Category Archives: मुंबई




Mumbai Local: लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचा प्रवास आता आणखी सुसाट होणार आहे. मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. यामुळे लोकलची गर्दी कमी होण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत मुंबई लोकलविषयी महत्वाची माहिती दिली आहे. ‘मुंबईसाठी उच्च दर्जाच्या 238 लोकल गाड्या तयार करण्यात येणार आहेत. याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नव्या तंत्रज्ञानाच्या डब्यांविषयी चर्चा झाली आहे. तसेच मुंबईतील जुन्या गाड्या आणि डबे बदलण्यावर भर देण्यात येणार आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाचा फायदा लाखो मुंबईकरांना होणार आहेकमी भाड्यात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दलही माहिती दिली आहे. ‘प्रवासाचा खर्च प्रति किलोमीटर 1.38 रुपये आहे, मात्र आम्ही प्रवाशांकडून फक्त 73 पैसे घेतो. म्हणजेच आम्ही 47 % अनुदान देतो. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये प्रवाशांना 57 हजार कोटींचे अनुदान दिले होते, ते 2023-24 मध्ये वाढून सुमारे 60 हजार कोटी झाले होते. आमचे ध्येय कमी भाड्यात सुरक्षित आणि उत्तम सेवा पुरवणे हे आहे’ अशी माहितीही वैष्णव यांनी दिली आहे..




मुंबई: दादरहून कोकणात जाणाऱ्या रत्नागिरी व सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अचानक बंद केल्यामुळे शिवसेनेने पुकारलेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शनिवारचे ‘रेल रोको’ आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांनी दिली आहे.
कोकणी जनतेची गैरसोय करणाऱ्या मध्य रेल्वेला आठवडाभरापूर्वी शिवसेनेने उग्र आंदोलनाचा इशारा दिला होता. दादर-रत्नागिरी आणि दादर- सावंतवाडी पॅसेंजर होळीआधी सुरू करा, नाहीतर १ मार्चला दादर स्थानकात तीव्र ‘रेल रोको’ करू, दादरहून गोरखपूर व बरेलीला जाणाऱ्या ट्रेन सुटूच देणार नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता. शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, आमदार सुनील शिंदे, महेश सावंत, रेल कामगार सेनेचे सरचिटणीस बाबी देव, संजय जोशी, विभागप्रमुख संतोष शिंदे यांनी २० फेब्रुवारी रोजी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन त्यांना स्मरणपत्र दिले होते. त्याचवेळी दोन्ही पॅसेंजर दादरवरून कशा सोडता येईल, या ट्रेनचा इतर गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही, याबाबत रेल्वे कामगार सेनेचे संजय जोशी, बाबी देव यांनी अभ्यासपूर्ण म्हणणे मांडले होते. मध्य रेल्वे प्रशासनाने आपण दादर ते दिवा मार्गाचा पाहणी करून ही गाडी पुन्हा दादर पर्यंत कशी नेता येईल याबाबत अभ्यास करू असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शिवसेनेने रेल्वेला यासाठी अधिक वेळ देण्याचा निर्णय घेतला असून हे आंदोलन स्थगित केले असल्याचे सांगितले आहे.
होळीआधी ट्रेन सुरू झाली नाही तर ‘रेल रोको
दादर-रत्नागिरी आणि दादर-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर पूर्वीच्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून तातडीने सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाकडून होळीआधी योग्य ती कार्यवाही न झाल्यास दादरवरून गोरखपूर आणि बरेलीला जाणाऱ्या ट्रेनसमोर कोणत्याही क्षणी ‘रेल रोको’ आंदोलन केले जाईल. दादर-गोरखपूर आणि दादर-बरेली या गाड्या दादरवरून सुटू देणार नाही, असा इशारा शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.




Mumbai Local: गर्दीमुळे लोकलमधून डोंबिवली स्थानकात उतरता न आल्याने संतापलेल्या एका प्रवाशाने दरवाजात उभ्या असलेल्या प्रवाशांवर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. इतर प्रवाशांनी हल्लेखोराला पकडून पोलिसांच्या हवाली केले.
बुधवारी सकाळी कल्याणकडून दादरकडे जाणाऱ्या जलद लोकलमधून शेख जिया हुसेन (१९) प्रवास करीत होता. डोंबिवली स्थानकात पोहोचण्यापूर्वी आपण जलद लोकलमध्ये असल्याने ती मुंब्रा स्थानकात थांबणार नसल्याचे त्याच्यालक्षात आले. त्यामुळे तो डोंबिवली स्थानकात उतरण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र, एका प्रवाशाला धक्का लागून वाद सुरू झाला. त्यातच धक्काबुक्की होऊन हुसेनला काही प्रवाशांनी मारहाण केली. त्यावर संतापलेल्या हुसेनने खिशातील चाकू काढत प्रवाशांवर हल्ला केला. यामध्ये अक्षय वाघ, हेमंत कांकरिया, राजेश चांगलानी जखमी झाले. यानंतर काही प्रवाशांनी हुसेनला पकडून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले.




मुंबई : भायखळ्याचे वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात (राणीची बाग) लवकरच सापांच्या विविध प्रजाती पाहता येणार आहेत. येथे सर्पालय उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळालेली आहे. दरम्यान, येत्या काही महिन्यांत सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात होणार आहे.
प्राणीसंग्रहालय प्रशासनाने सर्पालयाबाबतचा प्रस्ताव काही महिन्यांपूर्वी सादर केला होता. त्या प्रस्तावास मागील महिन्यांत केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी मिळाली आहे. यानुसार काही दिवसांत सर्पालयासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. आलेल्या निविदांची छाननी करून सर्पालयाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार असून २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली. दरम्यान, जुने सर्पालय तोडून १६८०० चौरस फूट जागेत नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यामुळे उद्यानात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे विविध प्रजातींचे साप पहायला मिळतील. सध्या प्राणी संग्रहालयात पेंग्विन, वाघ, देशी अस्वल आदी प्राणी उपलब्ध आहेत.
Follow us on




Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या वैतरणास्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.
या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे अधिकार्यांनी सांगितले आहे.