रेल्वेच्या ‘रेल-वन’ ॲपमधील तांत्रिक त्रुटीमुळे विनातिकीट प्रवासाला चालना

   Follow us on        

रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या नवीन ‘रेल्वे-वन’ (RailOne) या तिकीट बुकिंग ॲपमध्ये एक मोठी तांत्रिक त्रुटी समोर आली असून, यामुळे विनातिकीट प्रवासाचे प्रमाण वाढले आहे. वास्तविक, रेल्वेच्या नियमांनुसार ‘जिओ-फेन्सिंग’ प्रणालीमुळे धावत्या ट्रेनमध्ये किंवा स्टेशनच्या बाहेरून तिकीट काढता येत नाही; मात्र या तांत्रिक बिघाडामुळे प्रवासी आता ट्रेनमध्ये चढल्यानंतरही सहज तिकीट बुक करत आहेत. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून हा प्रकार सुरू असून, यामुळे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः कल्याणकडे जाणाऱ्या एसी (AC) लोकलमध्ये तिकीट तपासणी दरम्यान अनेक प्रवासी प्रवासाच्या मध्यभागी तिकीट बुक करताना आढळले आहेत, ज्यामुळे रेल्वेच्या महसुलाचे नुकसान होत आहे.

​या तांत्रिक त्रुटीचा थेट परिणाम मुंबईच्या उपनगरीय रेल्वे नेटवर्कवर, विशेषतः मध्य आणि हार्बर मार्गावर होत आहे. ‘डिव्हिजनल रेल्वे युजर्स कन्सल्टेटिव्ह कमिटी’चे सदस्य राजीव सिंघल यांनी सांगितले की, या त्रुटीमुळे एसी लोकलमध्ये होणारी गर्दी वाढली असून गाड्यांच्या वक्तशीरपणावरही परिणाम झाला आहे. सध्या मुंबईत पीक अवर्समध्ये लोकल गाड्या सरासरी १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या मते, सिग्नलसाठी वापरल्या जाणाऱ्या लहरींची व्याप्ती स्टेशन परिसराबाहेरही जात असल्याने जिओ-फेन्सिंग मर्यादित ठेवणे कठीण होत आहे.

​’रेल्वे-वन’ ॲपमधील ही त्रुटी दूर करणे तातडीचे बनले आहे, जेणेकरून विनातिकीट प्रवासाला आळा बसेल आणि रेल्वेचे वेळापत्रक सुधारण्यास मदत होईल.

Facebook Comments Box

कांजुरमार्ग – बदलापूर मेट्रोच्या कामाला वेग येणार; नव्याने निविदा प्रसिद्ध

   Follow us on        

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कांजुरमार्ग ते बदलापूर मेट्रो १४ मार्गिकेच्या कामाला आता वेग येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) या प्रकल्पाच्या पुनरावलोकनासाठी आणि तांत्रिक कामांसाठी नव्याने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

प्रकल्पाचे पुनरुज्जीवन

यापूर्वी मेट्रो १४ चा व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला होता, मात्र तांत्रिक कारणांमुळे डिसेंबर २०२५ मध्ये सल्लागार करार रद्द करण्यात आला होता. आता एमएमआरडीएने या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR), अंदाजपत्रक आणि सर्वेक्षणासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे गेल्या काही काळापासून रखडलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू झाला आहे.

मेट्रो १४ मार्गिकेची वैशिष्ट्ये

बदलापूर आणि अंबरनाथमधील प्रवाशांना थेट मुंबई आणि नवी मुंबईशी जोडणारी ही मार्गिका अनेक अर्थांनी खास ठरणार आहे:

एकूण लांबी:४३.६९ किमी

स्थानकांची संख्या: २४ (यात कांजुरमार्ग येथे एक भूमिगत स्थानक असेल).

वेग: डिझाइन गती ९० किमी/तास, तर सरासरी ५५ किमी/तास वेग असेल.

कनेक्टिव्हिटी:ही मार्गिका मेट्रो ४, मेट्रो ६, मेट्रो १२ आणि मेट्रो ५ ला जोडली जाणार आहे.

प्रवाशांना होणारे फायदे

सध्या बदलापूर-अंबरनाथ परिसरातील प्रवाशांना मुंबई किंवा नवी मुंबईला जाण्यासाठी पूर्णपणे मध्य रेल्वेवर अवलंबून राहावे लागते. या नवीन मेट्रो मार्गिकेमुळे:

१. रेल्वेवरील प्रवाशांचा ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.

