Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘स्लीपर विशेष’ एक्सप्रेस

   Follow us on        

कोकण रेल्वे: शनिवार-रविवारची प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मडगाव जंक्शन आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांच्या फेऱ्यांचे सविस्तर तपशील खालीलप्रमाणे आहेत:

१. गाडी क्रमांक ०१००४ मडगाव – लोकमान्य टिळक (T) स्पेशल

​दिनांक: शनिवार, २४ जानेवारी २०२६.

​वेळ: मडगाव जंक्शनवरून दुपारी १६:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​२. गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (T) – मडगाव स्पेशल

​दिनांक: रविवार, २५ जानेवारी २०२६.

​वेळ: लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सकाळी ०७:५५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २२:०० वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल.

​या विशेष गाड्या खालील स्थानकांवर थांबतील:

करमळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे.

​गाडीची रचना (Composition)

​या गाडीला एकूण २० डबे असतील, ज्यामध्ये:

​स्लीपर क्लास (Sleeper): १८ डबे

​एसएलआर (SLR): ०२ डबे

 

Facebook Comments Box

अखेर रेल्वे प्रशासन नरमले! चर्चेला तयार; नेमळेकर यांचे उपोषण स्थगित

२७ जानेवारीला कोकण रेल्वे मुख्यालयात तातडीची विशेष बैठक

   Follow us on        

नवी मुंबई (प्रतिनिधी) :

महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे सल्लागार व कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी २६ जानेवारी २०२६ रोजी सुरू केलेल्या उपोषणासंदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाशी सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर बेलापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोकण रेल्वेचे उप-मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (कमर्शियल मॅनेजर) श्री. दिनेश जी. बोंडे यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत विशेषतः सावंतवाडी टर्मिनस, कोल्हापूर–सावंतवाडी रेल्वे मार्ग, तसेच संध्याकाळची सावंतवाडीपर्यंत धावणारी अतिरिक्त विशेष रेल्वे या महत्त्वाच्या मागण्यांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

चर्चेदरम्यान उपस्थित सर्व मुद्दे लेखी स्वरूपात नोंदवून घेण्यात आले असून, या विषयांवर कोकण रेल्वेच्या वाणिज्य (कमर्शियल) विभागातील संबंधित अधिकारी व अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार दिनांक २७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता कोकण रेल्वेच्या बेलापूर येथील मुख्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीत सर्व मागण्यांवर सविस्तर वाणिज्यिक चर्चा करून कायमस्वरूपी व ठोस तोडगा काढण्याचे आश्वासन कोकण रेल्वे प्रशासनाने दिले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष श्री. अभिजीत धुरत, कोकण रेल्वेचे अधिकारी श्री. दिनेश बोंडे व पोलिस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने श्री. नेमळेकर यांचे उपोषण स्थगित करण्यात आले.

दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने आपल्या अधिकृत पत्राद्वारे महासंघाच्या मागण्या योग्य व विचारार्ह असल्याचे स्पष्ट संकेत दिले असून, येत्या बैठकीत सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Facebook Comments Box

प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर दिसणार महाराष्ट्राचा दिमाखदार चित्ररथ; ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ संकल्पनेचे सादरीकरण

   Follow us on        

नवी दिल्ली :भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७७ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्तव्यपथावर होणाऱ्या भव्य पथसंचलनासाठी महाराष्ट्र राज्याचा आकर्षक आणि आशयघन चित्ररथ सज्ज झाला आहे. यंदा महाराष्ट्राच्या वतीने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला जाणार असून, राज्याची समृद्ध सांस्कृतिक परंपरा, सामाजिक एकात्मता आणि वाढते आर्थिक सामर्थ्य यांचे प्रभावी दर्शन या चित्ररथातून घडवण्यात येणार आहे.

या वर्षीच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यास युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत सादर होणारा महाराष्ट्राचा चित्ररथ जागतिक स्तरावर राज्याची ओळख अधिक भक्कम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

चित्ररथाच्या मध्यवर्ती संकल्पनेत गणेशोत्सवाचे सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून निर्माण होणारी कोट्यवधी रुपयांची आर्थिक उलाढाल, मूर्तिकार, रंगकाम करणारे कलाकार, सजावट व्यावसायिक, प्रकाश व ध्वनी तंत्रज्ञ, वाहतूक, फुलव्यवसाय, पर्यावरणपूरक साहित्य निर्माते अशा असंख्य घटकांना मिळणारा शाश्वत रोजगार या संपूर्ण आर्थिक साखळीचे प्रभावी चित्रण या चित्ररथात करण्यात आले आहे.

