायला पण प्रसाद मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता.
गावातल्या निसर्गधारीत जीवन जगणाऱ्या आपल्या गावठी कोकणी लोकांचं जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन आहे ह्याची त्याला जाणीव होती. यातूनच त्याने सुरू केलं इको टुरिझम. आजवर आपल्याकडे येणारे पर्यटक हे काही ठराविक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देतात मजा करतात आणि परत जातात पण कोकणातलं खरं जीवन त्यांना कुठे दिसतच नाही किंवा ते जगता येत कोकणातला माणूस जे खर आयुष्य जगतो त्याचा अनुभव घेण्यासाठी आसुसलेल्या लोकांना आपण या कोकणी माणसाच्या जीवनाचा अनुभव द्यायचा जे जीवन ते जगतात त्या जीवनाचच ब्रँडिंग करायचं आणि कोकणात आलेल्या पर्यटकांना त्यांच्यासारखं जीवन जगायला लावायचं आणि त्याचे त्यांच्याकडून पैसे घ्यायचे जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांना त्यातूनच उत्पन्न मिळेल अशी प्रसाद ची कल्पना. यातूनच त्याने स्वतःकडे काहीही सोय नसताना गावच्या लोकांची मदत घेऊन अशा टूर्स अरेंज करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही टूर्स ला प्रसाद कडे ना धड चांगला कॅमेरा होता ना स्वतःची गाडी. खरंतर चार चाकी गाडी सुद्धा व्यवस्थित चालवता येत नव्हती. पण तरीही प्रसादने या पर्यटकांना गावातल्याच एका भाड्याच्या गाडीतून फिरवलं.ओळखीच्यांच्या घरी त्यांच्या जेवणाची सोय केली आणि हे पर्यटक अतिशय आनंदाने परतले. यातूनच त्याला गवसला पर्यटनाचा आणि एक मार्ग.
पुढच्या महिन्यात त्यानेसावंतवाडी,कुडाळ,मालवण आणि वेंगुर्ले हे चारही तालुके अगदी पिंजून काढले.प्रत्येक तालुक्यात असलेली अगदी बारीकसारीक निसर्गरम्य ठिकाणं, डोंगरात लपलेले धबधबे,नद्या, जंगलातली काही सुंदर ठिकाणं, तसेच असेच काही दुर्लक्षित परंतु स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे त्याने शोधून काढले.कोकण म्हणून आजवर प्रसिद्ध झालेल्या ठिकाणांव्यतिरिक्त ज्यांना खरच निसर्गाची ओढ आहे अशा लोकांना भेट देऊन इथल्या निसर्गाचा इथल्या जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून ही प्रसादची धडपड.
सोशल मीडियाचा उपयोग करून घेत सुरुवातीला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून प्रसाद ने आपल्या या उपक्रमाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यातून कोकणातल्या अंतर्गत भागात फिरायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. या पर्यटकांमध्ये परदेशी पाहुण्यांचादेखील समावेश होऊ लागला.गावागावात लपलेल्या प्रेक्षणीय गोष्टी पाहून येणारे पर्यटक खुश होऊन जाऊ लागले आणि नवीन लोकांना याबद्दल माहिती देऊन प्रसादकडे पाठवू लागले.प्रसादच्या या टूर्स मुळे मुख्यतः फायदा होऊ लागलाय तो गावागावातल्या अगदी सामान्य माणसाला.घरगुती जेवणाची सोय केल्यामुळे गावागावातल्या कुटुंबांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे.सध्या याचं प्रमाण कमी असेल तरी भविष्यात मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाच्या संधी लोकांना उपलब्ध होतील आणि गावात राहणाऱ्या लोकांना आपल्या जीवनाबद्दल वाटणारी लाज कमी होईल अशी प्रसादची पक्की खात्री आहे. याबद्दल प्रसाद उदाहरण दाखल सांगतो, ”मागच्या मे महिन्यात फॉरेनर चा १६-१७जणांचा एक ग्रुप दोडामार्ग मध्ये मी घेऊन गेलो तिथल्या एका आमच्या कोकणी माणसाने त्यांना त्यांच्याच बागेत झाडावर चढुन फणस ,आंबे,काजू,कोकम काढून दिले आणि ते ह्या पर्यटकांनी चांगले पैसे देऊन विकत घेतले,आजोबांचे खूप कौतुक केले..त्यांच्या बायकोने शेतातल्या मांगरात(शेतघर) उकडा भात,तांदळाची भाकरी,फणसाची भाजी आणि सोलकढी असं जेवण करून घातले ते जेवण इतकं आवडलं की त्यांनी आजीला जाताना मिठीच मारली ..रानातील करवंद ,जांभूळ,चाफर ,तोरण सगळं काही जाताना त्यांना अगदी कोकणी रानमेवा म्हणून भेट दिली..!
