Category Archives: महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या चित्ररथाला जिंकवून देण्यासाठी आपले मत महत्वाचे; ‘असे’ देता येईल मत

मुंबई: कर्तव्यपथावरील संचलनात आज अनेक नेत्रदीपक चित्ररथ समाविष्ट झाले होते. या सर्व चित्ररथातील विजेता चित्ररथ निवडण्यासाठी जनतेकडून मते मागविण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्यातर्फे ‘छत्रपतीशिवाजीमहाराज : लोकशाहीचे जनक’ या विषयावर अतिशय चित्त वेधक आणि नितांत सुंदर असा चित्ररथ कर्तव्यपथावरील संचलनात सहभागी झाला. या चित्ररथाला जिंकून देण्याची संधी आता आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे सर्वानी आपले मत नोंदवून या राज्याच्या चित्ररथाला जिंकवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचनालय तर्फे काण्यात आले आहे.
उद्या २७ जानेवारी सायं. ५.३० पर्यंत हे मतदान आपणास करता येणार आहे.
कसे नोंदवाल मत?
👇मार्ग पहिला :-
स्वत:च्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावरून MYGOVPOLL(स्पेस)344521(comma) 9 असा संदेश 7738299899 या क्रमांकावर पाठवावा.
म्हणजेच हा मेसेज खालील प्रमाणे होईल
MYGOVPOLL 344521,9 
👇मार्ग दुसरा :-
प्रथमत: https://mygov.in/group-poll/vote-your-favourite-tableau-republic-day-2024/ या लिंकवर क्लिक करुन लॉगिन करा. त्यानंतर महाराष्ट्राचा चित्ररथ निवडून मत नोंदवा.

कोल्हापूर ते कोकण प्रवास एका तासात शक्य; आंबोली घाटाला छेदून येणार ‘हा’ महामार्ग

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान लागणाऱ्या आंबोली घाटाखालून हा महामार्ग येणार आहे. आंबोली घाटातून मोठा बोगदा खोदला जाऊन तेथून हा महामार्ग जाणार असल्याने कोल्हापूर ते कोकण अंतर १ तासात गाठणे शक्य होणार आहे. 
सध्या आंबोली घाटातून वाहतूक खूप धीम्या गतीने होते. पावसाळ्यात अनेकदा वाहतूक धोक्याची होते. दरी कोसळल्याने वाहतूक कित्येकदा बंद होते. मात्र शक्तीपीठ महामार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकण जवळ येणार आहे. 
समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. 

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; परीक्षेसाठी दहा मिनिटे जादाचा वेळ मिळणार

पुणे: दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी ही वाढीव वेळ मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाने परिपत्रक काढून याबाबतची माहिती दिली आहे.
राज्य मंडळातर्फे दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी परीक्षेच्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना यापूर्वी करण्यात येत होते. दरम्यान, दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालकांसह आणि समाज घटकांचेही या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा, यांसारख्या घटना काही अंशी घडत असल्याचे निदर्शनास आले.
अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि परीक्षा निकोप, भयमुक्त आणि कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात, यासाठी परीक्षेच्या दिलेल्या वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ च्या परीक्षेपासून रद्द करण्यात आली होती. परंतु विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन आणि पालक-विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून फेब्रुवारी-मार्च २०२४ च्या परीक्षांसाठी दहा मिनिटे वेळ वाढवून देण्यात आला आहे. परीक्षेच्या वेळेनंतरची दहा मिनिटे वाढवून दिली आहेत, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली.
परीक्षेपूर्वी ३० मिनिटे अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर हजर राहावे
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये सकाळच्या सत्रात ११ वाजता, तर दुपारच्या सत्रात तीन वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल आणि लेखनास प्रारंभ होईल. विद्यार्थ्यांनी सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता, तसेच दुपारच्या सत्रात अडीच वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.

