वेंगुर्ला हादरले! पोटच्या मुलानेच झाडली जन्मदात्या आईवर गोळी; आईचा जागीच मृत्यू…

   Follow us on        

वेंगुर्ला | प्रतिनिधी: तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक घरगुती भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बंदुकीतून गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​अणसुर पाल मडकीलवाडी येथील रहिवासी वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात गेल्या काही काळापासून सतत घरगुती कारणावरून वाद होत होते. मंगळवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसल्या होत्या.

​त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या उमेशने क्रूरतेची सीमा ओलांडली. तो घराच्या छपरावर चढला आणि तिथून त्याने आपल्या हातातील बंदुकीने आईच्या दिशेने थेट गोळी झाडली. ही गोळी वासंती यांच्या डाव्या बाजूच्या छातीत घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

​या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १०३ (३) (हत्या)

​शस्त्र अधिनियम १९५९: कलम ३, २५, २७, २९

​महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१: कलम ३७ (१), १३५

Facebook Comments Box

Sindhudurg: मोठी बातमी:प्रशासकीय राजवट संपणार! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत असल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.

​प्रशासकीय राजवट संपणार; ५.९९ लाख मतदार बजावणार हक्क

​मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन पेचामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होती. आता या निवडणुकांमुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधी मिळणार आहेत.

​एकूण मतदार: ५,९९,५६७

​मतदान केंद्रे: ८७०

​जिल्हा परिषद जागा: ५०

​पंचायत समिती जागा: १००

​अध्यक्षपद ‘खुले’; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘खुले’ (General) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. हे पद सर्वांसाठी खुले झाल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

​पंचायत समित्यांचे आरक्षण: ४ तालुक्यांत ‘महिला राज’

​जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षणही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आठपैकी चार तालुक्यांचे नेतृत्व महिलांकडे जाणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

​तालुकानिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:

सावंतवाडी – अनुसूचित जाती (महिला)

कणकवली – ओबीसी (महिला)

दोडामार्ग – सर्वसाधारण (महिला)

मालवण – सर्वसाधारण (महिला)

वेंगुर्ला – ओबीसी (सर्वसाधारण)

कुडाळ – सर्वसाधारण (खुले)

वैभववाडी – सर्वसाधारण (खुले)

देवगड – सर्वसाधारण (खुले)

निवडणुकीचे महत्त्व

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ मानले जाते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्येही मोठा उत्साह आहे. प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवरून या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या या मतदानानंतर जिल्ह्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: लागून आलेल्या सुट्ट्यांसाठी मुंबई पुण्याहून विशेष गाड्या सोडाव्यात – कोकण विकास समिती

   Follow us on        

मुंबई/रत्नागिरी:

येणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) जोडून आलेल्या दीर्घ सुट्ट्यांमुळे कोकण मार्गावर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोकण विकास समितीने रेल्वे प्रशासनाकडे विशेष गाड्या सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. २३ जानेवारी ते २६ जानेवारी २०२६ या काळात मुंबई आणि पुण्याहून कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण महिनाभर आधीच फुल्ल झाल्याने चाकरमानी आणि पर्यटकांचे हाल होत आहेत.

​या पार्श्वभूमीवर, ‘कोकण विकास समिती’चे जयवंत शंकर दरेकर आणि अक्षय मधुकर महापदी यांनी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे प्रशासनाला सविस्तर पत्र लिहून विशेष गाड्यांचे नियोजन करण्याची विनंती केली आहे.

​प्रवाशांच्या सोयीसाठी या तीन मार्गांवर विशेष ट्रेनची मागणी:

​समितीने प्रवाशांच्या मागणीनुसार खालील तीन मार्गांवर विशेष फेऱ्यांचे प्रस्ताव मांडले आहेत:

​१. मुंबई CSMT – सावंतवाडी रोड – मुंबई CSMT:

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबून सिंधुदुर्गपर्यंत धावण्यासाठी अपेक्षित आहे. यात स्लीपर आणि एसी कोचची सोय असावी.

​२. पुणे – सावंतवाडी रोड – पुणे:

पुण्याहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. लोणावळा, कल्याण, पनवेलमार्गे ही गाडी सोडल्यास पुणेकर चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल.

