आम्ही कोकणासाठी पॅसेजर मागतोय तुम्ही सुपरफास्ट देताय,आम्ही रात्रीसाठी रेल्वे मागतोय तुम्ही दिवसाला देताय,आम्ही कोकणासाठी रेल्वे मागतोय तर तुम्ही गोव्यासाठी देताय? कोकणातील फक्त सात रेल्वे स्थानकावर थांबणारी सुपरफास्ट एक्सप्रेस देऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणी माणसाच्या जखमेवर मिठ चोळलेय अशा शब्दात संघटनेने आपली नाराजी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वेच्या प्रकल्पात ज्या महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक २२% गुंतवणूक केली त्याच्या वाटयाला मध्यरेल्वेच्या फक्त तीनच रेल्वे आल्या,त्यामुळे पश्चिम रेल्वेवरून चालू झालेली नवीन रेल्वेही वांद्रे ते वसईमार्गे सावंतवाडीपर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस चालवावी म्हणजे किमान कोकणातील प्रत्येक तालुक्याला एकतरी हॉल्ट मिळेल अशी मागणी करणाऱ्या प्रवासी संघटनेची धारणा होती.मात्र कोकण रेल्वेने बोरीवली मार्गे सुटणारी स्लो रेल्वे न देता बोरीवली ते मडगाव दरम्याने धावपारी सुपरफास्ट एक्सप्रेस १०११५/१६ देऊन काय साध्य केले?
कोकणातील रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हातील तब्बल ३४ रेल्वे स्थानकांवर हया पश्चिम रेल्वेवरून सुरू झालेल्या नवीन रेल्वेला हॉल्टच दिला नाही.यामध्ये १)आपटे २) जिते ३) पेण ४) कासू ५) नागोठणे ६) कोलाड ७) इंदापूर ८) माणगाव ९) गोरेगाव रोड ८) सापे वामने ९) करंजडी १०) विन्हेरे ११) दिवाणखवटी १२) कलंबनी बु. १३) खेड १४) अंजनी १५) कामथे १६) सावर्डा १७) आरवली रोड १८) कडवई १९) संगमेश्वर रोड २०) उक्षी २१) भोके २२) निवसर २३) आडवली २४ ) वेरवली २५) विलवडे २६) सौंदळ २७) राजापूर रोड २८) खारेपाटण रोड २९) वैभववाडी रोड ३०) आचरणे ३१) नांदगाव रोड ३२) सिंधुदुर्ग ३३) कुडाळ ३४) झाराप ह्या स्टेशनवरील चाकरमनी मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये राहत नाहीत का?असा संतप्त सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
लोकसभा प्रचाराच्या वेळी मंत्री पियुष गोयल यांनी मला मतदान करा मी कोकणाला नेहमीसाठी रेल्वे सुरू करून देतो असे आश्वासन दिले होते स्वाभिमानी कोकणी माणसाने गोयल यांना भरभरून मतदानही केले पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पियुष गोयल हे सर्वाधिक मताधिक्याने निवडूनही आले, कोकणी माणसामुळे साहेब पुढे कॅबिनेट मंत्रीही झाले व पुढे जाऊन द्विसाप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस कोकणा ऐवजी गोव्यासाठी सोडण्याचे प्रयोजन मंत्री महोदयांनी केले त्यामुळे ही सुपरफास्ट एक्सप्रेस नेमकी कोकणासाठी की गोव्यासाठी असा सवाल श्री.यशवंत जडयार यांनी विचारला आहे.
पश्चिम रेल्वेवरून नवीन सुरू होणाऱ्या बांद्रे ते मडगाव सुपरफास्ट एक्सप्रेसला फक्त बोरीवली,वसई,पनवेल,रोहा,विर,चिपळूण,रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग,सावंतवाडी,थिवीम,करमळी हे थांबे देण्यात आल्याचे निदर्शनास येत आहे. प्रवासी संघटना ह्या रेल्वेची रात्रीसाठी मागणी करीत आहे तरीही ती दिवसाची दिल्याने ती तळकोकणात रात्री १०.३५ च्या दरम्याने पोहोचतेय.म्हणजे कोकणातील लोकांनी मुंबईतून ३०० रू.मध्ये रेल्वेने जायचे आणि तेथे उतरल्यावर १५०० रू.ची रिक्षा करून घरी जायचे.
प्रवासी संघटनेच्या वतीने पश्चिम रेल्वेवरून वसईमार्गे कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे सुरू करण्यासाठी मागील १o वर्षापासून पाठपुरावा सुरू आहे यासाठी वसई विरारमध्ये फक्त एका महिन्यामध्ये १८ हजार सहयांचे क्याम्पीयनही राबवले,कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील कार्यालयासमोर उपोषण,वसई रोड येथे रेल्वे आंदोलन,सावंतवाडी रोड येथे लाक्षणिक उपोषण केले तर माजी खासदार श्री.विनायक राऊत,श्री.राजेद्र गावीत,श्री.गोपाळ शेट्टी तर विद्यमान खासदार श्री.नारायण राणे,श्री.पियुष गोयल,श्री.अरविंद सावंत,श्रीम.सुप्रिया सुळे व रेल्वे प्रशासन यांच्याकडे सततचा पाठपुरावा केला आहे.त्यामुळे फक्त कोकणासाठी स्वतंत्र्य रेल्वे मिळणे अपेक्षित होते,मात्र प्रवासी संघटनेने पाठपुरावा करूनही प्रत्यक्ष ही नवीन रेल्वे सोडताना कोकण रेल्वे प्रशासनाने ह्या प्रवासी संघटनांशी संपर्क न साधता वेळापत्रक परस्परच जाहिर केले.
पश्चिम उपनगरातील कोकणातील प्रवाशांनी मागील १० वर्षे ही रेल्वे मिळवण्यासाठी संघर्ष केला आत्ता पुढील १० वर्ष त्याचे हॉल्ट मिळवण्यासाठी कोकणकरांनी आंदोलने / उपोषण करत राहायची का? असा सवाल कोकणातील चाकरमनी विचारत आहेत.
वांद्रे मडगाव एक्सप्रेस नेहमीसाठी सुरू करून त्यातील एक जनरल कोच वसई रोड स्टेशनला राखीव ठेवावा व किमान माणगाव,खेड,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड व कुडाळ ह्या तालुक्याच्या ठिकाणी जादाचे हॉल्ट मिळावेत अन्यथा प्रवासी संघटना आपल्या मूळच्या वसई सावंतवाडी पॅसेंजरच्या मागणीवर ठाम असल्याचे प्रवासी संघटनेने सांगितले.
आज पश्चिम रेल्वेच्या वसईमार्गे दक्षिणेतील राज्यामध्ये दिवसाला साधारण ५ सुपरफास्ट एक्सप्रेस जात आहेत,त्यामुळे कोकणाला सुपर फास्ट एक्सप्रेसची आवश्यकताच नाही आहे. दिव्यावरून सावंतवाडी पर्यत पॅसेंजर किंवा स्लो एक्सप्रेस जाऊ शकते तर वांद्रे ते सावंतवाडी पॅसेंजर का शक्य नाही? नवीन सुपर फास्ट एक्सप्रेस कोकणाच्या नावाखाली गोव्याला देण्यापेक्षा कोकण रेल्वे प्रशासनाने ती उरलेल्या ३४ स्टेशनवर थांबवावी असे श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.