२. घणसोली येथे ट्रान्स-हार्बर रेल्वेची जोडणी मिळाल्याने नवी मुंबईचा प्रवास सुखकर होईल.

३. कल्याण-शिळफाटा आणि तळोजा भागातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.

महत्त्वाचे इंटरचेंज पॉइंट्स

कांजुरमार्ग: मेट्रो ४ आणि ६ शी जोडणी.

हेदुटणे: मेट्रो १२ (कल्याण-तळोजा) शी जोडणी.

बदलापूर: मध्य रेल्वे आणि मेट्रो ५ अ (प्रस्तावित) शी जोडणी.

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाला जोडणारा हा सर्वात मोठा मेट्रो प्रकल्प ठरणार असून, यामुळे एमएमआर क्षेत्रातील प्रवाशांचा प्रवास वेगवान आणि सुसह्य होण्याची चिन्हे आहेत.

 

Facebook Comments Box

धक्कादायक! सिग्नल यंत्रणेत बिघाड करून सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा

   Follow us on        

कराड: कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ शनिवारी सकाळी सह्याद्री एक्सप्रेस (कोल्हापूर-पुणे) गाडीवर चोरट्यांनी मोठा दरोडा टाकला. चोरट्यांनी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेशी छेडछाड करून गाडी अचानक थांबवली आणि प्रवाशांवर धाड घातली. त्यांनी प्रवाशांच्या मोबाइल फोन, सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तू लुटल्या.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने प्रवासी घाबरले होते.रेल्वे प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी सिग्नल बिघडवून गाडी थांबवल्याची ही पहिलीच घटना नाही, मात्र एक्सप्रेस गाडीवर अशा पद्धतीने दरोडा टाकणे ही दुर्मीळ आणि अतिशय धोकादायक घटना आहे. चोरांनी गाडी थांबताच काही मिनिटांतच लूट केली आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांची संख्या चार ते पाच होती.मिरज रेल्वे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, प्रवाशांच्या जबानी आणि अन्य पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. रेल्वे सुरक्षा यंत्रणेच्या कमकुवतपणामुळे ही घटना घडल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रवाशांनी अशा घटनांपासून सावध राहावे, मौल्यवान वस्तू जवळ ठेवू नयेत आणि संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना किंवा पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर-पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

Facebook Comments Box

“सह्याद्री एक्सप्रेस पुन्हा सुरू करा, अन्यथा….” प्रवासी संघाचा रेल्वेला इशारा

   Follow us on        

कोल्हापूर: कोल्हापूर आणि मुंबईला जोडणारी अत्यंत महत्त्वाची आणि जुनी रेल्वे सेवा ‘सह्याद्री एक्सप्रेस’ तातडीने पूर्ववत करावी, या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात संघातर्फे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन पाठवण्यात आले असून, मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन, रेल्वे रोको किंवा आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. १९९० पासून सुरू असलेली ही रेल्वे सेवा कोविड-१९ महामारीच्या काळात बंद करण्यात आली होती. सध्या ही रेल्वे केवळ कोल्हापूर ते पुणे या मर्यादित स्वरूपात धावत असल्याने मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

​प्रवासी संघाने निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यातून दररोज सुमारे २० ते २५ हजार प्रवासी खासगी बस किंवा कारने मुंबईकडे प्रवास करतात. रेल्वे सेवा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना महागड्या खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असून, यामुळे त्यांच्यावर आर्थिक भार पडत आहे. तसेच इंधनाचा वापर वाढल्याने पर्यावरणावरही विपरीत परिणाम होत आहेत. रेल्वे प्रशासनाकडून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) येथे प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात असले, तरी प्रत्यक्षात तिथे नवीन प्लॅटफॉर्मची सुविधा निर्माण झाली आहे. एकीकडे कोल्हापूर ते पनवेल विमान सेवा सुरू करण्यात आली असताना, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी रेल्वे सेवा मात्र अद्याप बंदच ठेवण्यात आली आहे, याबद्दल प्रवाशांमध्ये मोठी नाराजी आहे.

