Category Archives: रायगड

Mumbai Goa Highway: “अपूर्ण रस्त्यावर पूर्ण टोल वसुली”

   Follow us on        

रायगड, २१ मे २०२६: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चे काम १७-१८ वर्षांपासून रखडले असताना आणि अनेक भाग अजूनही अपूर्ण असताना खारपाडा टोल प्लाझावर टोल वसुली सुरू करण्यात आल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अपूर्ण रस्ते, खड्डे आणि खराब गुणवत्तेमुळे होणारे अपघात या पार्श्वभूमीवर ही टोल वसुली अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

रायगड जिल्ह्यातील खारपाडा टोल प्लाझावर १७ मे २०२६ पासून टोल वसुली सुरू झाली. फास्टॅगद्वारे वाहनांमधून पैसे कापले जाऊ लागले आहेत. मात्र, पेन ते माणगाव, इंदापूर बायपास, उड्डाणपुल, सर्व्हिस रोड्स आणि इतर अनेक महत्त्वाचे भाग अजूनही अपूर्ण आहेत. प्रवाशांना खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यांवरून, डाव्हर्सनमधून आणि अपूर्ण बायपासवरून प्रवास करावा लागत आहे.

अपघातांची मालिकारायगड विभागातील NH-66 वर २०२२ ते २०२४ दरम्यान झालेल्या अपघातांच्या आकडेवारीनुसार अनेक जीव गमावले गेले आहेत. अपूर्ण रस्ते, अचानक डाव्हर्सन, खराब पृष्ठभाग आणि रात्रीच्या वेळी अपुरी प्रकाश व्यवस्था यामुळे अपघात वाढले आहेत. कोकणातील अनेक कुटुंबे या महामार्गामुळे वेदनेत आहेत. गेल्या काही वर्षांत २४०० हून अधिक लोकांचा या महामार्गावर अपघातात मृत्यू झाल्याचे आकडे उपलब्ध आहेत.

रायगड प्रेस क्लबने या टोल वसुलीला “अन्यायकारक” ठरवत त्वरित स्थगित करण्याची मागणी केली आहे. उद्या आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. स्थानिक कार्यकर्ते चैतन्य पाटील यांनी कवींना आवाहन करत कवितेद्वारे या मुद्द्यावर विरोध व्यक्त करण्याचे आवाहन केले आहे. “रस्ता अपूर्ण, तरी टोल पूर्ण?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या कविता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सरकारचे आश्वासन आणि वास्तवकेंद्र आणि राज्य सरकारने महामार्गाचे पूर्ण काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात काम ९३% पूर्ण झाले असल्याचे सांगितले जात असले तरी रायगड आणि रत्नागिरीतील अनेक गंभीर भाग अजूनही बाकी आहेत. आता पूर्णत्व २०२७ पर्यंत ढकलले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रवासी आणि स्थानिक व्यापारी म्हणतात, “प्रथम पूर्ण रस्ता द्या, मग टोल घ्या.” अपूर्ण महामार्गावर पूर्ण टोल आकारणी ही प्रवाशांची लूट असल्याची भावना व्यक्त होत आहे. गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण ठरणार आहे.

कोकणवासीयांकडून आंदोलन, सोशल मीडियावर तीव्र विरोध आणि कविता-प्रतिबंध यांचा मेळ घालून हा मुद्दा अधिक तीव्र होत चालला आहे. NHAI आणि संबंधित विभागाकडून लवकरात लवकर स्पष्टीकरण आणि अपूर्ण काम पूर्ण करण्याची मागणी जोर धरत आहे.


 

 

 

 

 

 

मल्टीमोडल कॉरिडोर की ‘मल्टीमोडल’ लूट? विरार-अलिबागसाठी भारी टोल

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्रातील प्रस्तावित विरार-अलिबाग मल्टीमोडल कॉरिडोरसाठी पूर्ण १२६ किलोमीटर अंतरासाठी ₹७६५ इतका टोल आकारण्याच्या बातम्या माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू झाली आहे. इन्फ्रा न्यूज इंडियाने यावर प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे की, प्रति किलोमीटर ₹६.०७ इतका टोल दर अत्यंत जास्त आहे. प्रकल्प अद्याप सुरूही झालेला नसताना इतका उच्च दर निश्चित करणे योग्य नाही, असे मत व्यक्त करत MSRDCकडून अधिकृत स्पष्टीकरणाची मागणी करण्यात आली आहे.

