सिंधुदुर्ग: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पुतळा कोसळण्याची घटना काल घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत संताप व्यक्त केला गेला. पुतळा उभारणीत हलगर्जीपणा झाला असून हा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदलाने एक पथक नेमले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत नौदलाने सांगितले की, “राज्य सरकार आणि तज्ञांसह, नौदलाने या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे.” लवकरच हे पथक या घटने मागची कारणे शोधून आपला अहवाल सादर करेल. मात्र त्याआधी पुतळा कोसळण्यामागची कोणते कारणे असू शकतात, कोणते आरोप होत आहेत ते पाहू.
निकृष्ट दर्जाचे काम?
राज्य सरकारने योग्य ती काळजी न घेतल्याने ही पडझड होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारने कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले नाही. केवळ कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे शिवसेनेचे (यूबीटी) आमदार वैभव नाईक यांनीही कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.
लोखंडी अँगल अर्धवट?
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.
पुतळा निर्मितीसाठी खूप कमी कालावधी?
उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या पुतळ्याच्या निर्मितीस खूपच कमी कालावधी भेटला असे या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे हे म्हणाले होते. अशा प्रकारच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी किमान ३ वर्षे लागतात मात्र आपण हा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केला असल्याचे ते म्हणाले होते.
अपूर्ण अभ्यास?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मागील २ दिवस ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होते . तर पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी येथील खाऱ्या हवेमुळे पुतळ्याच्या नट बोल्ड्सना गंज पकडली असे विधान केले आहे. कोणतेही बांधकाम करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे बांधकामात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र हा पुतळा उभारताना हा अभ्यास झाला नसल्याचे दिसून आले आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्टला नौदलाला पाठविले होते पत्र
महाराजांच्या पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी ज्या नट-बोल्टचा वापर केला होता ते आता पाऊस आणि खारे वारे यामुळे गंजले असल्याने पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्र मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते. मात्र या पत्राची दखल का घेतली नाही याबाबत नौदलाकडून काही उत्तर आले नाही आहे.
Vision Abroad