Category Archives: अपघात
मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.
पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
देवरुख : देवरुख आगाराच्या एका एसटी बसला येथील बोरसू येथे काल अपघात झाला. बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बस गाडी रस्त्याच्या बाजुच्या गटारात गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र देवरुख आगाराच्या एसटी बसेसच्या दुरावस्थेमूळे या बसेस मधुन प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
व्हायरल चित्रफिती मधील चालकाचा दावा खरा?
गेल्याच आठवडय़ात याच आगारातील चालक अमित आपटे याने आगारातील बसेसच्या दुरावस्थेविषयी एक विडिओ बनवून तो समाजमाध्यमातून व्हायरल केला होता. ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन त्याने या विडिओ मध्ये केले होते. मात्र आगार व्यवस्थापनाने या चालकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याला निलंबित करण्यात होते. या सर्व प्रकारामुळे देवरुख आगार वादात सापडले होते. देवरुखमधील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली होती.
तर मोठा अपघात झाला असता…
या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर घाट रस्त्यावर असा प्रकार घडला असता तर बस कित्येक फुटावरून दरीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असती. या प्रकरणी एसटी महामंडळाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
लडाख : लेहमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. भारतीय सैन्याच्या एका ट्रकचा भीषण अपघात झालाय. या ट्रकमध्ये 2 ज्युनियर कमिशन ऑफिसर आणि 7 जवान होते. क्यारी शहरापासून 7 किमी अंतरावर अपघाताची दुर्घटना घडली. भारतीय सैन्याचं ट्रक थेट दरीत कोसळलं. या दुर्घटनेत गाडीतील सर्व 9 जवानांचा मृत्यू झाला. हे सर्व जवान कारु गॅरीसन येथून लेहच्या क्यारी शहाराच्या दिशेला जात होते. यादरम्यान ही दुर्घटना घडली.
भारतीय सैन्याची एक रुग्णवाहिका आणि आणखी काही वाहनं क्यारी शहाराच्या दिशेला जात होती. या दरम्यान एका ट्रकचा भीषण अपघात झाला. ट्रक थेट दरीत कोसळला. या अपघातात ट्रकमधील सर्व 9 जवान शहीद झाले. एकूण 34 जवान क्यारी शहराच्या दिशेला जात होती. त्यापैकी 9 जणांचा दुर्देवी अपघातात मृत्यू झालाय.
भारतीय सैन्याचा ताफा लेहच्या न्योमा येथून क्यारीच्या दिशेला जात होता. या दरम्यान घाटात संध्याकाळी पावणे सहा ते सहा वाजेच्या दरम्यान अपघाताची घटना घडली. सैन्याच्या ताफ्यातील एक ट्रक थेट दरीत कोसळलं. या ट्रकमध्ये 10 जण होते. त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झालाय.
रत्नागिरी, दि. ०८ : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड-आंबडवे रस्त्यावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास सावरे फाटा ते घोसाळे फाटा यादरम्यान आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे मात्र वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर आंबडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात एसटी बस पलटी झाली आहे. मंडणगड-आंबडवे या रस्त्याचे अपूर्ण कामामुळे येथे अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

रत्नागिरी: हातखंबा येथे डंपरने ट्रकला धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे .हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर शुक्रवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मागून येणाऱ्या डंपरने पुढे असणाऱ्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
निवळीहुन हातखंब्याच्या दिशेने दोन्ही वाहने मार्गक्रमण करीत असताना ईश्वर धांब्यासमोर ट्रक (गाडी क्रमांक MH 14 BJ 4731) आला असता मागून येणारा डंपरने (क्रमांक-MH10CR-8970) धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या डंपर चालक गणेश दिलीप मयेकर (वय 36 राहणार- पोमेंडी रत्नागिरी) हा स्वतः जखमी झाला. डंपरमधील जखमी चालकाला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Mumbai Goa Highway Accident :मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात काल गुरुवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक कोसळून भीषण अपघात झाला.
महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले होते. त्यातील एका ट्रकमध्ये तीन लोक अडकले होते. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माशांचे जाळे घेऊन जाणारा एक आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात हा अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने मागून धडक दिल्याने ही दोन्ही वाहने दरीत कोसळली. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस ग्रामस्थ आणि खेड येथील मदत ग्रुपचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा हे रेस्क्यू ऑपरेशन संपले. येथील एका जखमीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. खेडचे पोलीस निरीक्षक भोयर आणि सहाय्यक निरीक्षक चव्हाण हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
ठाणे : गर्डर मशिन कोसळल्याने समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी आहेत.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून जवळपास 10 ते 15 जण तिथं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे येत असल्याचीही माहिती आहे.
हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, त्याबाबतची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मालेगाव येथून अपघात स्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.