​३. मुंबई CSMT – चिपळूण – मुंबई CSMT (दिवसा धावणारी स्पेशल):

कमी अंतराच्या प्रवाशांसाठी ही गाडी फायदेशीर ठरेल. पेण, माणगाव, वीर, खेड यांसारख्या स्थानकांवर थांबा देऊन सेकंड सीटिंग आणि एसी चेअर कारची सुविधा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

​दरवर्षी जानेवारीच्या अखेरीस येणाऱ्या लाँग वीकेंडमुळे कोकणात कौटुंबिक भेटी आणि पर्यटनासाठी मोठी गर्दी होते. नियमित गाड्यांमध्ये जागा नसल्याने प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्सच्या अव्वाच्या सव्वा भाड्याचा सामना करावा लागतो किंवा असुरक्षित रस्ते प्रवासाचा धोका पत्करावा लागतो.

​”जर रेल्वेने वेळेत विशेष गाड्यांचे नियोजन केले आणि बुकिंग सुरू केले, तर प्रवाशांना शेवटच्या क्षणी होणारा मनस्ताप वाचेल. तसेच, यामुळे भारतीय रेल्वेच्या महसुलातही मोठी भर पडेल,” असे कोकण विकास समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

विधवा प्रथा बंद करण्यासाठी कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; राज्य महिला आयोगाकडून दखल

   Follow us on        

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ग्रा. पं.च्या अभिनंदनाचे पत्र सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांना पाठविले आहे.

आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही, तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधने झुगारून सन्मानाने मुख्य प्रवाहात येतील तसेच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचे कार्य करेल व आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल.

आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचे स्वागत करतो. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी आम्हाला खात्री असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

 

Facebook Comments Box

परप्रांतियांना जमीनी विकणार नाही; ग्राम देवतेसमोर नारळ ठेवत गावकऱ्यांनी घेतली शपथ

   Follow us on        

दोडामार्ग | १२ जानेवारी (प्रतिनिधी):

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील (इकोसेन्सिटिव्ह झोन) असलेल्या कोलझर गावामध्ये सध्या परप्रांतीय लोकांचा वावर वाढल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या जमिनी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कोलझरमधील ग्रामस्थ एकवटले असून, त्यांनी ग्रामदेवतेसमोर नारळ ठेवून सामूहिक शपथ घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

​गेल्या काही दिवसांपासून या भागात अनधिकृत उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनींच्या विक्रीचे व्यवहार अद्याप अधिकृतरीत्या समोर आले नसले तरी, भविष्यात गावातील जमिनी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नयेत यासाठी ग्रामस्थ सावध झाले आहेत.

ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय:

  • जमीन विक्रीवर बंदी: गावातील कोणत्याही नागरिकाने आपल्या रक्ताच्या नात्याबाहेरील व्यक्तीला जमीन विकू नये, याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.
  • व्यावसायिकांना विनंती: ज्यांनी जमिनी विकण्याचे ठरवले आहे किंवा ज्यांच्या चर्चा सुरू आहेत, त्यांना विनंती करून हे व्यवहार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • आंदोलनाचा इशारा: इथून पुढे कुणालाही न विचारता अनधिकृत उत्खनन किंवा जमिनींचे व्यवहार झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलनात्मक लढा उभारला जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

​निसर्गसंपन्न असलेल्या कोलझर गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे.

Facebook Comments Box

नो ‘वेटिंग’; ओन्ली ‘कन्फर्म’ तिकीट | वंदे भारत स्लीपर ट्रेनसाठीचे विशेष नियम जाहीर

   Follow us on        

​नवी दिल्ली: भारतीय रेल्वे लवकरच देशात पहिली वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करणार आहे. रेल्वे बोर्डाने या ट्रेनच्या तिकीट दराबाबत आणि प्रवासाच्या नियमांबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या ट्रेनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ जानेवारी रोजी करण्याची शक्यता आहे.

​प्रवाशांसाठी महत्त्वाचे नवीन नियम:

​किमान ४०० किमीचे भाडे: वंदे भारत स्लीपरमध्ये प्रवासाचे अंतर ४०० किलोमीटरपेक्षा कमी असले तरी, प्रवाशांना किमान ४०० किलोमीटरचे भाडे द्यावे लागेल.