आयुष्यात पहिल्यांदा कोकणातल्या एका गावठी माणसाला त्याच्या गावठी जीवनाचा अभिमान वाटला..हे मी माझं यश समजतो आणि इथेच मला माझा पहिला रानमाणूस भेटला..!! वालावल च्या खाडीत मयु तारी गेली कित्येक वर्ष लोकांना पैलतीरावर नेऊन सोडतो पण त्याच खाडीत बॅकवॉटर सफरी साठी मी आणि मयु पर्यटकांना फिरवून त्याच्या रोजच्या उत्पन्ना पेक्षा अधिक पैसे मिळवून देतो…किनाऱ्याला लागून असणाऱ्या माडबागायतीत छोट्याशा घरात राहणारा एखादा स्थानिक इथे काही उत्पन्न नाही म्हणून पैशाच्या लोभापायी आपली सोन्यासारखी जमीन एखाद्या बाहेरच्या माणसाला विकून टाकून कोकणातून बाहेर जाईल आणि आपलं कोकण हळूहळू बाहेरच्यांच्या हातात जाईल याची भीती कायम मनात असते आणि म्हणूनच प्रसादच लक्ष या लोकांना कमीतकमी खर्चात रोजचं उत्पन्न कस निर्माण करता येईल यात लागलेल असतं.
आजवर अनेक सोलो ट्रॅव्हलर्स ,अनेक गृप टूर्सना प्रसादने स्थानिकांच्या मदतीने उत्तम सुविधा दिली आहे. नुकतीच एक कॉर्पोरेट टूर यायची ठरलेली असताना अचानक ट्रेनची तिकीट कन्फर्म न झाल्याने आणि खाजगी वाहनांसाठी ड्रायव्हर उपलब्ध नसल्यामुळे मुंबई ते सावंतवाडी प्रवासाचा पर्यटकांचा प्रश्न प्रसादने रातोरात मुंबईला जाऊन दुसऱ्या दिवशी स्वतः पूर्ण ड्रायव्हिंग करून त्यांना सावंतवाडीला आणून सहज सोडवला.त्याच्या या सहकार्यामुळे तसेच इथल्या वास्तव्यात आलेल्या अनुभवाने अतिशय खुश होऊन पुन्हा जाताना पर्यटकांनी त्याला त्याच्या पुढच्या प्रवासात मदत करण्याची देखील तयारी दाखवली आहे.
स्वतःकडील मोबाईलवर फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करणारा प्रसाद या दीड वर्षाच्या प्रवासात स्वतःचा प्रोफेशनल कॅमेरा, ड्रोन तसेच स्वतःच्या उपजीविकेपुरते पैसे कमावण्याच्या टप्प्यावर पोचलाय. सुरुवातीला कशीबशी चारचाकी चालवणारा प्रसाद आता सगळ्या प्रकारच्या चारचाकी सहज चालवू लागलाय. घरातल्यांचा सुरुवातीला काळजीपोटी असणारा विरोध आता हळूहळू मावळतोय.एकेक शिलेदार प्रसादच्या सोबत काम करायला येऊन मिळत आहेत. या सोबतच इथल्या पडीक जमिनीतून उत्पादन सुरू करण्यासाठी प्रसादचा प्रयत्न सुरू आहे.त्याची स्वतःची फारशी जमीन नाही परंतु त्याच्या या प्रयत्नांना हातभार म्हणून एका ओळखीच्या कुटुंबाने आपली पडीक असलेली शेतजमीन त्याला शेतीसाठी देऊ केली आहे.त्या जमिनीतून यावर्षीपासून उत्पादन घेण्यास सुरुवात होईल.
