सिंधुदुर्ग : या महिन्यात मालवणला भेट देणार्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या अग्रस्थानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. समुद्र किनारा ते किल्ला वाहतुक होडी सेवा उद्यापासून चालू होणार आहे.
पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर कर्नाटक मध्ये कुमठा ते कुंदापुरा सेक्शन दरम्यान रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी उद्या दिनांक 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजून 10 मिनिटे ते 4 वाजून 10 मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) दिनांक 31 ऑगस्ट रोजी सुटणारी गाडी क्र. 16333 – वेरावल – तिरुअनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस रोहा ते कुमठा दरम्यान सुमारे तीन तास उशिराने धावणार आहे.
2) दिनांक 1 सप्टेंबर रोजी सुटणारी गाडी क्र. 12620 मंगलूरु सेंट्रल – लोकमान्य टिळक मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरतकल ते कुंदापुरा दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना होणाऱ्या तसदीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे
Konkan Railway News :प्रवाशांच्या सोयीसाठी गणेशोत्सवा दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका एक्स्प्रेसला अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार
22475/22476 हिस्सार – कोईमतूर – हिस्सार वीकली एक्सप्रेस या गाडीला एक टू टियर एसी Two Tier AC कोच जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
गाडी क्रमांक 22475 हिस्सार – कोईमतूर दर बुधवारी धावणारी ही गाडी दिनांक 06 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर पर्यंत या अतिरिक्त डब्यासहित धावणार आहे.
गाडी क्रमांक 22476 कोईमतूर-हिस्सार दर शनिवारी धावणारी ही गाडी दिनांक 09 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर पर्यंत या अतिरिक्त डब्यासहित धावणार आहे.
या सोयीमुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पोरबंदर-कोचुवेली-पोरबंदर एक्सप्रेसला उद्यासाठी अतिरिक्त स्लीपर कोच.
गाडी क्रमांक 20910 पोरबंदर-कोचुवेली या एक्सप्रेसला उद्या दिनांक 31 ऑगस्ट रोजी तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 20909 कोचुवेली – पोरबंदर या एक्सप्रेसला उद्या दिनांक 03 सप्टेंबर रोजी एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे.
देवरुख : देवरुख आगाराच्या एका एसटी बसला येथील बोरसू येथे काल अपघात झाला. बसचे स्टेअरिंग अचानक जाम झाल्याने बस गाडी रस्त्याच्या बाजुच्या गटारात गेली. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही. मात्र देवरुख आगाराच्या एसटी बसेसच्या दुरावस्थेमूळे या बसेस मधुन प्रवास करणार्या प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे.
व्हायरल चित्रफिती मधील चालकाचा दावा खरा? गेल्याच आठवडय़ात याच आगारातील चालक अमित आपटे याने आगारातील बसेसच्या दुरावस्थेविषयी एक विडिओ बनवून तो समाजमाध्यमातून व्हायरल केला होता. ‘देवरुख एसटी आगाराच्या देवरुख-पुणे आणि देवरुख-अर्नाळा या बसमधून प्रवास करू नका आणि स्वत:चा जीव वाचवा,’ असे खळबळजनक आवाहन त्याने या विडिओ मध्ये केले होते. मात्र आगार व्यवस्थापनाने या चालकावर शिस्तभंगाची कारवाई करून त्याला निलंबित करण्यात होते. या सर्व प्रकारामुळे देवरुख आगार वादात सापडले होते. देवरुखमधील काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी आगारप्रमुखांची भेट घेऊन याबाबत वस्तुस्थितीची विचारणा केली होती.
