वेंगुर्ला प्रतिनिधी – निर्जिवाला सजिव करणा-या कुळातच जन्म, त्यात कलेचा ईश्वर अशा कलेश्वराचा आशिर्वाद, त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून असे काही नाविन्यपूर्ण घडते की, ज्यामुळे त्यांचे नाव अबालवृद्धांच्या तोंडी असते. ही कथा नसून वास्तव आहे ते कुडाळ तालुक्यातील नेरुर गावातील ‘मेस्त्री‘ समाजातील कलाकारांचे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनविन हालते देखावे साकारत लोकांनाच आपल्याकडे खेचून आणण्याचे कसब या मेस्त्री वर्गाकडे पहायला मिळत आहे.
सध्या सर्वत्र शिमगोत्सव सुरु आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार हा शिमगोत्सव साजरा केला जात आहे. त्यातून ब-याच रुढीपरंपरा जपण्याचे काम या उत्सावातून होत आहे. अशीच प्रथा नेरुर गावात ‘मांड‘ या उत्सवातून जपली जात आहे. होळीच्या तिस-या दिवशी माड्याची वाडी येथील श्री गावडोबा मंदिराकडून ‘गावडे‘ समाजाचे रोंबाट तळी घेऊन ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. या रोंबटामध्ये मद्य, मांस नसल्याने याला ‘गोडा रोंबाट‘ असे म्हणतात. भेटीनंतर परतताना प्रत्येक वाडीत या रोंबटाला गा-हाणी घातली जातात, नवस बोलले जातात. हे रोंबाट सायचे टेंब येथे आल्यावर मांडाच्या ठिकाणी गा-हाणी वैगरे होतात आणि त्यानंतर मुख्य ‘मांड उत्सवाला‘ प्रारंभ होतो. राधा आणि शिमग्याचे खेळ या मर्यादेत असलेला हा मांड उत्सव कथांमधील विविध हलत्या देखाव्यांच्या संकल्पनेमुळे लोकप्रिय झाला आहे. कै. आना मेस्त्री, दिनू मेस्त्री, बाबा मेस्त्री व विलास मेस्त्री ही मंडळे आध्यात्मिक आणि पौराणिक कथांवर आधारीत बनविलेले ट्रिकसिनयुक्त हलते देखावे भजनाच्या साथीने सादर करतात. विशेष म्हणजे सर्व देखावे २५ ते ३० फुट उंचीपर्यंतचे असतात. एका ग्रुपमध्ये जवळपास २५च्या वर माणसे असतात. असतो. गणपती, मारुती, राक्षस, वाघ, हंस, बदक, फुलपाखरु, किडा, सिह असे पशूपक्षी कलात्मक पद्धतीने या मांडावर येऊन नृत्य करतात. यात लहान मुलांचाही सहभाग उत्स्र्फूत असतो.
या ‘मांड‘ उत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे देखावे सादर करणारी जी चार मंडळे आहेत, ती यावर्षी कोणता देखावा सादर करणार याची पुसटशीही कल्पना एकमेकांना नसते. साधारण शिवरात्रीच्या दरम्याने श्री कलेश्वराला श्रीफळ ठेऊन देखाव्यांच्या कामाला प्रारंभ केला जातो. जो तो आपल्या देखाव्यातील वेगळेपण जपण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. त्यासाठी लाखोनी रुपये खर्च येतो. परंतु, याचा विचार न करता आपली कला असंख्य जनसमुदायासमोर आणण्यासाठी सिद्ध होतात. मांड उत्सवाला लाभलेला जनसमुदाय आणि त्यांच्याकडून टाळ्यांच्या स्वरुपात मिळणारा प्रतिसाद तसेच त्यांच्या कलाकृतीला कॅमेरात टिपणारा प्रेक्षकवर्ग हेच त्यांचे बक्षिस म्हणायाला हरकत नाही.
आजपर्यंत पिढ्यान्पिढे हा मेस्त्री समाज ही परंपरा जपत आहे. कालानुरुप त्यात बदलही करत आहेत. त्यांच्या युवा पिढीकडून नेहमी वास्तव मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी या उत्सवासाठी मर्यादा होती. त्यामुळे यावर्षी गर्दीने तर उच्चांक गाठला. ‘मांड उत्सव‘ व्यवस्थित पहाता यावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गॅलरीची सोय करण्यात आली होती. तरीही अफाट गर्दीमुळे काहींनी झाडावर तर काहींनी टाचा वर करुन या उत्सवाची मजा लुटली. यावर्षी आना मेस्त्री ग्रुपने रावण-इंद्र युद्ध, विलास मेस्त्री ग्रुपने नंदीवरील शंकर, दिनेश मेस्त्री ग्रुपने महाकाली अवतार विस्तार आणि ज्योतिर्लिग दर्शन व बाबा मेस्त्री ग्रुपने विश्वाचा मुलाधार अवतार ओंकार दर्शन असे देखावे सादर केले. शिमगोत्सवातील या ‘मांडा‘मुळे नेरुर गावाची एक वेगळी ओळख सर्वत्र होत आहे.
विशेष आभार श्री. प्रथमेश गुरव, वेंगुर्ला लेखक आणि संकलक संपर्क – ९०२१०७०६२४
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा
.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
डोंगर आणि देवाचा संबंध आपण नेहमीच पाहतो. हिंदूंची अनेक तीर्थस्थळे, मंदिरे उंच डोंगरावर, शिखरावर दिसून येतात. श्री देव शिव शंकर पण हिमालयात वास्त्यव करतो. कोकणात पण अनेक देवस्थाने डोंगरावर आढळून येतात. आज आपण माहिती घेणार आहोत अशाच एका गावातील अनोख्या होळी उत्सवाची जेथे होळी गावात किंवा सपाट भागावर न उभारता एका उंच डोंगर शिखरावर उभारली जाते.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ह्या गावी ही प्रथा खूप पूर्वीपासून जपली जाते. सावंतवाडी आणि मळगांवच्या सरहद्दीवर असलेल्या नरेंद्र डोंगराचा एक उंच कडा असलेल्या सुवारड्याच्या कड्यावर एका प्रशस्त खडकावर ही होळी उभारली जाते. गावचे मानकरी आणि ग्रामस्थ ह्या ठिकाणी डोंगर चढून दाखल होतात. गाऱ्हाणे घालून गतवर्षीच्या होळी उतरून नवीन होळी उभारली जाते. ह्या होळीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील इतर होळीप्रमाणे शिमगोत्सव संपल्यावर चैत्र पौर्णिमेला होळी न तोडता पूर्ण वर्षभर ही होळी उभी ठेवली जाते. वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरु आहे.
प्रतिनिधी – कोकणाई
विशेष सहाय्य – श्री. प्रज्वल नेवार
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
तळकोकणातील सांगेली गावात शिमगा जरा वेगळया परंपरेने साजरा केला जातो. काय आहे हे वेगळेपण हे पुढील मुद्दे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल.
