खेकडा – भजी

हवामान खात्याने कितीही बोंबलून सांगितले तरी, जो पर्यंत गरम गरम कांदा भजी खावीशी वाटत नाही तोपर्यंत मान्सूनला आरंभ झाला आहे असे म्हणता येणार नाही.  हे कुठल्या नियमाच्या पुस्तकात लिहीलेले नाही, पण मराठी माणसाचा ठरलेला शिरस्ता. उकाड्याने हैराण करुन सोडल्यावर निसर्ग पावसाचा शिडकावा सुरु करतो, हळूहळू मान्सून स्थिरावतो मग काही दिवस तो मुक्कामाला राहतो. या दरवर्षीच्या पाहुण्याला मग गरमा गरमा कांदा-भजी चा पाहुणचार हा ठरलेलाच. निमित्त पावसाचे पण चोचले मात्र आपल्या जिभेचे आपण पुरवतो.
गरम गरम कांदा भजी सोबत वाफाळता चहा आणि बाहेर बेभान होऊन बरसणारा पाऊस. हा योग जर शनिवार-रविवार वा सुट्टीच्या दिवशी जुळून आला तर मग काही बघायलाच नको. नाही म्हणायला मुंबई सारख्या मेट्रोसिटी मध्ये प्रत्येक पावसाळा एक हक्काची सुट्टी देऊन जातोच. सकाळी लोकल ट्रेन वगैरे दळणवळणांच्या साधनांनी मान टाकली की सुरुवातीला चाकरमानी बीएमसी वा सरकारच्या नावाने बोट मोडणार, पण काही वेळातच हे सगळे विसरुन अचानक मिळालेल्या या सुट्टीचा आस्वाद घेण्यासाठी प्लॅनींग सुरु करणार, हे नेहमीचेच. बाहेर कंबरभर पाण्यातून कुठे चिकण-मटणाचे शॉप सुरु आहे का याची शोध मोहीम फत्ते करुन किलोभर तरी वशाट घरी येतेच. चिकन-मटण वगैर वगैर…. आता यातील ‘वगैरे-वगैरे’ चा अर्थ तुम्हाला कळला असणारच. जे ‘वगैरे वगैरे’ चे शौकिन असतात ते आपली सोय बरोबर करतातच म्हणा.
पावसात भिजणे, चिकन-मटण, ‘वगैरे-वगैरे’ हे ज्याची त्याची आवड त्याप्रमाणे बेत असतील. पण शाकाहारी-मांसाहारी लोकांचा कॉमन प्लॅन म्हणजे कांदा-भजी आणि वाफाळता चहा. नाही म्हणायला घरात बेसण, कांदा, मिरची, तेल हे पदार्थ असतातच, त्यामुळे कांदा-भजी बनायला काही वेळ लागत नाही. यावर्षी तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठलाय पण त्यामुळे कांदा भजीच्या बेतामध्ये काही विघ्न येईल असे काही वाटत नाही. नाही म्हणायला यंदा मान्सूनचे आगमान जरा लांबले आहेच. कदाचित प्रसार माध्यमात तेलाचे दर लवकरच उतरतील या बातमीमुळे मान्सून जरा विलंब करत असावा. पण मान्सूना तू काय तेलाच्या दराची काळजी करु नको रे बाबा, तू कोसळायला लागलास की तेलाचे वाढलेल्या भावाची फिकीर करण्याचा करंटेपणा कुणी करत बसणार नाही. गरम गरम कांदा भजी, सोबत तळलेली मिरची आणि वाफाळता चहा हा फस्सक्लास बेत यंदाही आपला शिरस्ता तोडणार नाही.
गृहीणींनो माफ करा, पण तुम्हीही हे मान्य करालच म्हणा, बाहेर टपरीवर मिळणाऱ्या कांदा भजीची सर काही घरच्या भजीला येत नाही. मुसळधार पावसात कुठेतरी आडोशाला सुरु असणारी टपरी चालू दिसली की आनंद गगनात मावेनासा होतो बघा. तीथे आपल्या सारखे शौकिन आधीच जाऊन पोहचलेले असतात, ओ मावशी… ओ दादा… असा आजर्व केल्यानंतर आणि अर्धातासाच्या प्रतिक्षेनंतर एक प्लेट हातात विसावते. सोबत हिरवी मिरची, लाल-हीरवी चटणी, कांद्याची फोड आणि इतर ग्राहकांचे धक्के खात डिश कधी फस्त होते ह कळतच नाही. तेलकट हात ढुंगनाला पुसून पेमेंटची कार्यवाही पूर्ण करता करता.. बायको-पोरांची आठवण  होते, मग भजीच्या दोन पुड्या घरीही पोहचतात.