यासोबतच आता स्वतःच्या कल्पना जगापर्यंत पोचवण्यासाठी लवकरच “कोकणी रानमाणुस” ची स्वतःची वेबसाईट पूर्णत्वाला येईल. कोकण म्हणजे फक्त गणपतीपुळे,मालवण तारकर्ली आणि वेंगुर्ला इथले समुद्र किनारे आणि देवळे नव्हे तर कोकण म्हणजे अश्याच गावठी कोकणी रानमाणसांसोबत निसर्गजीवन जगायला शिकवणारे स्वर्गीय डेस्टिनेशन आहे..म्हणून प्रसाद आपल्या जाहिरातीत नेहमी कॅपशन ला टाकत असतो.
“Explore Heavenly Konkan with Konkani Ranmanus”
जितका सुंदर इथला निसर्ग आहे तितकीच गोड इथली माणसं ही येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून मिळणारी प्रतिक्रिया असते ..!!कोकणचा विकास हा रासायनिक प्रकल्प,मोठे रस्ते,इमारती,industries ह्यात नाहीये तो आहे निसर्गपूरक शाश्वत पर्यटनात,शेतीत,फळप्रक्रियेत,मत्स्योत्पादन ह्यात..
येत्या काळात दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला हा गोवा सीमेलगतच्या तालुक्यांना ecotourism साठी भारतात ओळख मिळवून द्यायचं प्रसादचं स्वप्न आहे..याबद्दल बोलताना प्रसाद म्हणतो“गाडगीळ समितीच्या शिफारसी नुसार हा संपूर्ण भाग इकोसेन्सिटिव्ह आहे तरीही मायनिंग ,क्रशर,केरळ वाल्यांचे अतिक्रमण सुरूच आहे..जोपर्यंत लोकांना शाश्वत विकासाचे महत्व आपण पटवून देत नाही तोवर कोकण चा विनाश थांबवणे अशक्य आहे..
कोकणात राहून कोकण आहे तसंच निसर्गरम्य ठेवणारे रानमाणूस जरी निर्माण करू शकलो तर देवाने मला कोकणात जन्म दिल्याचे उपकार फेडल्याचे समाधान मिळेल ..बाकी करिअर वगैरे सगळ्या सांगायच्या गोष्टी असतात हो..”
या महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रसाद आणि त्याच्या काही मित्रांनी जवळपासच्या नदी-नाल्यांमधून उन्हाळ्यात साठलेला कचरा साफ करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.याबद्दल सांगताना प्रसाद आणि त्याचे सहकारी म्हणतात की,“ उन्हाळ्यात हे गावातून वाहणारे नदी-नाले कोरडे होतात आणि याच काळात आजूबाजूची लोक सहज वाटेल तो कचरा या नदीपात्रात आणून टाकतात.पाऊस सुरू झाला की हा सगळा कचरा वाहून जवळच असलेल्या समुद्राला मिळतो आणि पर्यायाने यातले घातक घटक समुद्रातल्या प्राण्यांच्या पोटात जातात.तेच दूषित अन्न जेव्हा मासे किंवा समुद्रातले प्राणी अन्न म्हणून आपण खातो तेव्हा आपल्या पोटात जातात. शिवाय या विघटन न होणाऱ्या कचऱ्यामुळे समुद्राचं प्रदूषण होतंच आणि पुन्हा हा सगळा कचरा किनाऱ्यावर येऊन साठतो आणि स्वच्छ सुंदर किनारे विद्रुप होऊन जातात.म्हणूनच काळजी म्हणून आम्ही यावर्षी पाऊस सुरू होईपर्यंत जवळपासच्या जेवढ्या जमेल तेवढ्या नदी नाल्यांच्या कोरड्या पात्रांना स्वच्छ करायचं ठरवलं आहे.यासाठी गावागावातल्या लोकांना सोबत यायचं देखील हे तरुण आवाहन करत आहेत.येतील त्यांना सोबत घेऊन आणि कोणी नसेल तरी आपल्याला जमेल झेपेल तेवढं हे काम आपण करायचंच या ठाम निश्चयाने या कामाला सुरुवात झाली आहे.”
खरतर रोजच्या आयुष्यात अस वागणाऱ्या माणसाला सगळे वेडाच समजतात.पण वेडेच इतिहास घडवतात हेही तेवढंच खरं. प्रसाद सारखे कोकणाची ओढ असलेले तरुण सगळ्या कोकणात निर्माण झाले तर दिवसेंदिवस रिकाम्या होत जाणाऱ्या कोकणाला उज्वल भविष्य आहे एवढं नक्की. उरीपोटी कोकणच प्रेम घेऊन जगणाऱ्या या धडपड्या प्रसादला शुभेच्छांसोबत आपण आपला मदतीचा हातदेखील नक्किच देऊया..