तर मोठा अपघात झाला असता… या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जर घाट रस्त्यावर असा प्रकार घडला असता तर बस कित्येक फुटावरून दरीत कोसळून मोठी जिवितहानी झाली असती. या प्रकरणी एसटी महामंडळाने त्वरित लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भजन परंपरेला प्रोत्साहन देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे बजेट करताना भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याकरिता २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. अशी तरतूद पहिल्यांदाच करण्यात आली आहे. एका भजन मंडळाला १० ते १२ हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. या निर्णयाचे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भजनप्रेमी मंडळींकडून जोरदार स्वागत होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात घरोघरी साजरा केला जातो. त्याप्रमाणे वाडीवाडीत भजन मंडळे सक्रिय होऊन या कालावधीत घरोघरी जाऊन गणपती समोर आरती, भजने सादर करीत असतात. जिल्ह्यात प्रत्येक वाडीचे स्वतंत्र भजन मंडळ आहे. काही वाड्यांमध्ये तर एकापेक्षा अनेक भजन मंडळे कार्यरत आहेत. अलीकडे महिला भजन मंडळ, लहान मुलांचे भजन मंडळ हा सुद्धा ट्रेंड मोठ्या स्वरुपात सुरू झाला आहे. एवढी रसिकता व लोकप्रियता भजन या पारंपरिक कलेची जिल्ह्यात आढळून येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद या मूलभूत विषयाला प्राधान्य देताना अन्य नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तजवीज करीत असते; मात्र यावर्षी यात वेगळीकता जिल्हा परिषदेने दाखविली आहे. जिल्हा परिषदेत प्रशासक असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी यावर्षी भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे विद्यमान ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी पुणे जिल्हा परिषदेच्या धर्तीवर ही संकल्पना मांडली आहे. पुणे जिल्ह्यातील वारकऱ्यांना जिल्हा परिषद वाद्य साहित्य पुरविते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने भजनी मंडळांना साहित्य पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, प्रशासनाने यासाठी मंडळ रजिस्टर असण्याची अट ठेवलेली नाही.
सध्या यासाठी प्रस्ताव घेण्याचे काम सुरू आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामीण भागातील भजन मंडळांची झुंबड उडालेली दिसत आहे. जिल्ह्यात ४३१ ग्रामपंचायती असल्या, तरी भजन मंडळांची संख्या हजारोंच्या संख्येने आहे. त्यामुळे कोणाला प्राधान्य दिले जाईल, हे निश्चित समजलेले नाही; मात्र ”पहिला प्रस्ताव, पहिले प्राधान्य” असा निकष असण्याची शक्यता आहे. उपलब्ध प्रस्तावांतून लॉटरी काढून लाभ दिला जाण्याचीही शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून ही योजना राबविण्यात येत आहे. यासाठी २५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. एका मंडळाला दहा ते बारा हजार रुपयांचे साहित्य पुरविले जाणार आहे. यामध्ये एक मृदंग, पाच ते सहा टाळ, एक झांज या साहित्य संचाचा समावेश आहे.
प्रस्ताव सादर करताना ग्रामसभा, मासिक सभेचा ठराव आवश्यक आहे. मंडळाची कार्यकारिणी यादी जोडणे गरजेचे आहे. मंडळ गावात कार्यरत असल्याबाबत ग्रामपंचायतीचा दाखला आवश्यक असून, पुरविण्यात येणारे साहित्य ठेवण्यासाठी जागा उपलब्ध असल्याबाबत मंडळाचा दाखला जोडणे गरजेचे आहे. पुरविण्यात येणाऱ्या साहित्याची देखभाल दुरुस्ती करण्यास तयार असल्याचा भजन मंडळाने दाखला जोडायचा असून, यासाठी गटविकास अधिकाऱ्यांची शिफारस आवश्यक आहे. मंडळाचे किमान १० ते १५ सदस्य असल्याची कार्यकारिणी यादी जोडायची आहे. यासाठी ३० ऑगस्टपर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत आहे.
Konkan Railway News:दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी दिवा फास्ट पेसेंजर या दोन गाडयांना गणेशचतुर्थी दरम्यान किमान एक एसी चेअरकार डबा जोडण्यात यावा यासाठी कोकण विकास समितीकडून रेल्वे प्रशासनाला एक निवदेन सादर करण्यात आले आहे.
