Category Archives: कोकण रेल्वे

कोकण रेल्वेच्या विलीनीकरणासाठी ‘नियम ३७७’ चे अस्त्र! खासदार वायकरांचा लोकसभेत पाठपुरावा

   Follow us on        

नवी दिल्ली: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्याच्या मागणीने आता जोर धरला आहे. उत्तर-पश्चिम मुंबईचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत ‘नियम ३७७’ अंतर्गत ही महत्त्वाची मागणी लावून धरली असून, या प्रक्रियेला गती देण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. १९९० च्या दशकात स्थापन झालेली कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वे आणि संबंधित राज्यांचा संयुक्त उपक्रम होता. मूळ करारानुसार, १० वर्षांच्या आत या संस्थेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे अपेक्षित होते, मात्र तीन दशके उलटूनही ही प्रक्रिया अद्याप प्रलंबित असल्याने कोकण रेल्वेच्या विकासाला खीळ बसत असल्याचे वायकर यांनी निदर्शनास आणून दिले.

​खासदार वायकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या कोकण रेल्वे आपल्या क्षमतेच्या १७५% पेक्षा जास्त वापर करत आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या एक वेगळे कॉर्पोरेशन असल्याने, इतर रेल्वे झोनप्रमाणे कोकण रेल्वेला केंद्राकडून थेट ‘अर्थसंकल्पीय साहाय्य’ मिळत नाही. निधीच्या प्रचंड टंचाईमुळे सुमारे ३५० किमी मार्गाचे दुहेरीकरण (Doubling) आणि भूस्खलन रोखण्यासारखी महत्त्वाची सुरक्षा कामे रखडली आहेत. पुरेशा पायाभूत सुविधांअभावी या मार्गावर नवीन गाड्या सुरू करणेही आता अशक्य झाले आहे. या तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा आणि सोयीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

​विलीनीकरणाच्या प्रक्रियेत राज्यांच्या सहमतीचा मुद्दाही आता मार्गी लागला आहे. केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्यांनंतर आता महाराष्ट्र सरकारनेही या विलीनीकरणाला अधिकृत मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र सरकारने केवळ एकच अट घातली आहे की, विलीनीकरणानंतरही या ऐतिहासिक ब्रँडचे नाव ‘कोकण रेल्वे’ असेच कायम ठेवण्यात यावे, ज्याला केंद्र सरकारने तत्वतः मान्यता दिली आहे. सर्व संबंधित राज्यांची संमती मिळाल्यामुळे आता विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

​शेवटी, केंद्र सरकारने ही विलीनीकरण प्रक्रिया युद्धपातळीवर पूर्ण करावी, अशी आग्रही मागणी रवींद्र वायकर यांनी केली आहे. विलीनीकरण झाल्यास कोकण रेल्वेला आवश्यक तो निधी उपलब्ध होईल, ज्यामुळे दुहेरीकरणाचे काम पूर्ण होऊन कोकणच्या विकासाला नवी गती मिळेल. कोकण रेल्वे हा या भागाचा कणा असून, या प्रदेशातील जनतेचा हा हक्क असल्याचेही त्यांनी यावेळी ठामपणे मांडले.

नियम ३७७ काय आहे? 

लोकसभेतील नियम ३७७ हा खासदारांना त्यांच्या मतदारसंघातील किंवा देशपातळीवरील तातडीच्या व सार्वजनिक महत्त्वाच्या बाबी केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी वापरता येणारा नियम आहे. या नियमांतर्गत खासदार सभागृहात तोंडी चर्चा न करता लिखित स्वरूपात निवेदन सादर करतो. या निवेदनावर कोणतीही चर्चा होत नाही तसेच संबंधित मंत्र्यांना तात्काळ उत्तर देणे बंधनकारक नसते. मात्र, हा विषय लोकसभेच्या अधिकृत नोंदीत समाविष्ट होतो आणि संबंधित मंत्रालय किंवा विभागाच्या लक्षात अधिकृतपणे आणला जातो. रेल्वे, रस्ते, पाणीपुरवठा, नैसर्गिक आपत्ती, विकासकामे रखडणे, स्थानिक समस्या अशा अनेक विषयांसाठी नियम ३७७ चा वापर केला जातो. त्यामुळे हा नियम थेट निर्णयासाठी नसला, तरी सरकारवर लक्ष केंद्रित करून पुढील कारवाईसाठी दबाव निर्माण करणारा महत्त्वाचा संसदीय उपाय मानला जातो.