१. येथे शिमगा सणाची सुरवात आदल्या रात्री पासून सुरू होते. ह्या सणाला गिरोबा उत्सव असे पण म्हंटले जाते. गावातील एक मोठे आणि सरळ फणसाचे झाड देवासाठी निवडून त्याला तोडून उंच देव महादेवाच्या पिंडीचा आकार देऊन त्याची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य ग्रामदेवता म्हणून केली जाते.
२. खरेतर महाशिवरात्रीला देवासाठी फणसाचे झाड निवडले जाते. महाशिवरात्रीला येथे गाव आणि मानकरी जमा होतात आणि देव कोठे काढायचा हे प्रथेप्रमाणे ठरवितात.
३. ज्या वाडीतील झाड निवडायचे आहे त्याठिकाणी पाच मानकरी त्या झाडाला हात लावतात व त्यांनतर हर हर महादेव असा जयघोष करतात. या दिवसापासून गिरोबा उत्सवापर्यंत झाडाची पूजाअर्चा करण्याची प्रथा आहे.
४. होळीच्या आदल्या दिवशी झाडाला तोडून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सुतार ह्या झाडाला सुंदर आकार देतात. त्यानंतर गावातील तरुण स्वयंपूर्तीने खांदा लावून देव देवळात भव्य मिरवणुकीने नेतात. एकूण १४ फुटी असलेला देव जमिनीखाली ७ फूट आणि वर ७ फूट उभारला जातो. ह्या सोहळ्याला जिल्ह्यातीलच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील, तसेच गोवा आणि कर्नाटकातून भक्त उपस्थिती दर्शवितात.
५. प्राणप्रतिष्ठा केलेल्या देवाची ग्रामदेवता म्हणुन वर्षभर पूजा अर्चा केली जाते. अशाप्रकारे झाडापासून बनवलेले ग्रामदैवत असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. त्याचप्रमाणे फणसाच्या झाडापासून लाकडी पिंडी बनवून पुजणारे हे एकमेव गाव आहे.
६. प्रत्येक शिमगा सणाला नवीन देवांची(पिंडीची) प्राणप्रतिष्ठा करून जुने देव मंदिराच्या आवारात एका जागेत ठेवले जातात जागेत ठेवले जातात, त्या जागेस खुट्याचा चाळा असे म्हणतात. असे बोलतात की दैवी चमत्काराने ह्या जुन्या देवांची संख्या त्यामध्ये दरवर्षी नवीन देवाची भर घातली तरी २१ च राहते.
७. अजून एक वैशिष्टय म्हणजे हे गिरोबा फणसाचे झाड देवळात पाषाण म्हणून पुजण्यात येते त्यापासून पाळेमुळे खड्डयात मिळतात ती औषधी असतात असे जाणकार सांगतात.
८. या गावात फणसाच्या झाडाला देवाचे स्थान आहे. येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडासमोर नतमस्तक होतात. आपल्या परसातील फणसाचे झाड देवासाठी वापरले गेले तर त्याला ते पुण्य मानतात. त्यासाठी ते फणसाच्या झाडाची लागवड आणि जतन करताना दिसतात.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
गणेश चतुर्थी प्रमाणे शिमगा (होळी) हा सण कोकणात खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणेशचतुर्थी झाली की मोठ्या कालावधी नंतर चाकरमानी कोकणात येतात आणि ह्या सणात सहभागी होतात.
होळी पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण प्रत्येक गावी-तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने आणि पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती प्रमाणे साजरा केला जातो. ह्या चालीरीती अनेकदा लोकांचे कुतूहल वाढवत असतात.
आपल्या गावातील ह्या शिमगा साजरा करण्याच्या पारंपरिक चालीरीती आणि पद्धती ईतर भागातील वाचकां पर्यंत पोहोचवण्यासाठी कोकणाई ”आमच्या गावात शिमगा” हे एक लेख सदर घेऊन येत आहे. तुमच्या गावात शिमगा कशा पद्धतीने साजरा केला जातो ते वर्णनात्मक लिखाण आम्हाला पाठवा. आपला लेख आमच्या संकेत स्थळावर, fb page आणि आमच्या सर्व whatsapp group वर आपल्या नावासह प्रकाशित केला जाईल.
नियम व अटी. १) लेख कमीत कमी 300 शब्दात असावे. २) स्थानिक शब्दांना पर्यायी मराठी शब्द कंसात लिहावा. ३) शक्य असल्यास फोटो जोडण्यात यावेत. ४) लेखातील भाषा कोणत्याही समजाला किंवा गटास दुखावणारे नसावी. ५) लेख प्रकाशीत करणे किंवा न करणे हा निर्णय कोकणाई टीम चा राहील. ६)लेख स्विकारण्याची अंतिम दिनांक २७.०३.२०२२ राहील.
लेख पाठवण्यासाठी whatsapp नंबर ९३५६९६८४६२ ९०२८६०२९१६
कोकणाई
pics cedit – https://tourdefarm.i
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
या लेखाचे शीर्षक वाचून घोगळ्यांनी वेंगुर्ला विषयक लेख लिहिण्यापासून फारकत घेतली की काय असे तुम्हाला वाटू शकते; पण थोडसं नीट विचार केला तर तुमच्या लक्षात येईल अस्सल माशेखांव ही वेंगुर्लेकरांची प्रमुख ओळख आहे. वेंगुर्ल्यात मच्छी न खाणारे सुध्दा आहेत. त्यातील बरेचजण धार्मिक परंपरेमुळे मच्छी खात नाहीत, मात्र मासळी आणि भात हे वेंगुर्लेकरांचे प्रमुख अन्न आहे. आता महागाईमुळे सुध्दा या ओळखीत काडीमात्र बदल झालेला नाही. त्यामुळे आजचा हा लेख सुध्दा माझ्या वेंगुर्ल्यावरच आहे.