मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभेचा थेट मुकाबला महायुती व महाविकास आघाडीमध्येच होणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनुसार ज्यांचा ज्या मतदारसंघात आमदार ती जागा त्याच पक्षाला सोडली जाणार आहे. त्यानुसार कुडाळ मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. येथून निलेश राणे इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांनी दावा केल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करु शकतात.
तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते भाजपाच्या की शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर ही निव़डणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Vision Abroad