Category Archives: कोकण




सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची बैठक दिनांक १४/१२/२०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे पार पडली.बैठकीत सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या अपूर्ण कामासंदर्भात सखोल चिंतन केले गेले. संघटनेने आतापर्यंत घेतलेल्या मोहिमा त्यात मेल मोहीम, राष्ट्रपतींना पत्र मोहीम आदींचा आढावा घेण्यात आला त्याच बरोबर काही महत्त्वाचे ठराव या बैठकीत पारित केले गेले. त्यात प्रामुख्याने कोकण रेल्वे महामंडळाचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग हा मध्य रेल्वेला हस्तांतरित करावा असा एकमुखी ठराव घेण्यात आला, त्यानंतर सावंतवाडी येथील अपूर्ण टर्मिनस साठी जर कोकण रेल्वे महामंडळ आणि राज्य शासन निधीची तरतूद करण्यास असमर्थ असल्यास हे अपूर्ण काम केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेतून करावा त्यासाठी येथील खासदार आणि आमदारांनी योग्य तो पाठपुरावा करावा त्यासाठी संघटनेकडून त्याबद्दल संबंधित लोकप्रतिनिधींना सखोल,अभ्यासपूर्ण निवेदन देण्या संदर्भात चर्चा झाली, सावंतवाडी स्थानकात मंगलोर एक्स्प्रेस, राजधानी एक्स्प्रेस, नागपूर – मडगाव एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस आदी गाड्यांना येत्या १५ दिवसात थांबा मिळावा, तसेच आजच्या घडीला कोल्हापूर – संकेश्वर – बेळगाव असा रेल्वे मार्गासाठी सर्वे सुरू आहे, काही महिन्यात त्या रेल्वे मार्गाचे काम देखील सुरू होईल त्यामुळे सावंतवाडी ते संकेश्र्वर असा रेल्वे मार्ग होण्यासाठी योग्य तो प्रयत्न करावा जेणे करून कोकणातून बेळगाव आणि कोल्हापूर या दोन्ही ठिकाणी कनेक्टिव्हिटी मिळेल,
आदी ठराव घेण्यात आले. या मागण्या येत्या ३० दिवसात पूर्ण नाही झाल्या तर २६ जानेवारी २०२५ ला रेल रोको करण्यात येईल असे एकमुखी ठरवण्यात आले. त्याच बरोबर गाडी क्रमांक ०११५१/५२ मुंबई – करमळी विशेष गाडीचा सावंतवाडी थांब्यासाठी प्रयत्न करणारे आमदार श्री नितेश राणे आणि कोकण रेल्वेचे क्षेत्रीय प्रबंधक श्री शैलेश बापट यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनस संदर्भात मेल मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे सचिव मिहिर मठकर यांनी यावेळी सांगितले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, संघटनेचे मुंबई अध्यक्ष श्री विनोद नाईक, सौ सायली दुभाषी, नंदू तारी,सुभाष शिरसाट , तेजस पोयेकर,स्वप्नील नाईक, रामकृष्ण मुंज, विहंग, भूषण, सागर आदी संघटनेचे पदाधिकारी आणि प्रवासी जनता उपस्थित होते.