हा लेख लिहायला घेण्यामागचं कारण पण तसच आहे, माझे बहुतांशी लेख हे एखाद्या घटनेमुळे मला सुचतात, मग ती घटना कितीही छोटी असू दे. असो, तर त्याचं काय झालं अलिकडेच वेंगुर्ल्यात म्हणजेच 6 मे पासून जनता कर्फ्यू लागू करण्याची घोषणा झाली आणि 5 मे रोजी आमच्या बंधूराजांचा मला फोन आला. “बाजारात मरणाची गर्दी झाली हां रे, लोक अक्षरश: तुटान पडलेत”. मागचा लॉकडाऊनचा अनुभव पाठिशी असल्याने वेंगुर्ल्यातील नागरिकांनी जनता कर्फ्युच्या काळात कमतरता भासू नये म्हणून भाजीपाला, धान्य, कडधान्य भरुन ठेवण्यासाठी वेंगुर्ल्याच्या मंडईत तुफान गर्दी केली होती. “अरे मग तू भरुन ठेयलय की नाय सामान”. अस्मादिकांच्या या प्रश्नावर बंधूराज उत्तरले, “नाय.. आसा आधीचाच थोडाफार धान्य, पुरात आठदहा दिवस, त्या गर्दीत शिरात कोण?” “अरे मग तू बाजारात काय गर्दी बघूक गेललस काय?” “नाय रे वायच जरा गोलमो हाडलय, आता दहा पंधरा दिवस माशे खांवक गावाचे नाय, म्हणान सोय करुन ठेवलंय”. मला अपेक्षित होते ते उत्तर मिळालेच.वेंगुर्ल्यात असताना आमच्या लहाणपणी माशे हे अमुचे प्रमुख खाद्य होते, आता पन्नाशीकडे आलोय, नवी मुंबईत स्थायिक झालोय तरी प्रमुख खाद्यात काहीच बदल झालेला नाही, ही बात अलहिदा. आता मिळते तशी तेव्हा वेंगुर्ल्यात मच्छी काही महाग नसायची आणि दोंपारच्या जेवणात भाताबरोबर कढीसाठी अगदी सुरमई, पापलेट हवे असं काही नव्हते; किंबहुना सुरमई-पापलेट हे माशे लहाणपणी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत वेळा मी खाल्लेत. चार-आठाण्याचे खापी, पेडवे नाहीतर इंगा पाच्छाळी आणली की बस झाले. त्याकाळी ओल्या नाराळाची कापं (खोबऱ्याचे तुकडे) बाजारात पाच दहा पैशाला मिळायचीत, म्हणजे नारळ घ्यायला पैसे नसतील तर ती काप आणायची, लाल मिरशांगो, वायच धणे, हळद टाकून फातरीवर (पाटा वरवंटा) वाटण वाटलं की मस्तपैकी माश्याची कढी तयार. म्हणजे तात्पर्य काय तर माशे खाणं ही त्याकाळी आम्हा वेंगुर्लेवासीयांची चैन नव्हती तर स्वस्तात उदरभरणाची सोय होती. आजच्या सारखा त्यावेळी काही मच्छीचा तयार मसाला हा प्रकार नव्हता. मिक्सरवर वाटण वाटायचा प्रकारही नव्हता, फातरीवर वाटण वाटल्यामुळे माश्याची कढी चवदार व्हायची. सहसा कढी पुरतेच माशे आणले जायचे, खाणारी तोंडही जास्तच असायची. त्यामुळे माशे तव्यावरुन ताटात येणं हा प्रकार (तुमचं काय शेलो फ्राय की काय ते) कमीच असायचा, जास्तीत जास्त महिन्यातून एक-दोनदा.मी वेंगुर्ला, सिंधुदुर्गच्या हद्दीबाहेर जेव्हा प्रथम बाहेर पडलो तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, आपल्याकडे खाणावळीत/हॉटेलात केवळ तीन प्रकारची जेवणाची ताटं मिळायचीत. शाकाहारी आणि मांसाहारीमध्ये मच्छी व चिकनचे ताट. हॉटेलात जेवायला जायचे म्हणजे वेगवेगळ्या पदार्थांच्या डिश मागवायचा हा प्रकार काही आपल्याकडे तेव्हा नव्हता. आता तेही खुळ आपल्या मातीत रुजलंय. नाष्टा करायचा म्हणजे सुध्दा काही व्हरायटी नव्हती, ऊसळ पाव, वडे, कांदा भजी, बटाटा भजी, पुरीभाजी, चहा हे मोजकेच पदार्थ. तेसुध्दा त्यांच्या वेळा ठरलेल्या. सकाळी ऊसळ, कांदा भजी तर संध्याकाळी बटाटा भजी त्यामुळे हॉटेलात गेल्यावर तुम्ही ज्या वेळात गेलात त्यावेळी जे काही दोन-तीन पदार्थाचे प्रकार असतील तेच तुमच्या पुढ्यात येतील. बरं, थोडसं विषयांतर होत आहे, तर आपला विषय काय होता मच्छी. हां तर आपल्याकडे खाणावळीत जी तीन ताटं जेवणासाठी उपलब्ध असायचीत त्याचा दर चढत्या क्रमाने असा – सर्वात स्वस्त शाकाहारी, नंतर मच्छीचे जेवण आणि सगळ्यात महाग चिकन ताट. मी वेंगुर्ला, सिंधुदुर्ग हद्दीच्या बाहेर गेल्यावर माझ्या असे लक्षात आले की, इतर ठिकाणी आपल्यासाखेच शाकाहारी ताट स्वस्त होते, मात्र मच्छीचे ताट चिकन थाळीपेक्षा महाग होते. अर्थात आता काळ बदललाय, आता कोकणात सुध्दा मच्छीचे ताट चिकन ताटापेक्षा महाग मिळू लागलेय; अर्थात हे दर मच्छीच्या प्रकारावर अवलंबून आहेत.लहाणपणी हातावर चार-आठाणे टेकवून मला दुपारच्या वेळात मच्छी आणायला काहीवेळा पाठवायचेत. त्यामुळे लहाणपणी थोडाफार माशे खरेदी करण्याचा अनुभव माझ्याकडे होता. चार-आठाण्याचा दर एक-दोन रुपयापर्यंत जाईपर्यंत मला वेंगुर्ल्यात मच्छी खरेदी केल्याचे आठवते. घरापासून काही लांब नव्हते मच्छी मार्केट. चालत पाच मिनिटे लागायचीत. वेंगुर्ले नगरपरिषद कार्यालयाच्या बाजूला भाजी मार्केट ओलांडल्यावर तृप्ती हॉटेलच्या बाजून एक चिंचोळी गल्ली होती. कधी-कधी या गल्लीच्या तोंडापासून मच्छी विक्रेत्या बसलेल्या असायच्या. या गल्लीतच एक प्लॅस्टिक वा तत्सम पिशव्या विकायला विक्रेता बसलेला (बसलेला कुठे.. बसायला जागाच नव्हती, उभाच असायचा बिचारा) असायचा. त्यामुळे तुम्ही बाजारात येताना पिशवी आणायला विसरला असाल तर आत शिरतानाच पिशवीची सोय करुन जायचं. तेथील मासेविक्रेती तुम्हाला पैशाच्या मोबदल्यात फक्त माशे देणार. ते सुटी करुन देणे, पिशवी देणे असले लाड नाही चालायचेत. माशे ‘सुटी’ करणे म्हणजे काय हे तुम्ही कोकणातले असल्याने तुम्हाला लगेच कळले असेलच. जे कोकणातले नाहीत त्यांच्यासाठी सांगतो, मासे ‘सुटी’ करणे म्हणजे मासे साफ करणे, त्याचे डोके, शेपटी, पंख, खवले वेगळी करणे, मासे सुटी करणे ही सुध्दा एक मोठी कला आहे.