सावंतवाडी-सावंतवाडी येथील अपूर्ण रेल्वेचे टर्मिनस मार्गी लागावे, येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळण्याबरोबरच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करावे आदी मागण्यांसाठी आज १५ ऑगस्ट रोजी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे पुकारण्यात आलेले घंटानाद आंदोलन शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार श्री दिपक भाई केसरकर यांचा आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित करण्यात आले.




रायगड – १७ वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि त्यातच पावसाळ्यात झालेली दुरावस्था याकडे सरकारचे लक्ष केंद्रित करण्याकरिता जनआक्रोश समितीने माणगाव येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू केले असून आधी हा महामार्ग पूर्ण करा नाहीतर कोकणात येणारा एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशाराच राज्य सरकारला कोकणवासियांनी दिला आहे.
माणगावमध्ये समितीच्या वतीने निषेध रॅली काढण्यात आली. यामध्ये माणगावसह कोकणातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर निघालेल्या रॅलीमध्ये सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत महामार्ग रोखून धरण्यात आल्याने काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांच्या यशस्वी मध्यस्थीनंतर महामार्गावरील आंदोलन स्थगित करत नियोजित जागेवरती आमरण उपोषण सुरू करण्यात आले.
हा महामार्ग केव्हा पूर्ण होईल याबाबत खुद्द मुख्यमंत्र्यांकडून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या महामार्गाच्या दुरावस्थेमुळे झालेल्या अपघातात जे मृत्यूमुखी पडले त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कसलेही आर्थिक सहाय्य केले जात नाही, अपघातात जखमी झालेल्यांना सहाय्य केले जात नाही याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कोकणातील नागरिकांची उपजीविका पर्यटनावरती अवलंबून आहे मात्र रस्ता खराब असल्याने पर्यटकांनी कोकणाकडे पाठ फिरवली आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असल्याने त्याची नुकसान भरपाई राज्य सरकारने करून द्यावी, यासह विविध चौदा मुख्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
संजय यादवराव, रुपेश दर्गे, अजय यादव, संजय जंगम,पराग लाड, सुरेंद्र पवार, प्रशिल लाड, आशिष बने, अनिल जोशी यांनी या आंदोलनाची हाक दिली असून त्यास मावळ प्रतिष्ठान, बजरंगदलसह अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. माणगावचे नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, रिक्षाचालक मालक संघटनेचे अध्यक्ष अण्णासाहेब साबळे, उद्योजक शेखर गोडबोले यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषणास उपस्थित राहून पाठींबा व्यक्त केला.
नवीन महामार्ग होऊ देणार नाही – यादवराव
गणेशोत्सव आणि शिमगा हे कोकणवासियांचे प्रमुख सण आहेत. या सणाला कोकणी माणूस यायला निघाला की सरकार सल्ला देते पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जा, अरे आम्ही आमच्या हक्काच्या रस्त्याने जायचे नाही तर किती वर्षे दुसर्यांच्या दारातून घरी जायचे हे यापुढे जमणार नाही, आधी आमचा रस्ता पूर्ण करा. जोपर्यंत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणासाठी घोषणा होत असलेल्यापैकी एकही नवीन महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा कोकण भूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी दिला.




Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे, अशी माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी एक्स खात्यावरून दिली.
महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) अंमलात आणली आहे. १ जुलैपासून ही योजना कार्यान्वित झाली असून आतापर्यंक १ कोटी ३५ लाख अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. तर, रक्षाबंधाच्या पार्श्वभूमीवर १७ ऑगस्ट रोजी हा निधी पात्र महिलांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे व उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी दिली होती. परंतु, त्या आधीच पात्र महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याची माहिती भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी दिली. पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्याचे काही स्क्रीनशॉटही त्यांनी शेअर केले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची रक्कम रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यांवर जमा होण्यास सुरुवात!!
राज्यभरात अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या योजनेत राज्यभरातून कोट्यावधी माता-भगिनींचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातून मान्यता प्राप्त अर्जदारांना थेट… pic.twitter.com/iTeaZpCH71
— Ranajagjitsinha Padmasinha Patil (@ranajagjitsinh1) August 14, 2024




सावंतवाडी: कोकण रेल्वे संदर्भात प्रलंबित प्रश्नांची नेहमी वाचा फोडणारी संघटना म्हणजेच कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी. या संघटनेने गेल्या वर्ष भरात अनेक प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडली त्यात सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे मुख्य..!
सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन होऊन ९ वर्षा पेक्षा अधिक काळ लोटला येथे प्रस्तावित रेलो-टेल देखील रखडले, त्यातच सावंतवाडी स्थानकातून कोरोना काळात तब्बल तीन रेल्वे गाड्यांचे थांबे हे रद्द करण्यात आले. या मुळे प्रवाशांची परवड होऊ लागली. या प्रवाशांचा आवाज प्रशासन आणि शासन या दोघांकडे पोहोचवण्यासाठी माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचा नातू मिहिर मठकर आणि त्याचे साथीदार व असंख्य टर्मिनस प्रेमी पुढे आले. सुरुवात झाली ती निवेदनाद्वारे, त्यानंतर माहितीचे अधिकार, त्यानंतर रेल्वे अधिकारी भेट, मंत्र्यांचा भेटी आदी घेण्यात आल्या. तरी यश मिळत नव्हतं.
२६ जानेवारी २०२४ रोजी संघटनेने सलग्न संघटनांचा सोबत मिळून हजारो लोकांचा उपस्थितीत लाक्षणिक उपोषण देखील केले होते. तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही.म्हणून प्रशासनाला जागे करण्यासाठी येत्या स्वातंत्र्य दिनी मोठ्ठा घंटानाद करण्यात येणार आहे. उद्या दिनांक १५ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर होणाऱ्या घंटानाद आंदोलनाला सर्व रेल्वे प्रवासी,टर्मिनस प्रेमी आणि कोकणवासियांनी उपस्थितीत राहण्याचे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.