रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाने यासाठी ९१ लाख ७० हजारांचा निधी मंजूर केला असून १५२ अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदनिर्मिती करण्यात येणार आहे. शासनाच्या गृह विभागाने याबाबतचा अद्यादेश शुक्रवारी जारी केला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गुन्हेगारीच्या प्रमाणाला आळा बसणार आहे.
कोकणातील रोहा, कणकवली आणि रत्नागिरी या तीन ठिकाणी लोहमार्ग पोलीस ठाणी प्रस्तावित होती त्यापैकी रत्नागिरी येथे लोहमार्ग पोलीस ठाण्याला शासनाने मंजुरी दिली आहे. त्यापैकी रेल्वे सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हद्दीतील स्थानके, प्रवाशांची सुरक्षा आणि गुन्ह्यांचा तपास करण्याची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांवर आहे. रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) अखत्यारित आहे. सध्या लोहमार्ग पोलिसांची हद्द सीएसएमटी ते पनवेल आणि कर्जत, खोपोली, मंकीहिलपर्यंत आहे. रोह्यापासून पुढे कोकण रेल्वेची हद्द सुरू होते. याहद्दीतील सुरक्षेची जबाबदारी रेल्वे सुरक्षा दलावर आहे. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या गाडीत कोकण रेल्वे स्थानकांदरम्यान एखादा गुन्हा घडल्यानंतरही त्याबाबतची तक्रार प्रवासी मुंबईत आल्यानंतर करतात. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल, स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा संबंधित यंत्रणेकडे वर्ग करण्याचे काम लोहमार्ग पोलिसांना करावे लागते. रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधून कारवाई करावी लागते. आपल्या हद्दीतील स्थानके, तसेच प्रवाशांची सुरक्षा व घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करता यावा यासाठी कोकण रेल्वेवरील तीन स्थानकांमध्ये पोलीस ठाणे स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खालिद यांनी दिली आहे.
पणजी : गोव्यातील दूधसागर ते सोनालीम सेक्शन दरम्यान आज सकाळी ९.३५ वाजता सतरा डब्यांची मालगाडी रुळावरून घसरल्याने दक्षिण पश्चिम रेल्वेवरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी मंजुनाथ कनमडी यांनी येथे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शुक्रवारी सकाळी 9.35 वाजता, गोव्यातील हुबली विभागातील घाट विभागात सोनालीम आणि दूधसागर सेक्शन दरम्यान सतरा (17) वॅगनसह मालगाडी रुळावरून घसरली असून खालील दोन गाड्या कोकण रेल्वे मार्गे वळवल्या असल्याची माहिती दिली आहे.
ट्रेन क्र. १२७७९ वास्को द गामा – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस मडगाव, रोहा, पनवेल, कल्याण आणि पुणे मार्गे वळवण्यात आली आहे, त्यापुढे ही गाडी आपल्या नियमित मार्गाने जाईल
दुसरी ट्रेन क्र. १२७८० हजरत निजामुद्दीन – वास्को दा गामा एक्स्प्रेस पुणे, कल्याण, पनवेल, रोहा आणि मडगाव मार्गे वळवण्यात आली आहे, त्यापुढे ही गाडी आपल्या नियमित मार्गाने जाईल
सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या तीन स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम खूप कमी वेळात पूर्ण झाले असून आज या स्थानकांचे त्यांचाच हस्ते लोकार्पण होणार आहे.
कोकण पट्ट्यातील एकूण १२ स्थानकांचे सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी १०० कोटी मंजूर करून घेतले. सावंतवाडी स्थानकाचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून या कामाला सुमारे ९ कोटी खर्च आला. या स्थानकाचे बाहेरचे रुपडे पालटून एखाद्या विमानतळाचे स्वरूप आले आहे. एखाद्या पर्यटन जिल्ह्याला साजेसे अशा स्वरूपाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या या कामाबद्दल प्रवाशांकडून, प्रवासी संघटनेंकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहतो. “नवरी तर नटली पण सुपारी कधी फुटणार?”
आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर, तळकोकणातील समुद्र किनारे या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी, दोडामार्ग तालुक्यातील काही भाग, सावंतवाडी पंचक्रोशी, बांदा, शिरोडा, वेंगुर्ला या मोठ्या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सावंतवाडी स्थानकाचा विकास होणे खूप गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती बघता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संख्या पाहता हे थांबे पुरेसे नाही आहेत. त्यामुळे वंदे भारत, मंगलोर एक्सप्रेस आणि ईतर प्रमुख गाड्यांना येथे थांबे मिळणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे मंजूर झालेल्या टर्मिनसचे काम पूर्ण होणे. ९ वर्षापूर्वी सावंतवाडी स्थानकाचे ‘सावंतवाडी टर्मिनस’ या नावाने तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. कोकण रेल्वेचा लाभ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील कोकणातील जनतेला व्हावा यासाठी सावंतवाडी येथे टर्मिनस होणे खूप गरजचे आहे ही गोष्ट सुरेश प्रभू यांच्या तेव्हाच लक्षात आली होती. टर्मिनस झाल्यास मुंबई /कल्याण/पुणे ते सावंतवाडी दरम्यान गाड्या चालविण्यास शक्य झाले असते. मात्र सुरेश प्रभू यांचा मंत्रिपदावरुन पायउतार होताच टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत अपूर्णच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे टर्मिनसच्या दुसर्या टप्प्यातील कामासाठी आलेला निधी परत गेला. ‘सावंतवाडी टर्मिनस’ अशा नावाने भूमिपूजन झाले असूनही अजूनही रेल्वे रेकॉर्ड मध्ये ‘सावंतवाडी रोड’ असा उल्लेख होत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या प्रयत्नांने सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आणि कोकण रेल्वे KRCL यांच्यात एक सामंजस्य करार झाला. या करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वे च्या १२ स्थानकाच्या बाहेरील सुशोभीकरणाची आणि रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि कमी वेळात ती पार पाडत आहे. मात्र आता कोकण रेल्वेने स्थानकाच्या आतील सुधारणांची जबाबदारी घेतली पाहिजे. सावंतवाडी स्थानकावर सध्या शेड नसल्याने प्रवाशांना ऊन आणि पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्मवर शेड बांधणीचे काम प्राधान्याने घेण्याची गरज आहे. सध्या स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत आहे ती पूर्णवेळ करण्याची गरज आहे.
सावंतवाडी शहर ते मळगाव रस्ता दुपदरीकरण होणे गरजेचे.
तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांचा बरोबरीने विकास होणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सावंतवाडी हे एकमेव स्थानक शहरापासून दूर आहे. हे अंतर ८ किलोमीटर एवढे आहे. तसेच मार्गावर घाटरस्ता लागतो. त्यामुळे सावंतवाडी शहर ते मळगाव ही वाहतूक जलद होण्यासाठी हा रस्ता दुपदरीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
एसटी च्या वेळापत्रकात बदल आवश्यक
मळगाव ते वेंगुर्ला, शिरोडा, बांदा आणि सावंतवाडी जाण्यासाठी एसटी आणि रिक्षा हे दोन पर्याय प्रवाशांनकडे आहेत. अंतर जास्त असल्याने सर्वच प्रवाशाना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी एसटीने या मार्गावर लवचिक वेळापत्रक अंगीकारणे आवश्यक आहे. सध्या प्रवाशांना इतर गावांसाठी चालविण्यात येणाऱ्या बसवर अवलंबुन राहावे लागत आहे. सावंतवाडी आगाराची अजूनही फक्त रेल्वे स्थानकाला विशेष बस नाही आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एसटीच्या या मार्गावरील बसच्या वेळापत्रकात बदल केल्यास त्याचा फायदा प्रवाशांना तर होईलच आगाराच्या उत्पन्नातही भर पडेल.