१२६ किलोमीटर लांबीचा मल्टीमोडल कॉरिडोर विरार ते अलिबाग दरम्यान थाणे आणि नवी मुंबई मार्गे जोडणारा असेल. यात रस्ता, रेल्वे आणि बससाठी वेगवेगळ्या समर्पित लेन असतील. भूमी संपादन प्रक्रिया सुरू असून, BOT मॉडेलवर टेंडर प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्प २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. मात्र, अद्याप बांधकाम सुरू नसताना टोल दर ₹७६५ ते ₹१००० पर्यंत असल्याच्या बातम्यांमुळे लोक संतापले आहेत.

काहींनी दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेचा उल्लेख करत याची तुलना केली आहे.नागरिक आणि सोशल मीडियावर या उच्च टोल दरावर टीका होत आहे. MSRDCने याबाबत लवकरात लवकर अधिकृत माहिती जाहीर करावी, अशी मागणी जोर धरत आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे.

 

 

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यात आज पावसाचा इशारा

   Follow us on        

मुंबई: मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या ताज्या माहितीनुसार, मुंबईसह लगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील ३ तासांत हवामानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या पाच जिल्ह्यांमधील काही भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अचानक उद्भवलेल्या या बदलामुळे नागरिकांनी आपल्या प्रवासाचे आणि कामाचे नियोजन काळजीपूर्वक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​पावसाच्या सरींसोबतच या भागात सोसाट्याचा वारा वाहण्याची दाट शक्यता आहे. तसेच, काही ठिकाणी जोरदार मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटही होईल, असे हवामान अंदाजात नमूद करण्यात आले आहे. विशेषतः किनारपट्टीलगतच्या आणि ग्रामीण भागांत वाऱ्याचा वेग अधिक राहण्याची शक्यता असल्याने घराबाहेर पडताना सतर्क राहणे आवश्यक आहे.

​प्रशासनाने नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून विजा चमकत असताना झाडाखाली किंवा मोकळ्या मैदानात उभे न राहण्याचा सल्ला दिला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील दुर्गम भागांत पावसाचा आणि विजांचा जोर अधिक राहू शकतो. बदलत्या हवामानामुळे तापमानात थोडी घट होण्याची शक्यता असली, तरी नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व आवश्यक खबरदारी घ्यावी, असे मंत्रालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवासी लिफ्ट कोसळली

   Follow us on        

नवी मुंबई: पनवेल रेल्वे स्थानकावर सोमवारी सकाळी एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरील एका लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड होऊन ती अचानक खाली कोसळली. या घटनेमुळे स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. ज्यावेळी ही लिफ्ट कोसळली, तेव्हा त्यामध्ये चार प्रवासी अडकले होते. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

​घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, पोलीस आणि आपत्कालीन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बचाव पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत लिफ्टमध्ये अडकलेल्या चारही प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. सुरक्षित बाहेर पडल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही, ही दिलासादायक बाब ठरली.

​मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की देखभालीतील निष्काळजीपणामुळे, याचा तपास केला जाणार आहे. पनवेल रेल्वे स्थानक हे हार्बर आणि मध्य रेल्वेवरील एक महत्त्वाचे जंक्शन असून, आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाशी ते जोडले जाणार आहे. अशा गजबजलेल्या स्थानकावर झालेल्या या अपघातामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, रेल्वे प्रशासनाने लिफ्ट आणि इतर सुविधांची कडक तपासणी करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

अटल सेतूचा विस्तार अलिबागपर्यंत होणार; मुंबई – अलिबाग अंतर दीड तासांवर येणार

   Follow us on        

​नवी मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जवळ आणणाऱ्या ‘अटल सेतू’चा विस्तार आता थेट अलिबागपर्यंत करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सिडकोने हाती घेतला आहे. या प्रकल्पामुळे सध्या रस्ते मार्गाने मुंबई ते अलिबाग जाण्यासाठी लागणारा ४ ते ५ तासांचा वेळ कमी होऊन अवघ्या दीड तासात हे अंतर पार करता येणार आहे. या कनेक्टिव्हिटीमुळे जेएनपीटी (JNPT) आणि नियोजित नवी मुंबई विमानतळ थेट अलिबागशी जोडले जाणार असून, प्रवाशांना आणि लॉजिस्टिक क्षेत्राला याचा मोठा फायदा होणार आहे.

