Category Archives: कोकण
सावंतवाडी :गोवा ते नागपूर असा 805 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग याला कोल्हापूर सांगली लातूर येथून प्रचंड विरोध होत आहे. आता त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये या सहित अन्य गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या सर्व गावांमध्ये लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व गावांचा मिळून सावंतवाडी तालुक्याचा तालुका मेळावा घेण्याचे नियोजन आहे. या अगोदर खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खाजगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.
या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ञ काका भिसे,सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत, कोल्हापूरचे शेतकरी सुधाकर पाटील, के डी पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर जयसिंग पाटील हे सहभागी झाले होते.
लवकरच या गावांच्या स्वतंत्र सभा व तालुका मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे.
कणकवली, दि.०१ : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी आज कणकवलीतून रेल्वे पोलिसांनी एकाला अटक केली. उद्या त्याला येथील न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.
रेल्वे पोलिसांनी बाजारपेठेतील एका दुकानामध्ये कामाला असलेल्या तरूणाला सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. त्या तरूणाने आयआरसीटीसी ॲपवरून रेल्वेची मर्यादेपेक्षा अधिक तिकीटे काढून ग्राहकांना विक्री केली होती. याबाबत आयआरसीटीसीकडून रेल्वे पोलिसांना कळविण्यात आले. त्यानंतर रेल्वे तिकीटे काढून देणाऱ्या त्या संशयित तरूणाची माहिती घेऊन सोमवारी त्याला ताब्यात घेण्यात आले.
रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचे वृत्त समजल्यानंतर शहरातील इतर तिकीट विक्री एजंटांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान रेल्वे तिकीट विक्री आणि बुकींग प्रकरणी रेल्वे पोलिसांकडून संशयित तरूणाची चौकशी सुरू आहे. तिकीट बुकिंग साठी वापरला जाणारा मोबाईल, कॉम्प्युटर आदी साहित्य देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या संशयित अधिक चौकशी करून त्याला मंगळवारी न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली.




मुंबई दि. २९:कोकण रेल्वे मार्गावर चालू करण्यात आलेल्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीही दिवसेंदिवस वाढत चाललेली दिसत आहे. त्यामुळे या गाडीचे डबे वाढविण्यात यावे अशी मागणी कोकण विकास समितीतर्फे करण्यात आली आहे.
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसचा सध्या चालविण्यात येणारा रेक आठ डब्यांचा आहे. देशात सुरु करण्यात आलेल्या यशस्वी वंदे भारत एक्सप्रेस मध्ये तिची गणना केली जात आहे. ही गाडी सातत्याने सुमारे ९५% क्षमतेने Occupancy धावत आहे. या गाडीच्या तिकिटांच्या आरक्षणाची प्रतीक्षा यादीच या गाडीला असलेली लोकप्रियता दाखवून देत आहे. तथापि, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाल्याने अनेक प्रवासांचा हिरमोड होत आहे.
या मार्गावरील प्रवासाची उच्च मागणी लक्षात घेता, या समस्येवर त्वरित लक्ष देणे अत्यावश्यक आहे असे आम्हाला वाटते. त्यामुळे, आम्ही रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला विनंती करू इच्छितो की, मुंबई गोवा वंदे भारत एक्स्प्रेसची 16 डब्यांची रेक तैनात करून डब्यांची क्षमता वाढविण्याचा विचार करावा.
अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी ट्रेनची क्षमता वाढवल्याने सध्याची सीटची कमतरता तर दूर होईलच पण एकूण प्रवासाचा अनुभवही वाढेल. शिवाय, ते मुंबई आणि गोवा दरम्यान कार्यक्षम आणि आरामदायी वाहतूक पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करता येईल. आम्ही तुम्हाला विनंती करतो की या प्रस्तावाचा अनुकूलपणे विचार करा आणि लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक पावले उचला. आगामी उन्हाळी हंगाम लक्षात घेऊन हा बदल करण्यात यावा अशी मागणी कोकण विकास समिती तर्फे करण्यात आली आहे. कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेलद्वारे रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वेला केली आहे.