महत्वाची बातमी : २२ जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर

मुंबई : अयोध्येतील राम मंदिराचे २२ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे. यादिवशी राम मंदिरात राम लल्लाची प्राण प्रतिष्ठापना केली जाणार आहे.हा सोहळा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातही २२ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रापूर्वी अनेक राज्यात या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
२२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील ६ हजाराहून अधिक व्हिआयपी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यात राजकीय नेते, अभिनेते,उद्योगपती तसेच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान, प्रभू राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अनेक राज्यांमध्ये सुटी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारने २२ जानेवारी रोजी केंद्रीय संस्था आणि इतर केंद्रीय औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी देण्याची घोषणा केली आहे. त्या दिवशी दुपारी अडीच वाजता कार्यालयीन कामकाज सुरू होईल.
आता महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर झाली आहे. तसेच उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम व ओडिशा या राज्यांनी २२ जानेवारीला सुट्टी जाहीर केली आहे.

नागपूर – पत्रादेवी ‘शक्तिपीठ’ महामार्ग ‘समृध्दी’ पेक्षाही मोठा; ८०५ किमी लांबीचा हा महामार्ग ठरणार राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग.

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या संरेखनानुसार ‘शक्तिपीठ’ मार्ग आता ७६० किमीऐवजी ८०५ किमी लांबीचा असणार आहे. एमएसआरडीसीने संरेखन अंतिम करण्यासाठीचा प्रस्ताव नुकताच राज्य सरकारला पाठवला आहे. तर दुसरीकडे या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम वेगात सुरू आहे. संरेखन आणि आराखडा शक्य तितक्या लवकर मंजूर करून घेण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे.
समृद्धी महामार्ग हा राज्यातील सर्वात मोठा, ७०१ किमी लांबीचा महामार्ग आहे. पण आता समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. हा मार्ग  यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, पत्रादेवी (उत्तर गोवा) या जिल्ह्यातून जाणार आहे. 

कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प गुजरातला जाणार

सिंधुदुर्ग: कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असून, पुढील महिन्यात होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारविरुद्ध संतप्त भावना आहे.
गुजरात सरकारने माझगाव डॉकसोबत यासाठी करार केला आहे. यानुसार 35 टन वजनाची आणि 24 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित केली जाणार आहे. या पाणबुडीमध्ये 24 प्रवासी दोन रांगेत बसतील. प्रत्येक सीटला काचेची विंडो असेल. त्यामुळे समुद्रातील 300 फूट खाली असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल. दरम्यान, माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी 2018च्या अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार होता.
केंद्राने अलीकडेच मालवणमध्ये ‘नौदल दिन’ साजरा केला. त्यातून सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न दाखवले. मात्र काही दिवसांतच या आनंदावर पाणी फेरले. पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसेच 100 ते 150 कोटींची उलाढाल करण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हिसकावण्यात आला.
कोकणात रिफायनरी सारखे निसर्गाला हानिकारक प्रकल्प लादले जात आहेत असे प्रकल्पाला विरोधकांचे म्हणणे आहे. कोकणाला  विध्वंसकारी प्रकल्प न देता पर्यटनाला चालना देतील असे प्रकल्प देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. मात्र प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात येत असल्याने कोकणवासीय नाराज झाले आहेत.

Accident: ताम्हिणी घाटात खाजगी बसला मोठा अपघात, २ महिलांचा मृत्यू; ५५ प्रवासी जखमी

रायगड: पुणे येथील खासगी कंपनीची बस कोकणात येत असताना रायगड जिल्ह्यात माणगाव हद्दीत ताम्हिणी घाटात कोंडेथर वळणाजवळ या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५५ जण जखमी झाले आहेत, तर दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. माणगाव तालुक्यात ताम्हिणी घाटात शनिवारी सकाळी अपघात झाला आहे.
माणगांव पोलिस ठाणे हद्दीत सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ट्रॅव्हल्स क्रमांक एमएच ०४ एफके ६२९९ ही बस पुण्यावरुन माणगावकडे येत असताना रस्त्याखली उतरल्याने पलटी होऊन अपघात झाला आहे. घटनास्थळी माणगाव पोलिसांनी धाव घेतली आहे. माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना उपजिल्हा रुग्णालय माणगाव, येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाच्या कामाच्या प्रक्रियेस आरंभ…

कोल्हापूर :कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे मार्गाची प्रकिया सुरू असल्याचे मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक राम करण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी करण्यासाठी ते सोमवारी कोल्हापूर स्थानकावर आले होते.

कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचे काम गती शक्ति योजनेतून केले जाणार आहे. त्याकरिता डीपीआर काढण्याचे काम चालू आहे. डीपीआर मंजूर झाल्यावर निधी उपलब्ध होईल आणि ताबडतोब भूसंपादन प्रक्रियेस सुरवात होईल असे ते यावेळी म्हणालेत.

वैभववाडी-कोल्हापूर मार्गाची पीएम गतीशक्ती अंतर्गत शिफारस करण्यात आली आहे. या मार्गासाठी 3411.17 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. सन 2015 मध्ये वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर 2016 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा केली. त्यानंतर आठ वर्षांपासून कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे हा रेल्वेमार्गाबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक केली जाते. कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. कोकणातील मालही मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

आता गाव खेड्यात सुद्धा मिळणार गारेगार प्रवासाचा अनुभव; ९ मीटरची वातानुकूलित मिडी बस लवकरच एसटीच्या ताफ्यात…

MSRTC News: पूर्वी एसटी म्हंटले की डोळ्यासमोर नकारात्मक चित्र उभे राहायचे. जुनी बस, निखळलेली आसने Seats, काचा फुटलेल्या किंवा धुळीने माखलेल्या खिडक्या गळणारे छत आणि चालताना होणारा कर्णकर्कश आवाज. मात्र आता एसटी आपली ओळख बदलताना दिसत आहे. एसटीच्या ताफ्यात आता वातानुकूलित आणि आरामदायक बस दाखल होत आहेत. मात्र या बसेस लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी चालविण्यात येत होत्या. आता एसटीने एक पाउल पुढे टाकले आहे. आता अशा बसेस ग्रामीण भागात पण चालविण्याचा विचार एसटी प्रशासनाने केला आहे.
एसटीने या करिता ५१५० ई – बसेस साठी मोठे टेंडर काढले आणि हे संपूर्ण टेंडर ओलेक्टरा (ईव्ही ट्रान्स) या कंपनीस देण्यात आले आहे. एकूण ५१५० बसेस असलेल्या या श्रेणीत ९ मीटर लांबीच्या २३५० बसेस आणि १२ मीटर लांबीच्या २८०० बसेस, एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार असून, याबसेसच्या माध्यमातून एसटी एक वेगळी श्रेणी निर्माण करत असल्याचे समजते.
मध्यम लांब पल्ला, शहरी तसेच ग्रामीण भागात या बसेसचे प्रामुख्याने मार्गक्रमण करण्याचे एसटीचे प्रयोजन असून, ३५ + १ (चालक) इतकी (नॉन पुशबॅक) आसन क्षमता असलेली’ओर्डीनरी एसी बस’ अशी एक वेगळी श्रेणी एसटी नव्याने आणू इच्छिते हे बसवरील नव्या रंगसंगतीवरून समजत आहे.सध्या या बसेस ठाण्यात आल्या असून, ट्रायल आणि पासिंग झाल्यावर आपल्या इच्छित मार्गावर लवकर सुरू होतील, अशी आशा आहे.

कसारा रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे दोन डबे घसरले; वाहतूक विस्कळीत

ठाणे : मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ एका पॅसेंजर ट्रेनचे डबे रुळावरून घसरून अपघात झाला आहे.  ही घटना आज रविवार, 10 डिसेंबर संध्याकाळी 6:31 च्या सुमारास घडली आहे. 
“कल्याण स्टेशन रोड एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) आणि इगतपुरी स्टेशन रेल्वे एआरटी (अपघात रिलीफ ट्रेन) मागवण्यात आले आणि अपघातस्थळी हलवण्यात आले,” असे मध्य रेल्वेच्या सीपीआरओने सांगितले. अधिक माहितीची प्रतीक्षा करण्यात येत आहे.  

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search