चित्ररथावर गणपती बाप्पांची भव्य मूर्ती, पारंपरिक ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करणारे कलाकार, लेझीम, फुगडी यांसारखे लोकनृत्यप्रकार, तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख दर्शवणारे पोशाख आणि रंगसंगती पाहायला मिळणार आहेत. या माध्यमातून ‘लोकसहभागातून आत्मनिर्भरता’ ही संकल्पना ठळकपणे मांडण्यात आली आहे.

विशेष बाब म्हणजे, महाराष्ट्र शासनाने २०२५ पासून सार्वजनिक गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’चा दर्जा दिला आहे. या निर्णयामुळे गणेशोत्सव केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उत्सव न राहता, पर्यावरणपूरक उपक्रम, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करणारा उत्सव म्हणून अधिक व्यापक स्वरूपात साजरा होत आहे. शाडू मातीच्या मूर्ती, कृत्रिम विसर्जन तलाव, पर्यावरण संवर्धनाचा संदेश यांचाही चित्ररथात समावेश करण्यात आला आहे.

एकूणच, महाराष्ट्राचा हा चित्ररथ परंपरा आणि प्रगती यांचा सुरेख संगम साधणारा असून, भारताच्या सांस्कृतिक वैविध्यात महाराष्ट्राचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे देशासह जगाला दाखवून देणारा ठरणार आहे.

Facebook Comments Box

गाबीत समाज विकास मंडळ, पुणे यांचा दिमाखदार स्नेह मेळावा संपन्न

   Follow us on        

पुणे: गाबीत समाज विकास मंडळ, पुणे यांचा दिमाखदार स्नेह मेळावा संपन्न झाला. गोवा,कारवारसह तळ कोकणातील गाबीत समाज बांधव ज्या उद्देशाने एकत्रित येऊन रोप लावले. त्यांचे रूपांतर आज वटवृक्षात झाले .असे कार्यक्रमाचे अध्यक्ष विठोबा तथा आबा झिलू कोळंबकर यांनी चिंचवड ,पुणे येथे गाबीत समाज वार्षिक स्नेहमेळावा २०२६ आयोजित सोहळ्यात ज्ञाती बांधवांना मार्गदर्शन करताना प्रतिपादन केले.

प्रारंभी दिपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, प्रा. डॉ. नंदा संतोष हरम, मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल आदी प्रभृतीच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. अध्यक्ष आबा कोळंबकर म्हणाले की, आनंद घ्यावा आणि आनंद द्यावा, सोबतच व्यक्त व्हावं हाच हेतू कार्यकर्त्यांनी मंडळ निर्माण केला तोच वारसा पुढे घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावेळी नमूद केले. प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर यांनी सांगितले की, आपलं गाव सोडून पुण्यासारख्या शहरात आलात.पण आपली संस्कृती टिकून ठेवत असताना ,सामाजाविषयी असलेली बांधिलकी अबाधित राखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध आहात हेच आजच्या कार्यक्रमातून अधोरेखित होतं आहे. त्यामुळे असेच जोमाने कार्यरत रहा आणि मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा असे सांगितले. प्रा. डॉ. नंदा संतोष हरम यांनी ” लहान मुलांना वाढवताना” या विषयावर बोलताना सांगितले की,खरंच आपली मुले सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित करून यांचा विचार गांभीर्याने पालकांनी करण्याची वेळ आल्याचे नमूद करताना बालपणी मुलांचा व्यक्तीमत्व विकास घडतं असतो. त्यांना सोशल मीडिया पासून दूर ठेवता येणे गरजेचे असून आईवडिलांनी सुद्धा किती वेळ भ्रमणध्वनी वापरायचा यांचाही विचार व्हावा! त्यापेक्षा मुलांना इतिहासिक ठिकाणे, वारी म्हणजे काय? गड किल्ले यांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यांना स्वावलंबन शिकवा तरच सजगतेने पालकत्व निभावलं जाईल असे सांगितले. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष नागेश साळगांवकर, महिला अध्यक्षा सौ. चंदन प्रसाद भाबल यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. यावेळी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून खजिनदार शशिकांत धुरी आणि प्रसाद भाबल यांना विशेष सन्मानित करण्यात आले. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक चिटणीस हेमंत आचरेकर यांनी करून आढावा घेतला. तर मागील वर्षीचा ताळेबंद वाचन खजिनदार शशिकांत धुरी यांनी केले.उपस्थित पाहुण्यांचा परिचय राजाराम गांवकर यांनी करून दिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमात मालवणी दशावतार “एक लोपावत असलेली कला” आणि सौ. मेधा नंदकिशोर सनये लिखित “वय हरले जिद्द जिंकली” या दुहेरी एकांकिका सद्यस्थितीवर भाष्य करण्याऱ्या ठरल्या त्याला उपस्थितांनी टाळ्यांची दाद दिली. तर कित्येक पारितोषिके प्राप्त झाली. या कार्यक्रमासाठी लेखक कवी डॉ. उदय माळगावकर, साहित्यिक गोपाळकृष्ण तथा बाबा मुणगेकर, सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. या रंगतदार स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन सुदवा देऊलकर आणि शुभम नंदकिशोर सनये संयुक्तपणे केले. सदर मेळावा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी मंडळ व सदस्य कार्यकारी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. विविध कार्यक्रमांनी सांगता करण्यात आली.

