Category Archives: सिंधुदुर्ग
Rain Alert :आज दिनांक 30 सप्टेंबर आणि उद्या दिनांक 01 ऑक्टोबर रोजी कोकणात जोरदार पावसाचा, तर उर्वरित राज्यात जोरदार वारे विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.मॉन्सूनची परतीची सीमा कायम असून, दोन ते तीन दिवसांत वायव्य भारताच्या आणखी काही भागातून मॉन्सून माघारी फिरण्याची शक्यता आहे. कर्नाटक किनारपट्टीच्या भागात वाऱ्यांचे पूर्व-पश्चिम जोडक्षेत्र कायम आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती टिकून आहे. बंगालचा उपसागरासह अरबी समुद्रात ढगांची दाटी झाली आहे.राज्यात जोरदार वारे, विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे.
आज आणि उद्यासाठी कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर या भागात अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट तर सातारा, रायगड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
कणकवली : तालुक्यातील वागदे येथील हॉटेल वक्रतुंड नजीक आज पहाटे एका टेम्पो रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात टेम्पो रिक्षाचालकाचा मृत्यू झाला आहे.
सदरचा टेम्पो फळे घेऊन कणकवलीहून ओरोसच्या दिशेने जात होता. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघाताचे कारण समजले नसले तरी टेम्पो उलटून हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. यामध्ये एका फळ व्यावसायिकाचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. त्या फळ व्यावसायिकाच्या मृत्यूची माहिती कळताच कणकवली शहरातील बहुसंख्य फळ व्यावसायिकांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.
वेंगुर्ले: गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील सर्वात मोठा सण. दिवाळी पेक्षाही मोठया उत्साहाने हा सण साजरा केला जातो. तसेच हा सण म्हणजे अनेक कलाकारांना आपली कला एक संधीच असते जणू. मूर्ती शिल्पकार, मखर कलाकार आणि भजनी गायक या संधीचा लाभ घेऊन आपल्या कला सादर करताना दिसतात. आरवली सोनसुरे येथील प्रसिद्ध कलाकार रविराज चिपकर यांनी या गणेशोत्सवात आपली कला सादर केली आहे. सागरतीर्थ समुद्र किनारी गणपतीला भावपुर्ण निरोप देताना रविराज चिपकर यांनी प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे साकारलेले वाळूशिल्प सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
आज संध्याकाळी भाविकांनी अकरा दिवसांच्या गणेश मूर्तींचे जड अंतःकरणाने करत आहेत. याच धर्तीवर प्रसिध्द वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी विसर्जनाला घेऊन जाणाऱ्या गणपतीचे वाळू शिल्प उभारले आहे आणि पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणीही केली आहे. हे शिल्प सर्वच भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
शहरातील धोकादायक झाडे त्वरित तोडण्यात यावीत अन्यथा…. माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांचा इशारा
सावंतवाडी :मंगळवारी रात्री सावंतवाडी शहरात झाड पडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. शहरात अशी बरीच धोकादायक झाडे आहेत. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी स्थानिक प्रशासनाने सावंतवाडी शहरासह परिसरातील रस्त्याच्या लगत जी धोकादायक झाडे आहेत, त्या झाडांच्या मालकांना सांगून ती आठ दिवसांत तोडावीत. अन्यथा शासनासह स्थानिक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा माजी शिक्षण व आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर यांनी दिला आहे.
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना त्यांनी आज एक निवेदन सादर केले. या निवेदनात तळवणेकर यांनी म्हटले आहे की, मंगळवारी जो आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी आणि रेस्ट हाऊस जवळ भर रस्त्यावर आलेली अनेक धोकादायक झाडे आहेत मात्र संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच मंगळवारी रात्री या दोन्ही दुर्दैवी युवकांनी काहीही चूक नसताना त्यांचा बळी गेला शहरातील सर्व धोकादायक झाडे येथे सात दिवसात तोडून घ्यावीत असे तळवणेकर यांनी म्हटले आहे.
मंगळवारी रात्री 11 वाजता सावंतवाडी शहरातील राजवाड्याच्या नजीक एक मोठे झाड पडून दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला होता.
मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.
पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.
नियमित चिपी विमानसेवा पाहणार्या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.
सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.
या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.
पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.