आत मासळी बाजारात ग्राहकांची व विक्रेत्यांची तुंबळ गर्दी असायची. या गर्दीतही आपल्याला हवे आहेत तसे मासे खरेदी करण्याच्या तपश्चर्येत अस्सल माशेखांव वेंगुर्लेवासिय भंग होऊ द्यायचा नाही. सर्वात स्वस्त मच्छीचे अनेक प्रकार होते. खापी हा त्यातला एक प्रकार. खापी जरा मोठ्या असतील तर ठीक, पण छोट्या असतील तर खाताना त्याचा काटा बऱ्याचदा गळ्यात अडकायचा. मग सुक्या भाताची मूद खाल्ल्यावर त्या घासाबरोबर तो काटा गिळला जायचा आणि पुन्हा माशे खाण्यावर आपले लक्ष केंद्रित व्हायचे.पेडवे, तारले, राणे, धोडकारे, इंगा-पाच्छाळी हे अजून काही स्वस्त आणि मस्त मिळणाऱ्या माश्यांचे प्रकार. त्यातील तारले आणि त्याचाच छोटा प्रकार! पण चवीत वैविध्य आणणारे ईरडा हा माश्याचा प्रकार माझ्या अत्यंत आवडीचा. अलिकडे कित्येक वर्षे हा मासा खाता नाही आला. इथे मुंबईत आमच्या मासेवाल्यांकडे अलिकडे विक्रीसाठी नसतो आणि मी जेंव्हा वेंगुर्ल्याला जातो तेंव्हा या माश्याचा सिझन नसतो. तिरफळा टाकून इरडाची चटणी करायची, चटणी म्हणजे तुमच्या नेहमीच्या चटण्या नव्हेत बरं का, कमी वाटण टाकून अगदी भाजी सारखी घट्ट ईरडाची चटणी करायची. चपाती बरोबर काट्यासकट एका घासात दहाबारा ईरडा खायच्या. काय अप्रतिम लागते म्हणून सांगू. तसेच तारले हा प्रकार, तारल्याची चटणी, आमटी दोन्हीही अप्रतिम. तारले असले की त्यातील काही तारले तव्यावर जायचे. खूप कमी तेल लागते, किंबहुना तव्यावर भाजताना हा मासा तेल सोडतो. शिवाय घरात मस्त वास दरवळत असल्याने माश्याला तेल आणि आमच्या तोंडाला पाणी सुटायचे.वरीलप्रकारचे माशे हे गरिबांच्या घरी असायचेत. अर्थात आपल्याकडे पैशाने गरीब असलेल्यांची संख्या तशी जास्तच होती म्हणा; त्यामुळे यांची विक्री जास्त व्हायची. त्यांनतर बांगडा हा मासा मध्यमवर्गीयांसाठी, थोडासा महाग. कधी-कधी जाळ्यात जास्त बांगडे मिळाले की तो गरिबांच्या घरीही जायचा. मी एकदा एक रुपयाला चौदा बांगडे आणलेले आठवतेय, अर्थात माझ्या लहाणपणी हां. नायतर म्हणशात घोगळ्यांनू काय फेकताय. हळदीचे पान, तिरफळे टाकून बांगड्या तिखला, कढी केली की त्या दिवशी भाताचे चार घास जास्तच जायचेत. बाजारात स्वस्त बांगडे मिळाले की आमच्या घरी भरलेले बांगडे व्हायचेत. भरलेले बांगडे करायला गृहिणींना आपले सगळे कौशल्य लावायला लागायचे. विशेषत: बांगडा सुटी करतानाच त्यातील संपूर्ण काटा काढून टाकणे हे काय सर्वांनाच जमायचे असे नाही. माझी आई अगदी सहज बांगड्यातून काटा वेगळा करायची. बळे, टोळ हेही काही अजून माशेखांव लोकांचे आवडीचे प्रकार. बुगडी हा मासा मात्र विकत घेणे कमीपणाचे मानले जायचे. वेंगुर्ल्यात खूप कमी किंमतीत हा मासा मिळायचा. फारच चविष्ट आणि आठाण्या-बाराण्यात भला मोठा मासा विकत मिळायचा. मुंबईत याला फुफा मासा असे नाव आहे, इथे तो जरा चढ्या दरातच विकला जातो. मी बरेच वेळा मुंबईत मासेविक्रेत्यांना सुरमई म्हणून ग्राहकांना विकताना पाहिले आहे.कधी चार पैसे जास्त कनवटीला असले तर सुंगटाचा वाटाही पिशवीत यायचा. सुंगटाला कोळंबी असेही म्हणतात, हे मुंबईत आल्यावर मला कळले. सुंगटा हा प्रकार नेहमीच्या मच्छीच्या वाटणात तसेच भाजलेल्या वाटपात असे दोन्ही प्रकारे बनविले तरी तेवढेच चविष्ट लागतो. यात काटा हा प्रकार नसल्याने लहान मुलांमध्ये लोकप्रिय. सुंगटा फ्राय करायला घेतल्यावर संपूर्ण घरात असा वास पसरतो, की पोटातले कावळे अधिक जोरात ओरडायला लागतात. तिसऱ्या, खुबे, म्हाकला, लेपे, कुर्ले, मोरी हे अजून काही माश्याचे प्रकार आहेत जे भाजलेल्या वाटपात केले जातात. कुर्ल्या खाताना त्याच्या तंगड्या तोडताना जरा मेहनत घ्यावी लागते; पण आमचे दातांना कुर्ल्यांच्या डेंग्याची सवय झालेली असल्याने आम्ही लिलया फस्त करायचो. मोरी मासा हा मटणाचाच प्रकार, मोरीची आमटी, कढी न म्हणता मोरीचे मटण असेच म्हटले जाते. वेंगुर्ल्यात हा मासा खूप महाग मिळतो, मुंबईला मात्र त्यामानाने स्वस्त आहे मोरी मासा.ईस्वन, सरंगो, पापलेट हे मासे श्रीमंतासाठी असाच माझा समज होता. खूप कमी वेळा जाळ्यात जास्त मिळाल्याने वेंगुर्ले मासळी मार्केटमध्ये स्वस्त मिळाले असतील. नाहीतर त्याचा दर आम्हाला न परवडणाराच असायचा. ईस्वनाला सुरमई तर सरंग्याला हलवा म्हणतात, असे मला मुंबईत आल्यावर कळाले. हे मासे खायला चविष्ट तसेच सोपे त्यामुळे खूपच लोकप्रिय आहेत; पण न परवडणारे. आता लोकांची कमाईच एवढी झाली आहे की परवडत नाही असा काही प्रकारच नाही राहिलाय. या माश्यांमुळे मुंबईत स्थायिक असलेले; परंतु मुळेचे ज्या भागातून आलेत ज्या भागात समुद्रातील मच्छी मिळत नाही, त्यांना माश्याची गोडी लागली आणि मासे हा प्रकार अजूनच महाग होत चाललाय. आम्हाला मच्छीखांव म्हणून हसणारे हॉटेलात गेल्यावर सुरमई थाळी, बांगडा थाळीची ऑर्डर देताना आढळतात.असो, माश्याची भरलेली पिशवी घेऊन घरी मार्गक्रमण करत असताना, रस्त्यात “काय ईला?” असा प्रश्न विचारणारे किमान तीन- चार तरी महाभाग भेटणारच. हातात माश्यांनी भरलेली पिशवी असताना सुध्दा “काय नाय” असं तोंड वाकडंतिकड करुन मिळणारे उत्तर हे ठरलेले; पण त्याचे उत्तर काही असले तरी विचारणारा, लगबगीने बाजारात धाव घेतो. माश्याची पिशवी हातात घेऊन घरी पोहचल्यावर प्रथम स्वागत करते ती मनिमाऊ आणि तिची पिल्ले. कुठून तरी तिचा नवरोबा बोकाही वास काढत घरात दाखल होतो; मग पायात घुटमळणाऱ्या मांजरांपासून पिशवी सांभाळत पार पाटल्यावाटेक (घराची मागची बाजू) जाऊन पिशवी आईच्या ताब्यात द्यायची.