लेखिका = उत्तरा जोशी, देवगड
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सावंतवाडी –शिवसेना ठाकरे गटाने काल दिनांक 1 एप्रिल रोजी मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात अनोखे आंदोलन केले. मंत्री केसरकर म्हणजे एप्रिल फुल आमदार गुल अशा घोषणा देत ढोल बडवून केसरकर यांचा निषेध नोंदवला.शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ याच्या नेतृत्वाखाली येथील एसटी बसस्थानकात आंदोलन करण्यात आले.
सावंतवाडीतील जगन्नाथ उद्यानात मोनोरेल सुरू, बसस्थानक, आंबोली-गेळे कबुलायतदार प्रश्न, मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पंचायत समिती इमारत नवीन जागेत स्थलांतर, एक लाख सेट टॉप बॉक्स आदिची घोषणा केल्या पण प्रत्यक्षात काहीच नाही. मंत्री केसरकर हे पंधरा वर्षे लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे काम केले आहे, असा आरोप करुन यापुढे ते आमदार म्हणून निवडून येणार नाही. यासाठी आम्ही ठाकरे गट म्हणून प्रयत्न करणार असे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी सांगितले.
या आंदोलनात मायकल डिसोजा, बाळा गावडे, गुणाजी गावडे, चंद्रकांत कासार, डॉ. जयेंद्र परुळेकर, शब्बीर मणियार, शैलेश गवंडळकर, आबा सावंत, भारती कासार, श्रृतिका दळवी, श्रेया कासार, अर्चना बोंद्रे आदीसह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गोवा वार्ता – एप्रिल महिन्यात गोवा राज्याला भेट देणार असाल तर तुमच्या साठी एक महत्त्वाची बातमी आहे. गोवा विधानसभेचे अधिवेशन संपल्याच्या रात्रीच विशेष मंत्रिमंडळ बैठकीत गोवा सरकारने एका महिन्याचा पणजी बंद लॉकडाऊन आज जाहीर केला आहे. त्याची कार्यवाही 1 एप्रिलच्या पहाटेपासून सुरू केली जाईल.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बेदरकारपणे चाललेल्या बांधकामांमुळे मेटाकुटीस आलेल्या राजधानीतील नागरिकांना दिलासा देण्यासाठी गोवा सरकारने हा लॉकडाऊन लावला आहे.
शनिवारी सर्व वाहने पणजीमध्ये येण्यापासून रोखून ठेवली जातील. शहरातून बाहेर जाणाऱ्या वाहनांना दुपारी एकपर्यंत मुभा राहील. केवळ अग्निशामक व रुग्णवाहिका यांना शहरात फिरण्यास अनुमती आहे.
एक वाजल्यानंतर मात्र लॉकडाऊनची कठोर कारवाई सुरू होणार आहे. त्यात मच्छी व भाजी मार्केट बंद ठेवण्याचाही निर्णय समाविष्ट आहे.
‘पोलिस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शहराचे शेरीफ म्हणून एका महिन्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. त्यांना लॉकडाऊनची कडक कार्यवाही करण्याचा आदेश देण्यात आला आहे,’ अशी माहिती एका अधिसूचनेद्वारे राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
महाराष्ट्र :राज्यातल्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून वाहतूक भत्तामिळणार आहे. राज्यभरातील ग्रामीण आणि शहरी भागातील वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. पहिली ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून १ किलोमीटर पेक्षा पेक्षा अधिक तर ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून ३ किलोमीटर, आणि ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थ्यांच्या वस्तीस्थानापासून ५ किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर शाळा असल्यास त्या विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता मिळणार आहे.
खेडेगावांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना शाळेत पोहचण्यासाठी बरीच पायपीट करावी लागते. विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे हाल होतात. बस सेवा उपलब्ध नसते अशा सगळ्या दिव्यातून वाट काढत खेडेगावातील मुलांना शिक्षण घ्यावे लागते. त्याचमुळे ज्या मुलांची शाळा एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे अशा विद्यार्थ्यांना वाहतूक भत्ता दिला जाणार आहे.
हा भत्ता किती रुपये भेटणार आहे आणि त्याबाबत कोणत्या अटी असतिल या बाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.