​या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई (किंवा पर्यायी स्वरूपात पनवेलपर्यंत) तात्काळ सुरू करावी, अशी विनंती अध्यक्ष ॲड. चंद्रकांत निकम यांनी केली आहे. या पत्राच्या प्रती मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, कोल्हापूरचे खासदार आणि मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. हजारो कामगार, विद्यार्थी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी ही रेल्वे सेवा पुन्हा सुरू होणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रवासी संघाने स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

मुंबईहून धावणार्‍या पाहिल्या ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनला मंजुरी

   Follow us on        

नवी दिल्ली: देशातील दोन प्रमुख आर्थिक केंद्रे असलेल्या मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान आता नवीन ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेन धावणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाला अधिकृतपणे मंजुरी दिली असून, यामुळे दोन्ही शहरांतील प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर आणि वेगवान होणार आहे.

​खासदार पी. सी. मोहन यांच्या मागणीला यश:

बेंगळुरू मध्य लोकसभा मतदारसंघाचे खासदार पी. सी. मोहन यांनी मुंबई आणि बेंगळुरू दरम्यान वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची विनंती रेल्वे मंत्रालयाकडे केली होती. या मागणीची दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी पत्राद्वारे या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचे कळवले आहे. लोकहिताच्या दृष्टीने आणि वाढत्या गर्दीवर उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

​प्रमुख स्थानके आणि मार्ग:

मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन वंदे भारत स्लीपर ट्रेन बेंगळुरूचे ‘क्रांतिवीर संगोळी रायाण्णा’ (KSR) स्टेशन आणि मुंबईचे ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ (CSMT) या दोन ऐतिहासिक स्थानकांदरम्यान चालवली जाईल. या मार्गावर सध्या धावणाऱ्या इतर गाड्यांच्या तुलनेत वंदे भारत स्लीपरचा वेग अधिक असल्याने प्रवाशांच्या वेळेत मोठी बचत होणार आहे.

​आधुनिक सुविधांचा संगम:

आतापर्यंत धावणाऱ्या वंदे भारत गाड्या प्रामुख्याने ‘चेअर कार’ स्वरूपाच्या होत्या, ज्या अल्प अंतराच्या प्रवासासाठी सोयीस्कर होत्या. मात्र, मुंबई-बेंगळुरू दरम्यानचा प्रवास लांब पल्ल्याचा असल्याने प्रथमच अत्याधुनिक ‘स्लीपर’ कोचची व्यवस्था करण्यात आली आहे. यात आरामदायी शयनिका, सुरक्षितता यंत्रणा, वातानुकूलित कोच आणि जागतिक दर्जाच्या सोयी-सुविधा प्रवाशांना मिळतील.

या ट्रेनच्या मंजुरीमुळे दक्षिण भारत आणि पश्चिम भारत यांच्यातील व्यापार आणि पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. आयटी हब बेंगळुरू आणि आर्थिक राजधानी मुंबई यांमधील संवाद या जलद रेल्वेसेवेमुळे अधिक सुलभ होईल अशी आशा रेल्वे प्रशासनाने व्यक्त केली आहे. लवकरच या ट्रेनचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष धावण्याची तारीख रेल्वे प्रशासनाकडून जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

राज्यातील रेल्वे प्रश्नांसाठी मुंबईत रंगणार ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’

   Follow us on        

मुंबई:कोकणातील रेल्वेचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आगामी रविवार, २६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता मुंबईत भव्य ‘महाराष्ट्र रेल्वे परिषद’ आयोजित करण्यात येणार आहे. ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र’ यांच्या कार्यकारिणी सभेत या परिषदेची संकल्पना मांडण्यात आली असून, आता प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात झाली आहे.

​२८ ते ३० गाड्यांचा प्रश्न ऐरणीवर

​या परिषदेचा मुख्य हेतू दादर-रत्नागिरी पॅसेंजर आणि सह्याद्री एक्सप्रेस यांसारख्या महाराष्ट्रातील बंद केलेल्या किंवा शहरांतील मुख्य स्थानकाबाहेर (उदा. पनवेल, पुणे किंवा दिवा) फेकलेल्या २८ ते ३० महत्त्वाच्या गाड्यांबाबत जनजागृती करणे हा आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत असून, या अन्यायाविरुद्ध प्रशासनाला इशारा देण्यासाठी राज्यातील सर्व प्रवासी संघटनांना एका छत्रछायेखाली आणून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे.

​दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प आणि सुविधा

​केवळ गाड्याच नव्हे, तर कोकण रेल्वे मार्गावरील दीर्घकाळ रखडलेले प्रकल्प, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे अपूर्ण काम आणि स्थानकांवरील पायाभूत सुविधांचा अभाव यावरही या परिषदेत सविस्तर चर्चा होणार आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी या परिषदेचे नियोजन केले असून, कोकणवासीयांनी या लढ्यात आता एकजुटीने सहभागी होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

​सामान्यांचा लढा, सामान्यांसाठी!