मच्छी सुटी करण्यासाठी “आदाळो” बाहेरच्या पडवीत वेगळा ठेवलेला असायचा. त्या आदाळयावर बसून आई सटासटा माशे सुटी करायची. माश्याची खवले साफ करणे, त्याचे पंख, शेपटी वेगळे करणे, डोके वेगळे केल्यावर ते मांजरांपुढे टाकले जायचे. इथ आमचे लहान मुलांचे सैन्य हातात काठी उभी घेऊन आदाळ्यापासून मांजरांना लांब ठेवण्यासाठी उभे असायचे. आईने टाकलेले माश्याचे डोके जमिनीवर पडायच्या आत मांजरे डाईव्ह मारुन झेलायचीत. त्यांच्या या झेलापुढे जाँटी ऱ्होडस, रविंद्र जाडेचाचे झेल पाणी कमच. बरं आमचे एवढे सैन्य हातात काठी घेऊन तैनात असताना देखील एखादे मांजर एखादा मासा लंपास करायचेच. ओरडा मात्र त्या मांजराऐवजी आम्हालाच पडायचा. टॉमी मात्र या मेजवाणी पासून वंचित रहायचा. जेवताना सुध्दा माश्याचे काटे खायला मनी आणि तिची फॅमिलीच उपस्थित असायची. तरीही आई टॉमीसाठी वेगळा मासा काढून ठेवायची आणि त्या इमानदाराला बाहेर नेऊन वाढायची.असे आम्ही माशेखांव, लिहिण्यासारखे अजून बरेच आहे, पण लिहितांना पोटात भूक चाळवली. मन लावून वाचल्याबद्दल धन्यवाद! ओ भाऊ.. ओ ताई.. पिशवी घेऊन कुठे निघालात, लॉकडाऊन चालू आहे, मासळीबाजार बंद आहे. नाय ओशाळण्याची कायच गरज नाय, आपण आहोतच माशेखांव, तोपर्यंत डब्यात तो गोलमो भरुन ठेवलो हां, सुके बांगडे ठेयलेत ते काढा बाहेर.– श्री. संजय गोविंद घोगळे (8655178247)
अभिजात कलाकृतीतून कलाकार घडत जातो. कलाकाराने रंगलेपनसह साकारलेले अनेक वास्तववादी कलात्मक लेपन व त्यातून साधलेला एक रम्य व नादमय अविष्कार यामुळे त्याचे प्रत्येक चित्र आकर्षक व विलोभनीय वाटते. आपल्या अद्भुत कलाविष्कारांनी रसिकांच्या चक्षूंचे पारणे फेडणाऱ्या नामवंत कलाकारांपैकीच एक सिद्धेश श्रीपतराव सुर्वे. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षापासून कलेची उपासना करणाऱ्या या कलाकाराचे चित्रकलेसाठी असणारे योगदान अतुल्य आहे. व्यक्तिचित्रे रेखाटण्यात माहीर असलेल्या या कलाकाराने आतापर्यंत जवळपास अनेक चित्रप्रदर्शनास आपल्या अंगभूत कलेची चुणूक दाखवली आहे.
कुंचल्याच्या फटकाऱ्याने हुबेहूब चित्रे रेखाटणाऱ्या सिद्धेश सुर्वेने अमूर्त शैलीत रेखाटलेली विविध व्यक्तिचित्रे, त्याला बालपणसापासून असणारी चित्रविषयी ओढ व कुतूहल यांचे दर्शन घडवितात. विविध आकार, रंग, पोत, त्यातील वैशिष्ट्यमय समन्वय, बोलकी व संवेदनात्मक समरसता यांचा सुंदर मिलाप त्याचा चित्रांमधून आढळतो. मंगलमूर्ती श्रीगणेश, प्रभू येशू ख्रिस्त, राधाकृष्ण, पि.के. चित्रपटाचे पोस्टर, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांची रेखाटलेली व्यक्तिचित्रे रसिकांची वाहव्वा मिळवून जातात. सिद्धेशने रेखाटलेले स्वामी समर्थांचे चित्र पहिले कि नकळतपणे रसिकांचे हात जोडले जातात. एवढा जिवंतपणा तो आपल्या चित्रात साकारतो.
कोकणचा सुपुत्र
मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीच्या असणाऱ्या सिद्धेश सुर्वेला कलाक्षेत्राची बालपणापासून आवड होती. विविध स्तरावर झालेल्या चित्रकला आणि रांगोळी स्पर्धेत सहभाग घेऊन त्याने अनेक बक्षिसे मिळवली आहेत. Drawing कलारंभ, राज्य पर्यटन महोत्सवात प्रथम पारितोषिक, विप्रो – पुणे आयोजित रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक, तसेच अनेक ठिकाणी आयोजित केलेल्या रांगोळी रांगोळी आणि चित्रकला स्पर्धेत त्याने प्रावीण्यही मिळवले आहे. सावंतवाडी नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कलादालनात सिद्धेश च्या चित्रांचा पण सहभाग होता. रांगोळी प्रदर्शनात अल्बर्ट आईन्स्टाईन, मदार तेरेसा, अण्णा हजारे, श्रीनिवास रामानुजन, शिवरामराजे भोसले, बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींची चित्रे रांगोळीतून साकारली आहेत.
कोणताही कलाकार सहजासहजी घडत नाही. सुरवातीपासून आतापर्यंत त्याला कित्येक वेळा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला. पण त्याची झळ त्याने कधी आपल्यातील कलाकाराला पोहोचू दिली नाही. कलेच्या प्रवासात त्याची गाडी खूप वेळा मार्गदर्शनाअभावी रखडली गेली पण त्याने हार न मानता त्यासाठी त्याचे प्रयत्न चालू ठेवले आणि जे मार्गदर्शन पाहिजे ते मिळवले आणि आपल्यातील एक परिपूर्ण कलाकार निर्माण केला. अर्थांजनासाठी तो सध्या Tech Mahidra ह्या कंपनी मध्ये मुंबईला नोकरीला आहे. नोकरीतून मिळालेला रिकामा वेळ तो कलेसाठी देतो. रसिकांनी त्याच्या कलेला दाद देऊन पैंटिंग बनवून घेतली आहेत. ह्यासर्वात त्याला खूप चांगल्याप्रकारे त्याच्या पत्नीची साथ मिळते. सौ. सिद्धी सिद्धेश सुर्वे नुसता संसार संभाळत नाही तर त्याला कलेसाठी शक्य होईल तेव्हडी मदत पण करतात.