नागपुर:महाराष्ट्रातील नवनिर्वाचित सत्ताधारी महायुतीच्या आमदारांचा शपथविधी सोहळा आजच पार पाडला. अपेक्षेप्रमाणे कणकवली मतदारसंघातील भाजपचे आमदार यांनी पहिल्यांदाच मंत्रिपदाची शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक पोस्ट ‘एक्स’ माध्यमावर पोस्ट केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की देव काही काळ परीक्षा घेतो पण नंतर जो प्रमाणिक आहे त्याच्या सोबत उभा राहतो आणि जो कपटी असतो त्याला काही काळ यश मिळते पण नंतर त्याचा बंदोबस्त होतो. उद्धव ठाकरे तुम्ही कुणासोबत चांगले वागलात नाहीत म्हणून तुमच्यावर ही परिस्थिती आली.
राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा…
आता तरी कुणासोबत कपटीपणाने वागू नका, तुम्हाला ही मी शुभेच्छा देतो कारणं पडत्या काळात समोरच्याला कमी लेखायचे नसते. तुमच्या मुलांनाही अक्कल द्या जर त्यांची घमेंड उतरली असेल तर, नाहीतर तुमच अजून कठिन होईल.
जय महाराष्ट्र!
श्री. उद्धव ठाकरे,
तुम्हाला सांगायला आनंद होतोय, तीन राणे तीन सभागृहात पोहोचले आहेत. एक खासदार, एक मंत्री आणि एक आमदार. तुम्ही २००५ पासून राणे कुटुंबाला संपविण्याचे टोकाचे प्रयत्न केले, काही काळ तुम्हाला यश मिळालं पण आज नितेशला मंत्रीपदाची शपथ घेताना बघितल्यावर एक जाणीव झाली की… pic.twitter.com/xUVE216rlu
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) December 15, 2024




Konkan Railway Updates:एकीकडे कोकणरेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यांच्या डब्यांत वाढ करण्यात यावी अशी मागणी होत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्यांचे सध्या असलेले डबे कमी करताना दिसत आहे. कोकण रेल्वे प्रशासनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून डबे कमी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तपशील खालीलप्रमाणे
१) ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी १ डबा कमी करण्यात आला आहे.
सध्याची संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०२, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१
सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१
दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
२) २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी १ डबा कमी करण्यात आला आहे.
सध्याची संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०२
सुधारित संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०१ ,एसएलआर – ०१
दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.




Konkan Railway: मध्य रेल्वेतर्फे कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या हिवाळी विशेष गाड्यांचे थांबे पाहून महाराष्ट्रात थांबे देताना हात आखडता घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. नाताळ आणि नववर्ष गोव्याची मक्तेदारी असली तरीही त्या काळात महाराष्ट्रातही पर्यटकांचे प्रमाण वाढते. तसेच शालेय सुट्ट्यांमुळे स्थानिक नागरिकही आपापल्या मूळ गावी जाण्याच्या प्रयत्नात असतात. तळकोकणात जत्रांचा हंगामही सुरू होत असल्याने चाकरमानी गावी जात असतात. सर्व नियमित गाड्यांचे आरक्षण याआधीच भरल्यामुळे प्रवाशांची मदार विशेष गाड्यांवर होती. परंतु महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्यांत थांबे न दिल्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. याबाबत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्रचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांनी समितीतर्फे नाराजी व्यक्त केली असून या गाड्यांना महाड, लांजा, राजापूर, वैभववाडी आणि सावंतवाडी या तालुक्यांतील रेल्वे स्थानकांवर थांबे देण्याची मागणी निवेदना द्वारे मध्य रेल्वे प्रशासनाला केली आहे.
हिवाळी पर्यटन आणि सणांच्या काळात धावणाऱ्या ०११५१/०११५२ मुंबई-करमळी, ०१४६३/०१४६४ लोकमान्य टिळक टर्मिनस-कोचुवेली, आणि ०१४०७/०१४०८ पुणे-करमळी या हिवाळी विशेष गाड्यांना महाड, लांजा, राजापूर आणि वैभववाडी या तालुक्यांत थांबा न दिल्याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. या गाड्या या भागातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.
रत्नागिरी ते कणकवली या १११ किलोमीटरच्या भागात कोणत्याही गाडीला एकही थांबा न दिल्यामुळे या गाड्या नक्की कोणासाठी सोडल्या जातात हा प्रश्न उभा राहिला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली विशेष गाडी सावंतवाडीच्या पुढे दर १५ ते २० किलोमीटरवर थांबणार आहे. परंतु, महाराष्ट्रात थांबे देण्यास आपले प्रशासन तयार नाही. कोकण रेल्वेत २२% आर्थिक सहभाग उचलून महाराष्ट्राला काहीही मिळाले नाही या आमच्या मतावर या प्रकारांमुळे मोहोर उमटते.
कोकण रेल्वे मार्गावरील वरील सर्व तालुके हे कोकणातील आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. सणासुदीचा कालावधी तसेच पर्यटन हंगामामुळे येथे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा परिस्थितीत या स्थानकांना थांबे न दिल्याने स्थानिक रहिवाशांची अनावश्यक गैरसोय होणार आहे.
वरील गाड्यांना वरील स्थानकांवर थांबा दिल्यास स्थानिक नागरिकांची दळणवळणाची समस्या सुटेल,पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल व प्रवाशांचा वेळ आणि खर्च वाचेल.
आपण या भागातील प्रवाशांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि वरील गाड्यांना आरक्षण सुरु होण्यापूर्वी महाड तालुक्यातील वीर, लांजा तालुक्यातील विलवडे, राजापूर तालुक्यातील राजापूर रोड आणि वैभववाडी तालुक्यातील वैभववाडी रोड तसेच ०११५१/०११५२ मुंबई-करमळी गाडीला सावंतवाडी रोड स्थानकांवर तातडीने थांबे देण्याची व्यवस्था करावी, अशी आम्ही नम्र विनंती करतो.
आपण लवकरात लवकर याबाबत सकारात्मक निर्णय घ्याल, अशी अपेक्षा आहे असे या निवेदनात त्यांनी म्हटले आहे.




रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे या तालुक्यातील 50 टक्क्यांहून अधिक जागांचे मालक हे परराज्यातील किंवा अन्य जिल्ह्यांतील आहेत. तालुक्यात असणार्या मोक्याच्या जागा या आधीच बळकावल्या गेल्या आहेत. त्यामुळे दापोलीत स्थानिकांचे अस्तित्व जवळपास संपुष्टात येताना दिसत आहे.
तालुक्यात 105 ग्रामपंचायती आणि 173 गावे आहेत. या 173 गावांमध्ये अन्य राज्यातील लोकांनी जमिनी खरेदी केल्याचे व्यवहार झाले आहेत. त्यामुळे अनेक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात घरे, रो -हाऊसेस, बंगलो, बांधकामाच्या नोंदी दर महिन्याला होताना दिसत आहेत. शेकडो एकर जागा खरेदी केलेले परप्रांतीय मालकांना गाव पातळीवर विरोध होऊ नये म्हणून मंदिर, सार्वजनिक इमारती, सार्वजनिक सुविधा अशा ठिकाणी ते देणगी देत असून स्थानिक पुढार्यांचे ‘खिसेही गरम’ केले जात असल्याची चर्चा सुरु आहे.
तालुक्यातील अनेक जागांचे व्यवहार हे बनवाबनवी करून झाले असल्याचीही ओरड होताना दिसत आहे. स्थानिकांकडून खरेदी केलेल्या जागेवर विकासकांनी रो-हाऊसेस, बंगलो बांधून शेकडो लोकांना त्याची विक्री केली आहे. यातील अनेक ठिकाणी विकसकांना विक्री केलेल्या जागेत जागा मालक मजूर म्हणून राबताना दिसत आहेत.
कोकणातील लोक वडिलोपार्जित जागा विकून स्थानिक लोक मुंबईसारख्या ठिकाणी खोली विकत घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. गावातील जागा विकल्याने तालुक्यातील अनेकांचे कायम वास्तव्य हे मुंबईत होताना दिसत आहे. गावाला केवळ सणासुदीला तो येताना दिसत आहे. शासनाकडून मिळणार्या धान्यामुळे तालुक्यातील शेतीही ओसाड पडण्याच्या मार्गावर आहे. अशा प्रकारे शेती ओसाड ठेऊन करायची काय म्हणून ती विकली जात असून भावी पिढीसाठी चिंतेचे बाब ठरली आहे.