Facebook Comments Box

अरण्यातून साक्षात अवतरला ‘वन विनायक’; मळगावच्या खडपकर कुटुंबाची २६ वर्षांची अनोखी भक्तीगाथा

   Follow us on        

सावंतवाडी: निसर्ग आणि मानवाच्या नात्याचे अनेक पदर आपण अनुभवतो, पण सावंतवाडीच्या माळगावात एक असा चमत्कार घडला ज्याने श्रद्धेला नवी परिभाषा दिली. एका बाजूला पितृशोक आणि दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या विसर्जनाचे दुःख अशा दुहेरी कात्रीत अडकलेल्या एका भक्ताला चक्क जंगलात ‘साक्षात देव’ भेटला. ही कथा आहे सुमन खडपकर आणि त्यांच्या घरी विराजमान असलेल्या ‘श्री वन विनायक’ या लाकडी मूर्तीची.

​जेव्हा ‘तो’ अरण्यात भेटला…

​वर्ष २००० ची ही गोष्ट. खडपकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. पितृनिधनामुळे घरच्या गणपतीचे विसर्जन अवघ्या दीड दिवसात करावे लागले. लाडक्या बाप्पाला इतक्या लवकर निरोप द्यावा लागल्याची सल सुमनजींच्या मनात होती. अशातच माळगावच्या घनदाट अरण्यातून जात असताना, त्यांना निसर्गाच्या कुशीत लाकडाच्या ओंडक्याला आलेला एक नैसर्गिक आकार दिसला. तो हुबेहूब ‘एकदंती’ गणपतीसारखा होता. जणू बाप्पानेच शब्द दिला होता – “विसर्जनाचे दुःख करू नकोस, मी आता तुझ्या घरी कायमचा वास्तव्याला येतोय.”

​श्रद्धेचा ‘अडीच दशकांचा’ प्रवास

​तेव्हापासून आजतागायत, म्हणजे तब्बल २६ वर्षे, ही नैसर्गिक लाकडी मूर्ती खडपकर कुटुंबाचा अविभाज्य हिस्सा आहे. गेल्या वर्षी या मूर्तीचे ‘श्री वन विनायक’ असे नामकरण करण्यात आले. दरवर्षी माघी गणेशोत्सवाचा सोहळा येथे एखाद्या उत्सवासारखा साजरा होतो. यंदाही सकाळी अभिषेक, पूजन आणि दुपारी महाप्रसादाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

​भक्तीचा ‘मळा’ आणि कीर्तनाची ‘सेवा’

​या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे सायंकाळची कीर्तन सेवा. स्वतः सुमन खडपकर जेव्हा आपल्या रसाळ वाणीने कीर्तन करतात, तेव्हा उपस्थित भक्त मंत्रमुग्ध होतात. यंदा त्यांना मयूर गवळी यांनी हार्मोनियमवर साथ दिली. केवळ एक धार्मिक विधी न राहता, या उत्सवाने माळगावच्या सांस्कृतिक जीवनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.