सिंधुदुर्ग:सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचे “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” भूमिपूजन होवूनही सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले त्याला” सावंतवाडी रोड ” असा फलक लावण्यात आला आहे त्याला सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने आक्षेप घेत सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष निवेदनाद्वारे वेधले आहे.
सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर,सागर तळवडेकर आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक,सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आदींचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे,सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन दि.२७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी “सावंतवाडी रेल्वे टर्मिनस” नावाची भूमिपूजन कोनशिला आवारात बसविण्यात आली आहे. दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले. तेथे “सावंतवाडी रोड” अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलेला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग तर्फे बाह्य सुशोभिकरणाचे काम पूर्ण झाले आहे. याचे उद्घाटन या आठवड्यात अपेक्षित आहे, त्या अनुषंगाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानक परिसरात नाव फलक लावण्यात आला आहे त्यावर “सावंतवाडी रोड” असा उल्लेख करण्यात आला आहे, जो काही अंशी चुकीचा आहे, कारण त्या ठिकाणी टर्मिनस चे उद्घाटन झालेले आहे आणि कोकण रेल्वेच्या दफ्तरी देखील सावंतवाडी टर्मिनस असा उल्लेख कागदोपत्री करण्यात येत असल्याचे निर्दशनास आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
सावंतवाडी रेल्वे टर्मिनस चे नामकरण हे कोकण रेल्वेचे शिल्पकार कै. प्रा. मधु दंडवते यांचा नावे करावे, अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे, त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जा ची कामे व्हावीत. तसेच अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा,पाणी भरण्याची सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी स्वतंत्र निवेदन दिली आहेत. तसेच आंदोलन छेडले, जनजागृती सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू केली आहे. यासाठी यापुढेही आंदोलने छेडण्यात येणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावरील त्या फलकावरील नावाची दुरुस्ती करून ‘सावंतवाडी टर्मिनस’ असे न केल्यास ‘घंटानाद’ आंदोलन छेडण्याचा ईशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने दिला आहे.
सिंधुदुर्ग: पुणेकर चाकरमान्यांसाठी एक खुशखबरआहे. चिपी- पुणे या रूटसाठी अखेर विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालय यांनी परवानगी दिली आहे. गणेश चतुर्थी पूर्वी ही विमानसेवा Fly 91 कंपनी तर्फे सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकर चाकरमान्यांना यंदाच्या गणेश चतुर्थीला विमानाने कोकणात उतरण्याची संधी मिळणार आहे.
सुरवातीला प्रत्येक शनिवार आणि रविवारी चिपी-पुणे -चिपी अशी प्रवासी विमानसेवा सुरु करण्यात येत आहे. याबाबत पुणे विमानतळ येथे स्लॉट उपलब्ध करून मिळण्यासाठी अडचण येत होती. याबाबत खासदार नारायण राणे यांनी हवाई मंत्री आणि संरक्षण मंत्री यांना पत्र पाठवून लक्ष वेधले होते. या नंतर दोन दिवसांसाठी विमान सेवा सुरु करण्याचे आदेश देण्यात आले. या बाबतची माहिती आज माजी सभापती निलेश सामंत यांनी खा.नारायण राणे यांची भेट घेऊन दिली. तसेच त्यांचे आभार मानले. सदर विमानसेवा संपूर्ण आठवडाभर सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत प्रयत्न करण्याचे आश्वासन ना. राणे यांनी दिले. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप जल्हा उपाध्यक्ष प्रसाद पाटकर आदी उपस्थित होते.
मुंबई:गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची यादी गुगल मॅपवर मिळणार आहे. क्यूआर कोडद्वारे गणेशभक्तांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. यंदाचा गणेशोत्सव ७ सप्टेंबर २०२४ पासून सुरू होत आहे. त्यासाठी महानगरपालिका प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन खरेदी माध्यमांशी संपर्क साधून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती घरपोच वितरण करण्याच्या सुविधा पुरवण्याकरत समन्वय देखील साधण्यात येणार आहे. याच उपक्रमांचा भाग म्हणून श्रीगणेश मूर्ती घडविणाऱ्या मुर्तिकारांना शाडूची माती पुरविणे, काही ठिकाणी जागा उपलब्ध करून देणे, मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव तयार करणे आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री गौरव स्पर्धेचे आयोजन करणे असे विविध उपक्रम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहेत.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत यंदाच्या गणेशोत्सवात कृत्रिम तलावांची संख्या २०० पेक्षा अधिक वाढवण्याचे लक्ष्य असल्याचे मंगलप्रभात लोढा म्हणाले.
Voice of Konkan : गणेशोत्सव काहीच दिवसांवर आला आहे. लवकरच चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू होईल. कोकणात जाणार्या गाड्या फुल भरून जातील आणि कोकणातील सर्व रेल्वे स्थानके गर्दीने फुलून जातील.
कशीबशी ट्रेनची तिकिटे मिळवून (नाही मिळाली तर प्रवासात कसरत करून) चाकरमानी गावी जाण्यास निघतो. गाडीतील गर्दी, रेल्वे मार्गावरील अतिरिक्त गाड्यांमुळे तब्बल 4 ते 5 तास उशीरा धावणाऱ्या गाड्या हे सर्व सहन करून चाकरमानी कोकणातील आपल्या गावच्या जवळच्या स्थानकावर उतरतो. हा त्रास कमी की काय तर त्याला अजून एका त्रासाला सामोरे जावे लागते.
हा त्रास म्हणजे आपल्याच लोकांकडून होणारी त्याची लुबाडणूक. येथील खाजगी वाहतुक व्यावसायिकांकडून खासकरून रिक्षा व्यावसायिकांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून त्याची लूट केली जाते. काही ठिकाणी तर हंगामात जवळपास दुप्पट भाडे आकारले जाते. त्यामुळे काही वेळा चाकरमान्यांना मुंबई ते त्या स्थानकापर्यंत जेवढे रेल्वेच्या तिकिटाचे पैसे लागले त्यापेक्षा जास्त भाडे स्थानक ते घर या काही किलोमीटर अंतरासाठी द्यावे लागते.
कोकणात बरीचशी स्थानके शहरापासून दूर असून सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा अपुऱ्या आहेत. गाड्या रात्री अपरात्री पोहोचत असल्याने खाजगी वाहतुकीशिवाय दुसरा पर्याय नसतो. या मजबुरीचा फायदा घेऊन दुप्पट भाडे आकारले जाते. या बद्दल विचारले असता ”हेच दिवस आमचे कमवायचे असतात”, ”जायचे असेल तर सांगा नाहीतर सोडा”, ”शहराप्रमाणे आम्हाला रिटर्न भाडे भेटत नाही” अशी उत्तरे भेटतात.
सर्वच रिक्षा व्यायवसायिकांना येथे दोष देणे चुकीचे ठरेल. काही मुजोर रिक्षा व्ययवसायीकांमुळे कोकणातील समस्त रिक्षा व्यायवसायिकांचे नाव खराब होत आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि राज्य परिवहन महामंडळाने RTO लक्ष घालणे महत्त्वाचे.
स्थानिक प्रशासनाने आणि राज्य परिवहन महामंडळाने RTO यांनी यात लक्ष घालून ही लूट थांबवणे अपेक्षित आहे. किलोमीटर प्रमाणे भाडे ठरवून दिले पाहिजे. या भाड्यापेक्षा अतिरिक्त भाडे मागत असल्यास त्या व्यावसायिकावर कारवाई केली गेली पाहिजे. हंगामात प्रत्येक रेल्वे स्थानकावर 24 तास RTO कर्मचारी कर्तव्यावर ठेवले गेले पाहिजेत. प्रवासी तक्रार निवारण केंद्र आणि हेल्पलाईन उपलब्ध करून दिली गेली पाहिजे. तरच या लूटीला आळा घालता येवू शकतो.
