सावंतवाडी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शस्त्रधारकांना शस्त्र जमा करण्यासंबंधी काढलेल्या नोटिसीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव असल्याने खळबळ माजली आहे. मात्र या बाबत दीपक केसकर यांनी आता साष्टीकरण दिले आहे.
मंत्री केसरकर यांनी याबाबत प्रसिध्दी पत्र देऊन बाजू स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची बंदुक नाही, वडिलांच्या कालावधीत त्यांच्याकडे दोन बंदुकांचा परवाना होता. त्यातील एक बंदूक ही वारसाने प्राप्त झाली व एक बंदूक माझ्या वडील बंधूंना प्राप्त झाली. वडिलांची आठवण म्हणून ही शस्त्रात्रे आजही पुजण्यासाठी आम्ही वापरतो. गेल्या पन्नास वर्षांत त्या शस्त्रांचा वापर झाला नाही. निवडणूक काळात शस्त्रे जमा करण्याचे आदेश पारित होतात. वेळोवेळी आम्हीही ती जमा केली आहेत. परंतु, ‘मंत्री केसरकर यांच्यासह १३ जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश’ अशी बातमी चुकीची असून जनतेची दिशाभूल करणारी आहे. नव्याने झालेल्या कोर्टाच्या निर्णयानुसार सर्वांची शस्त्रे सरसकट जमा करणे योग्य नसल्याने, योग्य कारण असल्यास ती हत्यारे जमा न करण्याबाबत बंधन प्रशासनावर घालण्यात आले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने सर्व शस्त्रधारकांना नोटीसा दिल्या आहेत. केवळ शस्त्राचा परवाना असल्याने अशाप्रकारची बदनामी होणे गैर आहे, असे मंत्री केसरकर यांनी पत्रात म्हटले आहे.
तालुक्यातील १३ जणांची यादीमध्ये नावे असून सर्वांत शेवटचे नाव दीपक केसरकर यांचे आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी शंका उपस्थित झाली आहे. एखाद्या दंगलीत समावेश होता, की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, की एखाद्या प्रकरणात जामीनावर मुक्तता झाल्यामुळे त्यांचे नाव यादीत आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात होते त्यावर दीपक केसकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. .
Facebook Comments Box


