MSRTC News: पूर्वी एसटी म्हंटले की डोळ्यासमोर नकारात्मक चित्र उभे राहायचे. जुनी बस, निखळलेली आसने Seats, काचा फुटलेल्या किंवा धुळीने माखलेल्या खिडक्या गळणारे छत आणि चालताना होणारा कर्णकर्कश आवाज. मात्र आता एसटी आपली ओळख बदलताना दिसत आहे. एसटीच्या ताफ्यात आता वातानुकूलित आणि आरामदायक बस दाखल होत आहेत. मात्र या बसेस लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी चालविण्यात येत होत्या. आता एसटीने एक पाउल पुढे टाकले आहे. आता अशा बसेस ग्रामीण भागात पण चालविण्याचा विचार एसटी प्रशासनाने केला आहे.
एसटीने या करिता ५१५० ई – बसेस साठी मोठे टेंडर काढले आणि हे संपूर्ण टेंडर ओलेक्टरा (ईव्ही ट्रान्स) या कंपनीस देण्यात आले आहे. एकूण ५१५० बसेस असलेल्या या श्रेणीत ९ मीटर लांबीच्या २३५० बसेस आणि १२ मीटर लांबीच्या २८०० बसेस, एसटी महामंडळ आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार असून, याबसेसच्या माध्यमातून एसटी एक वेगळी श्रेणी निर्माण करत असल्याचे समजते.
मध्यम लांब पल्ला, शहरी तसेच ग्रामीण भागात या बसेसचे प्रामुख्याने मार्गक्रमण करण्याचे एसटीचे प्रयोजन असून, ३५ + १ (चालक) इतकी (नॉन पुशबॅक) आसन क्षमता असलेली’ओर्डीनरी एसी बस’ अशी एक वेगळी श्रेणी एसटी नव्याने आणू इच्छिते हे बसवरील नव्या रंगसंगतीवरून समजत आहे.सध्या या बसेस ठाण्यात आल्या असून, ट्रायल आणि पासिंग झाल्यावर आपल्या इच्छित मार्गावर लवकर सुरू होतील, अशी आशा आहे.

Facebook Comments Box