​केवळ कन्फर्म तिकीट: या ट्रेनमध्ये वेटिंग लिस्ट (Waiting List) किंवा आरएसी (RAC) सुविधा नसेल. प्रवाशांना केवळ कन्फर्म बर्थ असेल तरच प्रवास करता येईल.

​मर्यादित कोटा: या ट्रेनमध्ये केवळ महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि रेल्वे कर्मचाऱ्यांचा ड्युटी पास यांसारखे मोजकेच कोटे लागू असतील. इतर कोणतेही सवलतीचे कोटे उपलब्ध नसतील.

​जीएसटी स्वतंत्रपणे: तिकिटाच्या मूळ भाड्यावर जीएसटी (GST) स्वतंत्रपणे आकारला जाईल.

​डिजिटल पेमेंटला प्राधान्य आणि परतावा (Refund):

​रेल्वेने प्रवाशांना तिकीट बुकिंगसाठी डिजिटल पेमेंट वापरण्याचे आवाहन केले आहे. जर डिजिटल पेमेंटद्वारे तिकीट बुक केले असेल आणि ते रद्द झाले, तर २४ तासांच्या आत परतावा मिळण्याची सोय केली जाईल. काऊंटरवर देखील डिजिटल पेमेंटलाच प्राधान्य दिले जाईल.

​ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी सुविधा:

​लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या पालकांना उपलब्धता असल्यास खालचा बर्थ (Lower Berth) दिला जाईल.

​६० वर्षांवरील पुरुष आणि ४५ वर्षांवरील महिला प्रवाशांना प्राधान्याने लोअर बर्थ देण्याचा प्रयत्न केला जाईल.

​महत्त्वाची माहिती: वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये स्वच्छ व्यवस्था, आधुनिक सुविधा आणि आरामदायी प्रवासावर विशेष भर देण्यात आला आहे. यासोबतच १७ जानेवारीला ६ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची भेटही देशाला मिळण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित संरेखनाच्या सर्वेक्षणाला वेग; संभाव्य गावांची यादी समोर

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) वतीने प्रस्तावित असलेल्या ८०२ किलोमीटरच्या नागपूर-गोवा ‘शक्तीपीठ महामार्गा’बाबत मोठी अपडेट समोर येत आहे. महामार्गाच्या अलाइनमेंटमध्ये (नव्या मार्गामध्ये) समाविष्ट असलेल्या गावांसाठी सध्या ‘व्हिलेज मॅप’ (गाव नकाशा) संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी प्रशासनाने जिल्ह्यानुसार गावांच्या याद्या तयार केल्या आहेत. या यादीत प्रामुख्याने खालील जिल्ह्यांतील गावांचा समावेश आहे:

विदर्भ आणि मराठवाडा: नांदेड जिल्ह्यातील हदगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा या तालुक्यांमधील अनेक गावांच्या नकाशांची मागणी करण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्र: सोलापूर (बार्शी, मोहोळ, माढा, पंढरपूर, माळशिरस), सातारा (माण, खटाव) आणि सांगली (खानापूर, पलूस, वाळवा) या जिल्ह्यांतील गावेही या प्रक्रियेत आहेत.

कोल्हापूर आणि कोकण: कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, राधानगरी, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांतील गावांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यांतील बांदा, कोळझर यांसारख्या गावांचाही यात समावेश आहे.

स्थानिक विरोध आणि फेरबदल: दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील काही भागांतून या महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध होत होता. या पार्श्वभूमीवर, सरकारने काही तालुक्यांना मूळ आराखड्यातून वगळण्याचे सूतोवाच केले होते. परंतु, समोर आलेल्या ताज्या यादीत अद्यापही या भागातील गावांची नावे दिसत असल्याने, ही ‘नवीन अलाइनमेंट’ मधील गावे आहेत का, याबाबत शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आणि चिंतेचे वातावरण आहे.

