सिंधुदुर्ग: कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरातला पळवला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील वेंगुर्ले येथील निवती रॉक येथे पाणबुडी पर्यटन प्रकल्प होणार होता; मात्र आता हा प्रकल्प द्वारका येथे होणार असून, पुढील महिन्यात होणाऱया ‘व्हायब्रंट गुजरात समिट’मध्ये याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात केंद्र सरकारविरुद्ध संतप्त भावना आहे.
गुजरात सरकारने माझगाव डॉकसोबत यासाठी करार केला आहे. यानुसार 35 टन वजनाची आणि 24 प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारी पाणबुडी विकसित केली जाणार आहे. या पाणबुडीमध्ये 24 प्रवासी दोन रांगेत बसतील. प्रत्येक सीटला काचेची विंडो असेल. त्यामुळे समुद्रातील 300 फूट खाली असलेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांना अनुभवता येईल. दरम्यान, माझगाव डॉकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव सिंघल यांनी सामंजस्य करार केल्याचे सांगितले.
कोकणच्या पर्यटनाला चालना देणारा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प होता. त्यासाठी 2018च्या अर्थसंकल्पात तरतूदही केली होती. सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती रॉक येथे समुद्र विश्व पाहण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येणार होता.
केंद्राने अलीकडेच मालवणमध्ये ‘नौदल दिन’ साजरा केला. त्यातून सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याचे स्वप्न दाखवले. मात्र काही दिवसांतच या आनंदावर पाणी फेरले. पहिल्या वर्षी 5 हजार प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती तसेच 100 ते 150 कोटींची उलाढाल करण्याची क्षमता असलेला महत्त्वाकांक्षी पाणबुडी प्रकल्प हिसकावण्यात आला.
कोकणात रिफायनरी सारखे निसर्गाला हानिकारक प्रकल्प लादले जात आहेत असे प्रकल्पाला विरोधकांचे म्हणणे आहे. कोकणाला विध्वंसकारी प्रकल्प न देता पर्यटनाला चालना देतील असे प्रकल्प देण्यात यावेत अशी मागणी होत आहे. मात्र प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यात येत असल्याने कोकणवासीय नाराज झाले आहेत.
Facebook Comments Box
Vision Abroad