गाडी क्रमांक १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आणि गाडी क्रमांक ५०१०३/५०१०४ रत्नागिरी दिवा फास्ट पेसेंजर या दोन गाडयांना अतिरिक्त डबे वाढविण्यास वाव आहे. या दोन्ही गाड्या कोकणातील सर्व स्थानकावर दिवसा धावत असल्याने या गाडीला एसी चेअरकार डबा जोडल्यास त्याला चांगला प्रतिसाद येईल. किमान एक किंवा जमल्यास एकापेक्षा अधिक डबे जोडल्यास चाकरमान्यांचा प्रवास आरामदायक होईल आणि रेल्वेची कमाई पण होईल या हेतूने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनाच्या प्रति केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, महाराष्ट्र राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे आणि कोंकण रेल्वेचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांना पाठविण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने हे निवेदन प्राप्त झाले असून यावर तांत्रिक बाजू विचारात घेऊन शक्य असल्यास हे डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात येईल असे कळवले आहे.
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/2308-Diva-AC-Coach.pdf” title=”2308 Diva AC Coach”]
सिंधुदुर्ग: कुडाळ आगारासाठी प्रथमच सहा शयनयान (स्लीपर) एसटी बसेस दाखल होणार आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी तशी मागणी केली होती; त्यांचा मागणीला यश आले आहे. या बस पैकी एक बस कणकवली आगारात दाखल झाली आहे.
या बसेस एसटीच्या कुडाळ आगारातून पणजी-पुणे-निगडी, पणजी-लातूर आणि पणजी-बोरिवली या मार्गावर चालविल्या जाणाऱ्या आहेत. . यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचा लांब पल्ल्याचा प्रवास सुखकर होणार आहे. एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी समजली जाते. आता एसटीने देखील आधुनिकरणाची कास धरली असून, जिल्ह्यातील बसस्थानकांची नूतनीकरणाची कामे पूर्णत्वास जात आहेत. नवीन बसेस देखील प्रवाश्यांच्या सेवेसाठी दाखल होत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग एसटी विभागाचे प्रमुख अभिजीत पाटील आणि इतर अधिकाऱ्यांशी चर्चा घडवून आणली होती.या माध्यमातून सर्वसामान्य प्रवाशांना चांगली आणि आधुनिक सेवा देण्यासाठी माजी खासदार तथा कुडाळ मालवण विधानसभेचे प्रभारी निलेश राणे यांच्या माध्यमातून आम्ही सतत प्रयत्नशील राहू, असे तालुकाध्यक्ष दादा साईल यांनी म्हटले आहे.
रायगड :आज मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांनी सरकारवर मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून आणि मनसे पदाधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत झालेल्या छळावरून जोरदार हल्लाबोल केला.
मुंबई- गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरुन मनसेने आक्रमक पवित्रा घेतानाच जागर यात्रेला आज सुरुवात केली. अमित ठाकरेंच्या नेतृत्वाखाली पळस्पे येथून या यात्रेला सुरुवात झाल्यानंतर मनसेच्या आठ नेत्यांची रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांतून निघालेल्या या पदयात्रेचा समारोप कोलाडमध्ये झाला. त्यानंतर राज ठाकरे यांची तोफ पुन्हा एकदा धडाडली.
राज ठाकरे म्हणाले, माझ्या मनसैनिकांनी मुंबई- गोवा महामार्गावरील दुरावस्थेवरुन आंदोलन केले. त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी दिली. मात्र, माझ्या पदाधिकार्यांना, मनसैनिकांना पोलीस स्टेशनमध्ये अंडरविअरवर बसवलं सरकारने. सरकार कोणचंही असू द्या, कालचं असू द्या , नाहीतर आजचं असू द्या. मला त्यांना एवढंच सांगायचंय, सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही आलेलो नसतो.