​नात्यांची वीण आणि निसर्गाची ओढ

​आजच्या काळात जिथे माणसांमधील संवाद संपत चालला आहे, तिथे या ‘वन विनायकाने’ सर्वांना एकत्र गुंफले आहे. निसर्गाने स्वतः घडवलेली ही मूर्ती आणि खडपकर कुटुंबियांची त्याप्रती असलेली निष्ठा, हे श्रद्धा आणि पर्यावरणाच्या संगमाचे एक उत्तम उदाहरण ठरले आहे.

Facebook Comments Box

जनसेवेचा ‘संदेश’ आता राजकारणात; रेल्वे प्रवाशांच्या हक्कांसाठी लढणारे जिमन राजकीय आखाड्यात!

कसबा संगमेश्वर पंचायत समिती गणातून आपला “अपक्ष” उमेदवारी अर्ज दाखल केला!

   Follow us on        

रुपेश मनोहर कदम/सायले:

दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम ठरवलेल्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काही दिवसांपूर्वी आपले मतप्रदर्शन करणारे संदेश जिमन यांनी जनसेवा दृष्टीपथात ठेवून हा निर्णय गांभीर्याने घेतला आहे. आजवर कोणत्याही प्रसिद्धीसाठी, मोठेपणा मिळवण्यासाठी आपण रेल्वे संबंधित कामे केली नाहीत.तालुक्यातील जनतेच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले.

याच प्रयत्नातून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती, जामनगर, पोरबंदर, मडगाव या लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसला थांबा मिळाला आहे. रेल्वे प्रवास आता पहिल्या पेक्षा कितीतरी पटीने आरामदायी झाला आहे.

हे काम करीत असताना वेळोवेळी राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी घ्याव्या लागत होत्या.

त्यामुळे या क्षेत्रातील व्यक्तींशी जवळून संपर्कात आलो असे त्यांनी म्हटले. माझी जन सेवेची तळमळ बघून सगळेच भारावून गेले असल्याचे त्यांनी म्हटले पण जेव्हा भक्कम आधारावर जनसामान्यांच्या सेवा सुविधांसाठी झटायचा विचार मनात आला.

निष्ठावंत,जवळचे, स्नेह संबंधित व्यक्तींचा लळा मला कोणत्याही पक्षाकडून तिकीट मिळवण्यासाठी अडसर ठरला आणि म्हणून हा अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. कसबा पंचायत समिती गणातील दुर्गम भागातील गावांचा विचार आपण प्रामुख्याने करणार!

आजवर गृहीत धरलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करणार. आजही या भागातील जनतेला,शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एसटीचा प्रवास, जनसामान्यांच्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि हेळसांड,उपेक्षेचे दाखले देणारे रस्ते, जनतेच्या सुविधांसाठी असलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी झटणार! जनतेच्या खऱ्या गरजा ओळखून त्यांना परिपूर्ण करण्यासाठी वेळ देणार! असे वक्तव्य पोटतिडकीने संदेश जिमन यांनी केले आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले ज्या सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती संभाजीराजांचा श्वास खेळला, शौर्याचा लाव्हा उसळला त्या छत्रपतींचे कसबा संगमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणी केवळ आंतरराष्ट्रीय स्मारक झाले आणि धन्य झालो एवढ्यावर न थांबता पर्यटन आणि स्थानिकांना रोजगार मिळवा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय कसबा गणातील महिला, पुरुष, गरजू व्यक्ती, दिव्यांग , यांच्या मदतीसाठी कायम प्रयत्नशील रहाणार असल्याचे म्हटले.

एकंदरीत एक युवा, सुशिक्षित, समाजसेवेची नाळ जाणणारा व्यक्ती या राजकीय परिघात प्रवेश करतो आहे. सद्यस्थितीत राजकारण आणि शिक्षण यांचा संबंध जवळजवळ नावालाही नसावा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्लानीत असलेल्या मतदार बंधू भगिनींनी उमेदवार निवडून देताना विकास आणि विश्वासार्ह व्यक्तीमत्व यांची निवड केली तरच भविष्याचे चित्र बदलेल!