​या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे कोणतेही राजकीय आंदोलन नसून, तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य कष्टकरी आणि कोकणी चाकरमान्यांनी पुकारलेला हा हक्काचा लढा आहे. या परिषदेला कोणतेही मोठे राजकीय किंवा आर्थिक पाठबळ नाही. त्यामुळे ही परिषद यशस्वी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आणि आर्थिक नियोजनाची गरज आहे.

​”ही परिषद यशस्वी करण्यासाठी स्वतः आयोजक म्हणून पुढे यावे. तसेच ज्यांना या सामाजिक कार्यात प्रत्यक्ष सहभाग घ्यायचा आहे किंवा आर्थिक मदत करायची आहे, त्यांनी त्वरित संपर्क साधावा,” असे आवाहन समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

​कोकणच्या रेल्वे विकासासाठी आणि हक्काच्या प्रवासासाठी होणारी ही परिषद कोकण रेल्वेच्या इतिहासातील एक निर्णायक वळण ठरण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई! फक्त ५ रुपयांत वापरता येतील जागतिक दर्जाची प्रसाधनगृहे; ७ मुख्य ठिकाणी सुविधा सुरू

   Follow us on        

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) मुंबई शहर आणि उपनगरांतील सार्वजनिक स्वच्छतेचा दर्जा सुधारण्यासाठी ‘अॅस्पिरेशनल’ (Aspirational) सार्वजनिक शौचालयांची संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात स्वच्छ प्रसाधनगृहांची उपलब्धता ही नेहमीच एक मोठी समस्या राहिली आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी महापालिकेने केवळ ५ रुपयांत ‘प्रिमिअम’ सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे मुंबईकरांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

​मोक्याच्या ठिकाणांची निवड

​प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्प्यात दक्षिण मुंबईतील सात महत्त्वाच्या आणि वर्दळीच्या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यात फॅशन स्ट्रीट, लायन गेट, बॉम्बे हायकोर्ट, विधानभवन, वाळकेश्वरमधील बाणगंगा आणि माहीम बीच यांसारख्या पर्यटन आणि कार्यालयीन दृष्टीने महत्त्वाच्या परिसरांचा समावेश आहे. या ठिकाणी दररोज हजारो लोकांची ये-जा असते, त्यामुळे अशा आधुनिक सुविधांची तिथे सर्वाधिक गरज होती.

​जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा

​ही ‘अॅस्पिरेशनल’ शौचालये केवळ नावापुरती मर्यादित नसून, त्यात अनेक अत्याधुनिक सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन, स्वतंत्र चेंजिंग रूम आणि मातांसाठी ‘बेबी फीडिंग’ (स्तनपान) क्षेत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष रॅम्प आणि सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे हे प्रकल्प खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक ठरत आहेत.

​सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य

​सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असतो. हे लक्षात घेऊन या प्रत्येक शौचालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत आणि सुरक्षेसाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, आणीबाणीच्या परिस्थितीसाठी अग्निशमन यंत्रणाही सज्ज ठेवण्यात आली आहे. अवघ्या ५ रुपयांच्या शुल्कात उच्च दर्जाची स्वच्छता आणि सुरक्षा प्रदान करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य आहे.

​भविष्यातील विस्तार योजना

​दक्षिण मुंबईतील या प्रयोगाच्या यशानंतर महापालिका आता मुंबईच्या उपनगरांमध्येही आपले जाळे विस्तारणार आहे. येत्या वर्षभरात उपनगरांतील ६७ विविध ठिकाणी अशाच प्रकारची आलिशान आणि सुसज्ज शौचालये बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील सार्वजनिक आरोग्याचा दर्जा सुधारण्यास मदत होईल आणि मुंबई खऱ्या अर्थाने ‘स्मार्ट सिटी’च्या दिशेने पाऊल टाकेल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: प्रवाशांना दिलासा! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाडीला जूनपर्यंत मुदतवाढ

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने गाडी क्रमांक २२११५/२२११६ लोकमान्य टिळक टर्मिनस – करमळी – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्स्प्रेसच्या मडगावपर्यंतच्या विस्ताराला आता ११ जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