भजी हा बाराही महिने महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यात मिळणारा पदार्थ. पावसाळ्यात याचे महात्म्य जरी वाढत असलं तरी एरव्हीही भज्यांचा फडशा पाडणे चालूच असते. मुंबईत फोर्ट भागात युनिव्हर्सिटी भजी फेमस. दिवसभर बटाटा वड्या सोबतच कांदा भजी व बटाटा भजी कढईतून परातीत आणि परातीतून गिऱ्हाईकांच्या प्लेट मध्ये अविश्रांत प्रवास सुरुच असतो. 1996 मध्ये मुंबईत नोकरीनिमित्त स्थाईक झाल्यावर ऑफिसच्या सहकाऱ्यांकडून या भजीचा महिमा कळला. आपण ज्या विद्यापिठातून पदवी घेतली ते विद्यापिठ आपल्या ऑफिसच्या जवळच आहे हे कळण्या अगोदर इथली भजी प्रसिध्द असल्याचे कळले. माझे मुंबईतल्या कारकिर्दीतले पहिले ऑफिस फोर्टमध्ये हुतात्मा चौकात. या हुतात्मा चौकातच प्याओच्या शेजारी दोन भजीचे स्टॉल होते. डोक्यावर टोपी, पांढरा सदरा आणि लेंगा असा अगदी टीपिकल मराठी वेष असलेला भजीवाला, ज्याचे नाव जाणून घ्यायचा मी कधीच प्रयत्न केला नाही, पण मुंबईतील सुरुवातीची तब्बल दोन वर्षे माझ्या नाष्ट्याची व्यवस्था करत होता. दिड-दोन रुपयात गरमा गरम भजी, सोबत गोड-तिखट आणि लाल चटणी असा मस्त बेत असायचा. एका प्लेटमध्ये खोबऱ्याचे तुकटेही ठेवलेले असायचेत. एक प्लेट भजी व दोन पाव साठी दोन भजी-पाव पेक्षा जास्त पैसे मोजावे लागता हे मध्यमवर्गीयांचे गणित मलाही माहित असल्याने एक भजीपाव संपला की दुसऱ्याची ऑर्डर द्यायची, दोन्ही भजी-पाव संपवून तीथेच प्याओचे थंडगार पानी पिऊन स्वारी जवळच असलेल्या आपल्या कार्यालयात जाऊन विसावायची. 
शिवडी स्टेशनच्या बाहेर पण मस्त भजी-पाव मिळायचा, कदाचित अजूनही मिळत असेल पण गेली कित्येक वर्षे त्या भागात जाणे झाले नाही. नवी मुंबईत मानसरोवर स्टेशनच्या बाहेर मोटर बाईक पार्किंगच्या बाजूला एक हातगाडी उभी असायची. या ताईंच्या हातच्या भजी-पावाचा मोह मला काही आवरता येत नसे. ‘संजू वजन प्रमाणाच्या बाहेर गेलाहा, आता भजी-पाव वगैर सगळाच बंद’…. असं व्हिटी स्टेशनपासून स्वत:लाच समजावणारा मी, आज त्या गाडीकडे ढुंकूणही बघणार नाही असा दृढ निश्चय करायचो. पण बाईक काढण्यासाठी त्या पार्किंग एरियात घुसताना बटाटा भजीचा सुंगध नाकात पोचायचाच आणि माझा सगळा दृढ निश्चय गळून पडायचा. कधी भजी थंड असेल किंवा संपली असेल तर माझा पडलेला चेहरा बघून त्या ताई माझ्यासाठी खास भजी तळून द्यायच्या. त्यांच्याकडचा वडा-पावही सुंदर असायचा पण मला मोह मात्र भजी-पावचाच. नंतर अस्मादिकांची बदली नवी मुंबईत झाल्याने कारने घर ते ऑफिस आणि परत असा प्रवास सुरु झाला आणि भजीच्या स्टॉलचा संपर्क तुटला. (अर्थात त्यामुळे वजन वाढण्याच्या प्रमाणात काही फरक पडला नाही ही बाब अलहीदा.)
नाही म्हणायला गेल्या वर्षी ऑफिसच्या दौऱ्यावर जात असताना कसाऱ्याला माझ्या एका सहकाऱ्याने मला कांदा भजी चारली होती. स्वाद उत्तम होता पण अंमळ महागच वाटली. भाषेत काय गंमत असते बघा. प्रत्येक प्रांतातल्या भाषेचा गोडवा अवीट असतो. आता हा ‘चारली’ शब्द मला एवढा आवडला की त्याचा उल्लेख इथे करावाच लागला. याच दिवशी मला अजून शब्दाचा अनुभव आला. थोडं विषयांतर होतय पण तुमच्याशी शेअर करायचला नक्की आवडेल. या सहकाऱ्याने अस्मादिकांना त्या दिवशी घरी आग्रहाचे जेवणाचे निमंत्रण दिले. आग्रह काही मोडता येत नव्हता, सहकाऱ्याच्या सौभाग्यवतीने आम्ही घरी पोहचायच्या आत जेवण तयार ठेवले होते. दौरा पुढे कन्टयूनू करायचा असल्याने मला घाई होतीच. त्यांच्या घरी पोहचल्यावर लगेच ताट पुढे आले. आग्रह करुन करुन ताटात जेवण वाढलं जात होत, एवढ्यात एक प्रश्न येऊन थडकला..’साहेब कशी वाटली भाजी?’ अस्मादिक उडालोच, ताटात पुन्हा पुन्हा निरखून पाहू लागलो, नाही माझं काहीच चुकत नव्हते पूर्ण नॉन-व्हेज जेवण असताना, भाजी आवडली का? असा प्रश्न का आला हे मला काही समजेना. पण ‘भाजी’ म्हणजेच ‘चिकन’ हे कळल्यावर मात्र मला महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात असलेल्या भाषेची अजून एक गंमत कळाली.