Facebook Comments Box

Kudal: पिंगुळी येथे दि.२९ जानेवारीला सद्गुरु समर्थ राऊळ महाराज यांच्या ४१ व्या पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

   Follow us on        

कुडाळ(प्रतिनिधी):
प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४१वा पुण्यतिथी उत्सव दि.२९ते ३१ जानेवारी २०२६ पासून सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, कुडाळ येथे सुरू होत असून या कालावधीमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संस्थानकडून करण्यात आले आहे. यावेळी विविध धार्मिक, सांस्कृतिक, कार्यक्रमासोबतच आरोग्य उपक्रम घेण्यात आला आहे.

 

कार्यक्रमाचा शुभारंभ प.पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांच्या ‘ वर्णावी ती थोरी”या लीलामातृचे सामुदायिक पारायणाने उत्सवाला सुरुवात करण्यात येणार आहे. तद्वतच राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. संदीप बुवा मांडके रामदासी पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांची आयोजित करण्यात आले आहेत. दरम्यान मुख्य कार्यक्रमाला शनिवारी दि.३१जानेवारी रोजी पहाटे ५.३० वाजल्यापासून प्रारंभ होऊन नित्य काकड आरती ,सकाळी ९ ते१० या वेळेत राऊळ महाराज समाधी मंदिरात अभिषेक व सार्वजनिक गाऱ्हाणे त्यानंतर प.पू.विनायक अण्णा महाराज पादुका पूजन १०.३० ते ११.३० हरिपाठ – जीवन विद्या मिशन सद्गुरू श्री वामनराव पै प्रणित उपासना व संगीत साधना ११.३० ते १२.३० नामस्मरण श्रीपत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् सद्गुरू श्री वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज नामस्मरण परिवार माणगाव दुपारी १२.३० ते १ समाधीस्थळी महाराजांची महाआरती त्यानंतर दुपारी १ते रात्री ११ अखंड महाप्रसाद तसेच यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध भागातून वारकरी भजन मंडळे आपली सेवा राऊळ महाराज चरणी सादर करतील. रात्रौ ८ते १० या वेळेत प.पू. राऊळनाथ नगरीतील नामवंत भजनी बुवांचे संयुक्त भजन होईल. ठिक ११ वाजता ‘लोकराजा ‘ सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेहरू यांचा महापौराणिक नाट्यप्रयोग ” ब्रम्हसंकेत सादर होईल.तरी समस्त राऊळ भाविकांनी सदर पुण्यतिथी उत्सवास मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. विठोबा विनायक (अण्णा) राऊळ सद्गुरू राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी यांनी केले आहे.

Facebook Comments Box

प्रवाशांना दिलासा! मुंबईहून मडगाव आणि नागपूरसाठी धावणार विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: प्रजासत्ताक दिनी सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करून मध्य रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते नागपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

​या गाड्यांचे आरक्षण २३ जानेवारी २०२६ पासून सुरू होणार आहे.

१. मुंबई – नागपूर – मुंबई विशेष (०२ सेवा)

​नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे.

​गाडी क्र. ०२१३९ विशेष: शनिवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी CSMT येथून मध्यरात्री ००.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५.३० वाजता नागपूरला पोहोचेल.

​गाडी क्र. ०२१४० विशेष: शनिवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी नागपूर येथून रात्री २०.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १३.३० वाजता CSMT मुंबईला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा:

दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा.

​गाडीची रचना (LHB कोचेस):

१ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, ६ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ९ शयनयान (Sleeper), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ जनरेटर/गार्ड व्हॅन.

​२. मुंबई – मडगाव – मुंबई विशेष (०२ सेवा)

​कोकण आणि गोव्याकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही विशेष गाडी उपयुक्त ठरेल.

​गाडी क्र. ०११२९ विशेष: रविवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून पहाटे ०१.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२.०० वाजता मडगावला पोहोचेल.

​गाडी क्र. ०११३० विशेष: रविवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी मडगाव येथून दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४.०५ वाजता LTT ला पोहोचेल.

