Konkan railway news : रेल्वेने जुन्या प्रकारातील ICF डब्यांसह धावणाऱ्या गाड्या आता आधुनिक प्रणालीच्या लिंके हॉफमन बुश (एलएचबी) मध्ये रूपांतरित करण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोकण रेल्वेमार्गावरून जुन्या प्रकारातील डब्यांसह धावणारी अजून एक लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी आता लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डब्यांसह धावणार आहे. गाडी क्रमांक १६३३७/१६३३८ ओखा एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस ही गाडी या महिन्याच्या ५ तारखेपासून एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेतर्फे देण्यात आली आहे.
वेगवान प्रवासासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इंटिग्रल कोच फॅक्टरी या जुन्या प्रकारातील डब्याचे रुपांतर एलएचबी डब्यात केले जात आहे. भारतीय रेल्वेच्या प्रत्येक विभागात ही प्रक्रिया सुरू असून, शेकडो रेल्वेगाड्या एलएचबी डब्यांसह धावत आहेत. आता कोकण रेल्वेवरील एलएचबी डबे असलेल्या रेल्वेगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात येत आहे.
गाडी क्रमांक १६३३७ ओखा एर्नाकुलम एक्सप्रेस दिनांक ८ एप्रिलपासून ओखा येथून तर गाडी क्रमांक १६३३८ एर्नाकुलम ओखा एक्सप्रेस दिनांक 5 एप्रिलपासून एर्नाकुलम येथून एलएचबी डब्यांसह धावणार आहे. एक्सप्रेस गाड्यांना एलएचबी डबे जोडल्याने रेल्वे गाड्यांच्या डब्याच्या रचनेत थोडा बदल झाला आहे. सुधारित डब्यांच्या संचनेनुसार वातानुकूलित द्वितीय श्रेणी २ डबे, वातानुकूलित इकॉनॉमी तृतीय श्रेणीचे ३ डबे, १२ शयनयान डबे, सामान्य २ डबे, जनरेटर कार एक डबा, एसएलआर डबा एक, पॅन्ट्री कार एक असे एकूण २२ डबे असणार आहेत, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली.
Facebook Comments Box
मंगलोर एक्स्प्रेस केव्हा LHB होणार आहे.