


सावंतवाडी :मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ आणि सावंतवाडी या दरम्यान असलेल्या झाराप येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शहरातून येणार्या गणेशभक्त व वाहन चालकांकरता मोफत चहा, पाणी व बिस्कीट स्टॉलची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज दिली.
गणेशभक्तांसाठी हा स्टॉल गणपतीपर्यंत चालू राहणार आहे. आज या स्टॉलची पाहणी करून, उपस्थितांकडून स्टॉलच्या व्यवस्थेची माहिती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री रविन्द्र चव्हाण हे आज मुंबई गोवा पाहणी दौर्यावर होते. मुंबई-गोवा महामार्गाची सिंगल लेन गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत. यामुळेच लवकरच ही सिंगल लेन कोकणवासीयांच्या सेवेत खुली होईल. यामुळेच जो प्रवास करायला पूर्वी १२ तास लागत होते, ते अंतर आता जवळपास ८ तासातच गाठता येईल. असं असलं तरीही कोकणवासीयांनी या रस्त्यावरून प्रवास करताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे आवश्यक आहे. ओव्हरटेकिंग आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक असलेले इतर प्रकार करू नयेत असे त्यांनी कोकणवासीयांना आवाहन केले आहे.
नवी मुंबई : गणेशोत्सव काळात कोंकणातील गणेश भक्तांना त्यांच्या गावी वेळेत पोहचता यावे व गणेशोत्सवा दरम्यान वाहतुक कोंडी न होता हा सण निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आज अपर पोलीस महासंचालक (वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या अध्यक्षतेखाली नवीमुंबई येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
19 सप्टेंबर पासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवासाठी राज्यभरातून चाकरमाने कोकणात मोठया संख्येने जातात. शासकीय सुट्टीला जोडून दि. 16 व 17 रोजी शनिवार व रविवार आल्याने महामार्ग क्र. 66 वरील वाहतुक कोंडी लक्षात घेता पोलीस प्रशासनामार्फत वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात या बैठकीत आले असल्याचे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ अंतर्गत मुंबई-पुणे दृतगती महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतुक कोंडी होऊ नये यासाठी डेल्टा फोर्स व पेट्रोलिंग वाहनांची गस्त वाढविण्यात आली आहे. आवश्यक त्याठिकाणी सुचना फलक, रंबलर स्ट्रीप, गतीरोधक फलक, वाहतुक नियंत्रण सुचना फलक आदि लावण्यात आले आहेत अशी माहिती या बैठकीत देण्यात आली आहे
तसेच राष्ट्रीय महामार्गांवर झालेल्या विविध अपघातात मदत करणाऱ्या मृत्युंजय दूतांचा अपर पोलीस महासंचालक(वाहतुक) डॉ.रविंद्र सिंगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रत्नागिरी: हंगामात खाजगी वाहतुकदारांकडून प्रवाशांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या RTO राज्य परिवहन प्राधिकरणने पाउले उचलली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात रिक्षांचे दरपत्रक ठरवून दिले असून ते प्रसिद्ध केले आहे. या दरांपेक्षा जर कोणी रिक्षाचालक अतिरिक्त दर आकारत असेल तर त्याची तक्रार करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन कमी अंतराला अव्वाच्या सव्वा भाडे आकारण्याचे प्रकार हमखास घडत असतात. हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणने रिक्षाचे मिटरने आणि शेअर-ए-रिक्षा तत्त्वावर चालविण्यात येणार्या रिक्षांचे दरपत्रक ठरवून जाहीर केले आहेत. या दरापेक्षा अधिक दर एखादा रिक्षाचालक आकारत असल्यास त्याच्या विरोधात तक्रार 02352 – 225444 या व्हॉटस् ॲप क्रमांकावर क्रमांकावर नोंदविण्यात यावी असे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.
Mumbai Goa Highway :रत्नागिरी व रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने मुंबई गोवा महामार्गाने कोकणात येणार्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी तयारी सुरू केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १४ ठिकाणी, तर रायगड जिल्ह्यात १० ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष सज्ज केले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.
रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५ सप्टेंबरपासून गणेशभक्त कोकणातील आपल्या गावी येण्यासाठी सुरवात होईल. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण १० लाख चाकरमानी दाखल होतील, असा अंदाज जिल्हा पोलिस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात एकूण १० ठिकाणी पोलिस चौकी सज्ज असणार आहेत. रत्नागिरी जिल्हा आढावा घेणारी बैठक जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी ३९ ऑगस्टला घेतली. जिल्ह्यात एकूण १४ ठिकाणी पोलिस चेकनाके स्वागत कक्ष व्यवस्था करण्यात येणार आहे.
कशेडी घाटापासून खारेपाटणपर्यंत तसेच आंबाघाट येथे ही व्यवस्था असणार आहे. रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थापन करताना गणेशभक्तांचा प्रवास सुखकर करण्याकरिता दहा ठिकाणी चौक्या सज्ज असणार आहेत, अशी माहिती रायगड जिल्हा पोलिस प्रशासनाने दिली. खारपाडा पोलिस चौकी, पेण वाहतूक चौकी, वडखळ वाहतूक चौकी, वाकण वाहतूक चौकी, कोलाडनाका वाहतूक चौकी, माणगांव वाहतूक चौकी, लोणेरे वाहतूक चौकी,नातेखिंड महाड चौकी, पोलादपूर वाहतूक चौकी, पाली वाहतूक चौकी या सगळ्या ठिकाणी वाहतूक स्वागतकक्ष सुरू करण्यात येणार आहेत. गणेशोत्सव स्वागतासाठी वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी बुधवारी (ता. ६) आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे तीन तालुके हे महामार्ग कक्षेत येतात.
क्रेन, रुग्णवाहिकेची सुविधा
गणेशोत्सव काळात भक्तांसाठी महामार्गावर असलेल्या सर्व स्वागत कक्षाच्या ठिकाणी वायरलेस सेट, क्रेन, रुग्णवाहिका या सुविधा सज्ज असणार आहेत, अशी माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.
Content Protected! Please Share it instead.