कोकण रेल्वे मार्गावर आज धावणार अनारक्षित मेमू गाड्या

   Follow us on        

रत्नागिरी/सावंतवाडी, दि. १० फेब्रुवारी २०२६ :

निवडणूकीहून परतणाऱ्या चाकरमान्यांना तसेच कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेसाठी गेलेल्या भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष अनारक्षित मेमू (MEMU) गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

या अंतर्गत सावंतवाडी रोड–पनवेल आणि पनवेल–रत्नागिरी दरम्यान विशेष TOD (Train on Demand) मेमू सेवा सुरू करण्यात आली आहे. या गाड्या मंगळवार, १० फेब्रुवारी २०२६ रोजी चालवण्यात येणार असून प्रवाशांना रात्री व दिवसा प्रवासाची अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे.

सावंतवाडी रोड–पनवेल विशेष मेमू (गाडी क्र. 01158)

ही गाडी सकाळी ०९.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटून झारप, कुदाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, कोलाड, रोहा व पेन मार्गे रात्री ०८.१५ वाजता पनवेल येथे पोहोचणार आहे.

पनवेल–रत्नागिरी विशेष मेमू (गाडी क्र. 01157)

ही गाडी रात्री ०८.२५ वाजता पनवेल येथून सुटून पेन, रोहा, कोलाड, इंदापूर रोड, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विंहेरे, दिवानखवटी, कलंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सवर्डा, आरवली रोड व संगमेश्वर रोड स्थानकांवर थांबे घेत बुधवार, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ०४.०० वाजता रत्नागिरी येथे दाखल होणार आहे.

या विशेष मेमू गाड्या अनारक्षित असून मोठ्या प्रमाणावर होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले कर्मचारी, मुंबई–पनवेल परिसरातील चाकरमानी तसेच आंगणेवाडी जत्रेसाठी गेलेले भाविक यांना याचा मोठा लाभ होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या विशेष सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचेही सांगितले आहे.

Konkan Railway: वंदे भारत एक्स्प्रेसची गुरांना धडक; कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प

   Follow us on        

सिंधुदुर्ग | दि. ९ : कुडाळ आणि सिंधुदुर्ग स्थानकादरम्यान मडगावच्या दिशेने जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसची अचानक रुळावर आलेल्या बैल आणि म्हशींना धडक बसली. या अपघातात काही गुरे मृत्युमुखी पडली. धडकेमुळे रेल्वेच्या ओव्हरहेड विद्युत वाहिनीचा खांब वाकला आणि वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी कुडाळ–मडगाव दिशेची सर्व रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली.

अपघातानंतर वंदे भारत एक्स्प्रेस जागीच थांबवण्यात आली. विद्युत वाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने डिझेल इंजिन लावून गाडी घटनास्थळावरून हलवली. सुमारे दुपारी २ वाजता वंदे भारत एक्स्प्रेस घटनास्थळावरून रवाना करण्यात आली. त्यानंतर विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याचे काम हाती घेण्यात आले.

या घटनेमुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुमारे साडेतीन तास ठप्प झाली होती. कुडाळ स्थानकात मांडवी एक्स्प्रेस, उदना एक्स्प्रेस, शताब्दी एक्स्प्रेस, तर झाराप स्थानकात राजधानी एक्स्प्रेस थांबवण्यात आली. सावंतवाडीत दूरांतो एक्स्प्रेस, मडुरा स्थानकात मत्स्यगंधा एक्स्प्रेस आणि कणकवलीत मंगला एक्स्प्रेसही थांबवून ठेवण्यात आल्या.

वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेक प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज आंगणेवाडी जत्रेसाठी प्रवास करणाऱ्या भाविकांचा परतीचा प्रवासही काही काळ लांबला. अखेर दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात आली, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.

आता सबब नको! कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या ‘त्या’ गाडीच्या डब्यांत वाढ करण्याची मागणी

   Follow us on        

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाने ‘गाडी क्रमांक २२६२९/२२६३० तिरुनेलवेली-दादर एक्स्प्रेस’चे टर्मिनल बदलून ते लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे कोकण विकास समितीने स्वागत केले असून, आता ही गाडी २२ किंवा २४ डब्यांची (LHB कोच) करावी, अशी आग्रही मागणी रेल्वे बोर्डाकडे केली आहे.