​या स्थानकांवर असेल थांबा:

ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

​गाडीची रचना (ICF कोचेस):

१ वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, ३ वातानुकुलीत तृतीय श्रेणी, ८ शयनयान (Sleeper), ४ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ गार्ड ब्रेक व्हॅन.

​आरक्षण आणि तिकीट विक्री

​गाडी क्रमांक ०२१३९, ०२१४० आणि ०११२९ चे आरक्षण २३ जानेवारी २०२६ पासून सर्व संगणकीकृत केंद्रांवर आणि IRCTC च्या अधिकृत संकेतस्थळावर (www.irctc.co.in) उपलब्ध होईल.

​अनरक्षित डब्यांसाठी प्रवासी UTS मोबाइल ॲप किंवा तिकीट खिडकीवरून सामान्य दरात तिकीट घेऊ शकतील.

Facebook Comments Box

मोठी बातमी: २९ महापालिकांच्या महापौर पदांचे आरक्षण जाहीर; मुंबई, पुणे, नागपूरसह ‘या’ शहरांत महिला राज!

   Follow us on        

मुंबई: महापालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत अखेर आज जाहीर झाली आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत काढण्यात आली. या आरक्षणामुळे अनेक शहरांतील राजकीय समीकरणे बदलणार असून, दिग्गजांच्या नजरा आता आपल्या प्रभागातील गणितांकडे लागल्या आहेत.

राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदांसाठी ही सोडत काढण्यात आली. यामध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि खुला प्रवर्ग (Open) अशा विविध प्रवर्गांसाठी पदे आरक्षित करण्यात आली आहेत.

​प्रमुख शहरांतील आरक्षणाची स्थिती

​१. महिलांसाठी आरक्षित महापालिका (खुला प्रवर्ग):

राज्यातील सर्वात महत्त्वाची समजली जाणारी मुंबई महानगरपालिका यंदा महिलांसाठी आरक्षित झाली आहे. यासोबतच खालील शहरांतही महिला महापौर विराजमान होतील:

​मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, नांदेड, धुळे, मालेगाव आणि मीरा-भाईंदर.

​२. अनुसूचित जाती आणि जमाती (SC/ST):

​कल्याण-डोंबिवली: अनुसूचित जमाती (ST) – सर्वसाधारण.

​ठाणे: अनुसूचित जाती (SC) – सर्वसाधारण.

​जालना आणि लातूर: अनुसूचित जाती (SC) – महिला.

​३. इतर मागास प्रवर्ग (OBC):

​पनवेल, उल्हासनगर, कोल्हापूर, इचलकरंजी: ओबीसी – सर्वसाधारण.

​अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव: ओबीसी – महिला.

राजकीय हालचालींना वेग

​आरक्षण जाहीर झाल्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुकांच्या स्वप्नांवर पाणी फेरले आहे, तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत महिला आरक्षण आल्यामुळे राजकीय पक्षांना आता महिला उमेदवारांची चाचपणी करावी लागणार आहे.

​पुढील काही दिवसांत या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राजकीय मोर्चेबांधणीला वेग येईल, हे निश्चित.

महानगरपालिका नुसार आरक्षण यादी 

महापालिका आरक्षणाचा प्रवर्ग

  1. मुंबई सर्वसाधारण (महिला)
  2. पुणे सर्वसाधारण (महिला)
  3. नागपूर सर्वसाधारण (महिला)
  4. पिंपरी चिंचवड सर्वसाधारण (महिला / पुरुष)
  5. ठाणे अनुसूचित जाती (महिला / पुरुष)
  6. नाशिक सर्वसाधारण (महिला)
  7. कल्याण डोंबिवली अनुसूचित जमाती (महिला / पुरुष)
  8. छत्रपती संभाजीनगर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  9. वसई विरार सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  10. सोलापूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  11. नवी मुंबई सर्वसाधारण (महिला)
  12. मिरा भाईंदर सर्वसाधारण (महिला)
  13. अमरावती सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  14. पनवेल ओबीसी- (महिला / पुरुष)
  15. भिवंडी- निजामपूर सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  16. नांदेड- वाघाळा सर्वसाधारण (महिला)
  17. अकोला ओबीसी (महिला)
  18. मालेगाव सर्वसाधारण (महिला)
  19. कोल्हापूर ओबीसी- (महिला / पुरुष)
  20. सांगली- मिरज- कुपवाड सर्वसाधारण खुला
  21. जळगाव ओबीसी (महिला)
  22. धुळे सर्वसाधारण (महिला)
  23. उल्हासनगर ओबीसी- (महिला / पुरुष)
  24. लातूर अनुसूचित जाती (महिला)
  25. अहिल्यानगर ओबीसी (महिला)
  26. चंद्रपूर ओबीसी (महिला)
  27. परभणी सर्वसाधारण- (महिला / पुरुष)
  28. इचलकरंजी ओबीसी (महिला / पुरुष)
  29. जालना अनुसूचित जाती (एससी महिला)
Facebook Comments Box