​सध्या उलवे भागात ७ किमी लांबीचा सहा पदरी (सिक्स लेन) कोस्टल रोड तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या मार्गाचा पुढील टप्पा द्रोणागिरीमार्गे रेवस-करंजा खाडी पुलाशी जोडण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर एक अखंड कोस्टल कॉरिडॉर तयार होईल, ज्यामुळे नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत जलद कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पासाठी अंदाजे १६०० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित असून, विस्तारासाठी २५०० ते ४००० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

​पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी या प्रकल्पात विशेष काळजी घेण्यात आली आहे. खारफुटीच्या (मॅंग्रोव्हज) जंगलांचे नुकसान टाळण्यासाठी काही भागांत ‘एलिव्हेटेड’ रस्ता उभारण्यात येणार आहे. स्टिल्ट्सवर हा रस्ता बांधल्यामुळे जमिनीवरील पर्यावरणाची हानी टाळता येईल. या मार्गामुळे पाम बीच रोडसह इतर मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि अटल सेतूपासून द्रोणागिरीपर्यंतचा प्रवास ‘सिग्नलमुक्त’ झाल्याने प्रवाशांचे २० ते ३० मिनिटे वाचणार आहेत.

​या प्रकल्पामुळे केवळ वेळच वाचणार नाही, तर रेवस-करंजा पुलामुळे कोकण भाग थेट रस्त्याने जोडला जाईल. परिणामी, सध्याच्या फेरीबोटींवरील ताण कमी होईल आणि अलिबागसह संपूर्ण कोकण पट्ट्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळेल.

रोहा-दिवा मेमू गाड्यांच्या विलंबाने प्रवासी हैराण; ‘रोहा रेल्वे प्रवासी समिती’ आक्रमक

   Follow us on        

रोहा (प्रतिनिधी):रोहा-दिवा-रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू (MEMU) गाड्यांच्या सततच्या विलंबामुळे चाकरमानी आणि विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समिती’ने रेल्वे प्रशासनाला साकडे घातले असून, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आणि पनवेल स्टेशन मास्तरांना लेखी तक्रार सादर केली आहे.

नेमकी अडचण काय?

गेल्या अनेक आठवड्यांपासून ६१०१०/६१०११, ६१०१५/६१०१६, आणि ६१०१२/६१०१३ या गाड्या नियमितपणे विलंबाने धावत आहेत. रोहा आणि दिवा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी या गाड्या जीवनवाहिनी आहेत.  महत्त्वाच्या भेटी आणि कामाचे वेळापत्रक कोलमडत आहे.

मात्र गाड्यांच्या सततच्या अनिश्चिततेमुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नोकरीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पोहोचता न आल्याने कामाचे मोठे नुकसान होत असून, अनेकांच्या पगारावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. वेळेत गंतव्यस्थानी न पोहोचल्यामुळे महत्त्वाच्या बैठका, अपॉइंटमेंट्स तसेच कामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांना मानसिक तणाव आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने रेल्वे प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत. गाड्या उशिरा धावण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, संबंधित गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची खात्री द्यावी तसेच प्रवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

या निवेदनाची प्रत पनवेल स्टेशन मास्तरांनी स्वीकारली असून, त्यावर रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही प्रवाशांकडून मिळत आहेत.

रोहा-पनवेल रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; ‘रेल वन’ ॲपवर आता पास सुविधेचा मार्ग मोकळा

   Follow us on        

रोहा रेल्वे प्रवासी समितीच्या पाठपुराव्याला यश; प्रवाशांचा वेळ आणि त्रास वाचणार

रोहा: रोहा आणि पनवेल दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला ‘रेल वन’ (Rail ONE) मोबाईल ॲपवरून रेल्वे पास काढण्याचा प्रश्न अखेर सुटला आहे. रोहा रेल्वे प्रवासी समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून, आता प्रवाशांना घरबसल्या आपला रेल्वे पास नूतनीकरण करता येणार आहे.

नेमका प्रश्न काय होता?

मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या सीमेवर रोहा स्थानक येत असल्याने तांत्रिक कारणांमुळे ‘रेल वन’ आणि इतर डिजिटल माध्यमांतून पास काढताना प्रवाशांना अनेक अडचणी येत होत्या. अनेकदा रोहा ते पनवेल हा मार्ग ॲपवर दिसत नसे किंवा पेमेंटमध्ये तांत्रिक अडथळे येत. परिणामी, प्रवाशांना तासन् तास तिकीट खिडकीवर रांगेत उभे राहावे लागत होते.

प्रवासी समितीचा लढा

या त्रासातून सुटका मिळावी यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समितीने आक्रमक पवित्रा घेतला होता. या पार्श्वभूमीवर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापकांची वारंवार भेट घेऊन प्रवाशांच्या समस्या थेट मांडल्या. डिजिटल इंडियाच्या युगातही ग्रामीण भागातील प्रवाशांना का डावलले जात आहे, असा थेट सवाल उपस्थित करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष या गंभीर मुद्द्याकडे वेधण्यात आले. तसेच, तिकीट प्रणालीतील तांत्रिक त्रुटी आणि त्यातून होणारा अन्याय स्पष्ट करणारे पुरावे सादर करत रेल्वे प्रशासनाशी सविस्तर पत्रव्यवहारही करण्यात आला, ज्यामुळे या प्रश्नावर ठोस कारवाईची मागणी जोरकसपणे करण्यात आली.

प्रवाशांना होणारे फायदे

या नव्या सुविधेमुळे प्रवाशांना अनेक प्रकारचे फायदे मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळेची मोठी बचत होणार असून तिकीट खिडकीवरील लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. तसेच कॅशलेस व्यवहारामुळे सुट्या पैशांच्या कटकटीतून प्रवाशांची कायमची मुक्तता होईल. याशिवाय मोबाईलवरच प्रवास पास उपलब्ध असल्याने प्रवासादरम्यान प्रत्यक्ष पास हरवण्याची भीतीही उरणार नाही, त्यामुळे प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.

“प्रवाशांची गैरसोय दूर करणे हेच आमचे मुख्य ध्येय होते. रेल्वे प्रशासनाने आमच्या मागणीची दखल घेऊन तांत्रिक अडथळे दूर केले आहेत.” – फैसल अधिकारी/ गणेश मासक

कोकण रेल्वे मार्गावर धावणार नवीन अमरावती – वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वे मार्गावर नवीन अमरावती ते कोकण रेल्वेच्या वीर स्थानका दरम्यान एक विशेष अनारक्षित गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.

०११०१ नवीन अमरावती – वीर अनारक्षित विशेष गाडी गुरुवार दि. ६ फेब्रुवारी, २०२५ दुपारी १५:३० ला नवीन अमरावती येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:४५ ला वीर येथे पोहोचेल.

०११०२ वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी मंगळवार दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रात्री २२:०० ला वीर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० ला नवी अमरावती येथे पोहोचेल.

या गाडीला बडनेरा, मुर्तुजापूर,अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा येथे थांबे देण्यात आले आहेत.

ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असून तिला १६ अनारक्षित डबे आणि २ एसएलआर डबे जोडण्यात येणार आहेत.

रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्यासाठी मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक पार

   Follow us on        

मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.

याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.

त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार  सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.

माणगाव रेल्वे स्थानकावर मराठी भाषेची ‘हत्या’

   Follow us on        
रायगड: अलीकडेच भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. मात्र याच भाषेचा चक्क महाराष्ट्रातच अपमान होण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने वापरून तिची ‘हत्या’ करण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराकडून माणगाव रेल्वे स्थानकावर घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम  कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव रेल्वे स्थानकावरही हे काम चालू आहे. मात्र या सुशोभीकरणादरम्यान या ठिकाणी वापरण्यात आलेल्या मराठी भाषेमध्ये कंत्राटदाराकडून काही अक्षम्य अशा चुका झाल्या आहेत.  “स्वर्ग कोकणाचा मातीवर”, “कोकणाचा निसर्गात वंदे भारत” अशी चुकीची वाक्ये इथे वापरण्यात आली आहेत. तर येथे लावण्यात एका फलकावर काही स्थानकांची नावे मराठीत लिहिण्यात चुका झाल्या आहेत. जसे कि कुडाळच्या जागी “कुंडल”, माणगाव च्या जागी  “मांणगाव”  इत्यादी
रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी X च्या माध्यमातून या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या असून त्या  लवकरात लवकर सुधारण्यात याव्यात अशी मागणी  केली आहे.
 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search