कोकणच्या ह्या सुपुत्राला गरज आहे आपल्यातील अस्सल रसिकतेची आणि आपल्या पाठबळाची.आम्ही इथे सिद्धेश ने रेखाटली काही पैंटिंग्स आपल्यासाठी देत आहोत. जर कोणी सिद्धेश कडून पैंटिंग्स बनवून घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्याचा मोबाईल नंबर खाली दिला आहे.
सिद्धेशच्या लोकप्रिय कलाकृती
सिद्धेशच्या आजून कलाकृती पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
अलिकडेच म्हणजे २०२१ च्या दिवाळीत गुजरातची छोटेखानी ट्रिप झाली. रात्री पावणे-अकराच्या दरम्यान अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरुन हॉटेलकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा सर्व दुकाने बंद असलेली दिसली. अस्मादिकांना लगेच आमच्या वेंगुर्ल्याची आठवण झाली. वेंगुर्ल्यातसुध्दा रात्री साडेनऊ दहानंतर सर्व दुकाने बंद असतात. तशी आमची चर्चाही रंगली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्याने सन टेम्पलच्या दिशेने निघालो. रात्री आम्हाला हॉटेलवर सोडण्यासाठी आलेली कार आज नव्हती आणि ड्रायव्हरही वेगळा होता. आजचा ड्रायव्हर गप्पीष्ट होता. माझं लक्ष्य पुन्हा पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा बंद असलेल्या दुकानाकडे जात होते. अकरा वाजत आले तरी अजूनही अहमदाबाद सारख्या शहरातील दुकाने उघडली नव्हती. काल रात्री दुकाने बंद होती आजही बंद, त्यामुळे न राहवून मी ड्रायव्हरकडे चौकशी केली, ‘अरे तुमच्या अहमदाबाद मध्ये लोक एवढी आळशी कशी काय? अकरा वाजले तरी दुकाने उघडली नाहीत’. अर्थात हा सर्व संवाद हिंदीतच होता, पण मला लिहायला सोप जावं म्हणून मराठीत लिहीतोय. मला माहित आहे ‘तुमको हिंदी भाषा समजने में आती है’. असो त्याने दिलेल्या उत्तराने मी उडालोच. नाही… नाही.. सकाळी नाष्ट्यात ढोकळा नव्हता. एक म्हणायची पध्दत असते म्हणून मी उडालो असे लिहीले आहे. साहेब आता चार दिवस अहमदाबाद मधील दुकाने बंदच राहणार. गाडी आता अहमदाबाद शहरातून बाहेर पडत होती. आम्ही चार दिवस अहमदाबादमध्ये फिरायला आलो आणि दुकाने बंद यामुळे थोडा निराश झालो पण मनातल्या मनात बराच खूषही झालो, अहमदाबाद मधील दुकाने बंद म्हणजे सौ ला शॉपींग करता येणार नाही त्यामुळे दौऱ्याच्या सुरुवातीलाच माझी पैशाची बचत झाली होती. ‘कशासाठी बंद, काही राजकीय कारण आहे का?’ माझी प्रश्नाची सरबत्ती सुरुच होती. ‘नाही दिवाळीसाठी सगळे व्यापारी दुकाने/धंदे बंद करुन बाहेर फिरायला गेलेत’. अरे हे काय नवीनच ऐकत होतो मी, मुंबईत गुजराती लोक धंद्याला प्राधान्य देतात. दिवाळीसारख्या सणात सर्वात मोठी कमाई असते आणि तोच गुजराती त्यांच्याच राज्यात ऐन दिवाळीत सर्व दुकाने बंद करुन मस्तपैकी फिरायला गेला होता. ‘साहेब, दिवाळीत दारु मिळत नाही ना, म्हणून सर्व लोकं फक्त दारु पिण्यासाठी राजस्थानमध्ये फिरायला जातात’. ड्रायव्हर सांगत होता पण मला दारु हे कारण काही पटलं नाही, मी त्याचा मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न केला. ‘अरे गुजरातमध्ये तर एरव्हीही दारु बंदच असते ना? मग काय फरक पडतोय’, ड्रायव्हर आपले म्हणने काही सोडत नव्हता, ‘साहेब एरव्ही चोरुन का होईना दारु मिळते पण दिवाळीत दारु मिळतच नाही’. तो आपले म्हणने मला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता. (ड्रायव्हर राजस्थानी होता) असो, पण अहमदाबाद मधील दुकाने दिवाळीच्या चार दिवसात बंद होती हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. अपवाद फक्त रेस्टॉरंटचा आणि काही निवडक स्ट्रीट फुडचा. त्याचं झालं असं की जीथे जातो तेथील लोकल फुडचा आस्वाद घेण्यावर माझा भर असतो. (परदेशात हे तेवढसं शक्य होत नाही.) आणि मी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होतो, तीथे गुजराती फुड एखाद दुसरा पदार्थाचा अपवाद वगळता उपलब्ध नव्हते. दुपारच्या वेळी एका लोकल ढाब्यावर जेवायला गेलो, भरपूरवेळ वेटींगवर राहील्यावर आमचा नंबर लागला. सर्वच पर्यटन स्थळावर व हॉटेलवर पर्यटकांची गर्दी होती. त्यात लोकल गुजराती लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. (त्यामुळे अहमदाबादमधील व्यापारी ऐन दिवाळीत दुकाने बंद करुन बाहेर फिरायला गेले त्यामागचे कारण केवळ दारु आहे, या ड्रायव्हरच्या विधानात तेवढंस तथ्य नाही याची खात्री मला ही गर्दी बघून पटू लागली होती.) या ढाब्यावरील जेवणाची चव मला तेवढीशी आवडली नव्हती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी आमच्या ड्रायव्हरने अहमदाबाद मधील गुजराती थालीसाठी प्रसिध्द असलेल्या सासूजी या हॉटेलमध्ये जेवणासाठी नेले. अश्या प्रकारच्या गुजराती थाळी मुंबईतही बऱ्याच प्रसिध्द आहेत. पण अहमदाबाद मधील या हॉटेलमधील गुजराती थाळी ची सर काय त्या थाळींना नव्हती; हे अस्मादिकांचे व्यक्तीगत मत आहे. अनलिमिटेड असलेल्या या थाळीत नाना विविध पदार्थांची रेलचेल होती. (याच्यापेक्षा जास्त पदार्थाची संख्या असलेल्या बुफे जेवणांचा मी आस्वाद घेतला आहे, पण या लेखाचा विषय सासूजी थाळी मध्ये जेवणाचा आस्वाद घेताना सूचला म्हणून हा सगळा वरील लेखन प्रपंच. मात्र प्रत्यक्षात लिखाण उतरवायला अंमळ उशीर झालय, याबद्दल क्षमस्व) पोळी कुठल्या भाजी बरोबर खाऊ याची निवड करत असताना मला पटकन नजरेसमोर तरळून गेली ती लहानपणी खाल्लेली कांद्याची भाजी. हो हो बरोबर वाचताय