अंडरवेअरचे रिटर्न गिफ्ट मी पण देऊ शकतो. पण विचार करा ते दिसतील कसे. कारण यांच्या अंगावरचे खड्डे बघण्यापेक्षा रस्त्यावरील खड्डे बघणे बरे असा टोला लगावतानाच इशाराही दिला. पण सगळ्यांनी असेच जागृत राहा, पुढे काय करायचे ते लवकरच तुम्हांला सांगेन.सगळेच पेपर काय आज फोडायचे नसतात, असेही ते म्हणाले.
ठाकरे म्हणाले, मुंबई -गोवा महामार्गाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सरकारला जाग आणण्यासाठी म्हणून तुम्ही सगळ्यांनी पदयात्रा केली. पदयात्रा हा एक सभ्य मार्ग असतो.आपल्या पक्षाचं धोरणच ते आहे, पहिल्यांदा हात जोडून जा, ऐकलं नाहीतर हात सोडून जा. आज पदयात्रेने सरकारला काही गोष्टी शांततेनं सांगायच्या आहेत. काय चाळण झाली आहे रस्त्याची. माझ्या कोकणी बांधवांना इतकी वर्ष या महामार्गावरील खड्डे सहन करावा लागत आहे.
इतकी वर्ष तुम्ही हा त्रास सहन करता तुम्हांला राग कसा येत नाही. राग न येता तुम्ही त्याच त्याच लोकांना मतदान करत राहता. तीच तीच माणसं तुम्ही निवडून देता. तीच माणसे तुमच्या आयुष्याचा खेळ करुन ठेवतात. या रस्त्यावर आत्तापर्यंत किती अपघात झाले असतील, किती लोकांचे जीव गेले असतील. अरे रस्त्यावरचा खड्डा भरता येतो, पण माणसांचं आयुष्य भरता येत नाही असेही ते म्हणाले.
या रस्त्यावरील अपघातात जे माणसं गेलीत त्यांचं काय असा सवाल उपस्थित करतानाच ते म्हणाले, मागील १५ ते १७ वर्षांत मुंबई – गोवा महामार्गावर अडीच हजार माणसे गेली आहेत. गाड्यांची किती विल्हेवाट लागली असेल माहिती नाही. कोणत्या सरकारचा मूर्खपणा आहे, माहिती नाही. त्याच्या हायवेवरती पेईंग ब्लाॅक टाकलेत. किती पैसे खायचेत. याला काही मर्यादा आहे. जगभर कुठेही तुम्ही गेलात तर काँक्रिटचे रस्ते पाहायला दिसतील. पेईंग ब्लाॅक हे फुटपाथवर टाकायचे असतात. पण सारखी कंत्राटं काढायची, नवी टेंडरं काढायची, त्या्च्यावर नवे टक्के घ्यायचे. आणि तुम्हांला दिवसभर या खड्ड्यांवरुन घेऊन जायचं असेही ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे म्हणाले, मुंबई गोवा महामार्ग अर्धवट अवस्थेत ठेवण्यामागचा छुपा अजेंडा तुम्हा कोकणी बांधवाना सांगून ठेवतो. हा रस्ता असा ठेवण्या मागचं कारण म्हणजे. अत्यंत चिरीमिरीत तुमच्या जमिनी विकत घेताहेत. अत्यंत मामुली किमतीत जमिनी विकत घेत आहेत. आणि ज्यावेळी हा रस्ता होईल तेव्हा याच जमिनीच्या किमती शंभर पटीने वाढून विकणार. म्हणजे पैसै ते कमवणार आणि तुम्ही तसेच राहणार असेही ते म्हणाले. यात आपलीच लोकं आहेत. आणि कुंपनच शेत खातंय. यात बाहेरची लोक नाहीयेत. ज्यावेळेला दळणवळण चांगलं होतं तेव्हा जमिनीच्या किमती काय पटीने वाढतात हे तुम्हांला लक्षात येईल. त्यामुळे तुमच्याकडच्या जमिनी आहे तशा ठेवा असे आवाहनही ठाकरेंनी यावेळी कोकणवासियांना केले.आज ना उद्या हा रस्ता होईल आणि याची किंमत तुम्हांलाच मिळेल, तुमच्या पुढच्या पिढ्यांना मिळेल असेही ते म्हणाले. या व्यापाऱ्यांच्या हाती तुमच्या जमिनी नका घालवू, त्यांना काय रट्टे लावायचेत ते आम्ही लावू असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.