Ganpati Special Bhajpa Express:दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त कोकणकरांसाठी भाजपतर्फे ‘भाजपा एक्सप्रेस’ चालविण्यात येणार असल्याची माहिती आज माजी खासदार निलेश यांनी एक्स X माध्यमातून दिली आहे.
यंदा गणेश चतुर्थीला कुडाळ आणि मालवणात जाणार्या मुंबईतील कोकणकरांना या गाडीचा लाभ घेता येईल. ही भाजपा एक्सप्रेस दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सुटणार असून तिची सेवा संपूर्णपणे मोफत आहे. इच्छुकांनी या गाडीच्या बूकिंग साठी ८६५७६७६४०४ व ८६५७६७६४०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
Shaktipeeth Expressway Updates:महाराष्ट्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाबद्दल एक महत्वाची अपडेट्स समोर येत आहे. या द्रुतगती मार्गावर आंबोलीजवळ पश्चिम घाटाखाली दोन मोठे बोगदे खोदले जाणार आहेत. या बोगद्यांची एकूण लांबी २१.९ किलोमीटर असणार आहे. हे काम पूर्ण झाल्यास तो देशातील सर्वात मोठा बोगदा ठरणार आहे.
महामार्गाची फेरआखणी
नागपूर-गोवा हा प्रस्तावित महामार्ग जवळपास ८०२ किलोमीटरचा आहे. हा महामार्ग १२ जिल्ह्यामधून जाणार आहे. यामध्ये १२ जिल्ह्यातील जवळपास २७ हजार हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. हा महामार्ग रद्द करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अनेक नेत्यांनी केली होती. तसेच या महामार्गामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान होणार असल्याची भावना अनेकांनी बोलून दखवली आहे. त्यामुळे नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे. या महामार्गाच्या झालेल्या विरोधानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुठलाही प्रकल्प जनतेवर थोपणार नाही अथवा रेटून नेणार नाही असे आश्वासन दिले आहे. शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पात ज्या ठिकाणी विरोध आहे, त्याची फेरआखणी करता येईल का? याचाही विचार करीत आहोत. मात्र जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही प्रकल्प पुढे नेणार नाही”, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं आहे.
आंबोली: पुणे हिंजवडी येथे सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेले चोरीतील तीन आरोपी आंबोली पोलीसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पकडले असून त्यांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. ते गोवा येथून पुणे येथे चालले असल्याची माहिती आहे .त्यांच्याकडून दोन रिव्हॉल्व्हर आणि जीवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आंबोली पोलीस हवालदार दत्तात्रय देसाई, हवालदार सुमित पिळणकर,पोलिस दिपक शिंदे, पो . अभिजित कांबळे आणि उत्तम नार्वेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना शिताफीने पकडले
पुणे-हिंजवडी येथील सराफी पेढीवर दरोडा टाकून पसार झालेल्या तीन संशयित आरोपींना आज सावंतवाडी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना ६ ऑगस्टपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अल्ताफ खान -वय २४, राजस्थान , गोविंद दिनवाणी – वय २२ वर्षे ,राजस्थान , राजुराम बिष्णोई वय – २६ राजस्थान अशी त्यांची नावे आहेत. काल सायंकाळी आंबोली पोलिसांनी आंबोली घाटात पूर्वीचा वस मंदिराजवळ या तीन आरोपींना दोन रिव्हॉल्व्हर ,आठ जिवंत काडतुसांसह जेरबंद केले होते. त्यावेळी पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा त्यांनी प्रयत्न करत या संशयित आरोपींनी पोलिसांना चेक पोस्टवर गुंगारा देत चकवा देण्याचा प्रयत्न देखील केला होता. परंतु , पोलिसांनी शिताफीने त्यांना अखेर जेरबंद केले