अद्याप जमिनीच्या संपादनाचे (Land Acquisition) काम पूर्ण झालेले नसून, केवळ नकाशांची जुळवाजुळव करण्याचे प्राथमिक काम सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

जिल्ह्यानुसार आणि तालुक्‍यानुसार संभाव्य गावांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

.
नांदेड जिल्हा
हदगाव: पेवा, शिराड, कोहाळी, महाटला , चाक्री, कोळी, मर्दगा.

.
हिंगोली जिल्हा

कळमनुरी: येहळेगाव तुकाराम, घोडा, कामठा, पिंपरी बु., डोंगरगाव पूल, गणगाव, कुप्ती, सापाळी, धारधावंडा, कसबे धावंडा, किल्ले वडगाव, गोरलेगाव, पोत्रा, बोल्डा, बोल्डावाडी.

वसमत: पांगरा शिंदे, गुंडा, करंजाळा, बोरसावंत, आडगाव, हट्टा, पिंपळगाव हजाम, संगमेश्वर.

औंढा: राजदरी, सोनवाडी, लोहारा खु., लोहारा बु., सावरखेडा, आसोला तर्फ लाख, दरेगव्हाण, नागेशवाडी, पुंजाळ, रांजाळा.

.
परभणी आणि बीड जिल्हा

परभणी: नांदगाव खु., नांदगाव बु., आलापूर पंढरी, धनगरवाडी, आसोला.

सोनपेठ: रेवा तांडा.

परळी (बीड): कौथळी तांडा.

 

सोलापूर जिल्हा

बार्शी: रतनंजन, सर्जापूर, राळेरास, सासुरे, मुंगशी (वा), दहिठणे, मौजे ताडवळे.

मोहोळ: वाळूज , भैरववाडी, देगांव, वाफळे, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेतफळ, वैरागवाडी .

माढा: धनोरे, मानेगाव , बुद्रुकवाडी, पंच फुलवाडी, खैराव, कुंभेज, अंजनगाव खु., मोडनिंब, वैरागवाडी .

पंढरपूर: बर्डी, करकंब, भोसे, नेमतवाडी, शेवते, पेहे, आव्हे.

माळशिरस: जांबुड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव, चांदापुरी, तरंंगफळ, मगरवाडी, गरवाड.

.
सातारा जिल्हा

माण: कारखेल, पर्यंत, खडकी, वरकुटे म्हसवड, वाकी, दिवाड, धामणी, गेटेवाडी, वडजाळ, कुकुडवाड.

खटाव: कण्हेरवाडी, हिवरवाडी, पाडल, मयाणी, अनफळे, कांकत्रे.

 

सांगली जिल्हा

खानापूर: भिकावाडी बु., माहुली, चिखलहोल, नागवाडी, घाणावड, नेवरी, आंबेगाव, वाडीयेरायबाग, भालवणी.

पलूस: वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव, कुंडल, घोगाव.

वाळवा: मसुचीवाडी, जुने खेड, बोरगाव, वाळवा, उरण इस्लामपूर, कामेरी, येडे निपाणी, इटाकरे, येळूर, कुरळप, ऐतवडे खु.

.
कोल्हापूर जिल्हा
हातकणंगले: पारगाव, मणपाडळे .

पन्हाळा: बहिरेश्वर, जाखले, गिरोली, पोहळे तर्फ आळते, कुशिरे.

करवीर: केरली, केरले, वरंगे, पाडळी बु., शिंदेवाडी, खुपिरे, वाकरे, कुडित्रे , बहिरेश्वर, बीड, गणेशवाडी, शिरोली दुमाला, सादोली दुमाला, भाटणवाडी, हासूर.

राधानगरी: राशिवडे बु., कोडावडे, वाघवडे, मोहडे, चाफोडी तर्फ तारळे, कौलव, पिंपळवाडी, ठिकपुर्ली, कुऱ्हाडवाडी, माजगाव, तळशी, तुरंबे, कापिलश्वर, सरवडे.

कागल: उंदरवाडी .

भुदरगड: खापरेवाडी, टिकेवाडी, नाधवाडे, पाचवडे, बासरेवाडी, मिणचे खु., लोटेवाडी, कोळवण, पालेवाडी, भाटीवडे, हेदवडे, देवकेवाडी, शेणगाव, करडवाडी, शेलोली, पाडखंबे, सोनुर्ली, मेघोली, बेडीव, अरळगुंडी.