मला आठवतं, बाळासाहेब म्हणायचे, तुम्हांला दोन तासांत मुंबई पुणे रस्ता पार करता येईल. असा रस्ता मला बनवायचाय. लोकांना तो जुना रस्ता पाहता ते शक्य होणार नाही असंच अनेकांना वाटायचे. महाराष्ट्र नेहमी पुढारलेलाच होता. आणि देशाला दाखवण्याचे काम नेहमीच महाराष्ट्राने केले. मुंबई पुणे महामार्ग झाल्यावर देशाला कळले की, असा रस्ता होऊ शकतो.
बाळासाहेबांच्या संकल्पनेतून आणि नितीन गडकरीं(Nitin Gadkari)च्या पुढाकारातून हा मुंबई पुणे महामार्ग झाला. आणि मग असे रस्ते व्हायला सुरुवात झाली. त्या महाराष्ट्रातला मुंबई पुणे महामार्ग असा, हालरस्ता असा का, याच्यामध्ये असे खड्डे का, वर्षानुवर्षे हा रस्ता असा का? याचं उत्तर सोपं आहे, की आपण त्या त्या व्यक्तींनाच निवडून देतो, असेही राज ठाकरे म्हणाले.
सिंधुदुर्ग : इन्सुली खामदेव नाका येथील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी अज्ञात चोरट्याने आज पहाटेच्या सुमारास फोडली. यात ४८ हजार रुपयांची रोकड व ८ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ५६ हजारांचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केला. याबाबतची फिर्याद मालक दिगंबर सदाशिव बोंद्रे यांनी बांदा पोलीसात दाखल केली आहे. ही घटना पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या दरम्यान घडली असावी असा पोलीसांचा अंदाज आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली खामदेव नाक्यावर श्री गणेश मंदिर समोरील शिवदुर्ग कॅश्यु फॅक्टरी फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले. चोरट्याने खिडकीचे लोखंडी ग्रील तोडून आत प्रवेश केला. कपाटातील तीन काऊंटरमध्ये ठेवलेली सुमारे ४८ हजार रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली. तसेच सुमारे ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरुन नेला.
आज सकाळी बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांनी सहकार्यां समवेत घटनास्थळाची पाहणी केली. मालक दिगंबर बोंद्रे व फॅक्टरीमधील कामगार यांच्याकडून आवश्यक माहिती घेतली. तसेच कॅश्यु फॅक्टरीमध्ये असलेले सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज तपासण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. एलसीबी तसेच श्वान पथक व ठसेतज्ञांनाही पाचारण करण्यात आल्याची माहिती एपीआय शामराव काळे यांनी दिली.
लेख |सई परब: काल सहजच सोशल मीडियावर वेळ घालवत असताना एक विडिओ नजरेस पडला. धान्याची साठवणूक करण्याची एक पारंपरिक पद्धत म्हणजे ‘मुडी’ किंवा ‘बिवळा’ बांधण्याचा तो विडिओ होता. हा विडिओ पाहताना काही जुन्या आठवणी जाग्या झाल्यात.
