कुडाळ : कुडाळ मार्गाने चौके परिसरात येणाऱ्या डंपर चालकाने काळसे होबळीचा माळ येथे काल गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता पादचारी महिलांना भीषण धडक दिली.या अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर- काळसे- बौध्दवाडी येथील महिला डंपर अंगावरुन गेल्याने जागीच मृत्यूमुखी पडली तर इतर चार महिलांपैकी दोघींना गंभीर दुखापत झाली आहे.तर दोघी जखमी झाल्या आहेत.
याबाबत सविस्तर बातमी – गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास कुडाळवरुन चौकेच्या दिशेने येणारा डंपर MH 46 -F0827 या डंपर चालकाने काळसे होबळीचामाळ येथे कामावरुन घरी परतत असणाऱ्या काळसे बौद्धवाडीतील पाच महिलाना मागून धडक दिली या अपघातात रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (६५) या महीलेच्या अंगावरुन डंपर गेल्याने जागीच गतप्राण झाली.तर समिक्षा सुभाष काळसेकर,रुक्मिणी विठोबा काळसेकर,अनिता चंद्रकांत काळसेकर,प्रद्ज्ञा दिपक काळसेकर यांना गंभीर दुखावत झाली.अपघातची माहिती मिळताच काळसे पोलीस पाटिल प्रभू यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी महिलाना रुग्णवाहिनेने जिल्हा रुग्णालयात नेले. चौकशीअंती डंपरचालक दारूच्या नशेत असल्याचे समोर आले आहे.
मालवण पोलिस निरीक्षक श्री विजय यादव, उपनिरीक्षक श्री.झांजृर्णे यांच्या सह कट्टा-मालवण येथील पोलीसपथक घटनास्थळी दाखल झाले. डंपर चालकास त्यांनी ताब्यात घेतले आहे. .
Konkan Railway News: कोकण रेल्वेचे १००% विद्युतीकरण करण्याचा निर्धार केला गेला आहे. याआधी बहुतेक गाड्यांचे विद्युतीकरण करण्यात आलेले आहे. त्याचाच भाग म्हणून दिवा सावंतवाडी या गाडीसह एकूण १२ गाड्या विद्युत इंजिनासह चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील गाड्या विद्युत इंजिनासह चालविण्यात येणार आहेत.
रत्नागिरी : प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने नव्याने बस घेण्याचा निर्णय घेतला होता. जुन्या गाड्यांचे प्रदूषण होत असल्यामुळे नव्याने बीएस ६ प्रणालीच्या बस आणण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात बीएस ६ च्या नव्या कोऱ्या २१ आरायमदायी लाल बस दाखल झाल्या आहेत. एकूण ५० गाड्या रत्नागिरी विभागासाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ गाड्या दाखल झाल्या असून उर्वरित गाड्या लवकरच येणार असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.
बसमध्ये दर्जेदार सुविधा
नव्याने दाखल झालेल्या गाड्यांमुळे एसटी विभागाकडे पुन्हा प्रवासी आकर्षित होण्याची आशा व्यक्त होत आहे. या बसमध्ये दर्जेदार सुविधा असणार आहेत. ४४ आसनांची आणि दोन बाय दोन आसन रचना, स्वयंचलित दरवाजा, पुढच्या मागच्या बाजूला डिजिटल मार्गदर्शक फलक, मोबाईल चार्जिंग, मागे आपत्कालीन दरवाजा अशा सुविधा असणार आहेत.
देखभालीसाठी खासगी कंत्राटदार
रत्नागिरी विभागाला देण्यात आलेल्या या सर्व बस कंत्राटी पद्धतीने चालणार आहेत.बसचा देखभाल खर्च खासगी कंत्राटदार करणार आहे. त्या बदल्यात एस. टी विभागाकडून काही रक्कम देण्याचा करार करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग : श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रेच्या प्रथम पूजेसाठी यावर्षी प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहण्याचे आश्वासित केल्यामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायत कुणकेश्वर आणि प्रशासनाच्या समन्वयाने नियोजन सुरू असल्याची माहिती श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लब्दे यांनी प्रसारमाध्यमांना दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील कुणकेश्वर मंदिर हे दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध आहे.
कुणकेश्वर यात्रा यंदा १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. यानिमित्ताने देवस्थानच्यावतीने पत्रकारांना माहिती देण्यात आली. यावेळी श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष लब्दे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी, अभय पेडणेकर यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते.
