गरीबीतील पंचपक्वान्ने

           अलिकडेच म्हणजे २०२१ च्या दिवाळीत गुजरातची छोटेखानी ट्रिप झाली. रात्री पावणे-अकराच्या दरम्यान अहमदाबाद रेल्वे स्टेशनवरुन हॉटेलकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा सर्व दुकाने बंद असलेली दिसली. अस्मादिकांना लगेच आमच्या वेंगुर्ल्याची आठवण झाली. वेंगुर्ल्यातसुध्दा रात्री साडेनऊ दहानंतर सर्व दुकाने बंद असतात. तशी आमची चर्चाही रंगली. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा-साडेदहाच्या दरम्याने सन टेम्पलच्या दिशेने निघालो. रात्री आम्हाला हॉटेलवर सोडण्यासाठी आलेली कार आज नव्हती आणि ड्रायव्हरही वेगळा होता. आजचा ड्रायव्हर गप्पीष्ट होता. माझं लक्ष्य पुन्हा पुन्हा रस्त्याच्या दुतर्फा बंद असलेल्या दुकानाकडे जात होते. अकरा वाजत आले तरी अजूनही अहमदाबाद सारख्या शहरातील दुकाने उघडली नव्हती. काल रात्री दुकाने बंद होती आजही बंद, त्यामुळे न राहवून मी ड्रायव्हरकडे चौकशी केली, ‘अरे तुमच्या अहमदाबाद मध्ये लोक एवढी आळशी कशी काय? अकरा वाजले तरी दुकाने उघडली नाहीत’. अर्थात हा सर्व संवाद हिंदीतच होता, पण मला लिहायला सोप जावं म्हणून मराठीत लिहीतोय. मला माहित आहे ‘तुमको हिंदी भाषा समजने में आती है’. असो त्याने दिलेल्या उत्तराने मी उडालोच. नाही… नाही.. सकाळी नाष्ट्यात ढोकळा नव्हता. एक म्हणायची पध्दत असते म्हणून मी उडालो असे लिहीले आहे.
 
              साहेब आता चार दिवस अहमदाबाद मधील दुकाने बंदच राहणार. गाडी आता अहमदाबाद शहरातून बाहेर पडत होती. आम्ही चार दिवस अहमदाबादमध्ये फिरायला आलो आणि दुकाने बंद यामुळे थोडा निराश झालो पण मनातल्या मनात बराच खूषही झालो, अहमदाबाद मधील दुकाने बंद म्हणजे सौ ला शॉपींग करता येणार नाही त्यामुळे दौऱ्याच्या सुरुवातीलाच माझी पैशाची बचत झाली होती. ‘कशासाठी बंद, काही राजकीय कारण आहे का?’ माझी प्रश्नाची सरबत्ती सुरुच होती. ‘नाही दिवाळीसाठी सगळे व्यापारी दुकाने/धंदे बंद करुन बाहेर फिरायला गेलेत’. अरे हे काय नवीनच ऐकत होतो मी, मुंबईत गुजराती लोक धंद्याला प्राधान्य देतात. दिवाळीसारख्या सणात सर्वात मोठी कमाई असते आणि तोच गुजराती त्यांच्याच राज्यात ऐन दिवाळीत सर्व दुकाने बंद करुन मस्तपैकी फिरायला गेला होता. ‘साहेब, दिवाळीत दारु मिळत नाही ना, म्हणून सर्व लोकं फक्त दारु पिण्यासाठी राजस्थानमध्ये फिरायला जातात’. ड्रायव्हर सांगत होता पण मला दारु हे कारण काही पटलं नाही, मी त्याचा मुद्दा खोडून काढायचा प्रयत्न केला. ‘अरे गुजरातमध्ये तर एरव्हीही दारु बंदच असते ना? मग काय फरक पडतोय’, ड्रायव्हर आपले म्हणने काही सोडत नव्हता, ‘साहेब एरव्ही चोरुन का होईना दारु मिळते पण दिवाळीत दारु मिळतच नाही’. तो आपले म्हणने मला पटवून द्यायचा प्रयत्न करत होता. (ड्रायव्हर राजस्थानी होता) असो, पण अहमदाबाद मधील दुकाने दिवाळीच्या चार दिवसात बंद होती हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. अपवाद फक्त रेस्टॉरंटचा आणि काही निवडक स्ट्रीट फुडचा.
 