​१५ एप्रिल २०२६ पासून तिरुनेलवेली येथून आणि १६ एप्रिल २०२६ पासून मुंबईतून सुटणारी ही गाडी दादरऐवजी एलटीटीवरून धावेल. दादर स्थानकातील तांत्रिक अडचणींमुळे या गाडीचे डबे वाढवता येत नव्हते त्यामुळे ती १६ डब्यांसह चालविण्यात येत असे, आता तो अडथळा आता दूर झाला आहे. कोकण विकास समितीचे जयवंत दरेकर आणि अक्षय महापदी यांनी या संदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या मार्गावर प्रवाशांची सतत मोठी गर्दी आणि प्रतीक्षा यादी असते, त्यामुळे डब्यांची संख्या वाढवल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि रेल्वेची क्षमता अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल, असा विश्वास समितीने व्यक्त केला आहे

तसेच ही डबेवाढ वेळेबद्ध पद्धतीने अंमलात आणून प्रवाशांना लवकरात लवकर त्याचा लाभ मिळावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानत, कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या गरजांकडे भविष्यातही सकारात्मक लक्ष दिले जाईल, अशी आशा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Konkan Railway: निवडणुकीनंतर मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वेकडून ‘विशेष’ सोय

   Follow us on        

चिपळूण: जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनातर्फे चिपळूण-पनवेल आणि पनवेल-रत्नागिरी दरम्यान विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवारी, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी या गाड्या धावतील. या विशेष गाड्यांमुळे निवडणुकीनंतर मुंबई-पुण्याकडे परतणाऱ्या प्रवाशांची गर्दी विभागण्यास मोठी मदत होणार आहे.

१. गाडी क्र. ०११५८ चिपळूण – पनवेल विशेष (अनारक्षित)
दिवस: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६

वेळ: चिपळूण येथून दुपारी ३:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ८:१५ वाजता पनवेलला पोहोचेल.

गाडीचे थांबे: अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामने, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, पेण आणि आपटा.

२. गाडी क्र. ०११५७ पनवेल – रत्नागिरी विशेष (अनारक्षित)
दिवस: रविवार, ८ फेब्रुवारी २०२६

वेळ: पनवेल येथून रात्री ८:२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०० वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

गाडीचे थांबे: आपटा, पेण, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड.

महत्त्वाची टीप: प्रवाशांनी गाडीच्या अधिकृत वेळेसाठी रेल्वेच्या www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES / RailOne ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Konkan Railway: प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी TOD विशेष एक्सप्रेस धावणार

   Follow us on        

मुंबईतील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी–सावंतवाडी रोड–सीएसएमटी दरम्यान TOD (ट्रेन ऑन डिमांड) विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही विशेष रेल्वे नियोजित करण्यात आली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन DRM मुंबई मध्य यांनी केले आहे.

०११२९ सीएसएमटी–सावंतवाडी रोड TOD विशेष रेल्वे ही गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटणार आहे. ही गाडी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.

तसेच, ०११३० सावंतवाडी रोड–सीएसएमटी TOD विशेष रेल्वे ही गाडी १५,२० आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष रेल्वेच्या डब्यांची रचना एकूण २२ आयसीएफ डब्यांची असून त्यामध्ये जनरल, स्लीपर आणि एसी डब्यांचा समावेश आहे. कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.

स्थानके :

सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड़, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

डब्यांची रचना :

जनरल (GS) – ४, जनरल-कम-गार्ड (GSLRD) – २, एसी थ्री टियर (WGACCN) – ५, एसी टू टियर (WGACCW) – १, स्लीपर (WGSCN) – १०, एकूण डबे – २२ (आयसीएफ).

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, जास्तीत जास्त प्रवाशांनी या TOD विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम ‘मित्रा’कडे सोपवा; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन

   Follow us on        

मुंबई: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम आणि या प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे महामंडळाची असलेली उदासीन भूमिका, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने आज, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. या पत्राद्वारे संघटनेने सावंतवाडी टर्मिनसचा प्रकल्प राज्य सरकारच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे हस्तांतरित करण्याची आणि उर्वरित कामांसाठी तातडीने अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची आग्रही मागणी केली आहे. दहा वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या निवेदनात कोकण रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (CMD) ‘सावंतवाडी हे केवळ वे-साइड स्टेशन आहे, टर्मिनस नाही’ असे खळबळजनक विधान केल्याचा दावा संघटनेने केला असून, हे विधान कोकणच्या विकासाला खीळ घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. या बेजबाबदार विधानामुळे रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे स्थानिक जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