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा मुद्दा ऐरणीवर

   Follow us on        

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांचे वारे वाहू लागले असतानाच, सिंधुदुर्गातील जागरूक मतदारांनी विकासाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या दहा वर्षांपासून रखडलेला मुद्दा ऐरणीवर आणला आहे. ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस’ पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच मत देणार, अशी ठाम भूमिका मतदारांनी खुल्या पत्राद्वारे जाहीर केली आहे.

केवळ रस्ते, वीज व पाणी यापुरते न थांबता जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा हा प्रकल्प तातडीने मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी होत आहे. मतदारांनी मांडलेल्या मुद्द्यांनुसार, टर्मिनस पूर्ण झाल्यास मुंबई–पुण्याहून थेट रेल्वे सेवा सुरू होऊन ‘वीकेंड टुरिझम’ला मोठी चालना मिळेल. शिरोडा, वेंगुर्ला, देवगड, मालवण यांसारख्या पर्यटनस्थळांवर पर्यटकांची संख्या वाढेल. एका खासगी सर्वेक्षणानुसार दररोज ५०० नवीन पर्यटक आले, तरी वर्षाला सुमारे ५४ कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकते. याशिवाय येथे प्रस्तावित ३९ कोटींच्या ‘रेल्वे बजेट हॉटेल’चे काम निधीअभावी रखडले असून तेही पूर्ण करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या दृष्टीनेही हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मतदारांचे म्हणणे आहे. सध्या देवगडचा हापूस आंबा व वेंगुर्ल्याचा काजू महागड्या ट्रकमार्गे वाशी मार्केटला पाठवावा लागतो. टर्मिनस सुरू झाल्यास रेल्वेमार्गे कमी खर्चात व कमी वेळेत मालवाहतूक शक्य होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढेल.

तरुणांसाठी स्थानिक रोजगारनिर्मितीचा मोठा स्रोत म्हणूनही टर्मिनसकडे पाहिले जात आहे. गाड्यांची सफाई, पाणी भरणे, देखभाल आदी कामांतून स्थानिकांना रोजगार मिळेल. ‘एक स्थानक, एक उत्पादन’ या योजनेमुळे महिला बचत गट व लाकडी खेळणी व्यवसायाला कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध होईल.

दरम्यान, टर्मिनससाठी आवश्यक असलेला अप्रोच रोड सुमारे ९० टक्के पूर्ण झाला असला, तरी पाण्याचा प्रश्न अद्याप लालफितीत अडकलेला आहे. तिलारी धरणातून पाणीपुरवठ्यासाठी ‘जल जीवन मिशन’अंतर्गत १५ कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे प्रलंबित आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास टर्मिनससह मळगाव, कुंभार्ली आणि ब्राह्मणपाट गावांचाही पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

गेल्या दहा वर्षांत केवळ भूमिपूजन झाल्या असून आता प्रत्यक्ष पूर्तता हवी, असा निर्वाणीचा इशारा मतदारांनी दिला आहे. जो उमेदवार आपल्या अधिकृत जाहीरनाम्यात ‘सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व रेलोटेल प्रकल्प’ पूर्ण करण्याचे स्पष्ट वचन देईल आणि निवडून आल्यानंतर त्याचा सातत्याने पाठपुरावा करेल, त्यालाच मत दिले जाईल, असा निर्धार या खुल्या पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

कोकणच्या स्वाभिमानाशी जोडलेला हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी आपल्या ‘व्हिजन’मध्ये याला अग्रक्रम द्यावा, अशी अपेक्षा सिंधुदुर्गातील मतदार व्यक्त करत आहेत.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search