ही गाडी दर गुरुवारी मुंबईहून (एलटीटी) पहाटे ००:५० वाजता सुटते आणि सकाळी ११:१५ वाजता मडगावला पोहोचते, तर परतीच्या प्रवासात मडगावहून दुपारी १३:५० वाजता सुटून मध्यरात्री ००:१० वाजता पुन्हा मुंबईला पोहोचते. प्रवाशांच्या सोयीसाठी या गाडीला आधुनिक एलएचबी (LHB) कोच जोडण्यात आले असून, या गाडीची डब्यांची रचना २ जनरेटर कार (EOG), १ फर्स्ट एसी (H1), ३ सेकंड एसी (A1-A3), १ पॅन्ट्री कार आणि १५ थर्ड एसी (B1-B15) अशी एकूण २२ डब्यांची आहे.

​या प्रवासादरम्यान ही गाडी कोकण रेल्वेच्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीचे सर्व थांबे पुढीलप्रमाणे आहेत: लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, करमळी आणि मडगाव जंक्शन. या मुदतवाढीमुळे उन्हाळी सुट्ट्या आणि आगामी पावसाळ्याच्या सुरुवातीला कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांनी वेळापत्रकातील अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा रेल्वेच्या अधिकृत ॲपचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार मुंबई-मडगाव विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: मुंबई ते गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी ) ते मडगाव दरम्यान विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

०११२९ क्रमांकाची मुंबई सीएसएमटी–मडगाव जंक्शन विशेष गाडी १० एप्रिल २०२६ (शुक्रवार) आणि १४ एप्रिल २०२६ (मंगळवार) रोजी मुंबई सीएसएमटी येथून रात्री १२:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी दुपारी ३:१५ वाजता मडगाव येथे पोहोचेल.

तर ०११३० क्रमांकाची मडगाव–मुंबई सीएसएमटी विशेष गाडी १० एप्रिल आणि १४ एप्रिल रोजी मडगाव येथून सायंकाळी ४:०० वाजता सुटून पुढील दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम आणि कारमळी या स्थानकांवर थांबतील.

या गाड्यांमध्ये एकूण २० एलएचबी डबे असणार असून त्यात १८ एसी ३-टियर (इकॉनॉमी) डबे आणि २ एसएलआर डबे असतील. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घेऊन आपला प्रवास अधिक सोयीस्कर करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

 

Give headline

Facebook Comments Box

शेकडो ‘रिकाम्या सीटस’ घेऊन धावणाऱ्या समर स्पेशल गाडीला संगमेश्वरला थांबा देण्याची मागणी

   Follow us on        

संगमेश्वर: कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या थिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – थिरुवनंतपुरम सेंट्रल (०६०१३ / ०६०१४) या समर स्पेशल गाड्यांना संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा देण्यात आलेला नाही. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून, कोकण रेल्वेच्या दुजाभावाच्या धोरणाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या गाड्यांना माणगाव, रोहा आणि मडगाव यांसारख्या स्थानकांवर थांबे दिलेले असताना संगमेश्वरला डावलण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

​संगमेश्वर रेल्वे स्थानक हे कोकणातील एक महत्त्वाचे व्यापारी आणि प्रवासी केंद्र आहे. वार्षिक सुमारे सहा कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून देणाऱ्या या स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. इतके मोठे उत्पन्न आणि प्रवाशांची संख्या असूनही, महत्त्वाच्या स्पेशल गाड्यांना येथे थांबा न देणे हे स्थानिकांच्या हिताकडे दुर्लक्ष करणारे असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील चाकरमानी आणि पर्यटकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

​एकीकडे या समर स्पेशल गाड्यांमधील शेकडो जागा रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे, तर दुसरीकडे संगमेश्वरच्या प्रवाशांना प्रवासासाठी संघर्ष करावा लागत आहे. जर या गाड्यांना संगमेश्वर येथे थांबा दिला, तर प्रवाशांची सोय होण्यासोबतच रेल्वेच्या उत्पन्नातही मोठी भर पडू शकते. रिकाम्या धावणाऱ्या गाड्यांमुळे रेल्वेचे आर्थिक नुकसान होत असतानाही थांबा का दिला जात नाही, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

​या गंभीर समस्येची दखल घेत ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर’ या फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवून या गाड्यांना तात्काळ थांबा देण्याची मागणी केली आहे. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला जोरदार पाठिंबा दिला असून, जर रेल्वे प्रशासनाने लवकरच सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search