तुम्ही, कुठेही चुकून एक्स्ट्रा काना-मात्रा टाईप नाही झालाय. आजकाल कांद्याची भाजी दुर्मिळ झालीय. कांद्याच्या पातीची नव्हे बरं का साध्या कांद्याच्या भाजी बद्दलच लिहीतोच मी. आमच्या बालपणी अनेकदा भाजीला काहीच नसेल तर कांदा, मीठ, मिरचीपुड टाकून बनवलेली भाजी चपातीबरोबर असायची. आता सगळीकडे थोड्या फार प्रमाणात का होईना समृध्दी आल्याने नुसत्या कांद्याची भाजी बनवलेली माझ्या तरी अलिकडे ऐकीवात नाही आले. सौ शी चर्चा करताना तीची आईसुध्दा तीच्या बालपणी कांद्याची भाजी बनवत होती हे कळले. ही भाजी फार काही चवीष्ट होती असे मी म्हणत नाही, पण त्यावेळी भाकरी/पोळी ला साथ देण्यासाठी अनेकदा या कांद्याच्या भाजीने साथ दिली होती हे मात्र नक्की. आता एक गोड आठवण म्हणून कांद्याची भाजी बनवायलो गेलो तर वाढलेले कांद्याचे भाव बघून त्यात अंडा टाकून भूर्जी बनवलेलीच बरी असे वाटते. कांद्याच्या भाजीचा विषय झाल्यावर पिठीला डावलणे अशक्य आहे. साधारणत: पंचवीस वर्षापूर्वी अस्मादिकांना मुंबईत एका मालवणी माणसाच्या घरी जाण्याचा योग आला होता. एकंदर घर-दार पाहता यजमानांची आर्थिक समृध्दी ओसंडून वाहत होती. त्यांनी दुपारी जेवूणच जा असा आग्रह धरला. अस्मादिकांनी अद्याप गृहस्थाश्रमाला सुरुवात केली नव्हती. म्हटलं बाहेर हॉटेलातच जेवायला जायचे आहे तर आज अनायसे घरगुती जेवणाचा बेत आहे तर का टाळा. बरं त्यांच्या आग्रहात एक वाक्य पुन्हा पुन्हा हायलाईट होत होते, ‘तुमचा एकंदर मालवणी असल्याचा अभिमान पाहूण आम्ही तुमच्यासाठी खास बेत बनवला आहे’. बरं त्यादिवशी रविवारही होता. अस्मादिकांना जेवणाचा आग्रह मोडता आला नाही. पाटावर (डायनिंग टेबल होते, पण पुन्हा एकदा म्हणायची पध्दत म्हणून पाटावर लिहीले आहे) बसल्यावर काही वेळातच जेवणाचे ताट समोर आले. ताटातील पदार्थ पाहून अस्मादिकांच्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या तारे चमकू लागले. ताटात गरमा-गरमा भात आणि पिठी एवढे दोनच पदार्थ होते. मी पक्का मालवणी असलो तरी पिठी माझ्या नावडती. बालपणातच पिठी-भाताचा ओवरडोस झाल्याने हा पदार्थ माझा नावडता झाला होता. पण चेहऱ्यावर शक्य तेवढा आनंद ठेवत मी ताटातले संपवले, माझे जेवण एवढेच आहे असं सांगूण त्यांचा आग्रह नाकारला आणि रुमवर मार्गस्थ झालो. सुट्टीत वेंगुर्ल्याला गेल्यावर हा किस्सा भावंडाना सांगितला असता, माझे पिठी-भातावरील ‘प्रेम’ माहित असल्याने सर्व गडाबडा लोळत हसत होते. बरं अस्मादिकांची सोयरीक जुळली तिला कारणही पिठी होते, हे लग्नांतर एक-दोन महिन्यांनी कळले. जेव्हा लग्न होऊन नवीन सूनबाई घरी आली तेंव्हा माझ्या बहिणींनी अस्मादिकांच्या सौ ना पहिला पाठ दिला, ‘आमच्या संजूक कायपण रांधून घाल हां, पण पिठी-भात करुन घालू नको’. सौ बिचारी गप्पच झाली. तीने अस्मादिकांना लग्नासाठी होकार कळवला होता तो माझी सरकारी नोकरी बघून नव्हे तर मी पक्का मालवणी माणूस आहे म्हणून. ड्यूटीवरुन थकून घरी आल्यावर नवऱ्याला रोज पंचपक्वान्न करुन घालायला नको, पिठी-भात रांधून घातला की झालं. पण अस्मादिकांना पिठी आवडत नाही, हे ऐकून तीचा बिचारीचा भ्रम निरास झाला होता. पण असो आमच्या सुपूत्राला पिठी-भात खूप आवडतो, त्यामुळे मी दौऱ्यावर गेल्यावर दोघांचा पिठी-भाताचा मस्त बेत जमतो. गरीबीतील पंचपक्वान्न म्हटल्यावर गोड पदार्थ हवाच. गोड-धोडाची पूर्तता गूळचूणाने होते. महिन्यातून एकदा येणाऱ्या संकष्टीचा उपवास म्हणजे एकवेळेच का होईना ताजे जेवण जेवण्याचा योग. दाळ-भात आणि तिटकी (म्हणजे गवार) ची भाजी, उपवास सोडताना बरेचवेळा हेच जेवण असायचे. मग बाप्पाला मोदक पाहिजेच. दर संकष्टीला मोदकाची चंगळ काय आम्हाला परवडायची नाही. मग छोट्या वाटीत गूळ-चूणाचा नैवद्य दाखवला जायचा. म्हणायला गूळ-चूण पण बरेचदा गूळ नसायचेच. गुळा ऐवजी रेशनवर मिळणारी लेवी साखर आणि थोडेसे किसलेले ताजे खोबरे. बाप्पा बिचारा आमच्या या मोदकाने तृप्त होऊन जायचा; आणि उपवास करणाऱ्यांमध्ये मी सर्वात छोटा असल्याने नैवद्याचे ताट अस्मादिकांच्या नशीबी असायचे. कुपनावर (रेशनवर) मिळणाऱ्या तांदुळाने मात्र गरीबीतील पंचपक्वान्नाने बऱ्याच पदार्थात मानाचे स्थान पटकावले होते. शिळ्या-भातावर तेल, मिठ आणि तिखट टाकून कालवून पोट पूजा होऊन जाते. तोच तांदूळ पाणी जास्त टाकून शिजवायचा, अगदी नरम नरम भात त्यात मीठ टाकले की आटवाल झाले तयार. सोबत लोणच्याची एकच फोड असली तर स्वर्ग सुखच. शिवाय चूलीवर भात शिजवताना, टोपाच्या बाजूने करपलेला भात, भाकरी म्हणून खाण्यासाठी उड्या पडायच्यात. पेजेच पौष्टीक म्हणून स्थान मात्र अद्यापही अबाधित आहे. अजून बरेच काही लिहीण्यासारखे आहे. अगदी कधीतरी मस्त तांब्याभर पाणी पिऊन गाढ झोपी जाण्याचे स्वर्गसूखही आपण अनुभवले आहेच. अजूनही बरेच गरीबीतल्या पंचपक्वान्नाचा आठवणींचा आस्वाद घेण्यासारखा आहे. पण नंतर कधीतरी. म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. अस्मादिकांचे म्हणने मात्र थोडसं वेगळे आहे, प्रेमाचे माहित नाही पण गरीबीचे अनुभव मात्र सेम असतात. लेखक – संजय गोविंद घोगळेसंपर्क – ८६५५१७८२४७ Photos credits :
www.marathi.momspresso.com
स्वर्गाहुन सुंदर आपलं कोकण (FB group)
www.sriramgawas.blogspot.com
स्वामी समर्थ मठ, वांयगणी येथे श्री देव सत्यनारायणाच्या पूजेसाठी केळींच्या झाडापासून बनवण्यात आलेला हा अप्रतिम मकर.
