तळकोकणातील सांगेली गावात शिमगा जरा वेगळया परंपरेने साजरा केला जातो. काय आहे हे वेगळेपण हे पुढील मुद्दे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल.
१. येथे शिमगा सणाची सुरवात आदल्या रात्री पासून सुरू होते. ह्या सणाला गिरोबा उत्सव असे पण म्हंटले जाते. गावातील एक मोठे आणि सरळ फणसाचे झाड देवासाठी निवडून त्याला तोडून उंच देव महादेवाच्या पिंडीचा आकार देऊन त्याची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य ग्रामदेवता म्हणून केली जाते.
२. खरेतर महाशिवरात्रीला देवासाठी फणसाचे झाड निवडले जाते. महाशिवरात्रीला येथे गाव आणि मानकरी जमा होतात आणि देव कोठे काढायचा हे प्रथेप्रमाणे ठरवितात.
३. ज्या वाडीतील झाड निवडायचे आहे त्याठिकाणी पाच मानकरी त्या झाडाला हात लावतात व त्यांनतर हर हर महादेव असा जयघोष करतात. या दिवसापासून गिरोबा उत्सवापर्यंत झाडाची पूजाअर्चा करण्याची प्रथा आहे.
४. होळीच्या आदल्या दिवशी झाडाला तोडून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सुतार ह्या झाडाला सुंदर आकार देतात. त्यानंतर गावातील तरुण स्वयंपूर्तीने खांदा लावून देव देवळात भव्य मिरवणुकीने नेतात. एकूण १४ फुटी असलेला देव जमिनीखाली ७ फूट आणि वर ७ फूट उभारला जातो. ह्या सोहळ्याला जिल्ह्यातीलच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील, तसेच गोवा आणि कर्नाटकातून भक्त उपस्थिती दर्शवितात.
५. प्राणप्रतिष्ठा केलेल्या देवाची ग्रामदेवता म्हणुन वर्षभर पूजा अर्चा केली जाते. अशाप्रकारे झाडापासून बनवलेले ग्रामदैवत असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. त्याचप्रमाणे फणसाच्या झाडापासून लाकडी पिंडी बनवून पुजणारे हे एकमेव गाव आहे.
६. प्रत्येक शिमगा सणाला नवीन देवांची(पिंडीची) प्राणप्रतिष्ठा करून जुने देव मंदिराच्या आवारात एका जागेत ठेवले जातात जागेत ठेवले जातात, त्या जागेस खुट्याचा चाळा असे म्हणतात. असे बोलतात की दैवी चमत्काराने ह्या जुन्या देवांची संख्या त्यामध्ये दरवर्षी नवीन देवाची भर घातली तरी २१ च राहते.

७. अजून एक वैशिष्टय म्हणजे हे गिरोबा फणसाचे झाड देवळात पाषाण म्हणून पुजण्यात येते त्यापासून पाळेमुळे खड्डयात मिळतात ती औषधी असतात असे जाणकार सांगतात.

८. या गावात फणसाच्या झाडाला देवाचे स्थान आहे. येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडासमोर नतमस्तक होतात. आपल्या परसातील फणसाचे झाड देवासाठी वापरले गेले तर त्याला ते पुण्य मानतात. त्यासाठी ते फणसाच्या झाडाची लागवड आणि जतन करताना दिसतात.
टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.
तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.
https://kokanai.in/2022/03/16/shimga/
कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box