सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी या तीन स्थानकाच्या सुशोभीकरणाचे काम खूप कमी वेळात पूर्ण झाले असून आज या स्थानकांचे त्यांचाच हस्ते लोकार्पण होणार आहे.
कोकण पट्ट्यातील एकूण १२ स्थानकांचे सुशोभीकरण करण्यासाठी त्यांनी १०० कोटी मंजूर करून घेतले. सावंतवाडी स्थानकाचे सुशोभीकरण पूर्ण झाले असून या कामाला सुमारे ९ कोटी खर्च आला. या स्थानकाचे बाहेरचे रुपडे पालटून एखाद्या विमानतळाचे स्वरूप आले आहे. एखाद्या पर्यटन जिल्ह्याला साजेसे अशा स्वरूपाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. प्रशासनाने केलेल्या या कामाबद्दल प्रवाशांकडून, प्रवासी संघटनेंकडून समाधान व्यक्त होत आहे. मात्र एक प्रश्न अजूनही अनुत्तरीत राहतो. “नवरी तर नटली पण सुपारी कधी फुटणार?”
आंबोली, रेडी, सावंतवाडी शहर, तळकोकणातील समुद्र किनारे या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी, दोडामार्ग तालुक्यातील काही भाग, सावंतवाडी पंचक्रोशी, बांदा, शिरोडा, वेंगुर्ला या मोठ्या पट्ट्यातील प्रवाशांसाठी सावंतवाडी स्थानकाचा विकास होणे खूप गरजेचे आहे. सध्याची परिस्थिती बघता या स्थानकावर खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संख्या पाहता हे थांबे पुरेसे नाही आहेत. त्यामुळे वंदे भारत, मंगलोर एक्सप्रेस आणि ईतर प्रमुख गाड्यांना येथे थांबे मिळणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे मंजूर झालेल्या टर्मिनसचे काम पूर्ण होणे. ९ वर्षापूर्वी सावंतवाडी स्थानकाचे ‘सावंतवाडी टर्मिनस’ या नावाने तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते भूमिपूजन झाले होते. कोकण रेल्वेचा लाभ खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील कोकणातील जनतेला व्हावा यासाठी सावंतवाडी येथे टर्मिनस होणे खूप गरजचे आहे ही गोष्ट सुरेश प्रभू यांच्या तेव्हाच लक्षात आली होती. टर्मिनस झाल्यास मुंबई /कल्याण/पुणे ते सावंतवाडी दरम्यान गाड्या चालविण्यास शक्य झाले असते. मात्र सुरेश प्रभू यांचा मंत्रिपदावरुन पायउतार होताच टर्मिनसचे काम रखडले ते आजतागायत अपूर्णच आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे टर्मिनसच्या दुसर्या टप्प्यातील कामासाठी आलेला निधी परत गेला. ‘सावंतवाडी टर्मिनस’ अशा नावाने भूमिपूजन झाले असूनही अजूनही रेल्वे रेकॉर्ड मध्ये ‘सावंतवाडी रोड’ असा उल्लेख होत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या प्रयत्नांने सार्वजनिक बांधकाम विभाग PWD आणि कोकण रेल्वे KRCL यांच्यात एक सामंजस्य करार झाला. या करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कोकण रेल्वे च्या १२ स्थानकाच्या बाहेरील सुशोभीकरणाची आणि रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांच्या पुनर्बांधणी करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि कमी वेळात ती पार पाडत आहे. मात्र आता कोकण रेल्वेने स्थानकाच्या आतील सुधारणांची जबाबदारी घेतली पाहिजे. सावंतवाडी स्थानकावर सध्या शेड नसल्याने प्रवाशांना ऊन आणि पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व प्लॅटफॉर्मवर शेड बांधणीचे काम प्राधान्याने घेण्याची गरज आहे. सध्या स्थानकावरील तिकीट आरक्षण खिडकीची वेळ दुपारी २ वाजेपर्यंत आहे ती पूर्णवेळ करण्याची गरज आहे.
सावंतवाडी शहर ते मळगाव रस्ता दुपदरीकरण होणे गरजेचे.
तालुक्याच्या विकासासाठी रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतूक यांचा बरोबरीने विकास होणे गरजेचे आहे. संपूर्ण जिल्ह्यातील सावंतवाडी हे एकमेव स्थानक शहरापासून दूर आहे. हे अंतर ८ किलोमीटर एवढे आहे. तसेच मार्गावर घाटरस्ता लागतो. त्यामुळे सावंतवाडी शहर ते मळगाव ही वाहतूक जलद होण्यासाठी हा रस्ता दुपदरीकरण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
एसटी च्या वेळापत्रकात बदल आवश्यक
मळगाव ते वेंगुर्ला, शिरोडा, बांदा आणि सावंतवाडी जाण्यासाठी एसटी आणि रिक्षा हे दोन पर्याय प्रवाशांनकडे आहेत. अंतर जास्त असल्याने सर्वच प्रवाशाना रिक्षाने प्रवास करणे परवडत नाही. त्यामुळे सामान्य प्रवाशांसाठी एसटीने या मार्गावर लवचिक वेळापत्रक अंगीकारणे आवश्यक आहे. सध्या प्रवाशांना इतर गावांसाठी चालविण्यात येणाऱ्या बसवर अवलंबुन राहावे लागत आहे. सावंतवाडी आगाराची अजूनही फक्त रेल्वे स्थानकाला विशेष बस नाही आहे. रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एसटीच्या या मार्गावरील बसच्या वेळापत्रकात बदल केल्यास त्याचा फायदा प्रवाशांना तर होईलच आगाराच्या उत्पन्नातही भर पडेल.
Facebook Comments Box
Vision Abroad