​टर्मिनसचे काम रखडल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचे आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत असल्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटांचा तुटवडा निर्माण होतो आणि काळाबाजार वाढतो. जोपर्यंत सावंतवाडी येथे हक्काचे टर्मिनस पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन गाड्या सुरू करणे शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे मुंबई विभागाचे संपर्कप्रमुख श्री. विनोद नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

महत्वाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसच्या टर्मिनलमध्ये बदल

   Follow us on        

मुंबई: कुर्ला स्थानकापुढील लोकल मार्गावरील आणि दादर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने दादर–तिरुनेलवेली–दादर साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 22629/22630) च्या टर्मिनलमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ही गाडी आता दादर स्थानकाऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून सुटणार व तेथेच तिचा प्रवास संपणार आहे.

गाडी क्रमांक 22629 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुरुवारी रात्री 20:45 वाजता सुटेल, तर ठाणे स्थानकावर 21:02 ते 21:05 दरम्यान थांबेल आणि शनिवारी पहाटे 03:55 वाजता तिरुनेलवेली येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेली येथून बुधवारी सकाळी 07:30 वाजता सुटून ठाणे स्थानकावर 14:27 ते 14:30 दरम्यान थांबेल आणि दादरऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुपारी 15:00 वाजता दाखल होईल.

हा बदल 16 एप्रिल 2026 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुनेलवेली प्रवासासाठी, तर 15 एप्रिल 2026 पासून तिरुनेलवेली–लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवासासाठी लागू होणार असून,

या निर्णयामुळे दादर स्थानकावरील गर्दी कमी होऊन मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास उपलब्ध होणार आहे. मात्र कोकणातील आणि दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांना दादर ऐवजी एलटीटी स्थानक गाठण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.

Konkan Railway: आंगणेवाडी जत्रेनिमित्त आणखी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; आजपासून आरक्षण सुरू

   Follow us on        

सावंतवाडी: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबई व कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०१२१७ (लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी )

ही विशेष गाडी गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ आणि शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २०:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२१८ (सावंतवाडी – लोकमान्य टिळक टर्मिनस)

ही परतीची विशेष गाडी शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ आणि रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी १७:३० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दाखल होईल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

आरक्षणाबाबत महत्त्वाची सूचना:

रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नसली तरी, वेळापत्रकानुसार

गाडी क्र. ०१२१७ चे आरक्षण ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ८ वाजता,

तर गाडी क्र. ०१२१८ चे आरक्षण ५ किंवा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होण्याची शक्यता आहे.

रोहा-दिवा मेमू गाड्यांच्या विलंबाने प्रवासी हैराण; ‘रोहा रेल्वे प्रवासी समिती’ आक्रमक

   Follow us on        

रोहा (प्रतिनिधी):रोहा-दिवा-रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू (MEMU) गाड्यांच्या सततच्या विलंबामुळे चाकरमानी आणि विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समिती’ने रेल्वे प्रशासनाला साकडे घातले असून, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आणि पनवेल स्टेशन मास्तरांना लेखी तक्रार सादर केली आहे.

नेमकी अडचण काय?

गेल्या अनेक आठवड्यांपासून ६१०१०/६१०११, ६१०१५/६१०१६, आणि ६१०१२/६१०१३ या गाड्या नियमितपणे विलंबाने धावत आहेत. रोहा आणि दिवा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी या गाड्या जीवनवाहिनी आहेत.  महत्त्वाच्या भेटी आणि कामाचे वेळापत्रक कोलमडत आहे.

मात्र गाड्यांच्या सततच्या अनिश्चिततेमुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नोकरीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पोहोचता न आल्याने कामाचे मोठे नुकसान होत असून, अनेकांच्या पगारावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. वेळेत गंतव्यस्थानी न पोहोचल्यामुळे महत्त्वाच्या बैठका, अपॉइंटमेंट्स तसेच कामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांना मानसिक तणाव आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने रेल्वे प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत. गाड्या उशिरा धावण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, संबंधित गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची खात्री द्यावी तसेच प्रवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

या निवेदनाची प्रत पनवेल स्टेशन मास्तरांनी स्वीकारली असून, त्यावर रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही प्रवाशांकडून मिळत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search