               त्याचं झालं असं की जीथे जातो तेथील लोकल फुडचा आस्वाद घेण्यावर माझा भर असतो. (परदेशात हे तेवढसं शक्य होत नाही.) आणि मी ज्या हॉटेलमध्ये वास्तव्यास होतो, तीथे गुजराती फुड एखाद दुसरा पदार्थाचा अपवाद वगळता उपलब्ध नव्हते. दुपारच्या वेळी एका लोकल ढाब्यावर जेवायला गेलो, भरपूरवेळ वेटींगवर राहील्यावर आमचा नंबर लागला. सर्वच पर्यटन स्थळावर व हॉटेलवर पर्यटकांची गर्दी होती. त्यात लोकल गुजराती लोकांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता. (त्यामुळे अहमदाबादमधील व्यापारी ऐन दिवाळीत दुकाने बंद करुन बाहेर फिरायला गेले त्यामागचे कारण केवळ दारु आहे, या ड्रायव्हरच्या विधानात तेवढंस तथ्य नाही याची खात्री मला ही गर्दी बघून पटू लागली होती.) या ढाब्यावरील जेवणाची चव मला तेवढीशी आवडली नव्हती, त्यामुळे दुसऱ्या दिवशी दुपारी आमच्या ड्रायव्हरने अहमदाबाद मधील गुजराती थालीसाठी प्रसिध्द असलेल्या सासूजी या हॉटेलमध्ये जेवणासाठी नेले. अश्या प्रकारच्या गुजराती थाळी मुंबईतही बऱ्याच प्रसिध्द आहेत. पण अहमदाबाद मधील या हॉटेलमधील गुजराती थाळी ची सर काय त्या थाळींना नव्हती; हे अस्मादिकांचे व्यक्तीगत मत आहे.
 
             अनलिमिटेड असलेल्या या थाळीत नाना विविध पदार्थांची रेलचेल होती. (याच्यापेक्षा जास्त पदार्थाची संख्या असलेल्या बुफे जेवणांचा मी आस्वाद घेतला आहे, पण या लेखाचा विषय सासूजी थाळी मध्ये जेवणाचा आस्वाद घेताना सूचला म्हणून हा सगळा वरील लेखन प्रपंच. मात्र प्रत्यक्षात लिखाण उतरवायला अंमळ उशीर झालय, याबद्दल क्षमस्व) पोळी कुठल्या भाजी बरोबर खाऊ याची निवड करत असताना मला पटकन नजरेसमोर तरळून गेली ती लहानपणी खाल्लेली कांद्याची भाजी. हो हो बरोबर वाचताय तुम्ही, कुठेही चुकून एक्स्ट्रा काना-मात्रा टाईप नाही झालाय. आजकाल कांद्याची भाजी दुर्मिळ झालीय. कांद्याच्या पातीची नव्हे बरं का साध्या कांद्याच्या भाजी बद्दलच लिहीतोच मी. आमच्या बालपणी अनेकदा भाजीला काहीच नसेल तर कांदा, मीठ, मिरचीपुड टाकून बनवलेली भाजी चपातीबरोबर असायची. आता सगळीकडे थोड्या फार प्रमाणात का होईना समृध्दी आल्याने नुसत्या कांद्याची भाजी बनवलेली माझ्या तरी अलिकडे ऐकीवात नाही आले. सौ शी चर्चा करताना तीची आईसुध्दा तीच्या बालपणी कांद्याची भाजी बनवत होती हे कळले. ही भाजी फार काही चवीष्ट होती असे मी म्हणत नाही, पण त्यावेळी भाकरी/पोळी ला साथ देण्यासाठी अनेकदा या कांद्याच्या भाजीने साथ दिली होती हे मात्र नक्की. आता एक गोड आठवण म्हणून कांद्याची भाजी बनवायलो गेलो तर वाढलेले कांद्याचे भाव बघून त्यात अंडा टाकून भूर्जी बनवलेलीच बरी असे वाटते.
 
             कांद्याच्या भाजीचा विषय झाल्यावर पिठीला डावलणे अशक्य आहे. साधारणत: पंचवीस वर्षापूर्वी अस्मादिकांना मुंबईत एका मालवणी माणसाच्या घरी जाण्याचा योग आला होता. एकंदर घर-दार पाहता यजमानांची आर्थिक समृध्दी ओसंडून वाहत होती. त्यांनी दुपारी जेवूणच जा असा आग्रह धरला. अस्मादिकांनी अद्याप गृहस्थाश्रमाला सुरुवात केली नव्हती. म्हटलं बाहेर हॉटेलातच जेवायला जायचे आहे तर आज अनायसे घरगुती जेवणाचा बेत आहे तर का टाळा. बरं त्यांच्या आग्रहात एक वाक्य पुन्हा पुन्हा हायलाईट होत होते, ‘तुमचा एकंदर मालवणी असल्याचा अभिमान पाहूण आम्ही तुमच्यासाठी खास बेत बनवला आहे’.
 
