पेण: मुंबई गोवा चौपदरीकरणाचे काम २०११ पासून सुरु असून १२ वर्षे उलटूनही पनवेल ते इंदापूर व पुढे इंदापूर ते पत्रादेवी (गोवा सीमा) मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. याबाबत अनेक वर्षे अनेक आंदोलने झाली. माननीय उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करण्यात आली. परंतु काम पूर्ण झाले नाही. गणेशोत्सव काळात कामाला गती देण्यात आली होती. त्यामुळे या महिन्यात सदर काम पूर्ण होईल अशा आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, गणेशोत्सवानंतर कामाची गती मंदावली असून डिसेंबर अखेरीस काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर झाली आहे.
याच मुद्द्यावर कोंकण विकास समितीच्या शिष्टमंडळाने आपली टिप टॉप प्लाझा, ठाणे येथे भेट घेऊन निवेदन दिले होते. आपण त्याच वेळी संबंधितांना सूचना देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यानंतर, स्थानिक नागरिक, शेतकरी व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे दि. १२ डिसेंबर, २०२३ पासून रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील पांडापूर, कासू येथे साखळी उपोषण सुरु आहे. त्याची उच्चस्तरीय दखल घेतली असल्याचे दिसत नाही.
तरी, आपण यात लक्ष घालून आपण स्वतः संबंधित मंत्री, वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधींसोबत सदर ठिकाणी भेट देऊन मागण्यांची नोंद घ्यावी व संपूर्ण मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशी विनंती जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आली आहे.