कुणकेश्वर मंदिर हे पांडवकालीन पुरातन मंदिर असून याठिकाणी स्वयंभू पिंड आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्वर येथे 107 शिवलिंगे आहेत. त्यामुळे कुणकेश्वरला कोकणची काशी असे संबोधले जाते. श्री देव कुणकेश्वराचे स्थान इ.स. अकराव्या शतकापूर्वीच प्रसिद्धीस आले होते. जवळजवळ 350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज प्रत्यक्ष कुणकेश्वर मंदिरातही येऊन गेल्याचा आख्यायिका आहे.
रत्नागिरी – रत्नागिरीच्या समुद्रामध्ये तेलाच्या साठ्यांचा (Oil Reserves) शोध घेण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार असून यासंदर्भातील कामही सुरु झालं आहे. स्थानिक मच्छीमारांसाठी जारी करण्यात आलेल्या एका पत्राद्वारे सावधानतेच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यापासून 40 नॉटिकल मैलांवर ओएनजीसी कंपनीमार्फत तेलाचे साठे शोधण्यासाठी भूकंपीय सर्वेक्षण (सिझमिक सर्व्हे) करण्यात येत आहे. याच सर्वेक्षणासाठी एक मोठे जहाज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जयगड ते रायगड दरम्यानच्या समुद्रामध्ये फिरणार आहे. हा सर्व्हे सुरू असताना दुर्घटना टाळण्यासाठी मच्छीमारांना विशेष सल्ला देण्यात आला आहे. मासेमारी करण्यासाठी जाताना सुरक्षा बाळगावी किंवा जहाजाच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन मत्स्य विभागाकडून केले आहे. याबाबतचे पत्र जिल्ह्यातील सर्व मच्छीमार सोसायट्यांना पाठवण्यात आले आहे.
हा सर्व्हे समुद्रात ज्या ठिकाणी होणार आहे, त्या ठिकाणाचा नकाशा तसेच अक्षांश व रेखांशची माहितीही मच्छीमारांना कळवण्यात आली आहे. ओएनजीसी कंपनीमार्फत समुद्रात फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत तेल संशोधन करण्यात येत आहे. त्यासाठी भूकंप संशोधन जहाज जयगड ते रायगडपासून 40 नॉटिकल मैलांवर दाखल झाले आहे. हे सर्वेक्षण क्षेत्र किनाऱ्यापासून लांब असून, दाभोळपासून खोल समुद्रात 75 किमी अंतरावर आहे.
जहाजावरील विविध यंत्रणांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे जहाज 4 ते 4.5 नॉट्स वेगाने 24 तास सतत समुद्रात सक्रीय राहणार आहे. या जहाजाच्या मागे 6 हजार मीटर लांबीच्या (6 किलोमीटर) 10 केबल्स लावण्यात आल्या आहेत. स्ट्रीमर्सची खोली 6 मीटर आणि शेपटीच्या दिशेने 30 मीटरपर्यंत असेल. हा भाग पाण्याखाली असेल असं सांगण्यात आलं आहे. प्रत्येक 6 हजार मीटर लांबीच्या केबलच्या शेवटी फ्लॅशिंग लाइटसह एक टेल-बॉय असेल. ही बोट न थांबता चालवण्यात येणार असून, ती लगेच वळवता येत नाही. अपघात टाळण्यासाठी मच्छीमारांनी नौका व जाळी भूकंपीय जहाज आणि बाहेरील उपकरणाच्या मार्गापासून दूर राहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
या मोठ्या जहाजाबरोबर दुसरे एक छोटे जहाज (सॅन्को स्काय) आणि 3 सुरक्षा व्हेसल्स (मॅट युरेनस, एनाक्षी, सोहा) या परिसरात तैनात करण्यात येणार आहेत. सर्वेक्षण करत असताना समुद्रात मासेमारी नौकांच्या हालचालींचं प्रत्येकी दोन समन्वयक आणि दुभाष्यांद्वारे 24 तास निरीक्षण केले जाणार आहे. हे सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन कंपनी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मासेमारीसाठी जात असताना मच्छीमारांनी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. हा सर्व्हे जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्याचा कंपनीचा तसेच स्थानिक प्रशासनाचा प्रयत्न आहे.
ओएनजीसी कंपनीकडून समुद्रात सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यासाठी जहाज दाखल होत आहे. सर्वेक्षण करत असताना मच्छीमारांनी काळजी घेणे गरजेचे आहे. या संदर्भात मच्छीमार सोसायटींना पत्र पाठवण्यात आले आहे, असं सहायक मत्स्य आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी म्हटलं आहे.