           बरं त्यादिवशी रविवारही होता. अस्मादिकांना जेवणाचा आग्रह मोडता आला नाही. पाटावर (डायनिंग टेबल होते, पण पुन्हा एकदा म्हणायची पध्दत म्हणून पाटावर लिहीले आहे) बसल्यावर काही वेळातच जेवणाचे ताट समोर आले. ताटातील पदार्थ पाहून अस्मादिकांच्या डोळ्यासमोर दिवसाढवळ्या तारे चमकू लागले. ताटात गरमा-गरमा भात आणि पिठी एवढे दोनच पदार्थ होते. मी पक्का मालवणी असलो तरी पिठी माझ्या नावडती. बालपणातच पिठी-भाताचा ओवरडोस झाल्याने हा पदार्थ माझा नावडता झाला होता. पण चेहऱ्यावर शक्य तेवढा आनंद ठेवत मी ताटातले संपवले, माझे जेवण एवढेच आहे असं सांगूण त्यांचा आग्रह नाकारला आणि रुमवर मार्गस्थ झालो. सुट्टीत वेंगुर्ल्याला गेल्यावर हा किस्सा भावंडाना सांगितला असता, माझे पिठी-भातावरील ‘प्रेम’ माहित असल्याने सर्व गडाबडा लोळत हसत होते.
 
             बरं अस्मादिकांची सोयरीक जुळली तिला कारणही पिठी होते, हे लग्नांतर एक-दोन महिन्यांनी कळले. जेव्हा लग्न होऊन नवीन सूनबाई घरी आली तेंव्हा माझ्या बहिणींनी अस्मादिकांच्या सौ ना पहिला पाठ दिला, ‘आमच्या संजूक कायपण रांधून घाल हां, पण पिठी-भात करुन घालू नको’. सौ बिचारी गप्पच झाली. तीने अस्मादिकांना लग्नासाठी होकार कळवला होता तो माझी सरकारी नोकरी बघून नव्हे तर मी पक्का मालवणी माणूस आहे म्हणून. ड्यूटीवरुन थकून घरी आल्यावर नवऱ्याला रोज पंचपक्वान्न करुन घालायला नको, पिठी-भात रांधून घातला की झालं. पण अस्मादिकांना पिठी आवडत नाही, हे ऐकून तीचा बिचारीचा भ्रम निरास झाला होता. पण असो आमच्या सुपूत्राला पिठी-भात खूप आवडतो, त्यामुळे मी दौऱ्यावर गेल्यावर दोघांचा पिठी-भाताचा मस्त बेत जमतो.
               गरीबीतील पंचपक्वान्न म्हटल्यावर गोड पदार्थ हवाच. गोड-धोडाची पूर्तता गूळचूणाने होते. महिन्यातून एकदा येणाऱ्या संकष्टीचा उपवास म्हणजे एकवेळेच का होईना ताजे जेवण जेवण्याचा योग. दाळ-भात आणि तिटकी (म्हणजे गवार) ची भाजी, उपवास सोडताना बरेचवेळा हेच जेवण असायचे. मग बाप्पाला मोदक पाहिजेच. दर संकष्टीला मोदकाची चंगळ काय आम्हाला परवडायची नाही. मग छोट्या वाटीत गूळ-चूणाचा नैवद्य दाखवला जायचा. म्हणायला गूळ-चूण पण बरेचदा गूळ नसायचेच. गुळा ऐवजी रेशनवर मिळणारी लेवी साखर आणि थोडेसे किसलेले ताजे खोबरे. बाप्पा बिचारा आमच्या या मोदकाने तृप्त होऊन जायचा; आणि उपवास करणाऱ्यांमध्ये मी सर्वात छोटा असल्याने नैवद्याचे ताट अस्मादिकांच्या नशीबी असायचे.
 
            कुपनावर (रेशनवर) मिळणाऱ्या तांदुळाने मात्र गरीबीतील पंचपक्वान्नाने बऱ्याच पदार्थात मानाचे स्थान पटकावले होते. शिळ्या-भातावर तेल, मिठ आणि तिखट टाकून कालवून पोट पूजा होऊन जाते. तोच तांदूळ पाणी जास्त टाकून शिजवायचा, अगदी नरम नरम भात त्यात मीठ टाकले की आटवाल झाले तयार. सोबत लोणच्याची एकच फोड असली तर स्वर्ग सुखच. शिवाय चूलीवर भात शिजवताना, टोपाच्या बाजूने करपलेला भात, भाकरी म्हणून खाण्यासाठी उड्या पडायच्यात. पेजेच पौष्टीक म्हणून स्थान मात्र अद्यापही अबाधित आहे. 
               अजून बरेच काही लिहीण्यासारखे आहे. अगदी कधीतरी मस्त तांब्याभर पाणी पिऊन गाढ झोपी जाण्याचे स्वर्गसूखही आपण अनुभवले आहेच. अजूनही बरेच गरीबीतल्या पंचपक्वान्नाचा आठवणींचा आस्वाद घेण्यासारखा आहे. पण नंतर कधीतरी. म्हणतात प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं. अस्मादिकांचे म्हणने मात्र थोडसं वेगळे आहे, प्रेमाचे माहित नाही पण गरीबीचे अनुभव मात्र सेम असतात.
 
लेखक –  संजय गोविंद घोगळे
संपर्क – ८६५५१७८२४७
 
Photos credits :
www.marathi.momspresso.com
स्वर्गाहुन सुंदर आपलं कोकण (FB group)
www.sriramgawas.blogspot.com
Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search