आजरा: कोरीवडे, हरपवडे, पेरनोली, देवर्डे, वेळवट्टी, पेठेवाडी , मसोली, खानापूर, पोळगाव, एरंडोल, सातेवाडी.

चंदगड: गवसे, बुजावडे, कुरणी, महाळुंगे इनाम, बिजूर , भोगोली, कानूर बु., पिळणी, जांबरे, इसापूर .

.
सिंधुदुर्ग जिल्हा

सावंतवाडी: केगड , पडवे माजगाव, पडवे, डेगवे, बांदा.

दोडामार्ग: कुंभवडे, भेकुर्ली, कोळझर, तळकट, झोळंबे.

महत्वाची सूचना: सदर माहिती हि प्राथमिक स्वरूपाची असून,या यादीवर शिक्केमार्फत झालेले नाही किंवा कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही आहे. त्यामुळे ही यादी संभाव्य स्वरूपाची असून अंतिम मानता येणार नाही.

 

Facebook Comments Box

शब्द–संवेदनांचा उत्सव : मराठी साहित्य व कला सेवेतर्फे तेवीसावे कविसंमेलन दादरमध्ये उत्साहात संपन्न

   Follow us on        

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : शब्दांना भावार्थ देणाऱ्या संवेदना, अनुभवांना दिशा देणारे विचार आणि संस्कृतीच्या मुळांशी जोडणारी अभिव्यक्ती यांचा सुरेल संगम साधणारे मराठी साहित्य व कला सेवा आयोजित तेवीसावे कविसंमेलन रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी दादर (पूर्व) येथील इंडियन एज्युकेशन सोसायटी, राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी येथे अत्यंत शिस्तबद्ध, रसिक आणि साहित्यनिष्ठ वातावरणात यशस्वीरीत्या पार पडले. नववर्षाच्या प्रारंभी आयोजित या साहित्यिक सोहळ्याने कवी आणि रसिकांच्या मनात सर्जनशील ऊर्जेचे नवे अंकुर रुजवले.

गेल्या नऊ वर्षांपासून सातत्याने काव्य, कला आणि विचारांच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या मराठी साहित्य व कला सेवा या संस्थेने या संमेलनातून नवोदित व अनुभवी कवींना समान व्यासपीठ उपलब्ध करून दिले. एकाच कार्यक्रमात प्रत्येक कवीला तीन कविता सादर करण्याची संधी देणारी ही संस्था अखंड भारतवर्षातील एकमेव संस्था असल्याचे वैशिष्ट्य या संमेलनात अधोरेखित झाले. “कविता का लिहावी?” या पहिल्या सत्रात आत्मशोध, समाजाशी साधलेला प्रामाणिक संवाद आणि न बोलता येणाऱ्या भावनांचा काव्यमय वेध घेण्यात आला, तर दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात मुक्त विषयांवरील स्वच्छंद, प्रामाणिक आणि भावपूर्ण अभिव्यक्तीने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कविसंमेलनात अशोक सहदेव सुकाळे, आदित्य भालचंद्र कुलकर्णी, एकनाथ शेडगे, कल्पना दिलीप मापूसकर, चंद्रकांत दढेकर (अभिवाचन), जयश्री हेमचंद्र चुरी, नमिता नितीन आफळे (अभिवाचन), प्रतिक्षा पांडुरंग सरमळकर, महेश रामनाथ वैजापूरकर, डॉ. मानसी पाटील, मोहित जनार्दन तांडेल, योगिता दशरथ कदम, विक्रांत मारुती लाळे, विलास मारुती अडसुळे (अभिवाचन), विवेक वसंत जोशी आणि गुरुदत्त दिनकर वाकदेकर यांनी आपल्या सादरीकरणातून विविध भावविश्वे उलगडली. स्वामी विवेकानंद या विषयांवरील अभिवाचनाने विचार, प्रेरणा आणि सकारात्मकतेचा सशक्त संदेश दिला.