सिंधुदुर्ग : आंबोली येथील सुशांत खिल्लारे खूनप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी आणखीन ५ संशयितांना अटक केली असून विशेष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.जे. भारुका यांनी दि.१३ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. याकामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले.
नव्याने अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीत आबासो उर्फ अभय बाबासो पाटील (वय-३८ रा. वाळवा, सांगली),प्रवीण विजय बळीवंत (वय-२४, रा. वाळवा, सांगली),स्वानंद भारत पाटील (वय-३१, रा.इस्लामपूर, सांगली),राहुल बाळासाहेब पाटील(वय- ३१, रा.वाळवा,सांगली), राहुल कमलाकर माने( वय-२३,रा.कराड,सातारा) यांचा समावेश आहे.
वीटभट्टी व्यवसायासाठी कामगार पुरविणार असल्याचे सांगून सुशांत खिल्लारे याने भाऊसो माने याच्याकडून साडेतीन लाख रुपये घेतले होते.मात्र,त्याने कामगार पुरवले नव्हते.तसेच घेतलेले पैसे देण्यास ही तो टाळाटाळ करीत होता.याचा राग येऊन सुशांत याला पंढरपूर येथून पुढे कराड येथे आणून भाउसो माने व तुषार पवार यांनी मारहाण केली होती.यात सुशांत याचा मृत्यू झाला होता.त्यानंतर मृतदेह आंबोली येथे दरीत टाकताना भाऊसो याचा तोल गेल्याने सुशांत यांच्या मृतदेहाबरोबर तोही दरीत कोसळला होता.त्यात त्याचाही मृत्यू झाला होता.
Konkan Railway News: नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय रेल्वेला २.४ लाख कोटी रुपयांची भरीव तरतूद केली गेली आहे. पण नेहमीप्रमाणे कोकणरेल्वेसाठी या अर्थसंकल्पामध्ये काहीच तरतूद केली गेली नाही आहे; त्यामुळे कोकणरेल्वेची भारतीय रेल्वेत विलीनीकरणाची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. कोकणरेल्वे महामंडळ ही भारतीय रेल्वेच्या अखत्यारीत येणारी स्वायत्त आस्थापना आहे. कोकणात रेल्वेमार्ग बांधण्यासाठी कोकणरेल्वे महामंडळाची स्थापना जुलै १९९०मध्ये झाली. त्यानंतर आतापर्यंत बाजारपेठेतील वाटय़ावर कोकण रेल्वे महामंडळाला अवलंबून राहावे लागत आहे. याआधी भारतीय रेल्वेने कोकण रेल्वेला मदत करावी, यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न झाले होते. मात्र सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना झालेली ६०० कोटीची तरतूद वगळता मागील ३३ वर्षात अर्थसंकल्पात कोंकण रेल्वेच्या वाट्याला काहीच आले नाही.
कोकणरेल्वे कॉर्पोरेशन KRCL ही रेल्वे एक रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तसेच ती एक वाणिज्य आस्थापना Corporate Entity आहे त्यामुळे नफ्यावर तिचा जास्त भर आहे. तसेच ही कंपनी मालवाहतुकीवर जास्त भर देताना दिसते; त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर दुर्लक्ष होताना दिसत आहे. असे मत उत्तर कन्नड रेल्वे सेवा समिती चे सचिव राजीव गावकर यांनी मांडले आहे. त्यांचे हे वक्तव्य वास्तवाला धरून आहे. कारण कोकण रेल्वमार्गासारखा आवाहनात्मक मार्ग ,रो- रो सारखी नवी संकल्पना, जम्मूचा नवा रेल्वेमार्ग हे या कंपनीने यशस्वी केले मात्र प्रवासी वाहतुकीच्या अनेक समस्या अजूनपर्यंत या मार्गावर कमी झाल्या नाही आहेत.
कोकणरेल्वे मार्ग आणि मध्यरेल्वे मार्ग जोडणारा विजयदुर्ग- वैभववाडी-कोल्हापूर हा प्रस्तावित मार्ग निधीअभावी रखडला आहे. वाढता प्रतिसाद पाहता कोकण मार्गाचे दुपदरीकरण आवश्यक आहे. या मार्गावर प्रवासी गाड्यांची संख्या आवशक्यतेपेक्षा खूपच कमी आहे. अनेक स्थानकावरील प्रश्न सुटले नाही आहेत. कोकणरेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण झाल्यास गोवा व कर्नाटक रेल्वेच्या साऊथ झोनमध्ये, तर सिंधुदुर्ग,रत्नागिरी-रायगड सेंट्रल झोनमध्ये जाईल. अशा वेळी कोकण रेल्वेचा चेहरामोहरा बदलून जाईल, कारण त्यामुळे अर्थसंकल्पात या मार्गाला वाटा भेटेल आणि आणि प्रवासी वाहतुकीच्या बऱ्याच समस्या दूर होतील असे तज्ञांचे मत आहे.