कोकणातील कल्पकतेचा आणि कलाकारीला हा एक उत्तम नमुना. खूप बरे वाटले की आजून ह्या पारंपरिक कला नव-नवीन कल्पकता वापरून पुढे चालू ठेवल्या जात आहेत.
हा फोटो पाहिल्यावर काही जुन्या आठवणी ताज्या झाल्यात ज्या मला तुम्हास सांगायला आवडेल.
पूर्वी कोकणात कलाकाराचा एक प्रकार आपल्याला प्रत्येक वाडीत दिसायचा. गणेश चतुर्थी जवळ आली की ह्या कलाकारास खूप मागणी असायची. गणेश मूर्तीच्या मागच्या भिंतीवरचे कमळ मोडणे (चित्र काढणे), मकर तयार करणे तसेच सत्यनारायण पूजेसाठी केळीच्या झाडापासून मकर बनवणे ही कामे तो खूप आवडीने करायचा. गणेश चतुर्थीची आदल्या दिवशीची रात्र तर पूर्ण जागवून ज्यांनी ज्यांनी बोलवले त्यांच्या भिंतीवरची कमळे काढून देण्यात जागरण होत असे. मोबदला काय मिळायचा तर एक चहा, किंवा खूपच वेळ लागला तर जेवण. पण खरा मोबदला असायचा तो म्हणजे कौतुकाचे शब्द आणि पाठीवरची थाप. कलेला दाद पण तशी भेटायची.
आजकाल शाळेत कल्पकता वाढविण्यासाठी उपक्रम राबविण्यात येतात. पण जी कल्पकता आमच्यातील ह्या हौशी कलाकारांनी त्याकाळी लावली त्याची सर कुठेच नाही. तहान भूक विसरणे ह्या वाक्प्रचाराचा खरा अर्थ तेव्हा त्यांनी अनुभवला. रेडीमेड च्या जगात ह्या गोष्टी नाहीश्या होत चालल्या आहेत. लोकांनी गणपतीच्या मागच्या भिंतीला फ्लेक्स लावायला सुरवात केली. कागदी आणि थर्माकोल च्या तयार मकर खरेदी करून सजावट केली जाते. अशा या युगात अशी कलाकृती बघितली तर तोंडातून आपसूकच वाह! हा शब्द आपसूकच निघतो.
कोकणात कला आणि कलाकार जिवंत आहे तो फक्त कोकणातील पाठीवर थाप देणाऱ्या रसिकांमुळे. खऱ्या कलाकृतीला दाद देताना येथील रसिक जात,धर्म, गरिबी-श्रीमंती बघत नाही. जे अस्सल आहे ते अस्सल भले ते आपल्या शत्रूचे असेल बाहेर जगाला नाही दाखवले तरी मनात वाहवा देऊन जातो.
अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी…..मराठीतील एका गाजलेल्या गीतातील हि एक ओळ. आयुष्याबद्दलची प्रचंड सकारत्मकता ह्या ओळीतूनच नाही तर ह्या गीतातील प्रत्येक शब्दातून दिसून येते. प्रसिद्ध आणि माननीय कवी कै. मंगेश पाडगावकर यांनी हे गीत लिहिले आहे. कवींची आयुष्याबद्दलची इतकी साकारत्मकता कशी काय आहे ह्या उत्सुकतेपोटी मी कवींविषयी माहिती काढून वाचायचे ठरवले. विकिपीडिया वर त्यांच्याविषयी वाचायला सुरु केले आणि अगदी पहिल्या वाक्यात मला माझ्या प्रश्नाचे उत्तर भेटले. कवींचा जन्म तळकोकणात झाला होता !!!!
निसर्गामध्ये खूप ताकद असते. कुठलीही तक्रार न करता, आलेल्या संकटाना सामोरे जाऊन, जे मिळाले त्यात समाधान मानून आयुष्य सुखाने जगण्याची ताकद कोकणवासीयांना इथल्या निसर्गाने दिली आहे. तुम्हाला कदाचित हे सर्व अतिशोयक्ती वाटत असेल. पण ज्यांनी हि ताकद अनुभवली आहे त्यांना माझे प्रत्येक वाक्य १००% पटेल.
कोकणविषयी अजून इथे काही वेगळे लिहिणे मला काही गरजेचे वाटत नाही, कारण आपण सर्वानी कोकणातील निसर्गसौदर्य, हवामान, समुद्रकिनारे, कोकणी मेव्याबद्दल नक्कीच खूप ठिकाणी वाचले आणि अनुभवले असेल. एवढेच सांगेन कि ज्यांची कोकणाशी नाळ आहे ते खरोखच भाग्यवान आहेत.
आम्हाला सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे कि आपल्या हक्काचे एक व्यासपीठ इथे तयार करायचा आम्ही एक छोटासा प्रयत्न करत आहोत. अर्थातच आपल्या सहकार्यानेच ह्या प्रयत्नास यश येईल. आपण लिहिलेले साहित्य म्हणजे कोकण संबंधित लेख, कविता, माहिती तसेच छायाचित्रे आम्हास पाठवा, आम्ही ती नावासकट इथे प्रकाशित करू. तसेच आमच्या ह्या उपक्रमामध्ये काही बदल किंवा सुधारणा सुचवायच्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा किंवा कंमेंट बॉक्स मध्ये आपला अभिप्राय नोंदवावा. आपल्या सूचनांचे स्वागतच आहे.