अंबरनाथ : अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. हे एक भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत.या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे.अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते.
अंबरनाथ शिवालय’ पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे.
1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि ‘Bombay branch of the Royal Asiatic Society’च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.
त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये “…हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले”, असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव ‘आम्रनाथ’ असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.
पर्यटकांसाठी पर्वणी
केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र, कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र, याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.
तिथून एक रिक्षा केली की सुमारे अडीच किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. आणि अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.
Vision Abroad