मुंबई :दक्षिण कोकणाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुणकेश्वर दिनांक १८ फेब्रुवारीला होणाऱ्या प्रसिद्ध जत्रेसाठी एसटी महामंडळाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
दिनांक १७ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथून संध्याकाळी ६ वाजता एक विशेष बस सुटणार आहे. ही गाईड सायन – पनवेल मार्गे चालवण्यात येणार आहे. तसेच कल्याण-विठ्ठलवाडी येथून त्याच दिवशी ६.३० ला एक गाडी या जत्रेसाठी सोडण्यात येणार आहे.
दरवर्षी कुणकेश्वरला महाशिवरात्रीच्या निमित्ताने तीन दिवसांची यात्रा भरते. या यात्रेच्या निमित्ताने देऊळ्परिसरात मोठी जत्राही भरते. कलिंगडांचा बाजार आणि मालवणी खाजे हे या जत्रेचे खास वैशिष्ट्य आहे. या यात्रेला येणाऱ्या सर्व देवस्वाऱ्या काही अपवाद वगळता अजूनही आपल्या गावरयतेसहित पायी चालत येतात. कुणकेश्वर भेटीसाठी १२ किमी. अंतरावरून येत असलेल्या जामसंडेच्या दिर्बा-रामेश्वरसाठी तारांमुंबरी खाडीवर नौकासेतू बांधला जातो. दर २४ वर्षॉंनी कुणकेश्वरच्या भेटीला येणाऱ्या कोटकामते गावच्या भगवती मातेला त्या गावचे ग्रामस्थ उत्साहात वाजतगाजत कुणकेश्वर क्षेत्री आणतात. १६ किलोमीटरवरून येणाऱ्या मुणगे गावची भगवती माता वाटेत विश्रांती न घेता पायी चालत येऊन कुणकेश्वरची भेट घेते. ५० किलोमीटरवरून येणारा मसुरे गावचा श्री भरतेश्वर पायी चालत गावरयतेसहित कुणकेश्वरच्या भेटीला येतो. तसेच किंजवडे-स्थानेश्वर, दाभोळे-पावणाई, टेंबवली-कवळाई, असे अनेक देव त्याच्या त्याच्या रयतेसह कुणकेश्वरची पायी वारी म्हणजेच यात्रा करतात.
मुंबई :मागील सुनावणी दरम्यान मुंबई-गोवा महामार्गाचे काम डिसेंबर २०२३ रोजी पूर्ण होणार असे राज्य सरकारद्वारे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. पण आताच झालेल्या सुनावणीत ही तारीख पुढे ढकलली आहे. ह्या महामार्गावरील अखेरचा टप्पा १८ फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही देण्यात आलेली आहे.
मुंबई-गोवा महार्गावरील अरवली – कंटे – वाकड ह्या पट्ट्यातील साडेनऊ किलोमीटर महामार्गाचे बांधकाम बाकी असून ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती मुख्य सरकारी वकील पी. ए. काकडे यांनी प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला व न्यायाधीश संदीप मारणे यांच्या खंडपीठाला दिली आहे.
महामार्गाच्या कामाची सध्याची स्थिती पुढीलप्रमाणे आहे.
चिपळूण:मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या महामार्गावरील चिपळूण येथील परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम चालू असल्याने या भागात रस्त्यावर दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे येथून जात असताना आपले वाहन सावकाश चालवण्यात यावे.
आज सकाळी या भागात काम चालू असताना रस्त्यावर दरड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतुक काही वेळासाठी ठप्प झाली होती. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन रस्त्यावर नसल्याने अनर्थ घडला नाही. कंत्राटदार कंपनीने जेसीबी च्या सहाय्याने ही दरड बाजूला करून वाहतुक पूर्वस्थितीत आणून दिली होती. मात्र असे प्रकार वारंवार घडत असल्याने या मार्गावरून जाणार्या प्रवाशांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागे दोन वेळा रस्त्यावर भले मोठे दगड पेढे वस्तीत आणि रस्त्यावर आले होते. सुदैवाने अजूनपर्यंत काही जिवितहानी झाली नाही आहे. पण या सर्व प्रकारांतून कंत्राटदार कंपनी कामांदरम्यान योग्य त्या सुरक्षिततेचे मापदंड पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.