



सिंधुदुर्ग: मालवण राजकोट किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या ९ महिन्यात कोसळला. तमाम महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांची अशी अवहेलना खुद्द महाराष्ट्रातच होत असेल तर त्यापेक्षा मोठे दुर्दैव कोणते? महाराजांची यापेक्षा मरणोत्तर अपमान आणि अवहेलना ती कोणती?
घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यादृष्टीने कारवाई केली गेली पाहिजे होती. कोणी जबाबदार नेत्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे होती. मात्र घडले विपरीत…. कोणत्याही गोष्टीतील राजकीय फायदा बघणाऱ्या राजकारण्यांनी या घटनेचेही राजकारण सुरु केले. काल ठाकरे गट आणि राणे समर्थक एकाच वेळी राजकोट किल्ल्यावर आल्यावर खूप मोठा राडा झाल्याची घटना घडली. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते एकमेकांशी भिडले. या राड्याचे विडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेत. हे विडिओ बघताना ही घटना यूपी बिहारमध्ये घडत असल्याचे भासत होते.
सिंधुदुर्ग जिल्हा आणि राडा हे आता जणू समीकरणच झाले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे नाव खराब होत आहे. याला जबाबदार आहेत येथील राजकारणी. पण कालचा विषय हा राजकारणाचा नव्हताच. तरी यांनी ती संधी वाया जाऊ दिली नाही. अगदी प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा प्रकार घडला. पुतळा कोसळल्यानंतर महाराज येथून गायबच झाले जणू. मुख्य विषय बाजूलाच राहिला आणि त्याची जागा राजकारणाने घेतली. संपूर्ण देशात ज्या महाराजांची आराधना केली जाते त्यांचा पुतळा आपल्या घरात पडला ही शरमेची गोष्ट असताना येथील राजकारणी ताठ मानेने राडे करत आहेत? महाराजांचा पुतळा कोसळला हे कमी होते की काय म्हणून राजकारण्यांनी राजकोट किल्ल्याची तोडफोडही केली. त्यापेक्षा दुर्देव म्हणायचे तर त्यांना समर्थन देणारे आपलेच लोक आहेत.
आज सर्व सोशल नेटवर्किंग मीडियावर कालचा राडा कसा होता? कोणाला कशी धमकी दिली? कोणाची किती फा… ली? यासारख्या पोस्ट्स दिसत आहेत. अरे ज्यांच्यासाठी हे सर्व चालले ते छत्रपती शिवाजी महाराज कुठे गायब झालेत? पुतळा बांधणारा तो कंत्राटदार फरार झाला आहे याबाबत कोणाला काही सोयरसुतक आहे का?
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी येथे महाराजांचा १०० फुटी येथे लवकरच उभारला जाणार असे विधान केले. एक शिवप्रेमी म्हणून मला वाटते ईथे १०० फुटी सोडाच तर १ फुटी पुतळा सुद्धा नका उभारू. जेथे महाराजांची अशी अवहेलना केली जाते तिथे आमच्या दैवताचा पुतळा नकोच.