Follow us on
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार काही मोठे आणि महत्वाचे निर्णय घेऊन सर्व स्तरातील मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यानुसार आजच मंत्रिमंडळाने सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार वाढवले जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन मिळेल.
मानधनात किती वाढ होणार ?
राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांचं सध्याचं मानधन त्या-त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. त्यानुसार, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० पर्यंत आहे, त्या सरपंचाचं मानधन ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये होणार आहे. तर, या ग्रामपंचायतींच्या उपसरंपचांचं मानधन १ हजार रुपयांवरून २ हजार रुपये होणार आहे.
दोन हजार ते आठ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचं मानधन ४ हजार रुपयावरून ८ हजार रुपये होणार आहे. तर, उपसरपंचांचं मानधन दीड हजार रुपयांवरून ३ हजार रुपये होईल.
ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचांचं मानधन ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये तर, उपसरपंचांचं मानधन २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये होणार आहे.
या निर्णयामुळे राज्यावर वर्षभरात 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे
Vande Bharat Cargo: प्रवाशांना वंदे भारत मेट्रो, वंदे स्लीपर, वंदे मेट्रो( नमो भारत रॅपिड रेल) या ट्रेन धावण्यास सज्ज झाल्यानंतर आता मालवाहतुकीसाठी लेटेस्ट टॅक्नलॉजी असलेली वंदे कार्गो ट्रेन धावणार आहे. वंदे कार्गो ट्रेनची पहिली झलक समोर आली असून रेल्वे लवकरच वंदे कार्गो ट्रेनला प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे.
आता विमानाप्रमाणेच ट्रेनमध्येही पार्सल सप्लाय होणार आहेत. वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर आता माल वाहतूक करण्यासाठी हायस्पीड मालगाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे सेवा अधिक चांगली आणि आधुनिक करण्यावर भर देत आहे. चेन्नई येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीत वंदे कार्गो ट्रेनचं काम सुरू आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत आणि वंदे मेट्रो ट्रेनच्या कोचचे काम करण्यात आले आहे तिथेच हाय स्पीड वंदे कार्गो तयार होत आहे.
कमी अतंर असलेल्या शहरांत वंदे भारत कार्गो ट्रेन चालवण्यात येण्याची शक्यता आहे. या Vande Cargo मध्ये प्रवाशांसाठी कोणतीही सीट नसणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या Vande Cargo गाड्यांचा वापर कमी वेळेत एका शहरातून दुस-या शहरात सुलभ आणि सुरक्षित माल वाहतुकीसाठी केला जाईल. या Vande Cargo गाड्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्णपणे तयार होतील अशी माहिती देण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून सौर हायमास्ट मंजूर केले गेले आहेत. जिल्हा वार्षिक अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत हे सौर हायमास्ट मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२४-२५ या आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर पथदीप मंजूर करण्याबाबत प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडून दिला होता. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये हे हायमास्ट मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-कापाईवाडी सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी, पाणलोस रवळनाथ माऊली मंदिर, चौकूळ शंकर मंदिर, इन्सुली क्षेत्रफळ कोठावळे बांध हायवे सर्कलजवळ, वेंगुर्लेतील शेळपी मुंडयेवाडी, भोगवे शेवटचा स्टॉप जवळ, ग्रामपंचायत परबवाडा इमारत, ग्रामपंचायत खडपीवाडी कोचरा वेतोबा मंदिरजवळ, निवती किनारा, आडेली कांबळेवीर नेमळे रस्त्याजवळ (प्रभू खानोलकर घरानजीक), मालवणातील शिरवडे देव सिद्ध गणेश मंदिर, देव गांगेश्वर मंदिर, तळगाव सातेरी मंदिर खांदवाडी, चौके देवी भराडी मंदिर, आंबेरी वाक येथे, दोडामार्गातील झोळंबे रबेलवाडी प्राथमिक शाळेजवळ, गावठणवाडी सातेरी मंदिर देवस्थानसमोर, श्रीरामवाडी मासे लिलाव केंद्राजवळ, झोळंबे वरचीवाडी, कोलझर टेंबवाडी येथे, देवगड तालुक्यातील सौंदळे ग्रामपंचायत, कुडाळातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गानगर ब्राह्मण देव मंदिर तळी, वेताळ बांबर्डे वाघ भाटले वाडी वाघोबा मंदिर, खुर्द मायदेश्वर मंदिरनजीक, पिंगळी भद्रकाली मंदिर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर अंदुर्ले खिंड येथे,
कणकवलीतील हळवल श्रीराम मंदिर, नडगिवे ग्रामपंचायत आदी ३७ कामांना मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश बांधकाम आणि संबंधित ग्रामपंचायतींना पाठविले आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होईल, यादृष्टीने योग्य कार्यवाही करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.
वाचकांचे व्यासपीठ: कोकण रेल्वे २५ वर्षापूर्वी कोकणात आली. कोकण रेल्वे मार्ग साकारणे हे अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक कार्य KRCL कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आणि त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी अगदी लीलया पेलले. मात्र त्यानंतर आतापर्यंत पाहिजे तसा विकास कोकण रेल्वेचा झाला नाही. असे नाही की प्रयत्न झालेच नाही. कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक योजना, प्रस्ताव पुढे आलेत, मात्र त्यांना मूर्त स्वरूप देण्यात अपयश आले. कोणत्या आहेत या योजना आणि प्रस्ताव हे थोडक्यात पाहू.
राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चिपळूण कराड रेल्वे मार्ग होणार असे जाहीर केले गेले होते. या प्रस्तावाला ७ मार्च २०१२ रोजी मंत्रिमंडळात मान्यताही दिली गेली होती. मात्र त्यानंतर यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मात्र कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रेल्वे मार्ग मृगजळच ठरला आहे.
माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रेल्वे यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर वैभववाडी मार्ग याबाबत सर्वेक्षण झाले होते. मात्र पुढे यासाठी म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने हाही मार्ग रखडला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा मार्ग होणे काळाची गरज आहे त्यामुळे गणपती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ज्यादा गाड्याअप किंवा डाउन कोल्हापूर मार्गे वळवता येतील व गाड्यांचा होणारा खोळंबा रोखता येईल.
विद्यमान खासदार नारायण राणे काँग्रेसच्या सत्तेत मंत्री असताना सावंतवाडी ते रेडी रेल्वे मार्ग टाकण्याचे सुतवाच झाले होते त्याचे पुढे काय झाले? कणकवली ते रेडी पर्यंत स्वतंत्र टॉय ट्रेन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरणार अशी रेवडी त्याच वेळेला उडवली होती त्या रेवडीचे पुढे काय झाले? हे देखील प्रश्नच आहेत.
सावंतवाडी आंबोलीमार्गे बेळगाव जोडण्याची एक रेवडी मध्यंतरी उडवली केली होती त्यामध्ये सीमा वरती भागातील काही आमदार खासदार सक्रिय झाले होते त्याचे पुढे काय झाले ?
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस याचा कोनशिला समारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. खरं म्हणजे सावंतवाडी टर्मिनस काळाची गरज आहे. मे महिन्यामध्ये आणि गणपती मध्ये सावंतवाडी टर्मिनस जर पूर्ण झाले तर जादा गाड्या सोडता येतील तसेच वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी पुणे सावंतवाडी अशा गाड्या सोडता येतील
सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न येत्या दिवाळीपूर्वी सोडवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्या टर्मिनसचे उद्घाटन करा आणि त्याला मधु दंडवते यांचे नाव द्या कारण कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस यांना जाते. 2024 साल हे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी या वर्षात टर्मिनसला त्यांचे नाव देऊन सावंतवाडी टर्मिनस वरून स्पेशल गाडी वसई किंवा कल्याण पर्यंत सोडण्यात यावी हीच मधु दंडवते यांना आदरांजली ठरेल. पाणी भरण्याची आणि पाण्याची सोय आता दीपक केसरकर यांनी पूर्णत्वास नेलेली आहे तिलारी प्रकल्पातून पाणी देण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.
श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर
संस्थापक सदस्य कोकणरेल्वे
सल्लागार :अखंड कोकण रेल्वे सेवा समिती
नागपूर: नागपुरातील सुरू होणारी कंपनी गुजरातला नेण्यात आली असल्याची बातमी काल व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी या गोष्टीवरून मोठ्या प्रमाणात सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे रिन्यू कंपनीने म्हंटले आहे. याबाबत कंपनीने एक लिखित खुलासा जारी केला आहे.
कंपनीने काय म्हटले आहे खुलाश्यात..
महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा वीज दर प्रचंड असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही म्हटल्याचे वृत्त धादांत खोटे. हे वृत्त नुसते दिशाभूल करणारे नाही, तर अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. महाराष्ट्रात आम्ही सौर उत्पादनात अपस्ट्रीम व्हॅल्यूचेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत, ती गुजरातमध्ये करणार नाही. रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कंपनी आहे आणि महाराष्ट्राबाबत आमची वचनबद्धता आहे. महाराष्ट्रात आम्ही 550 मेवॉ क्षमता स्थापित केली आहे आणि आणखी 2000 मेवॉ चे काम सुरु आहे. 2026 पर्यंतचा हा आराखडा असून, त्यासाठी 15,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. याशिवाय पंप स्टोरेज, ग्रीन डायड्रोजन क्षेत्रात सुद्धा आम्ही राज्यात काम करणार असून, यातून 30 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनी महावितरणला 550 मेवॉ वीज स्पर्धात्मक दरात देत असून, सध्याचे प्रकल्प आणि येणारे प्रकल्प असे मिळून 1 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आम्ही करणार आहोत
मुंबई : पाश्चिम उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान नवीन सहाव्या मार्गिकेच्या पूर्तीनंतर पाश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर नव्या १२ लोकल चालवण्यात येणार आहे. लोकलमधील प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी १२ डब्यांच्या १० लोकल फेऱ्यांचे रूपांतर १५ डब्यांत करण्यात येणार आहे. नवे वेळापत्रक लागू झाल्यावर प्रवाशांना या सुविधा वापरायला मिळतील.
पश्चिम रेल्वेवरील मेल-एक्स्प्रेस आणि लोकल मार्गिकांच्या स्वतंत्र मार्गिका उभारण्यासाठी सहाव्या मार्गिकेचे काम सध्या युध्द पातळीवर सुरू आहे. ऑक्टोबर अखेर सहावी मार्गिका कार्यरत होणे अपेक्षित आहे. यामुळे रेल्वेगाड्या चालवण्यासाठी अतिरिक्त रूळ उपलब्ध होणार आहे. दादर ते विरार दरम्यान नव्या १० लोकल फेऱ्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वेचे आहे. वाढीव फेऱ्यांनंतर पश्चिम रेल्वेवरील फेऱ्यांची संख्या १,४०६पर्यंत पोहोचणार आहे. त्याचबरोबर बारा डब्यांच्या १२ लोकल फेऱ्यांचे रूपांतर १५ डबा लोकलमध्ये करण्यात येणार आहे.पंधरा डब्यांच्या लोकल विस्तारामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यावर पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेगाड्यांवर नवे वेळापत्रक लागू करण्यात येईल. वेळापत्रक अंमलबजावणीचीf तारीख जाहीर करण्यात आलेली नाही, असे पश्चिम रेल्वेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.