



सिंधुदुर्ग: १४४ वर्षातून येणारी पर्वणी म्हणजेच महाकुंभ मेळ्यासाठी कोकणातून सावंतवाडी येथून प्रयागराज साठी विशेष ट्रेन चालवण्याची मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने कोकण रेल्वेकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यां रेल्वेच्या सर्व संबंधितांकडे यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असल्याची माहिती अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
१४४ वर्षांत एकदा साजरा होणारा हा महोत्सव लाखो भाविकांसाठी जीवनातील एक अद्वितीय आणि धार्मिक अनुभव ठरेल. त्यामुळे कोकणातील अनेक भक्त प्रयागराजला प्रवास करण्यासाठी इच्छुक आहेत.महा कुंभमेळ्यासाठी सावंतवाडी ते प्रयागराजदरम्यान काही विशेष गाड्यांची व्यवस्था करावी, कोकण रेल्वे मार्गावरील सर्व तालुक्यांतील नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी या गाड्यांना सावंतवाडी रोड, कुडाळ, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पेण व पनवेल स्थानकांवर थांबे देऊन पुढे प्रयागराजला रवाना करावे, असे या निवेदनात म्हटले आहे.
हिंदू धर्मात महाकुंभाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातून सनातन धर्माच्या परंपरेचे सखोल प्रतिबिंब उमटते. दर १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला पूर्णकुंभ म्हणतात. बाराव्या पूर्णकुंभमेळ्यानंतर महाकुंभमेळा होतो. तब्बल १४४ वर्षांनंतर यंदा महाकुंभ होत आहे. महाकुंभमेळ्यात शाही स्नानाची व्यवस्थाही आहे. कुंभमेळ्यातील शाही स्नानासाठी काही तारखा निश्चित केल्या जातात. यंदा महाकुंभात एकूण ६ शाही स्नान होणार असून त्यापैकी २ स्नान पूर्ण झाले आहेत.
महाकुंभ शाही स्नानाच्या तारखा
१. पौष पौर्णिमा: १३-०१-२०२५/सोमवार
२. मकर संक्रांत : १४-०१-२०२५/मंगळवार
३. मौनी अमावस्या (सोमवती): २९-०१-२०२५/बुधवार
४. वसंत पंचमी: ०३-०२-२०२५/सोमवार
५. माघी पौर्णिमा: १२-०२-२०२५/बुधवार
६. महाशिवरात्री: २६-०२-२०२५/बुधवार
महाकुंभमेळा कधी संपणार?
महाकुंभमेळ्याचा समारोप महाशिवरात्रीला होणार आहे. यावर्षी २६ फेब्रुवारी २०२५ रोजी महाशिवरात्री आहे. महाकुंभाचे शेवटचे शाही स्नानही याच दिवशी केले जाणार आहे.