Author Archives: Kokanai Digital
सावंतवाडी :गोवा ते नागपूर असा 805 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग याला कोल्हापूर सांगली लातूर येथून प्रचंड विरोध होत आहे. आता त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये या सहित अन्य गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या सर्व गावांमध्ये लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व गावांचा मिळून सावंतवाडी तालुक्याचा तालुका मेळावा घेण्याचे नियोजन आहे. या अगोदर खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खाजगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ञ काका भिसे,सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत, कोल्हापूरचे शेतकरी सुधाकर पाटील, के डी पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर जयसिंग पाटील हे सहभागी झाले होते.
लवकरच या गावांच्या स्वतंत्र सभा व तालुका मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे.
कणकवली, दि.०१ : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी आज कणकवलीतून रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली. उद्या त्याला येथील न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. त्या तरूणाने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर रेल्वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या संशयित तरूणाची माहिती घेऊन सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.
रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त समजल्यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रेल्वे तिकीट विक्री आणि बुकींग प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून संशयित तरूणाची चौकशी सुरू आहे. तिकीट बुकिंग साठी वापरला जाणारा मोबाईल, कॉम्प्युटर आदी साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयित अधिक चौकशी करून त्याला मंगळवारी न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.
सांगली : विद्यमान सरकाराच्या महत्त्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेवरची विघ्ने संपताना दिसत नाही. या महामार्गा विरोधात सांगली सोलापूर, कोल्हापूर या तीनच जिल्ह्यातून १ हजार ३११ हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. शक्तीपीठाला समांतर महामार्ग उपलब्ध असताना पिकाउ जमिनीतून महामार्गाचा प्रकल्प राबविण्यास एकसंघपणे विरोध करण्याचा निर्णय सांगली येथील कवलापूर येथे शेतकर्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या महामार्गाची कोणीही मागणी केली नव्हती. सध्या नागपूर रत्नागिरी हा महामार्ग नियोजित प्रकल्पाला समांतर असताना पुन्हा हा नव्याने महामार्ग प्रस्तावित करण्याचे काहीच कारण नाही. माणसाच्या जगण्यासाठी संविधानिक तरतुदी आहेत, मारण्यासाठी नाहीत. या मार्गाने शेतकर्यांसह अनेक समाजघटक देशोधडीला लागणार आहेत. केवळ मूठभर लोकांचे हित त्यामागे लपले आहे. संघर्ष समितीने महामार्गबाधित शेतकर्यांच्या २२ मागण्या शासनापुढे ठेवल्या आहेत. त्या मान्य झाल्या, तरच शेतकरी संमती देतील. हा लढा दीर्घकाळ अविरत चालणार आहे. शेतकर्यांची एकजुटच शासनाला नमवेल. महामार्गामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. असे यावेळी या बैठकीचे निमंत्रक दिगंबर कांबळे म्हणालेत
प्रस्तावित महामार्गाबाबत सांगलीतून ६११, कोल्हापूरमधून ४५० आणि सोलापूरमधून २५० अशा १ हजार ३११ हरकती शासनापुढे मांडण्यात आल्या आहेत. या हरकतीवर सुनावणीची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे.