Category Archives: पर्यटन
सिंधुदुर्ग : या महिन्यात मालवणला भेट देणार्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या अग्रस्थानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. समुद्र किनारा ते किल्ला वाहतुक होडी सेवा उद्यापासून चालू होणार आहे.
पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.
सिंधुदुर्ग : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात
या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.





आंबोली | पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनातर्फे १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत ‘आंबोली वर्षा महोत्सव’ आयोजित केला आहे.
या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा आमदार वैभव नाईक, विधानसभा आमदार नितेश राणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे आणि अनिकेत तटकरे तसेच आंबोली गावचे सरपंच सौ. सावित्री संतोष पालकर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य पर्यटन प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी, राज्याचे पर्यटन संचालनालय संचालक डॉ. बी. एन. पाटील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.
पाच दिवसांच्या या वर्षा महोत्सवाची सुरुवात आंबोली येथे १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता स्थानिक ढोलताशा, गणेशवंदनाच्या माध्यमातून होईल. साहसी क्रीडा प्रकार, झिप लाईन सफर, दशावतार, नाईट सफर, १३ ऑगस्टला जलक्रीडा प्रकार, जेटस्की, स्पीड बोट, बनाना बम्पर राईड, हिरण्यकेशी ट्रेकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फुगडी, जंगल सफर, १४ ला रॅपलींग जैवविविधता माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम ”चांगभलं”, जंगल सफर, १५ ला सैनिक स्कूल मुलांच्या कवायती, शहीद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकथी, जंगल सफर, १६ ला महादेव गड ट्रेकिंग, आंबोली सफर आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्याने जिल्ह्यातील बारमाही पर्यटनासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे पर्यटन महासंघाने स्वागत केले असून, अशा महोत्सवांमुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होईल, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.
Press on pdf to enlarge/turn page. 👇🏻
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/Festival-Amboli.pdf” title=”Festival Amboli”]Download file 👇🏻


रत्नागिरी : लांजा तालुक्यातील खोरनिनको धरण धबधब्यावरील पर्यटनास दोन महिने बंदी घालण्याचे आदेश तहसिलदार प्रमोद कदम यांनी दिले आहेत. मुचकुंदी धरण खोरनिनको हे पावसाळ्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला आले आहे. असंख्य पर्यटक पावसाळ्याच्या कालावधीत धरणावर आंघोळीसाठी येत असतात. पावसाचा जोर वाढल्याने धरणाचा मानवनिर्मित सांडवा वेगाने वाहू लागला आहे. या ठिकाणी जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असून अतिवृष्टीमुळे धबधब्याच्या ठिकाणी जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
खोरनिनको सोबत सवतकडा आणि प्रभानवल्ली या ठिकाणच्या धबधब्यावरसुद्धा प्रशासनाने बंदी घातली असल्याने असंख्य हौशी पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.


चिपळूण :मान्सूनचे आगमन झाले असून, गेले काही दिवस कोकणात सर्वत्र मुसळधार वृष्टी होत आहे. त्यामुळे नद्या, ओहोळ भरले असून, काही धबधबेही प्रवाहित झाले आहे. मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूण पेढे येथे महामार्ग लगतच असणारा ‘सवतसडा धबधबाही’ प्रवाहित झाल्याने या मार्गावरून प्रवास करणारे प्रवासी या धबधब्याचा आनंद घेताना दिसत आहेत.मुंबई, पुणेसह स्थानिक नागरिक या धबधब्याखाली भिजण्यासाठी आनंद घेण्यासाठी येत आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचीही येथे गर्दी पाहायला मिळत आहे. उंच कड्यावरून कोसळणारा हा धबधबा दरवर्षी सर्वांनाच आकर्षित करत असतो. हा धबधबा सुरक्षित मानला जातो. विशेष म्हणजे, हा धबधबा महामार्गाला लागून असल्याने या ठिकाणी दररोज हजारो लोक भेट देत आहेत.
मुंबई-गोवा हायवेवरील चिपळूण हे शहर मुंबईपासून २४७ किमी अंतरावर आहे. या शहरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला निसर्गरम्य असा परशुराम घाट लागतो.

या घाटामध्येच कोकणच्या निर्मात्या श्री परशुरामाचं पुरातन मंदिर आहे. इथून आपण चिपळूणच्या दिशेने जात असताना, मुंबई गोवा महामार्गावर उजव्या हाताला, चिपळूणपासून ५ किमी आधी आपणास एक प्रचंड जलप्रपात लांबूनच दिसून येतो. धबधब्याचा आवाज ऐकू येतो.
धबधब्याच्या पायथ्याची जाण्यासाठी येथील स्थानिक प्रशासनाकडून सिमेंटची पायवाट आणि रेलिंग बांधण्यात आली आहे. त्यामुळे अगदी धबधब्याच्या जवळ जावून पर्यटकांना त्याचा मनमुराद आनंद घेता येतो. हायवेच्या अगदी कडेस असल्याने आबालवृद्धदेखील याला भेट देऊ शकतात. ज्यांना धबधब्यात जाण्याची भीती वाटते ते जवळ उभे राहून वरून पडणाऱ्या पाण्याचा तूषारांनी चिंब भिजू शकतात.
सावंतवाडी : पावसाळी पर्यटनासाठी नावाजलेल्या तळकोकणातील आंबोली येथील प्रसिद्ध धबधब्याला भेट देण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क घेण्याच्या निर्णयास स्थगिती देण्यात आली आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ही शुल्क आकारणी स्थगित केली जावी असे आदेश दिले आहेत. सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे.
आठवडाभरा पूर्वी धबधबा पाहण्यासाठी 14 वर्षावरील पर्यटकांना 20 रुपये तर 14 वर्षाखालील मुलांना 10 रुपये असे तिकीट दर आकारण्यात येणार आहेत असे एस. नवकिशोर रेड्डी यांनी जाहीर केले होते. मात्र दीपक केसरकर यांनी दिलेल्या आदेशानुसार या निर्णयाला स्थगिती दिली गेली आहे.