कार्यक्रमाचे आस्वादक म्हणून डॉ. अनुज केसरकर आणि राहुल मुदाळकर यांनी सूक्ष्म निरीक्षणांसह रचनांचा रसग्रहणात्मक आढावा घेतला. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. मानसी पाटील यांनी अत्यंत ओघवत्या आणि संवेदनशील शैलीत पार पाडली. अल्पोपहाराची शानदार व्यवस्था डॉ. मानसी पाटील आणि डॉ. अनुज केसरकर यांनी केली. कार्यक्रमाचे छायाचित्रण विक्रांत लाळे यांनी व्यावसायिक खुबीने केले. संपूर्ण कार्यक्रमात साहित्यिक शिस्त, वेळेचे काटेकोर पालन आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे विशेष लक्षवेधी ठरले.

शब्दसंपदा, वैचारिक समृद्धी आणि सांस्कृतिक जाणीव यांचा सुरेल संगम साधणारे हे तेवीसावे कविसंमेलन उपस्थित प्रत्येकाच्या मनात दीर्घकाळ रेंगाळणारा अनुभव ठरले. कार्यक्रमाच्या यशस्वी समारोपप्रसंगी आयोजकांनी पुढील उपक्रमाची घोषणा करत चोवीसावे कविसंमेलन रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती दिली. साहित्यसंवादाचा हा सन्माननीय मंच भविष्यातही मराठी साहित्यविश्वाला नवी दिशा देत राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Facebook Comments Box

ठाणे महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार प्रफुल्ल कदम यांचा बोलबाला! प्रभाग क्रमांक १३, विभाग “ड” मध्ये प्रचाराची रणधुमाळी!

   Follow us on        

संदेश जिमन /ठाणे: मिळालेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत महानगरपालिका निवडणूकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रचाराची धग शिगेला पोहोचली असताना त्यात एखाद्या अपक्ष उमेदवाराने जन सेवेची अपेक्षा ठेऊन प्रचारात आघाडी घ्यावी अशीच परिस्थिती ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १३ , “ड” विभागातील अपक्ष उमेदवार यांनी निर्माण केली आहे.

वाढता प्रतिसाद, सेवाभावी व्यक्तीमत्वाचा प्रभाव यामुळे जनतेचा प्रफुल्ल कदम यांच्यावरील विश्वास वाढतो आहे.

प्रफुल्ल कदम हे कोकणाचे सुपुत्र, त्यांनी सामाजिक कार्य करताना आजवर कोणत्याही मोठ्या पदाची अपेक्षा बाळगली नाही. शारीरिक शिक्षण , कराटे प्रशिक्षक म्हणून काम करत असताना सशक्त, जागृत समाज घडविण्यासाठी, सामान्य माणसाचा दबलेला आवाज सुस्त प्रशासना पर्यंत पोहचवण्यासाठी आपण निवडणूकीच्या रिंगणात दाखल झाल्याचे म्हटले आहे.

मुंबईत सध्यातरी मोठा प्रश्न आहे तो म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन, या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर लढाई करावी लागणार, हा काळ संघर्षाचा आहे. एकजुटीने लढलो तर विजय निश्चितच आपला आहे. म्हणून कायम सुख दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा असणारा प्रतिनिधी निवडावा असे आवाहन प्रभागातील जनतेला प्रफुल्ल कदम यांनी केले आहे.

हा संघर्ष,ही लढाई सत्तेच्या मदमस्त सुखासाठी नाही तर ती हक्क, न्याय,सन्मान यासाठी आहे असा ठाम विश्वास प्रफुल्ल कदम यांनी मतदारांना दिला आहे. “केक” ही निशाणी आहे.

मतदारांनी मोठ्या संख्येने पाठींबा द्यावा असे त्यांनी नम्र आवाहन केले आहे.

निवडणूकीच्या रिंगणात नियोजित उद्देशाने येणारे , प्रचार आणि जनतेचा विश्वास यांच्या जोरावर निवडणूक जिंकतात. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न हाताळणाऱ्या उमेदवारांचे मनोरथ पूर्ण होईल असा विश्वास वाटतो आहे.