असो, आपण पुन्हा आपल्या भजी-पुराणाकडे वळूया. भज्यांबद्दल लिहीत असताना अस्मादिकांच्या वेंगुर्ल्यातील भज्यांचा उल्लेख झाला नाही तर तो वाचकांवर अन्यायच होईल. तर, रामेश्वर मंदिराच्या शेजारची रेडकरांकडील बटाटा भजी, आबा कुळकरांकडची भजी, बोक्याच्या हॉटेलातील भजी, केळजीच्या हॉटेलातील भजी, फटू कडची भजी, तृप्ती हॉटेलातील भजी … नावं काही संपतत नाहीत. वेंगुर्ल्याहून मुंबईला स्थायिक होण्यापूर्वी आमच्या घरा शेजारी डेऱ्याचे हॉटेल सुरु झाले होते. मी त्यांच्या हॉटेलात त्यावेळी गेलो होतो ते त्यांच्याकडची पातळ भाजी आणि पाव खायला. पुढे या हॉटेलने  वेंगुर्ल्यात बराच जम बसवला. अलीकडे मी इथे एका बिल्डराकडून फ्लॅट खरेदी केला. तेंव्हा त्या कॉम्लेक्सच्या पत्त्यात ‘डेरे हॉटेलच्या बाजूला असा उल्लेख पाहून’ आता त्या हॉटेलचे वेंगुर्ल्यात काय स्थान असेल याची कल्पना आली असेलच.
मुंबईला स्थायिक झाल्यावर आई हयात असताना जेंव्हा जेंव्हा मी वेंगुर्ल्याला जायचो, तेंव्हा आई या हॉटेलातून मला खाऊ म्हणून भज्याची पुडी आणून द्यायची. पुढे यात माझा चिरंजीव वाटेकरी झाला. मायेने आणलेल्या भजीच्या पुडीचा खाऊ खाल्ला नाही असा महाराष्ट्रीयन तुरळच भेटेल. विषेशत: खेडेगावात आणि छोट्या शहरात, बाजारातून येताना नाक्यावरुन पोरांना भजीची पुडी आणली जायची. पूर्वी पानात बांधून मिळणारी भजी आमच्या लहाणपणीच वर्तमान पत्राच्या कागदात गुंडाळून दिली जावू लागली. तेलकट झालेला तो पेपर आणि त्यावर गुंडाळलेला दोरा, पूडी हातात मिळाल्यावर पोरं त्यावर तुटून पडायचीत. ‘बाहेरचे खायचं नसतं, मी घरात बनवून देईन तुम्हाला भजी’ असे घरातल्या जाणत्या स्त्रीचे शब्द कानावर पडेपर्यंत हातात फक्त तेलकट कागद आणि दोरा शिल्लक उरायचा. पण त्या भजीच्या पुडीत असलेले प्रेम आणि बाहेरची खायची हौस ही त्यावेळच्या पिढीची एक रम्य आठवण.
कांदा-भजीला खेकडा-भजी हे पडलेले नाव तेवढेच गमतीदार वाटते. असो, हे भजी पुराण जेवढं लिहू तेवढं रंगतच जाणार, पण आता आवरतं घ्यावच लागणार. ते बघा हा लेख वाचता वाचता दादा भजीच्या टपरीवर पोहचले सुध्दा. ताईंच्या डाव्या हातात मोबाईल आणि उजवा हात बेसनाच्या डब्यात पोहचलाय. अरे.. भाऊंनी रुमाल काढून मोबाईलची स्क्रीन पुसायला घेतली… राहूंदे भाऊ…. कळतंय आम्हाला, भजी हा विषयच असा आहे.. तोंडाला पाणी आणणारा. आता अजून तुमचा वेळ घेत नाही, अल्पविराम घेतोय. लवकरच भेटू पुढच्या लेखात, धन्यवाद !
संजय गोविंद घोगळे
    (8655178247)
तुम्ही लिहिलेले लेख आमच्या ह्या सदराखाली प्रकाशित करायच्या असतील तर ९३५६९६८४६२ ह्या नंबरवर Whatsapp करा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search