रत्नागिरी : प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने नव्याने बस घेण्याचा निर्णय घेतला होता. जुन्या गाड्यांचे प्रदूषण होत असल्यामुळे नव्याने बीएस ६ प्रणालीच्या बस आणण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात बीएस ६ च्या नव्या कोऱ्या २१ आरायमदायी लाल बस दाखल झाल्या आहेत. एकूण ५० गाड्या रत्नागिरी विभागासाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ गाड्या दाखल झाल्या असून उर्वरित गाड्या लवकरच येणार असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.
बसमध्ये दर्जेदार सुविधा
नव्याने दाखल झालेल्या गाड्यांमुळे एसटी विभागाकडे पुन्हा प्रवासी आकर्षित होण्याची आशा व्यक्त होत आहे. या बसमध्ये दर्जेदार सुविधा असणार आहेत. ४४ आसनांची आणि दोन बाय दोन आसन रचना, स्वयंचलित दरवाजा, पुढच्या मागच्या बाजूला डिजिटल मार्गदर्शक फलक, मोबाईल चार्जिंग, मागे आपत्कालीन दरवाजा अशा सुविधा असणार आहेत.
देखभालीसाठी खासगी कंत्राटदार
रत्नागिरी विभागाला देण्यात आलेल्या या सर्व बस कंत्राटी पद्धतीने चालणार आहेत.बसचा देखभाल खर्च खासगी कंत्राटदार करणार आहे. त्या बदल्यात एस. टी विभागाकडून काही रक्कम देण्याचा करार करण्यात आला आहे.