Facebook Comments Box

संगमेश्वरमध्ये जनआक्रोश समितीचे रस्ता रोको आंदोलन यशस्वी; मात्र आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल 

मुंबई–गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात आक्रमक रस्ता रोको-

संगमेश्वर | ११ जानेवारी २०२६

“कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही… मुंबई–गोवा महामार्ग झालाच पाहिजे!”

“या तिरडीत झोपलाय कोण,आमदार–खासदार सगळेच चोर… ही तिरडी कशाला? प्रशासनाच्या मयताला!”

अशा तीव्र व आक्रमक घोषणांनी रविवारी संगमेश्वर येथील सोनवी पुल परिसर अक्षरशः दणाणून गेला. गेल्या तब्बल १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाविरोधात नागरिकांचा संयम संपल्याने जनआक्रोश समितीच्या वतीने महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

महामार्गावरील संथगतीने सुरू असलेले काम, नियोजनाचा अभाव व ठेकेदारांचा हलगर्जीपणा यामुळे सातत्याने भीषण अपघात घडत आहेत. अनेक निष्पाप नागरिक, दुचाकीस्वार, वाहनचालक तसेच मुक्या जनावरांचे प्राण गेले असून, शेकडो नागरिक गंभीर जखमी, कायमचे अपंग झाले आहेत. आर्थिक नुकसान व मानसिक त्रास हे कोकणकरांचे रोजचे वास्तव बनले आहे.

“अजून किती जीव गेल्यावर शासन व प्रशासन जागे होणार?” असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनामुळे महामार्गावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. संपूर्ण संगमेश्वर परिसर काही काळ पोलीस छावणीत रूपांतरित झाला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी कनिष्ठ अभियंता – जनतेचा संताप

आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांऐवजी केवळ कनिष्ठ अभियंत्याला पाठवण्यात आल्याने आंदोलनकर्त्यांचा संताप अनावर झाला.

“आमच्या प्रश्नांची दखल घ्यायची असेल तर जबाबदार वरिष्ठ अधिकारीच आले पाहिजेत. अटक झाली, जेलची हवा खावी लागली तरी माघार नाही,” असा ठाम इशारा देण्यात आला.

सुमारे तासभर महामार्ग पूर्णतः ठप्प राहिला. काही आंदोलनकर्ते सोनवी पुलावरच झोपून प्रतिकार करत होते, तर महिलांनीही महामार्गावर ठाण मांडले. प्रतीकात्मक तिरडी ठेवून जोरदार घोषणाबाजी सुरूच होती.

अखेर अधीक्षक अभियंता आंदोलनस्थळी

दीर्घ तणावानंतर महामार्ग प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता अनामिका जाधव आंदोलनस्थळी दाखल झाल्या.जनआक्रोश समितीने स्पष्ट भूमिका मांडत सांगितले की, “पोकळ आश्वासने नकोत. लेखी, ठोस व कालबद्ध हमी दिली तरच आंदोलन स्थगित करू.” अधीक्षक अभियंता अनामिका जाधव यांनी संगमेश्वर येथील उड्डाणपुलाचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुले केले जाईल, तसेच इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असे आश्वासन दिले.

चार तासांचा नाट्यपूर्ण संघर्ष

सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. परवानगीशिवाय राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको केल्याप्रकरणी काही आंदोलनकर्त्यांवर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, विशाखा खेडेकर.

राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक अडवणे हे कायद्याने गुन्हा असला तरी, सार्वजनिक सुरक्षिततेकडे दुर्लक्ष करून प्रशासन व ठेकेदारांनी केलेली दिरंगाई हीदेखील गंभीर गुन्हेगारी कसूर आहे, असा ठाम आरोप जनआक्रोश समिती व नागरिकांनी केला आहे.

या आंदोलनात जनआक्रोश समितीचे सुरेंद्र पवार, संजय जंगम, रुपेश दर्गे, जितेंद्र गिजे, अनिकेत मेस्त्री, संतोष आंब्रे, हरिश बेगावले, विशाखा खेडेकर यांच्यासह मुंबईतून आलेले ८० कोकणकर, संगमेश्वरचे युयुत्सु आर्ते, मनसेचे जितेंद्र चव्हाण, अशोक जाधव तसेच तालुक्यातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search