पूर्वी कोकणात भातशेती मोठ्या प्रमाणात केली जात असे. पिक हातात आल्यानंतर त्याची साठवणूक करणे हे सुद्धा शेती करून धान्य मिळवण्याइतकेच महत्वाचे काम असे. धान्याच्या साठवणुकीसाठी गवताची ‘मुडी’ बांधून धान्याची साठवणूक केली असे.
मुडी म्हणजे गवत आणि दोरी वापरून धान्याची नैसर्गिकरीत्या साठवण करून ठेवण्याचं एक साधन. मुडी ही भाताची मळणी केल्यावर मिळणाऱ्या गवताची बांधली जायची. हे मोठं कौशल्याचं आणि ताकदीचंही काम असायचं. मोठय़ात मोठी मुडी ही दहा कुढवांची बांधली जायची. अगदी लहान म्हणजे दोन-तीन कुडू धान्याच्या मुडीला ‘बिवळा’ म्हणायचे. आमच्या बालपणीच्या काळात कोकणातल्या प्रत्येक घरात धान्याच्या अशा मुड्या एकावर एक रचून ठेवलेल्या दिसत.
बालपणीची काही वर्षं आम्ही अशा मुड्या पाहिल्या. एकाही वर्षी अशा मुडीतलं बियाण्यासाठीचं धान्य खराब झालेलं कधी पाहिलं नाही. त्या काळात खरिपाच्या सुरुवातीला बाजारातली आताच्या सारखी पिशवीबंद बियाणी विकत आणण्याची प्रथा नव्हतीच. शेतकरी वर्षभरासाठी लागणारं धान्य आणि मिरगात पेरायचं बियाचं धान्य अशा मुड्यांमध्ये ठेवत असत.
मुड्या या भाताच्या, भुईमुगाच्या व नाचणीच्या बांधल्या जात असत. धान्य टिकण्यासाठी त्यात त्रिफळ आणि लिंबाची पानेही टाकली जात असत. त्या काळात आजच्या सारखी बियाणी बाजारातही नव्हती. ‘वालय’ आणि ‘बेळणा’ ह्या भाताच्या पारंपरिक जाती खूप लोकप्रिय होत्या. ह्या दोन्ही जाती ‘महान’ प्रकारातल्या होत्या आणि जास्त उत्पादन देणाऱ्या होत्या. या जातीच्या भाताच्या पाच पायली, दहा पायली, एक मण, दीड मण अशा प्रमाणात मुड्या बांधत असत. साधारणपणे एक मणापासून पुढची मुडी बांधण्यासाठी खूप ताकद लागत असे. एखाद्या मुडीतलं भात दोन-अडीच वर्षांपर्यंतही उत्तम स्थितीत राहत असे.
पूर्वी कोणत्याही घराच्या श्रीमंतीचा अंदाज हा त्या घरात किती ‘मुड्या’ आहेत यावरून लावला जात असे. जेवढ्या जास्त ‘मुड्या’ तेव्हडा तो शेतकरी सधन असे मानले जायचे. एवढेच नव्हे तर जेव्हा लग्न ठरव्यासाठी मुलीकडील लोक मुलाकडे जायचे तेव्हा त्या घरातील ‘मुड्या’ मोजून लग्नाला होकार द्यायचा कि नाही ते ठरवायचे. काहीशी अतिशोयक्ती वाटल्यास तुम्ही वाडीतील जुन्या शेतकऱ्यांना अजूनही या गोष्टी विचारून या गोष्टीतील सत्यता जाणून घेऊ शकता.
आता अशा घरगुती मुड्या कुठे औषधालाही दिसत नाहीत. आता धान्य साठवण करून ठेवण्याइतपत शेतीही कुणी करत नाही. दीड-दोन खंडी भात पिकवणारा शेतकरी आज ‘मोठा’ शेतकरी समजला जातो. याशिवाय गावोगावी भात भरडण्याच्या मोठमोठ्या गिरण्या उपलब्ध असल्याने धान्याची साठवणही कुणी करत नाही.